घरफिचर्ससारांशहमारे हौसलों का घर, हमारी हिंमतों का घर

हमारे हौसलों का घर, हमारी हिंमतों का घर

Subscribe

मालमत्ता बाईला एक खूप महत्त्वाचा अधिकार देते तो म्हणजे ‘बाहेर पडण्याचा अधिकार’. हिंसा, अपमान, दर्जाहीन वागणूक, परकेपणाची भावना हे सगळं सहन न करता स्वत:च्या आयुष्यासाठी सन्मानाने या शोषण करणार्‍या व्यवस्थेतून बाहेर पडण्याचा अधिकार तिला यातून मिळतो. नातं कुठलंही असो पण ते तिच्या स्वतःच्या प्रतिमेची राख करत असेल तर त्यातून बाहेर पडून आपल्याला हवं तसं जगण्याचा अधिकार म्हणजे मला स्त्रीमुक्तीचा एक महत्त्वाचा दरवाजा वाटतो.

बेटी को क्यों लेके आये अंदर, बाहर बिठा दिया होता, असं बँकेच्या ऑफिसमध्ये टेबलापल्याड बसलेले महाशय वडिलांना
म्हणाले आणि बेटी तुम बैठो बाहर जाके, हम बात करते हैं, अशी प्रेमपूर्वक आज्ञा करत मला केबिनच्या बाहेर बसण्याची सूचना दिली. तसं पाहिलं तर ही अशी वाक्यं सार्वजनिक जागांवर ऐकणं मुलींसाठी फार नवीन नाही. पण यावेळी मात्र ते माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. कारण प्रसंग होता स्वतःच्या नावावर घर घेण्यासाठी बँकेकडून स्वतःच्याच नावावर कर्ज घेण्यासाठी गेलेल्या मला एक ग्राहक म्हणून मिळणारी ही वागणूक होती. पितृसत्ताक व्यवस्थेत जिथे संपत्ती कमावण्याचा आणि जमा करण्याचा अधिकार नकळतपणे पुरुषांची मक्तेदारी ठरतो तिथे एक बाई, आणि त्यातही त्याच समाजाच्या भाषेत ‘लग्नाच्या वयात आलेली’ पण लग्न न झालेली तरुण मुलगी म्हणून स्वतःच्या पैशाने घर विकत घेण्याचा निर्णय मला अनेक ठिकाणी थबकून विचार करायला भाग पाडणारा होता.

बँक, वकील, बिल्डर, नोंदणी करणारा अधिकारी, कोर्ट अशा अनेक ठिकाणी पुरुषसत्तेचे प्रतिनिधित्व करत बसलेले पुरुष आणि स्त्रियासुद्धा(!) मला वेळोवेळी अशी संपत्तीची स्वप्न बघणं मुलींच्या हातचं काम नाही याची जाणीव आपल्या कृतीतून, शब्दातून किंवा कधीकधी नुसत्याच कटाक्षातून करवून देत होते. मला खात्री आहे ही गोष्ट फक्त माझी नसेल तर अशी स्वप्न पाहणार्‍या कितीतरी मुलींनी असे प्रसंग अनुभवलेले असतील. भारतासारख्या देशात तर आर्थिक मालमत्तेची मालकी किंवा नियंत्रण असणं हे कितीतरी मुलींसाठी दिवास्वप्नच राहिलं असेल. लहानपणापासून मुलगी म्हणजे ‘परक्याचं धन’, ‘नवर्‍याच्या घरी गेल्यावर तुला जे करायचं ते कर’ किंवा ‘लग्नानंतर सासर हेच तुझं घर, पुन्हा फिरून माहेरी यायचं नाही’ अशी संस्कारी धमकी मुलींना ‘ना घर का, ना घाट का’ अवस्थेत ढकलते. स्वतःच्या मालकीची अशी कुठलीच संपत्ती आणि विशेषत: स्थावर जंगम मालमत्ता नसल्याने स्त्रिया नेहमी पितृसत्तेने पोसलेल्या सासर आणि माहेर अशा दोन टोकांच्या मध्ये अधांतरात आपलं अस्तित्व शोधत असलेल्या बाहुल्या ठरल्या आहेत.

- Advertisement -

अशी मालमत्ता बर्‍याचदा वारसा हक्काने पुरुषांकडे जाते. आणि बाईचा त्यातला वाटा फक्त हुंड्यापुरता मर्यादित राहतो, हुंडा देणं म्हणजे तिच्या सुरक्षित भविष्यासाठी लाच देणं. मग हुंड्यानंतर पुन्हा तिने फिरून कशाचीही अपेक्षा करायची नाही. संपत्तीचा हट्ट केला तर कुटुंबासोबतचे नाते किंवा माहेर गमवावे लागू शकते या भीतीने बायका त्या संपत्तीत फक्त ‘चोळीबांगडी’ पुरता वाटा घेऊन आपल्या अधिकाराला कुंपण घालतात. मालमत्तेवरचे बाईचे हक्कसोड प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सुरू असलेली भावनिक गुंत्यात अडकवण्याची प्रक्रिया ही पन्नास लाखांच्या अधिकारासाठी भांडणार्‍याला लाखभराचं चॉकलेट हातात देऊन गप्प करणं असतं. संपत्तीत आता बाईचा समान वाटा असेल असं सांगणार्‍या कायद्यावर मात करण्यासाठी आणि स्वतः स्त्रियांनीच हा अधिकार नाकारण्यासाठी ‘माहेर तुटण्याची’ दहशत पुरेशी असते. पण स्वतःच्या मालकीची संपत्ती ही बाईसाठी फक्त भौतिक मालमत्ता न उरता ती तिच्या अधिकारांच्या जागृतीचा केंद्रबिंदू ठरते. आतापर्यंत झालेल्या कितीतरी संशोधनांमधून हे सिद्धसुद्धा झालंय. स्वतःच्या मालकीची संपत्ती आणि मालमत्ता असणे हे स्त्रियांच्या सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणाचे चिन्ह असते हे अनेक वेळा आपल्यासमोर आलंय. मालमत्ता तर बाजूलाच; पण साधं राहतं घर जरी बाईच्या मालकीचं असेल तर त्याने घरात आणि पर्यायाने समाजात तिचा आवाज बुलंद होतो. तिच्या मताला किंमत येते, तिला भूमिका घ्यायला ताकद मिळते, बाई म्हणजे फक्त उपभोग्य वस्तू हा रुतलेला समज याने पुसट होण्याची शक्यता असते. अशा कितीतरी आणि काय काय गोष्टी एका साध्या आणि स्वतःच्या मालकीच्या घरामागे दडलेल्या असतात, ज्याकडे आपण पुरुषसत्तेचे पोशिंदे म्हणून जाणतेपणीसुद्धा दुर्लक्ष करतो.

२००१ मध्ये केरळमधील तिरूअनंतपूरममध्ये झालेला एक अभ्यास सांगतो की, फक्त स्वतःच्या मालकीचे घर असण्याची साधीशी गोष्ट बायकांना घरगुती हिंसाचारापासून वाचवते. अशी मालमत्ता नसलेल्या ४९.१ टक्के बायका शारीरिक हिंसाचाराचा तर ८४.२ टक्के बायका कितीतरी काळापासून मानसिक हिंसाचाराचा सामना करत होत्या आणि त्याच तुलनेत स्वतःच्या मालकीचे घर असलेल्या बायका खूपच कमी म्हणजे फक्त ६.८ टक्के शारीरिक हिंसाचार तर १६.८ टक्के मानसिक हिंसाचार सहन करतात. बाईच्या आवाजाला बळकटी देण्याचे आणि अशा घरगुती हिंसेपासून तिचं रक्षण करण्याची मोठी जबाबदारी फक्त स्वत:च्या हक्काच्या चार भिंती आणि छपरावर असते.

- Advertisement -

अशा प्रकारची मालमत्ता बाईला एक खूप महत्त्वाचा अधिकार देते तो म्हणजे ‘बाहेर पडण्याचा अधिकार’. हिंसा, अपमान, दर्जाहीन वागणूक, परकेपणाची भावना हे सगळं सहन न करता स्वत:च्या आयुष्यासाठी सन्मानाने या शोषण करणार्‍या व्यवस्थेतून बाहेर पडण्याचा अधिकार तिला याने मिळतो. नातं कुठलंही असो पण ते तिच्या स्वतःच्या प्रतिमेची राख करत असेल तर त्यातून बाहेर पडून आपल्याला हवं तसं जगण्याचा अधिकार म्हणजे मला स्त्रीमुक्तीचा एक महत्त्वाचा दरवाजा वाटतो. वर्षानुवर्षांपासून तिने लहानपणी वडिलांच्या घरात, तरुणवयात नवर्‍याच्या घरात आणि म्हातारपणी मुलांच्या घरात राहून त्या घराला घरपण द्यावे ही अपेक्षा किंवा अट तिच्यावर लादली जाते. तिच्या स्वतःच्या मर्जीची जिथे तिला तिच्या असण्याचे संदर्भ कळू शकतील, जिथे ती तिच्या स्वप्नांना बंद तिजोरीत न ठेवता त्यांना अनुभवातून आकार देऊ शकेल आणि जे छप्पर तिला सन्मानाने वागवण्याची हमी देऊ शकेल अशी सुरक्षित आणि हक्काची जागाच आपण एक व्यवस्था म्हणून नाकारतोय. स्वतःच्या मालकीच्या चार भिंतींची ही सुरक्षितता तिला या व्यवस्थेसमोर व्हल्नरेबल होण्यापासूनच थांबवते. पण आपण आपल्या करंटेपणाने तिला फक्त घराच्या स्वयंपाकघराची खोटी मालकीण बनवतो आणि ती सोडून इतरांच्या सुरक्षित जगण्याला एका असुरक्षित कोंदणातून जपणारी म्हणून तिचं गौरवीकरण करण्यात वाफ घालवतो.

वडील नावाचं सध्याचं एक सुरक्षित(?) अवकाश आणि नवरा नावाचं येऊ पाहणारं एक बिनभिंतीचं छप्पर याच्या मधोमध उभं राहून स्वतःचं छप्पर उभं करण्याचा निर्णय घेणं आणि तो निभावणं हे माझ्याही पायाला पक्की जमीन देणारं होतं. स्वतःच्या मालकीच्या घरात बसून हा लेख लिहिताना जितकी सुरक्षितता जाणवतेय तितक्याच तीव्रतेने मी काम करत असलेल्या गावांमध्ये माहेरच्या घरावरचा हक्क सोडल्याने परत यायला हक्काची जागा नाही म्हणून नवर्‍याचा मार खाणार्‍या बायकांचे चेहरे डोळ्यासमोर फिरतायत. व्यवस्थेविरुद्ध ब्र उच्चारल्यास तर ‘घरातून हाकलून देईन’च्या धमकीने दाबलेला कितीतरी कोवळ्या पोरींचा आवाज कानात घुमतोय आणि या सगळ्यांना जावेद अख्तर यांच्या ओळी खूप जवळच्या वाटाव्या असं कधीतरी काहीतरी घडावं असं खूप मनापासून वाटतंय,

ना आरजू पे कैद हैं, ना हौसले पे जंग हैं
हमारे हौसलों का घर, हमारी हिम्मतों का घर
ये घर बहुत हसीन हैं …
ये घर बहुत हसीन हैं!!

काजल बोरस्ते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -