सोन्याच्या पावलांनी गौरी आली माहेरी!

‘आली आली गौराई, सोन्यारुप्याच्या पावलानं.. आली आली गौराई, धनधान्याच्या पावलानं..’ या स्वागत गीतासह पारंपरिक पद्धतीने आज गौरीचं आगमन होणार आहे. यासाठी घराघरातील गृहिणींकडून मंगलमय वातावरणात तयारी सुरू आहे. माहेरवाशीण म्हणून असलेल्या महालक्ष्मी तथा गौराई अनेक घरांमध्ये पिढ्यानपिढ्या बसविल्या जातात. काही घरांमध्ये नवसाच्या, तर काहीजण हौस म्हणून गौराई बसवतात. स्थळपरत्वे गौरींच्या पूजेची पद्धत आणि परंपरा बदलल्या आहेत. काही कुटुंबात गौरींचे मुखवटे असतात, तर काही कुटुंबात परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींनाच साडी चोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात. काही घरांमध्ये धान्यांची रास म्हणजेच गहू, तांदूळ,ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी एकदोन धान्यांचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात.

महाराष्ट्रात इतर सण-उत्सवांप्रमाणे गणपती व गौरीची मोठ्या आतुरतेने वाट पाहिली जाते. घराघरात श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासूनच या उत्सवांची लगबग सुरू होते. भाद्रपद चतुर्थीला लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन झाले की तिसर्‍या दिवशी गौरींचे अगमन होते. महाराष्ट्राच्या समाजजीवन परंपरेमध्ये गौरी पूजनालादेखील मोठे महत्व आहे. गौरीला शिवाच्या शक्तीचे म्हणजेच गणरायाच्या आईचे रूप मानले गेले आहे. अनेक भागात याला महालक्ष्मी रूपातही पुजले जाते. गणेशोत्सवाच्या 10 दिवसातच येणार्‍या गौरी पूजनोत्सवात प्रत्येक जण आपापल्या कुटूंबातील पद्धती, परंपरा व कुळाचारानुसार दरवर्षी गौरी पूजन करतात. यात गौरींचे आगमन,भोजन आणि विसर्जन असा तीन दिवसांचा हा उत्सव कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशासह इतर भागातही भक्तिभावाने साजरा केला जातो.

हा उत्सव तीन दिवसातच असला तरी तो साजरा करण्याच्या पद्धतीदेखील प्रत्येक ठिकाणी निरनिराळ्या आहेत. काही ठिकाणी गौरींचे फक्त मुखवटे असतात,काही भागात लाकडी,पितळी अथवा पंचधातूंच्या मूर्तींवर मुखवटे बसवून त्यांचा साज-शृंगार केला जातो. काही कुटूंबांमध्ये खड्यांच्या गौरींचे पूजन केले जाते. यात कुटूंबातील कन्या किंवा सुवासिनी नदी किंवा पाणवठ्यावर जाऊन पाच,सात,अकरा संख्येने खडे आणून त्यांची पूजा करतात.

बहुजन समाजात मातीच्या 5 मडक्यांची उतरंड रचून त्यावर मुखवटे बसवतात व त्याला साडी-चोळी नेसवून शृंगार करतात. तर काही ठिकाणी घरातील धान्याच्या राशींची गौरी रुपात पूजा केली जाते. यात गहू व तांदळाच्या राशी करून त्यांचे पूजन केले जाते.

तेरड्याची गौर हा प्रकारही काही भागात, विशेषतः कोकणात बघायला मिळतो. कोकणात भाद्रपद सप्तमीच्या दिवशी सायंकाळी महिला तेरड्याची रोपे मुळासकट काढून आणतात. गौरी इल्यो असे म्हणत त्यांचे स्वागत केले जाते. तेरड्याची मुळे म्हणजेच लक्ष्मीची पावले मानली जातात. कोळी बांधव देवीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवितात. कोळी महिला रात्री पारंपरिक वेशभूषा करून नृत्य करतात. दुसर्‍या दिवशी म्हणजेच अष्टमीला महापूजा व नवमीला वाजत-गाजत मिरवणुकीने गौरी-शंकराचे विसर्जन केले जाते.

खान्देश,विदर्भ आणि मराठवाड्यात गौरींचे मुखवटे ठेवण्याची पद्धत असून या मुखवट्यांचेही अनेक प्रकार असतात. त्यात प्रामुख्याने शाडू माती,पितळ,कापड फायबरपासून बनविलेले मुखवटे बघायला मिळतात. तांब्यावर मुखवटा रेखाटून त्याचे गौरी रूप पूजण्याचीही पद्धती आढळते. इकडे गौरीला महालक्ष्मी म्हणूनच संबोधिले जाते. पश्चिम महाराष्ट्रात गौरी-गणपती, तर मराठवाड्यात महालक्ष्मी असे म्हणतात. महालक्ष्मीचा हा सण तीन दिवस असतो व तो घरोघरी साजरा केला जातो. पहिल्या दिवशी आगमन, दुसर्‍या दिवशी गौरी भोजन व तिसर्‍या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल अष्टमीला या गौरी-महालक्ष्मीचे विसर्जन करण्यात येते. तीन दिवस अगदी आनंदाचे, उत्सवाचे वातावरण असते. तिसर्‍या दिवशी गौरीचे विसर्जन होणार असल्यामुळे मात्र काहीशी दु:खाची छाया असते. महाराष्ट्राच्या काही भागात धातूच्या, मातीच्या प्रतिमा तयार केल्या जातात, कागदावरही देवीचे चित्र काढून पूजनाचा रिवाज आढळतो.

गौरींच्या बरोबरच काही ठिकाणी त्यांच्या मुलांचे(एक मुलगा व एक मुलगी) यांच्याही प्रतिमा साकारून त्यांचे पूजन करण्याची पद्धती आहे.

कालौघात गौरीची रूपे, पूजनाचे प्रकार,तसेच मांडण्याचा पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. आधुनिक काळात गौरींच्या रूपावरही आधुनिकतेचा ठसा उमटलेला दिसत असला तरी गौरींच्या रूपांमध्ये जशी विविधता आहे तशीच विविधता गौरींच्या पूजापद्धती व मांडणीमध्ये देखील दिसून येते. मात्र या विविधतेमध्ये तीन दिवसांच्या पूजेचा एक समान धागा आहे. ज्यात पहिल्या दिवशी गौरींचे आगमन, दुसर्‍या दिवशी पंचपक्वान्नांचे जेवण आणि तिसर्‍या दिवशी त्यांची पाठवणं,म्हणजेच विसर्जन.

पौराणिक कथेनुसार असुरांकडून होणार्‍या त्रासाला कंटाळलेल्या स्त्रियांनी आपल्या सौभाग्य रक्षणासाठी गौरीला साकडे घातले. भाद्रपद शुद्ध अष्टमीला गौरीने असुरांचा विनाश करून भूतलावरील सर्व प्राणीमात्रांना सुखी केले. तेव्हापासूनच अखंड सौभाग्य लाभावे म्हणून स्त्रिया ज्येष्टा गौरी व्रत करतात.

परंपरेनुसार गौरींच्या आगमनावेळी तिला घराच्या दारातून आणले जाते, तेव्हा गौरी घेऊन आलेल्या सुवासीनींचे पाय दूध आणि पाण्याने धुऊन पायावर कुमकुम स्वस्तिक काढले जाते. दारापासून गौरीच्या स्थापना ठिकाणी गौरीचे मुखवटे, लक्ष्मीच्या पायाचे ठसे घेत वाजत-गाजत त्यांचे स्वागत केले जाते. अंगणातील तुळशी वृंदावनापासून पावला-पावलांनी गौरींना घरात आणले जाते. यावेळी

गौरी आली, सोन्याच्या पावली
गौरी आली, चांदीच्या पावली
गौरी आली, गाई वासराच्या पावली
गौरी आली, पुत्र-पोत्रांच्या पावली
असे म्हणत गौरींचे स्वागत करतात.

गौरींचे दोन मुखवटे असतात. एकीला ज्येष्ठा तर दुसरीला कनिष्ठा म्हणतात.
स्थापित होण्यापूर्वी त्यांना घर, तिजोरी, धान्यखोली, दुधाचे ठिकाण, इ.गोष्टी दाखवून घरात ऐश्वर्य व सुबत्ता नांदावी यासाठी प्रार्थना करतात. सायंकाळी शेपू किंवा मेथीची भाजी व भाकरीचा नैवेद्य केला जातो.
दुसर्‍या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रात गौरीची पूजा केली जाते. सकाळी गौरी-महालक्ष्मीची पूजा-आरती झाल्यावर अनेक प्रकारची फळे, रेवडी,लाडू, बेसन लाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा नैवेद्य दाखविला जातो.
गौरी जेवल्यावर गौरीपुढे दोन गोविंद विडे ठेवतात.

संध्याकाळच्या आरतीच्या वेळी प्रसादात पूरणपोळी, ज्वारीच्या पीठाची अंबिल,भाजी, सोळा भाज्या एकत्र, इत्यादींचा समावेश असतो. याशिवाय शेंगदाणा आणि मसूराची चटणी, पंचामृत, पडवळ, आमटी, विविध प्रकारच्या भाज्या, पापड, लोणचे इत्यादीचाही नैवेद्य दाखविला जातो. महाराष्ट्रात काही ठिकाणी संध्याकाळी महिलांच्या हळदी कुंकवाचे आयोजन

केले जाते.
तिसर्‍या दिवशी मूळ नक्षत्रात गौरी-महालक्ष्मीचे विसर्जन केले जाते. त्या दिवशी सकाळी कापसाची गाठ बांधतात. सूतामध्ये हळद, फळे, तमालपत्र, फुलं, झेंडूची पाने, काजूची फुलं, रेशीम धागा मिसळला जातो. त्यानंतर गौरी- महालक्ष्मीची पूजा व आरती होते.

यावेळी गौरींना गोड शेवयांची खीर, उडदाचा पापड अर्पण केला जातो. हा दिवस गौरींचा परतीचा दिवस असतो. यादिवशी गौरीची पूजा व आरती करतात. आरतीनंतर पुढच्या वर्षी येण्याचे आमंत्रण दिले जाते. त्यानंतर गौरींना निरोप देत त्यांचे विधिवत विसर्जन केले जाते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात या दिवशी गौरीच्या पूजेबरोबरच कापसाच्या धाग्याला सोळा गाठी देऊन हळदीने रंगवले जाते. नवीन पीक येईपर्यंत ही दोरी गळ्यात बांधतात.

अश्विन वद्य अष्टमीला ही दोरी गळ्यातून काढून महालक्ष्मीला अर्पण केली जाते.

काही ठिकाणी गौरीसोबतच गणपतीचेही विसर्जन होते. तर काहींकडे गौरी विसर्जन झाल्यानंतर 10 दिवसांनीच गणपतीचे विसर्जन होते. दीड दिवसाचा गणपती ज्यांच्याकडे असतो, त्यांच्याकडे गौरी आणि गणपतीची भेट होत नाही. अलिबाग, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग भागात सुपे ओवसण्याची (ओवाळण्याची) प्रथा आहे.

हा प्रकार दरवर्षी होत नसून ज्या वर्षी, पूर्वा नक्षत्रावर गौरीचे पूजन होते त्याच वर्षी सुपे ओवसली जातात. घरात लग्न झाले की, चोळीखण, पाच फळे, मोदक, करंजा, लाडू यासारखे पाच पदार्थ व पूजा साहित्याने भरलेले नवीन सूप डोक्यावर घेऊन नववधू गौरीचे पूजन झाले की, ते भरलेले सूप गौरीसमोर धरून वरून खाली पाच वेळा ओवाळते, यालाच सूप ओवसणे म्हणतात. ओवसलेली पाच सुपे डोक्यावर घेऊन किमान पाच सवाष्णीसोबत पायी चालत, ती सासरी जाते. तिच्या सासरी याला सुपांचा ओवसा आला असे म्हणतात. सासरच्या मंडळींकडून हा ओवसा स्वीकारला जातो.

आनंद, उत्साह आणि परंपरेची जोपासना करत साजरा केला जाणारा हा उत्सव ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे यात तिळमात्रही शंका नाही.

— दिलीप कोठावदे