गिधाडे

Subscribe

स्त्रीकडे एक माणूस म्हणून बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन आजही बदलेला नाही. तिच्याकडे मादी म्हणून पाहण्याची क्रूरता जेव्हा हिंसरूप धारण करते तेव्हा भारतात निर्भयानंतर हा थरससारख्या घटना घडतात आणि सुन्न व्हायला होते. बलात्कार करून भागत नाही तेव्हा पुरुषरुपी नर या मादीचे लचके तोडतो आणि ती आता या जगात जगायला लायक नाही असे दाखवून तेव्हा गावा कुसातीलखेडोपाड्यातील चार भिंतीच्याआत कोंडून राहणार्‍या मुलीबाळीच्या डोळ्यातील अश्रू गोठून जातात... अन् त्यांच्या आईबापाला मुलगी छातीवरचे ओझे वाटायला लागते. घटनेनंतर आज हाथरस गावात दलित महिलांचा आक्रोश काळीज चिरणारा असून जातीपातीची मुळे किती खोलवर पसरलीत... हे बघून मन कातर होते. दुसर्‍या बाजूला शहरी भागात मुलगी शिकली मोठी झाली तरी समाज तिला गुड गर्लच्या संकल्पनेत बसवण्याचा आटापीटा सुरू असताना दिसतो. मीटू प्रकरण काल आणि आज गाजले तरी पुरुषी वर्चस्वाचा समाज स्त्रीला तिच्यातील बाई बाजूला ठेवून तिला माणसाचे स्थान देणार आहे का? याचे उत्तर मिळत नाही. शेवटी तिला मादी म्हणूनच पाहिले जाते. या सार्‍या बाजूंचा हा पंचनामा...

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये 14 सप्टेंबरला एका 19 वर्षीय दलित तरुणीवर चार उच्चवर्णीय तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा मंगळवारी 29 सप्टेंबरला उपचारादरम्यान मृत्यू झाला. 14 सप्टेंबरला जनावरांसाठी चारा आणण्यासाठी ही तरुणी आपल्या शेतात गेली होती. याठिकाणी चार तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेत जेव्हा ही तरुणी घटनास्थळी आढळून आली तेव्हा तिची जीभ छाटलेली होती तसेच तिच्या मानेवर गंभीर जखमा होत्या. त्याचबरोबर तिच्या पाठीच्या कण्यालाही गंभीर दुखापत झाली होती. विजय तेंडुलकर यांच्या ‘गिधाडे’ नाटकात माणसातील हिंस्त्र वृत्ती प्रकर्षांने समोर आली होती. घाशीराम कोतवाल, सखाराम बाईंडर अशा नाटकांमध्येही ती दिसली. स्त्रीचा एक मादी म्हणून विचार करणारी पुरुषी गिधाडे आजही तिचे लचके तोडत आहेत. त्यांना कोण आणि कसे आवरणार हा खरा प्रश्न आहे.

नर आणि मादीची पुरुष आणि स्त्री अशी उत्क्रांती झाली तरी आजही स्त्रीकडे मादी म्हणूनच बघण्याचा पुरुषाचा दृष्टिकोन बदललेला नाही. तो हिंस्त्र रूपात समोर येतो तेव्हा स्त्रीचे मादी म्हणून शोषण तर केले जातेच, पण ती आता जगायला लायक नाही म्हणून तिचे अवयव छाटून टाकणारी पुरुषरुपी गिधाडे फिरू लागतात. बिनदिक्कतपणे. उत्तर प्रदेशला ती पुन्हा फिरताना दिसली. महाराष्ट्रात पालघरला दोन साधूंची हत्या झाल्यानंतर (कुठलीही हत्या चूकच) छाती पिटून घेणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील हाथरसच्या भयानक घटनेनंतर आपली छाती आता पिटून न घेता बडवून घेतली पाहिजे. धर्म आणि संस्कृतीच्या ठेकेदारांच्या राज्यात असे काही होत असेल तर त्या राज्याच्या कारभारावर तो कलंक म्हणायला हवा. तो पुसून काढण्याचा आता किती प्रयत्न झाला तरी उत्तर प्रदेशात मुलायमसिंह यादव आणि बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या जंगलराजमध्ये जी परिस्थिती होती तीच आजही योगी यांच्या राजवटीत ठळकपणे दिसते.

- Advertisement -

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गँगस्टर आणि राजकारणी हातात हात घालून फिरतात तेव्हाच विकास दुबेसारख्या गुंडाची पोलिसांना ठार मारण्यापर्यंत मजल जाते. तो गुंड आता आपल्याला भारी होईल अशी भीती वाटून मग फेक एन्काउंटर केले जाते. पण, तोपर्यंत नाकाने कांदे सोलणार्‍या राजकर्त्यांची लाज गेलेली असते. ती कधीच भरून येऊ शकत नाही. आताही उत्तर प्रदेशमधील पीडित प्रकरणात तेच झाले. आता या प्रकरणात एसआयटी स्थापन करून फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्याचे निर्देश दिले असले तरी हे काही योगी यांनी उचलेले पाऊल नाही तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन आदेश दिल्यानंतर योगी सरकार हलले. साधूंची हत्या हा पालघरमधील झुंडशाहीने घेतलेले बळी होते. चोर समजून साधूंना मारण्यात आले. मात्र या प्रकरणात पोलिसांनी दाखवलेला हलगर्जीपणा या मुळाशी होता. शेवटी तो उघड झाला. पण, या प्रकरणाने व्यथित होऊन महाराष्ट्रात अराजक आलय हा जो कांगावा योगी यांनी केला होता, तो खोटा होता. स्वतःच्या राज्यातही कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजत असताना दुसर्‍याच्या नावाने छाती पिटण्यात काहीच अर्थ नाही, हे स्पष्ट झाले आहे. राज्यकर्त्यांनी तर ती कधीच पिटू नये.

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये 14 सप्टेंबरला एका 19 वर्षीय दलित तरुणीवर चार उच्चवर्णीय तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा मंगळवारी 29 सप्टेंबरला उपचारादरम्यान मृत्यू झाला. 14 सप्टेंबरला जनावरांसाठी चारा आणण्यासाठी ही तरुणी आपल्या शेतात गेली होती. याठिकाणी चार तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेत जेव्हा ही तरुणी घटनास्थळी आढळून आली तेव्हा तिची जीभ छाटलेली होती तसेच तिच्या मानेवर गंभीर जखमा होत्या. त्याचबरोबर तिच्या पाठीच्या कण्यालाही गंभीर दुखापत झाली होती. तरुणीच्या मृत्यूपूर्वी कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत ही गोष्ट नमूद केलीय. बलात्कार केल्यानंतर 4 नराधमांनी त्या पीडितेला ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र युवतीच्या किंकाळ्यांमुळे आरोपी पळून गेले. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले खरे पण तोपर्यंत ती मुलगी गंभीर जखमी झाली होती. शेवटी तिची मृत्यूची झुंज 19 दिवसांनंतर संपुष्टात आली. योगी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर या राज्यात काही क्रांती झालेली नाही. जसा आधी पोलिसांचा गुंडांना आश्रय होता तो आताही ठळकपणे दिसला. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला फक्त जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर 23 तारखेला तरुणीच्या जबाबानंतर एफआयआरमध्ये सामूहिक बलात्काराचे कलम जोडण्यात आले.

- Advertisement -

पोलिसांनी पीडित मुलीच्या घराजवळील तीन व्यक्तींना सुरुवातीला ताब्यात घेतले. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यातील एकजण फरार झाला होता. त्यानंतर त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस इतके दिवस मग कशाची वाट बघत होते. हे प्रकरण सोपे नाही, आपल्या हाताबाहेर जात आहे, हे लक्षात आल्यानंतर पीडितेचा जबाब घेण्यात आला. पोलीस गावातील उच्च वर्णीयांच्या दबावाखाली आधी या प्रकरणात बलात्कार झाल्याचे मान्यच करत नव्हते. साधी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला होता आणि जखमांबाबत मुलगी खोटी बोलत आहे, असे पोलिसांचे म्हणणे होते. नंतर प्रकरण गंभीर आहे असे दिसताच पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला. शिवाय बलात्काराचा गुन्हा आठ दिवसानंतर पीडित मुलगी शुद्धीवर आल्यानंतर नोंदवण्यात आला आणि मग 23 सप्टेंबरला आरोपींना अटक झाली. पीडितेच्या मृत्यूच्या आधी आणि नंतरही पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जात होता. तो 29 सप्टेंबरच्या रात्रीही दिसला. मध्यरात्री 3 वाजता पीडित तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यात पीडितेच्या कुटुंबाला सहभागी होऊ दिले नाही. ‘आमच्या सर्व नातेवाईकांना मुलीच्या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी होऊन तिचे अंत्यदर्शन घ्यायचे होते. मात्र, मुलीचा मृतदेह पोलीस बळजबरीने घेऊन गेले.

आमच्यापैकी कोणालाही तिच्या पार्थिवाजवळ जाऊ दिले नाही. आमच्यापैकी कोणीच तिच्या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी झालं नाही. मला माझ्या मुलीचे अंत्यदर्शनही पोलिसांनी घेऊ दिले नाही. अंत्यसंस्काराआधी मला तिचा चेहराही पाहता आला नाही’, असा आरोप पीडितेच्या आई वडिलांनी केला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओंपैकी एकात पोलीस अधिकारी पीडितेच्या कुटुंबाला असा सल्लाही देत आहेत की, जास्त काळ मृतदेह ठेवणे योग्य नाही. प्रत्येक गोष्ट प्रथेनुसार असावी. एका व्हिडीओत पीडित तरुणीची आई पोलिसांना विनवण्या करताना दिसत आहे. यात त्या, माझ्या मुलीला एकदा घरी घेऊन जाऊ दे. अंत्यसंस्कार करण्याची एवढी घाई का? आता रात्र झाली आहे…घाई कशाला करत आहात? याला उत्तर देताना पोलीस अधिकारी म्हणाले की, ‘मी राजस्थानचा आहे. प्रथेनुसार मृतदेह जास्त काळ ठेवला जात नाही. येथे एका मुलीवर बलात्कार होतो आणि तिला जीवे मारले जात असताना आपल्या हालहाल झालेल्या मुलीला बघताही येत नसेल तर त्या आईबापाचा आक्रोश हा आरोपींबरोबर पोलिसांमध्ये दडलेल्या गिधाडांच्या नावाने होता… ‘कुटुंबीयांकडून जबरदस्तीने हिसकावून घेत पीडितेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा आदेश कुणी दिला? मागील 14 दिवसांपासून तुम्ही कुठे झोपलेला होतात? तातडीनं कार्यवाही का केली नाही? कधीपर्यंत हेच चालत राहणार आहे? तुम्ही कसे मुख्यमंत्री आहात, असे प्रश्न विचारत काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी योगी आदित्यानाथ यांना धारेवर धरले. उत्तर प्रदेशमधील सर्वसामान्य लोकांचा हाच सवाल आहे.

विजय तेंडुलकर यांच्या ‘गिधाडे’ नाटकात माणसातील हिंस्त्र वृत्ती प्रकर्षांने समोर आली होती. घाशीराम कोतवाल, सखाराम बाईंडर अशा नाटकांमध्येही ती दिसली. स्त्रीचा एक मादी म्हणून विचार करणारे पुरुष आजूबाजूला फिरत असताना बाईचा माणूस म्हणून कधी विचार होणार असा खडा सवाल तेंडुलकर उपस्थित करताना दिसत होते ते 60 च्या दशकात. तेंडुलकर सांगतात : ‘इथे भासतो एक थंडपणा, निर्विकारपणा; दिसतात फक्त मांसाचे लचके, हाडांचे तुकडे; रक्त किंवा घाम नाही. गिधाडे नाटकाने तेव्हा मध्यमवर्गीय समाजामध्ये केवढा तरी गहजब उडाला होता. एवढी हिंसा कुठे असते का, असा कांगावाही करण्यात आला. मात्र माणसांमधील गिधाडेरुपी हिंस्त्र वृत्ती आजही पाच दशकानंतर बदलेली नाही. निर्भया, प्रियांका आणि आता हाथरस प्रकरणात गिधाडेरुपी आरोपींनी स्त्रीच्या देहाचे हालहाल केले तेव्हा ती पुन्हा ठळकपणे दिसून आली.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -