-मंजूषा देशपांडे
परवा अगदी उतरत्या संध्याकाळी मी राजाराम कॉलेजच्या मागच्या रोडवरून टेंबलाबाईला निघाले होते. माझ्या डाव्या बाजूला एक मोठ्ठा झगमगता बोर्ड दिसला श्यामचा वडा. एनडी टीव्हीमुळे संपूर्ण देशात प्रसिद्ध केलेल्या त्या श्यामच्या वड्याच्या ठेल्यावर संध्याकाळी मोठी गर्दी असते. आमच्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षातच ‘श्यामचा वडा’ तिथे आला होता. त्या रस्त्यावरून जाता जाता मी चाळीस वर्षे मागे गेले. खरंतर त्यावेळी म्हणजे ऐंशीच्या दशकात बाहेर खायची काही फार पद्धत नव्हती.
विशेषत: मुली तर एकट्या दुकट्या असे खायला कुठे जायच्या नाहीत, पण त्याला अपवाद म्हणजे काही रसवंतीगृह आणि काही मिसळीची ठिकाणे होती. बहुतेक सगळ्या कॉलेजच्या जवळपास रसवंतीगृहे असायचीच. त्यावेळी फार तर आठ आण्याला एक फूल्ल ग्लास रस मिळायचा. काही काही मुलांकडे तर तेवढेही पैसे नसायचे. मग तीन जणांच्यात दोन ग्लास असा रस घ्यायचे. खरंतर रसवाले लोक बर्फाचे तुकडे घातलेल्या भांड्यातच चरकातून पिळलेला रस गोळा करायचे. तरीही मुले बर्फाने भरलेला वेगळा ग्लास मागायची.
कारण बर्फ घालून घालून वाढवलेला रस कितीही वेळ पिता यायचा. बहुतेक पोरे तिथे पडिक असल्यामुळे कॉलेज जवळचा रसवाला बहुतेक ओळखीचा असायचा. बर्फाळ रस पिणार्या त्या पोरांची दया येऊन तो कधी कधी त्या ग्लासांत अजून असाच रस ओतून द्यायचा. कॉलेजातली प्रेम प्रकरणे, पैजा, ट्युटोरियल्सचे कमी जास्त मार्क्स सगळे काही रसवंतीवाल्याला ठाऊक असायचे. वडीलकीच्या नात्याने पोरीबाळींना सल्ले द्यायलाही तो कमी करायचा नाही.
पाच-सहा महिन्यांतून एकदा आम्ही मिसळ खायला जायचो. तशी कोल्हापुरातील खासबागची मिसळ प्रसिद्ध आहे, पण ती मवाळ मिसळ मंगळवार पेठेत राहणार्या बुजुर्गांसाठी असायची किंवा स्कॉलर वगैरे पोरांसाठी असायची. आमच्यासारख्या पोरांना आवडायची ती मंगळवार पेठेतल्या आहारची मिसळ. आहार म्हणजे मंगळवार पेठ मेन रोडवरचे एकदम बारकं हॉटेल होतं. (म्हणजे अजूनही आहे. हल्ली मी कित्येक वर्षात तिकडे गेलेले नाही.)
तिथे एका खोलगट प्लेटमध्ये मटकीची उसळ, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, फरसाण, चिवडा, शेव, कांदा आणि कोथिंबीर असं घालून त्यावर लालभडक आणि तिखट-जाळ कट ओतलेला असायचा. शेजारच्या प्लेटमध्ये पावाच्या दोन स्लाईस, चिरलेला कांदा आणि लिंबाची फोड द्यायचे.
त्या मिसळीचा एक घास खाल्ला की डोळ्यांतून आणि नाकातून पाणी गळायला लागायचं आणि कानातून धूर निघायचा, पण मिसळ कितीही भन्नाट तिखट लागली तरी नाकाने तरी सूं सूं करीत… आम्ही ती पावाबरोबर खात राहायचो. वरतून आणखी कट मागवायचो. आमच्या कोल्हापुरात अजूनही कुठेही गेलात तरी मिसळीचा कट अनलिमिटेड मिळतो.
आहार हॉटेलचा कट बाकी हॉटेलात मिळणार्या मिसळीच्या कटापेक्षा वेगळ्याच तिखट चवीचा आणि किंचित दाट असायचा. आमच्यापैकी काही जण त्यात मटणाचा स्टॉक मिसळला आहे असे सांगायचे. खरे-खोटे आहारवाले जाणोत. आम्ही शाकाहारवाले तिकडे दुर्लक्ष करायचो. आहारामध्ये गेलं की भरपूर कांदा, कोथिंबीर पखरलेली लालभडक मिसळ समोर आली की जगाचा विसर पडल्यासारखं वाटायचं. एक घास मिसळ आणि ग्लासभर पाणी असं केल्याने मिसळ संपेपर्यंत पोट गच्च आणि मन तृप्त झालेलं असायचं.
पुढे राजाराम कॉलेजला आल्यावर हायवे कॅन्टीनची ओळख झाली. हायवे कॅन्टीन पुणे-बँगलोर हायवेवर होते. तिथे जायचे म्हणजे कॉलेजमधून बाहेर पडावे लागायचे. त्याकाळी तेही एक आकर्षणच वाटायचे. तसे तर तिथल्या प्रत्येक कॉलेजला स्वत:चे कॅन्टीन असायचे, पण हायवे कॅन्टीनची मजा तिथे यायची नाही. हाय वे कॅन्टीन युनिव्हर्सिटी आणि राजाराम कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी गजबजलेले असायचे. तिथला कट वडा आणि कडक चहा म्हणजे तोबा तोबा…असं आम्ही म्हणायचो. एक भलामोठा बटाटेवडा मध्ये चिरून त्यावर शेव, कांदा आणि कोथिंबीर घालायचे.
त्यावर कट घालून ब्रेडच्या स्लाईसबरोबर खायचा. अगदी सुरुवातीला खाताना कट वडा चुरचुरीत आणि झणझणीत कट असं मिश्रण मस्त लागायचं. नंतर नंतर मात्र कट आणि बटाटेवड्यातले बटाटे एकंकार होऊन झालेले मिश्रणही भारीच लागायचे. शेवटी शेवटी तर फक्त कटच उरायचा. अशा वेळी कॅन्टीनवाल्याकडे जरासं पाहिलं तरी तिथला पोर्या जाड्या शेवेची बशी आणून ठेवायचा. मग शेव आणि कट असा एक नवीन पदार्थ खात राहायचे. हायवे कॅन्टीनमध्ये पोरांचे काहीही चालायचे. काही पोरे जर्नल्स लिहायची, काही नोट्स उतरवायची.
नवकवी तिथे कविता आणि शेरशायर्या लिहायचे. कॉलेजच्या हस्तलिखितातले बरेचसे साहित्य तिथेच जन्माला यायचे. कॉलेजमधल्या प्रेमजोड्या तर परत परत कट मागवून एकमेकांकडे पाहत तासन्तास कट वडा खायच्या. प्रेमभंग झालेले प्रेमवीरही त्यांच्या प्रेमाचे दु:ख कटात बुडवत उसासा टाकत कटवडा रिचवायचे. आमच्यासारखे विद्यार्थी तास संपले की चकाट्या पिटून टाईमपास करीत हायवे कॅन्टीनमध्ये बसायचे. युथ फेस्टिवलची नाटके असोत की कॉलेजमधले कार्यक्रम, सगळ्यांची सुरुवात आणि अखेर तिथला कटवडा आणि चहानेच व्हायची.
त्या हायवे कॅन्टीनमध्ये विद्यापीठात पीचडी करणारे विद्यार्थीही दिसत. त्या विद्यार्थ्यांना नुसते पाहूनही तो विद्यार्थी पीएचडीच्या कोणत्या टप्प्यावर आहे हे आम्ही ओळखत असू. पहिल्या टप्प्यातील विद्यार्थी पटापट कट संपवून लायब्ररीत पळत. हळूहळू त्या पोरांचा कॅन्टीनमधला मुक्काम वाढायचा. त्या पोरांच्या गप्पा म्हणजे ऐकण्यासारख्याच असत. तशी मुले बहुधा त्यांच्या गाईडने पकवलेली असत. सतत असंतुष्ट असलेली पीएचडी गाईड ही जमात पाहायची त्यावेळी आम्हाला फार उत्सुकता होती.
विद्यापीठातल्या पदवीदान समारंभावेळी हायवे कॅन्टीनमध्ये पदवीची भेंडोळी घेतलेल्या विद्यार्थ्यांची गर्दी व्हायची. त्या दिवशी हायवे कॅन्टीनवाला ओळखीच्या विद्यार्थ्यांला फुकट चहा देऊन भरल्या अंत:करणाने निरोप द्यायचा. विद्यार्थी आणि कॅन्टीनवाला डोळे पुसत एकमेकांचा निरोप घ्यायचे, पण का कोण जाणे कॉलेजच्या तिसर्या वर्षाला असताना हायवे कॅन्टीन अनेकदा बंद असायचे. हळूहळू ते बंदच झाले.
त्या सुमारास एक पोरसवदा तरुण आणि त्याची आई एका डब्यात बेसन आणि उकडलेले बटाटे घेऊन यायचे. तो पोरगा भराभर कांदा चिरायचा. तिथल्या पसरट दगडावरच मिरची, आले आणि कोथिंबिरीचे वाटण करायचा. त्याची आई उकडलेल्या बटाट्यात ते वाटण मिसळून सारण बनवायची. एका लहानशा स्टोव्हवर त्या बटाटेवडे तळून द्यायच्या. त्या वड्यांना पॉलिटेक्निक आणि अॅग्रीकल्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचेही गिर्हाईक होतं. ते गरमागरम बटाटेवडे मोठ्या आकाराचे आणि एकदम म्हणजे एकदमच खास चवीचे असायचे.
कधी कधी तर त्या मायलेकराने बरोबर आणलेले बेसन आणि बटाटे दुपारपर्यंत संपूनही जायचे. मग तो मुलगा कुठल्या तरी विद्यार्थ्याची सायकल घेऊन राजाराम कॉलेजच्या माळावरून तर्राट राजारामपुरीत जाऊन सगळे सामान घेऊन यायचा. त्यावेळी बेसन विकत मिळत नसे. कधी कधी तर त्याला हरभर्याची डाळ विकत घेऊन दळून आणावी लागे. तोपर्यंत आम्ही उकिडवे बसून त्याच्या आईशी गप्पा मारत बसत असू. त्याबदल्यात त्या आम्हाला बटाटेवडे तळून झाल्यावर त्या वड्यांची पिल्ले फुकट देत असत. तोच वडा आता मोठा होऊन श्यामचा प्रसिद्ध वडा झाला आहे.
त्यावेळच्या आमच्या खिशाला परवडणारी खादाडी अक्षरश: चारच ठिकाणापर्यंत मर्यादित होती. घरातले खाऊन कंटाळलेल्या जिभांना बाहेरचा चरचरीतपणा हवासा असायचा. तसे कधी घरात कोणी पाहुणे आले तर सर्व मिळून भवानी मंडपात राजाभाऊची भेळ खायला जायचे.
भडंगेवर हिरवी आणि लाल चटणी, शेव, चिंचेची चटणी, कांदा आणि कोथिंबीर घातलेल्या भेळेची चव आजही तशीच आहे. अगदी क्वचित कधीतरी घरच्यांसोबत गोकूळ किंवा सह्याद्री हॉटेलमधला डोसा, कामतांकडचा उतप्पा किंवा आंबोळी असेही खायला मिळायचे, पण घरात न सांगता फक्त पोरापोरांनी बाहेर खाणे म्हणजे एक साहसच वाटायचे. मजा यायची, तो एक थ्रिलिंग अनुभव असायचा.