Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश बुद्धीच्या देवतेचा सण

बुद्धीच्या देवतेचा सण

बहुतांश वेळा स्मरणरंजनपर लेखांचं सार ‘आमच्या वेळी असं नव्हतं’ हेच असतं. पण ते तसं का नव्हतं किंवा आता हे असं का आहे, याची कारणमीमांसा करण्याची कटकटीची कामगिरी करण्यात कोणालाच स्वारस्य नसतं. गणेशोत्सवाच्या बाबतीतही तेच आहे.

Related Story

- Advertisement -

Disclaimer : प्रस्तुत लेखाचा उद्देश हा विचारमंथन आहे. कोणत्याही एका धर्मावर टीका करून दुसर्‍या धर्माची कणव घेण्याचा नाही. कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही.

खरं तर कोणत्याही लेखाला ही अशी पूर्वपिठिका जोडणं थोडंसं विचित्रच! पण काळ आणि वेळ दोन्ही असे आहेत की, काही गोष्टींचा खुलासा केल्याशिवाय तुम्ही तुमचं मत मांडलंत की, तुमच्यावर शिक्का बसलाच म्हणून समजा! त्यातून विषय गणेशोत्सव असेल, तर मग भावना दुखावणार्‍यांची संख्या आणि तुमच्यावर बसणारे शिक्के यांचं प्रमाण कोट्यवधींनी वाढतं.
तर, नमनालाच एवढं घडाभर तेल ओतल्यावर तुम्हाला या लेखाच्या विषयाची साधारण कल्पना आली असेलच. देशभरात साजर्‍या होणार्‍या अनेक सणांमध्ये गणेशोत्सव, दिवाळी, नवरात्र, ख्रिसमस यांचा नंबर खूप वरचा! त्यातही महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम आणखीच वेगळी. लहानपणापासूनच हा सण माझाही आवडता होता. अजूनही आवडतो अधेमधे. पण लहानपणी हा सण आवडण्याची आणि आता आवडण्याची कारणं मात्र प्रचंड बदलली.

- Advertisement -

श्रावणाचा पहिला पंधरवडा संपला की, साधारण गणेशोत्सवाची चाहुल लागायला सुरुवात व्हायची. आमच्या गल्लीचा सार्वजनिक गणपती असायचा. त्याचा मंडप घालायला सुरुवात झाली की, गणपती बाप्पाचे वेध लागायचे. ते बांबू, सुतळीच्या ओल्या दोर्‍या, जाड कापडाच्या ताडपत्री, त्या झाकायला त्यांच्यावर लावलेलं पांढरं-निळं कापड या सगळ्यांचा एक विशिष्ट गंध यायचा. मंडप रिकामा असला की, तिथे जाऊन दीर्घ श्वास घेऊन तो गंध साठवत राहावं असं वाटायचं. मग तयारी सुरू व्हायची ती सजावटीची!

सुदैवाने गल्लीत माझ्या आणि माझ्या आसपासच्या वयोगटातील 20-25 मुलं सहज होती. थोडीफार समज यायला लागल्यापासून म्हणजे साधारण पाचवी-सहावीपासून आम्हा मुलांनीच सजावटीचा जिम्मा आमच्याकडे घेतला होता. त्यामुळे सजावटीचा विषय ठरवणं, त्यासाठी खरेदी करणं, ते सगळं मंडपात आणणं, मग कागदांची कापाकापी, पुठ्ठे वाकवणं वगैरे गोष्टी जोमानं चालायच्या. शाळा सुटल्यावर पावलं गणपती बाप्पाचं विसर्जन होण्याच्या दिवसापर्यंत थेट मांडवाकडेच वळायची.

- Advertisement -

गणपती बाप्पाचं आगमन हा तर त्या काळच्या भावविश्वातला उच्च बिंदू होता. वक्राकार सोंड, अर्धोन्मिलित डोळे, शांत मुद्रा, असा तो गणपती बाप्पा कारखान्यातून हातगाडीवर विराजमान झाला की, त्याच्या शक्य तेवढ्या जवळ राहण्याचा प्रयत्न करायचा. गणपतीच्या सोंडेवरून हात फिरवण्याची माझी इच्छा आजतागायत पूर्ण झालेली नाही. ‘तो सोवळ्यातला असतो, त्याला हात लावायचा नाही,’ अशी दटावणी असंख्य वेळा ऐकली आहे.

गणपतीची प्राणप्रतिष्ठापना झाली की, पुढले चार-पाच दिवस मंडपात आम्हा मुलांचा धुमाकूळ असायचा. गणपतीची सोबत करायला दिवसभर बसूनही मन भरायचं नाही. रात्रीच्या वेळी बाबा आणि त्यांचे मित्र मंडपात सोबतीला असायचे. रात्र-रात्र जागवायचे. क्वचित पत्तेही खेळायचे. या पाच दिवसांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा व्हायच्या, गल्लीतल्या मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. माझ्या वडिलांनी बसवलेलं ‘पुरुषांचं हळदीकुंकू’ हे नाटकही चांगलंच लक्षात आहे. कॅरमच्या स्पर्धांदरम्यान खेळणार्‍यांच्या बाजूला कोंडाळं करून उभे असलेल्यांचा कोलाहल लक्षात आहे.

पाच दिवस कसे सरायचे, कळायचंच नाही. घरी गणपती बाप्पा नसला, तरी शाळेतला-गल्लीतला बाप्पा आपलाच वाटायचा. कधी एकदा शाळा सुटते आणि कधी एकदा मंडपात येतोय, असं व्हायचं. शाळावाले पण बेटे या दिवसात अर्धा दिवस वगैरे शाळा ठेवून आम्हा मुलांची सोय बघायचे. लाऊडस्पीकरवर गाणी लावण्याचा काळ नुकताच सुरू झाला असावा. मोठ्यांकडून फिल्मी गाणी न वाजवण्याची सक्त ताकीद असायची. त्यामुळे ‘श्री गणरायाच्या आगमनानं…’ अशा साचेबद्ध वाक्यानं आणि साचेबद्ध आवाजात सुरू झालेल्या निवेदनानंतर वाजणारी ‘ओंकार स्वरूपा’, ‘अशी चिक मोत्याची माळ’ वगैरे गाण्यांचा रतीब पाच दिवस चालायचा. रूचीपालट म्हणून ‘शिवकल्याण राजा’ लागायचा.

मग उगवायचा तो विसर्जनाचा दिवस! ‘दिवस उगवला विसर्जनाचा…’ या गाण्याने तो सुरू व्हायचा. गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी भाजीवाल्यांकडे असते, तशी हातगाडी कुठून तरी पैदा केली जायची. त्याला चार बाजूंना चार आणि मध्ये दोन अशा सहा काठ्या उभ्या ठोकल्या जायच्या. त्या काठ्यांना बाकी तीन बाजूंनी पताका, झिरमिळ्या, फुलांच्या माळा लावल्या जायच्या. मग संध्याकाळी उत्तरपूजा झाली की, मांडवातली शेवटची आरती व्हायची आणि मंत्रपुष्पांजलीला आम्हा सगळ्या लहान मुलांना रडायला यायचं. बाप्पा मखरातून उठायचे आणि त्या गाडीत विराजमान व्हायचे. गाडीसमोर आम्ही मुलं-मुली, आमचे आई-बाप दोन बाजूंना रांगा करून लेझीमच्या नाचासारखे नाचत गाणी म्हणत तळ्यापर्यंत जायचो. ‘पार्वती बोले शंकराला, गणपती आपला निघाला,’ ‘पायी हळूहळू चाला…’ वगैरे गाणी गात गात, गुलाल उधळत, कधी फुगड्या घालत, कधी डबलडेकर फुगडी घालत अशी ती मिरवणूक निघायची. तळ्यावर कापूर आरती व्हायची आणि मग बाप्पाचं विसर्जन व्हायचं. वडिलांच्या खांद्यावर बसून आम्ही मुलं आमचा बाप्पा पाण्यात खाली खाली जाताना बघून आसवं गाळायचो. गल्लीत परत आल्यानंतर रिकामा झालेला मांडव डोळ्यांना आणि काळजाला चटका लावायचा.

त्या काळी बहुतांश ठिकाणी गणपतीचा थाट साधारण असाच होता. जागतिकीकरणाची कवाडं खुली झाली असली, तरी जागतिकीकरणाचं वारं धुमाकूळ घालायच्या आधीचा तो काळ होता. लहान असल्यामुळे असेल कदाचित, पण या गणेशोत्सवाचं धार्मिक अंग त्या वेळी जाणवायचं नाही. सगळ्या मित्रमैत्रिणींनी एकत्र येऊन मजा करत साजरा करायचा सण, एवढाच त्याता परीघ होता. वर्गणी गोळा करणारे आणि देणारेही अंथरूण पाहून पाय पसरणारे होते. त्यामुळे विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजेच काय, लाऊडस्पीकरही लागायचे होते. ढोल-ताशे मात्र त्याही वेळी गर्जायचे.

गणपतीच्या मंडपात असलेल्या जाहिरातींचे बॅनरही अगदी मोजके असायचे. त्यात एखादा बर्‍यापैकी गल्ला जमवणारा स्थानिक दुकानदार, स्थानिक आमदार, स्थानिक खासदार, त्या-त्या भागातली एखादी सहकारी बँक आणि एखादा ज्वेलर्स यांच्या जाहिराती तेवढ्या दिसायच्या. मोठाल्या मंडळांची उलाढालही कोट्यवधींमध्ये पोहोचली नव्हती. गल्लीतल्या किंवा विभागाच्या मंडळाच्या गणपतीची सजावट करायला खास चित्रपट सृष्टीतले सेट डिझायनर्स बोलवायला लागण्याच्या आधीचा तो काळ होता!

नेमकं कधीपासून बिनसायला सुरुवात झाली, ते कळत नाही. पण जागतिकीकरणाच्या फळांचे तुकडे मध्यमवर्गीयांच्या घरात झिरपायला लागले, लोकांच्या हाती पैसा खुळखुळायला लागला, राजकारण्यांकडे अमाप पैसे आले आणि गणेशोत्सवाचं रूपडं पालटायला लागलं. आधीही गल्लीचा गणपती हा अभिमानाची गोष्ट होती. पण आता त्या अभिमानाची जागा जाज्ज्वल्य अभिमानाने घेतली. शेजारच्या मंडळासोबतची स्पर्धा वाढायला लागली. पूर्वी स्पर्धा नव्हती, असं अजिबात नाही. पण ‘तुम्ही प्रशांत दामलेचं नाटक आणलंत, तर आम्ही ‘मंगलगाणी दंगलगाणी’ आणू’, एवढं निकोप त्या स्पर्धेचं स्वरूप होतं. राजकीय नेतेही देणगी वगळता या मंडळांपासून व्यवस्थित अंतर राखून होते.

हळूहळू राजकीय नेत्यांना आपल्या शक्तीप्रदर्शनासाठी या सणांची गरज भासायला लागली आणि मला वाटतं, तिथे सगळं बिघडत गेलं. दहीहंडीचा पार ‘मटका’ झाला आणि गणेशोत्सवाचा ‘गणेश फेस्टिव्हल’ झाला आणि या सणांपोटी असलेला निरागसपणा पुरता हरवला. मग उरलं ते संपत्तीचं ओंगळ प्रदर्शन, डीजेचा कानठळ्या बसवणारा आवाज आणि फटाक्यांमध्ये घुसमटणारा श्वास! मिरवणुकीच्या नावाखाली दारू पिऊन केलेल्या धांगडधिंग्याने तर याची परिसीमा गाठली. ‘हिंदू संस्कृती’च्या नावाखाली हा सगळा नंगानाच सुरू झाला आणि मग मला स्वत:ला हा असला हिंदू म्हणवून घ्यायला लाज वाटायला लागली.

गणेशोत्सवाचा आणि माझा संबंधं संपला तो तिथे! या काळात जोरजोरात होणारे आवाज, फटाके यामुळे गोंधळून हरवणारे मुके प्राणी बघितले आणि माणूस म्हणून घेण्याचीही लाज वाटायला लागली. सणांभोवती अर्थकारण फिरतं हे मान्य, पण म्हणून सणांना तमाशातल्या दौलतजादाचं स्वरूप आणायलाच हवं होतं का? एखाद्या सोसायटीत सगळ्या मुलांनी एकत्र येऊन दहीहंडी फोडली, तर तेवढं पुरेसं नाही का? लाखालाखांचे मटके उभारल्याशिवाय आणि दारूच्या नशेत एकाच बाईकवरून फिरणारे तीन-चार गोविंदे गोळा केल्याशिवाय हिंदू धर्माचं आणि संस्कृतीचं रक्षण होऊच शकत नाही काय? गुढीपाडव्याला घरात गुढी उभारून आप्तजनांसोबत तो दिवस घालवून तो सण साजरा होऊच शकत नाही का? त्यासाठी स्वागतयात्रा काढावीच लागते का? सणांद्वारे शक्तिप्रदर्शन करण्याची गरज खरंच एवढी का बोकाळली आहे? न्यू ईअरच्या आदल्या रात्री दारू प्यायलाशिवाय नवीन वर्षं सुरूच होत नाही का? ईदला बोकड कापला नाही, तर ईद मुबारक होणारच नाही का? दुसर्‍यांना त्रास दिल्याशिवाय आपला एकही सण साजरा होऊ शकत नाही का? बुद्धीच्या देवतेचा हा सण सारा करताना लोक आपली बुद्धी गहाण का टाकतात? हे सगळे प्रश्न मला अस्वस्थ करायला लागतात आणि मी त्या गणेशोत्सवापासून आणि पर्यायाने गणपती बाप्पापासून लांब जायला लागतो.

कधीकधी वाटायला लागतं, या सगळ्याच समाजापासून आपण तुटत चाललो आहोत. आपण या समाजात वावरत असलो, तरी समाजमान्य रूढी-परंपरांचा आपण भाग नाही. आपण आपली मुळं तर गमावली नाहीत ना, अशीही शंका येते. पण मग गुरूदेव रवींद्रनाथ टागोरांचं ‘एकला चालो रे’ आठवतं. बाजूने ‘मुन्नी’ किंवा ‘शिला’च्या तालात बेभान झालेल्या गणपती विसर्जन मिरवणुकीकडे बघून मी एक सुस्कारा सोडतो आणि मनातल्या मनात पुटपुटतो, ‘How Green Was my Valley&’

- Advertisement -