गर्जा महाराष्ट्र माझा…!

महाराष्ट्र हा मागणारा नाही तर देणारा आहे. कोणत्याही सिंहासनापुढे महाराष्ट्राने कधी आपली मान झुकवली नाही. ही त्याची थोरवी आहे. म्हणूनच मराठी माणसांनी अटकेपार झेंडे फडकावले असे म्हटले जाते. महाराष्ट्राच्या मातीत असलेल्या या शूरता, रसिकता, समता आणि अस्मितेच्या गुणधर्मामुळेच महाराष्ट्राबद्दलचा एक वचक आणि असूयाही इतर भाषकांमध्ये दिसते. त्यामुळे मराठी माणसाला नेहमी वरच्या तख्तापासून दूर ठेवले जाते. कोणतेच क्षेत्र यास अपवाद नाही.

–डॉ. अशोक लिंबेकर

महाराष्ट्राच्या अस्मितेचे, अभिमानाचे, गौरवाचे पोवाडे प्राचीन काळापासून अनेक कवींनी आपल्या कवनातून आणि गायनातून गायले आहेत. संत, पंत, शाहिरी या मध्ययुगीन आणि अलीकडच्या आधुनिक साहित्यातही महाराष्ट्राचे गुणगान मुक्तकंठाने कवीने केलेले दिसते. एवढेच नाही तर अनेक परदेशी प्रवाशांनीही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा गौरव केलेला आहे. महाष्ट्राच्या मातीत असे खास काय आहे? की महाराष्ट्र संस्कृतीचा भल्याभल्यांना मोह वाटावा? याचे उत्तर महाराष्ट्राच्या मातीतच आहे.

मुळात महाराष्ट्र हे असे राज्य आहे की जिथे सर्व संस्कृती गुण्यागोविंदाने नांदल्या आहेत. महाराष्ट्र हे एक सहिष्णू राज्य आहे. भारतातील अत्यंत मोजक्या राज्यांना राष्ट्र म्हणून संबोधले गेले त्यात महाराष्ट्र एक मोठे राज्य. त्याच्या महत्तेमुळेच त्याला ‘महा’ ही उपाधी लागलेली. जिथवर महाराष्ट्री म्हणजेच मराठी भाषा बोलली जाते त्या भाषकांचे वसतिस्थान म्हणजे महाराष्ट्र. त्यामुळेच मराठी भाषा बोलणार्‍या या भाषिक समूहांच्या राज्याला मिळालेली ही ओळख सर्वदूरपर्यंत पोहचलेली आहे. साहित्य, चित्र, शिल्प, कला इत्यादी बाबींच्या अभिजात आविष्काराने महाराष्ट्राची कीर्ती जगभर पोहचली. त्यात आपले संत साहित्य हे सर्वात अग्रणी असे साहित्य. याच मातीत संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांसारखे जागतिक दर्जाचे महान कवी उदयास आले. त्यांनी अवघ्या जगाला मानवतेच्या कल्याणाची शिकवण देऊन भक्तीबरोबरच प्रबोधनाची उज्ज्वल परंपरा निर्माण केली. त्याच परंपरेने महाराष्ट्राचे सांस्कृतिक भरणपोषण केलेले. त्यावरच महाराष्ट्राचे अधिष्ठान आहे.

महाराष्ट्र संस्कृतीचे हे दोन महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. पंढरपूरचा विठ्ठल हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक माहेर आहे. तेराव्या शतकात महाराष्ट्रात अनेक भक्ती संप्रदाय उदयास आले. त्यांच्या भक्तीतून आणि प्रबोधनातून महाराष्ट्र संस्कृतीचे सहिष्णू, समन्वयशील रूप आकारास आले. कुसुमाग्रजांनी याचे खूपच मार्मिक वर्णन केले आहे. महाराष्ट्राच्या मातीचा गौरव करताना त्यांनी म्हटले आहे, ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा! हिच्या संगाने जागल्या दर्‍या खोर्‍यातील शिळा! रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी! चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी! महाराष्ट्र ही संतांची, शूरांची, वीरांची, कष्टकर्‍यांची भूमी आहे. असे असले तरी येथील माणूस कमालीचा अभिमानी आहे. तो कुणापुढे झुकणारा नाही. जिथे अहंता द्रवली आणि ज्या मातीने वसुधैव कुटुंबकमचा वैश्विक मंत्र दिला अशी ही उदात्त विचारांची भूमी आहे.

इथला माणूस जसा रांगडा आहे तसाच मनाने रसिक आहे. इथल्या रसरंगात शृंगाराचा स्वर भिजलेला आहे. महाराष्ट्र हा मागणारा नाही तर देणारा आहे. कोणत्याही सिंहासनापुढे महाराष्ट्राने कधी आपली मान झुकवली नाही. ही त्याची थोरवी आहे. म्हणूनच मराठी माणसांनी अटकेपार झेंडे फडकावले असे म्हटले जाते. महाराष्ट्राच्या मातीत असलेल्या या शूरता, रसिकता, समता आणि अस्मितेच्या गुणधर्मामुळेच महाराष्ट्राबद्दलचा एक वचक आणि असूयाही इतर भाषकांमध्ये दिसते. त्यामुळे मराठी माणसाला नेहमी वरच्या तख्तापासून दूर ठेवले जाते. कोणतेच क्षेत्र यास अपवाद नाही. मराठी माणसाने कोणत्याही क्षेत्रावर आपला झेंडा एकदा फडकावला की तो सहजी लवकर खाली उतरत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रस्थापित केलेले महाराष्ट्राच्या प्रतापाचे हे तेजोवलय दिप्तीमान असेच आहे.

मुळात महाराष्ट्र हा दगड-धोंड्याचा देश. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा…अशी कवी गोविंदाग्रजांनी त्याची ओळख करून दिलेली असली तरी पुढे नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा…असेही त्यांनी म्हटले आहेच. असे अनेक अंतर्विरोध इथे आहेत. हाच धागा पकडून पुढे अनेक कवींनी महाराष्ट्राच्या थोरवीचे वर्णन केले आहे. त्यात महाराष्ट्राच्या भौगोलिकतेचेही दर्शन घडते. दक्षिणेतील कृष्णा, कोयना ते गोदावरी, तापी ते नर्मदा अशी महाराष्ट्राची सीमा तेराव्या शतकातील महानुभाव साहित्यातूनही दर्शवली गेलेली आहे. महाराष्ट्र गीतातूनही या नद्यांचे आणि त्यावरून महाराष्ट्राच्या भूभागाचे सूचन आलेले आहे. महाराष्ट्राचा उल्लेख दक्षिणपथ, झाडीमंडळ असाही केलेला आहे. प्राचीन साहित्यात असे दाखले आले आहेत. गोदावरी, कृष्णा, तापी, भीमा या महाराष्ट्रातून वाहणार्‍या प्रमुख नद्या.

या नद्यांचे आणि महाराष्ट्राचे अभेद्य सांस्कृतिक नाते. गोदावरीच्या काठावरच महाराष्ट्र संस्कृतीचा, मराठी साहित्याचा पहिला स्वर निनादलेला. यातूनच गाथासप्तशतीसारखे महान काव्य आविष्कृत झालेले. या नद्यांनीच महाराष्ट्राची कूस हिरवी केलेली. त्यामुळेच या नद्यांबद्दलचा माहिमाही अनेक कवींनी गायलेला. मग ते संत नामदेवांचे चंद्रभागा माहात्म्य असो की कवी चंद्रशेखर यांचे गोदागौरव. महानुभावांच्या साती ग्रंथातील एका ग्रंथाचे नाव तर सह्याद्रीवर्णन असे. महाराष्ट्राला लाभलेले सह्याद्री पर्वताचे अभेद्य कवच, येथील नद्यांच्या काठावर फुललेला भावभक्तीचा मळा, याच महाराष्ट्राच्या काळ्या कातळावर कोरली गेलेली अजिंठा, वेरूळसारखी तेजोलेणी हे महाराष्ट्र संस्कृतीचे मानबिंदू! म्हणून यांच्या महिम्याशिवाय महाराष्ट्र संस्कृतीचे गाणे गाताच येत नाही.

प्रत्येक राष्ट्राचा एक धर्म असतो, त्याला एक संस्कृती असते. त्या संस्कृतीचा प्रभाव त्याच्या रोजच्या जगण्यावर पडत असतो. आज आपण कितीही वैश्विकीकरणाच्या गप्पा मारत असलो तरी या पृथ्वीवरील मानवी समूहांची एकच संस्कृती अजूनही दृष्टिपथात नाही आणि ती कधी निर्माण होईल याचीही शक्यता नजीकच्या काळात तरी नाही. सांस्कृतिक अभिसरण होते, पण त्याने मूळची संस्कृती नष्ट होते असेही नाही. ती लोकगंगेतून प्रवाहित होत राहते. महाराष्ट्राच्या मातीत असलेल्या संत परंपरेमुळे तर महाराष्ट्र संस्कृती अजूनही अबाधित आहे. ती प्रवाही राहिली आहे. जोपर्यंत महाराष्ट्रात ज्ञानदेव-तुकारामांचा जयघोष सुरू आहे तोपर्यंत तरी महाराष्ट्र संस्कृतीचे कवच अबाधित आहे असे मानण्यास हरकत नाही. म्हणूनच महाराष्ट्राचे पोवाडे गाताना महाराष्ट्र गीतातून हे ओघानेच येते.

अलीकडेच महाराष्ट्र शासनाने राजा बढे यांचे जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा! या काव्याला महाराष्ट्र गीत म्हणून राजमान्यता दिली आहे. त्याची अंमलबजावणी होईलच. या गीतात काय वेगळे आहे? मराठी माणसांचे स्वभाव, मराठी रीत, महाराष्ट्राची भौगोलिकता, देश गौरवासाठी मराठी माणसाने केलेला त्याग, त्याची अस्मिता आणि अभिमान, इथला कणखर आणि कष्टाच्या घामाने, तरी निढळाच्या छातीने सर्व अस्मानी -सुलतानी आव्हानांना सामोरा जाणारा मराठी माणूस, मराठी माणसांनी केलेली मुलखगिरी या सर्वांचे वर्णन या काव्यात आहे. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ही ओळ गाळली गेलीय, असा एक नाराजीचा सूरही आळवला गेलाय, पण त्याला काही इलाज नाही. कारण महाराष्ट्राच्या याच प्रभावीपणाची भीती इतर भाषकांना वाटते ना? याचे चित्र केवळ इथेच नाही तर ते अनेक क्षेत्रांत दिसते. केवळ राजकारणच नाही तर अलीकडे साहित्यकारणातही याचे प्रत्यंतर आलेच आहे. असा हा महाराष्ट्र असल्यानेच त्याच्या महत्तेची गर्जना जयघोषात करायलाच हवी!

–(लेखक साहित्य, समाज आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत)