– प्रशांत कळवणकर
आतर्क्यातील कल्पना या बहुतांशाने भीतीने ग्रासलेल्या असतात त्यामुळेच त्या मानसिक स्तरावर विकृती उत्पन्न करू शकतात. अती श्रद्धा हीसुद्धा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून एक विकृतीच आहे. जिज्ञासेला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जर आधार असेल तरच समर्पक असे उत्तर मिळू शकते. जे इंद्रिय गोचर आहे, बुद्धिगम्य आहे तेच स्वीकारावे हाच वैज्ञानिक दृष्टिकोन आहे.
जिज्ञासा म्हणजे एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा, मात्र यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सा करणे, कार्यकारण भाव जाणून घेण्याची इच्छा आणि ज्ञानपिपासू वृत्ती हे मूलभूत गुण स्वभावात असणे गरजेचे आहे. द्वैत तत्वज्ञान पुरस्कर्त्यांच्या मते आत्मन आणि ब्राह्मण हे मृत्यूंनंतरही वेगळं अस्तित्व टिकवून असतात, तर अद्वैत पुरस्कर्त्यांसाठी मात्र ते पुन्हा या पंचतत्वाचाच एक भाग बनतात. त्यांचं स्वतंत्र अस्तित्व राहत नाही. मृत्यूपश्चात आत्मा (चेतन) जडदेहापासून (अचेतन) मुक्त होतो व पुन: नवीन शरीर प्राप्त करतो, तर काही तत्ववेत्त्यांना मात्र हे मान्य नाही, त्यांच्या मते आत्मा असो वा शरीर हे मृत्यूपश्चात पंचतत्वात (ब्रह्मतत्वात) विलीन होतात. त्यांचं वेगळं असं अस्तित्व उरत नाही. काही तत्ववेत्ते आत्म्याचंही अस्तित्व नाकारतात. आधुनिक विज्ञानाचाही कल बर्यापैकी अद्वैताकडेच नेणारा आहे.
परावाणी ही अप्रत्यक्ष परंतु तीव्र आर्त सात्विक संवेदना आहे, तर वैखरी ही इंद्रियांची प्रत्यक्ष भौतिक अनुभूती आहे. परावाणी हे जरी अतर्क्य वाटत असले तरी आपण ज्याला पोटतिडकीने म्हणतो ती संवेदना बुद्धीगम्य आहे. हवा दिसत नाही, पण ती इंद्रिय गोचर आहे. परमाणू दिसत नाही, पण शास्त्रीय प्रयोगाने त्यांचं अस्तित्व मान्य केलं आहे.
आद्य शास्त्र म्हणजे कणाद मुनींचे ‘वैशेषिक’ शास्त्र व कपिल मुनींचे ‘सांख्य’ शास्त्र हे देव मानत नाहीत, तर यांनी निर्गुणाचे ज्ञान विज्ञानाच्या साहाय्याने विषद केले आहे. ‘न्याय’, ‘मीमांसा’, ‘योग’ आणि ‘वेदांत’ शास्त्र मात्र ईश्वर संकल्पनेचा आधार घेतात. कारण विज्ञान हे सर्व आणि सहज गम्य नाही. आतर्क्याची पोकळी ईश्वर या संकल्पनेनी बर्यापैकी भरून निघते, परंतु हा विचार ठोस नसून मनाची गुंतागुंत वाढवणारा आहे. वैचारिक द्वंद्व म्हणजे निश्चित उत्तर नाही! मन आहे म्हणून विचार आहे. शिव-शक्तीच्या मिलनातून निजा, परा, अपरा, सूक्ष्मा आणि कुंडलिनी या शक्ती निर्माण झाल्यात. कुंडलिनी शक्तीमुळेच चेतन-अचेतन याचा सुरेख संगम आहे आणि यातूनच मन व तार्किक विचाराचे वैभव मानवाला लाभलेलं आहे.
एकोहं बहुस्याम । नुसार ज्या एकाचा बहू झाला तो एक ‘शिव’ आहे आणि तोच अव्यक्त परब्रम्ह आहे, हुंकार हा आदिनाद आहे. शिवानेच शक्तीला जन्म दिला त्याचबरोबर इच्छा हा आद्य विकार अस्तित्वात आला. शिवाचा अहंकार आणि पार्वतीची (आदिशक्ती) इच्छा यामुळेच आत्मण आणि ब्राम्हण रूपाला आले. शिव अवस्थेत मनाबरोबर विचारही शून्य आहेत आणि त्यामुळेच या सृष्टीचा कारक अव्यक्त आहे. कुराणमधे अल्लाहची शंभर नावे सांगितली आहेत. नव्यान्नव नावे लिहिली आहेत, तर शंभराव्या नावाची जागा रिक्त आहे, कारण तोच ईश्वर, अल्लाह अकूल अव्यक्त आहे.
आदिशक्तीची इच्छा साकार रूप धारण करण्याची आहे, तर शिवाची इच्छा एकांतवासात राहण्याची. आदिशक्ती आदिमायेचं रूप घेऊन शिवाला संसार निर्मितीसाठी साद घालते. लाल, पिवळा, निळा रंग धारण करते व शिवाला आकृष्ट करते. आदिशक्तीच्या निर्मितीबरोबरच वेळ, अवकाश, काळ, दिशा आणि मिती अस्तित्वात आल्या. शिव-शक्ती मिलन म्हणजेच निजा शक्ती.
पिंड विचारात पंचतत्वांपैकी प्रथम महापृथ्वी, महाआप, महातेज, महावायू आणि महाआकाश तत्वे उत्पन्न झाली. निजा शक्तीनंतर क्रमाक्रमाने परा, अपरा, सूक्ष्मा आणि शेवटी व्यक्त आणि अव्यक्त कुंडलीनी शक्ती निर्माण झाल्यात. कुंडलीनी शक्ती प्रोच्चलता, प्रबलता, प्रत्यमुखता, प्रतिबिंबिता आणि पूर्णत: या गुणांनी युक्त आहे.
पृथ्वी तत्व अस्थी, मास, त्वचा, नाडी, रोम कारक आहे. आप तत्व लाळा, मूत्र, शुक्र, शोनीत, स्वेद कारक आहे. तेज तत्व तृषा, क्षुधा, निद्रा, क्लांती, आलस्य कारक आहे. वायू तत्व आकुंचन, प्रसरण, धावन, प्लवण आणि निरोध कारक आहे, तर आकाश तत्व भय, लज्जा, मोह, राग कारक आहे.
जड देह सत्व, रज, तम गुण, सप्त धातू व वात, पित्त, कफ ह्या त्रिदोशांनी युक्त आहे. वात दोष वायू आणि आकाश तत्वोत्पन्न आहे. पित्त दोष अग्नी आणि जल तत्वोत्पन्न आहे तर कफ दोष पृथ्वी आणि जल तत्वोत्पन्न आहे.
शिव हा पदार्थाचा सर्वात अंतिम असा सूक्ष्म कण असल्यामुळे त्याचे विखंडण होऊ शकत नाही, त्याला कोणी जाळून नष्ट करू शकत नाही, तर कोणता वायू सुकवू शकत नाही.
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो, न शोषयति मारुतः ॥’
अर्थ : नैनं छिन्दन्ति शस्त्राणि (ज्याचा कोणतेही शस्त्र भेद करू शकत नाही), नैनं दहति पावकः (ज्याला अग्नी जाळून नष्ट करू शकत नाही), न चैनं क्लेदयन्त्यापो (पाणी ज्याला ओले करू शकत नाही), न शोषयति मारुतः (ज्याला वायू सुकवू शकत नाही),हाच ऊर्जा अक्षय्यतेचा नियम आहे.
योगशास्त्रात याच अंतिम शिवतत्वाला जाणून घेण्यासाठी सुनियोजित असा अष्टांग मार्ग सुचविला आहे. १) यम, २) नियम, ३) आसन, ४) प्राणायाम, ५) प्रत्याहार, ६) धारणा, ७) ध्यान, ८) समाधी.
आचार्य रजनीश यांनी शिवतत्वाला जाणून घेण्यासाठी संभोगातून समाधीकडे जाण्याचा मार्ग सांगितला आहे. इथे पूर्णतः रतिक्रिडेतील आनंद अभिप्रेत नाही. कारण तो क्षणिक आहे, तर हा संभोग चेतन आणि अचेतन यामधील आहे. स्त्री-पुरुषाचा जन्म एकमेकांच्या सहवासातून होतो. त्यामुळे अचेतन शरीर हे जेव्हा पुरुषाचे असते, तेव्हा चेतन हे स्त्रीचे असते आणि अचेतन जेव्हा स्त्रीचे असते, तेव्हा चेतन हे पुरुषाचे असते. पुरुषाने त्याच्यातील चेतन स्त्रीशी व स्त्रीने तिच्यातल्या चेतन पुरुषाशी केलेला संभोग हाच खरा समाधी अवस्थेकडे नेणारा मार्ग आहे. शिवलिंग हे स्त्री आणि पुरुषाच्या जननेंद्रियाचे प्रतीक आहे, तर नंदी हा शुक्राच्या ताकदीचे प्रतीक आहे.
पराविंदो कुमारीनी कुंडल्या मेलन शिवे ।
मैथुनं शयनं दिव्यं यतीनां परिकीर्तितम ॥
आता ईश्वर म्हणून विषयाला पूर्णविराम द्यावा की शास्त्रीय दृष्टिकोनातून चिकित्सा करावी हा ज्याच्या त्याच्या आकलनाचा प्रश्न आहे. अभ्यास जर कृतीने परिपूर्ण असेल तर ती खर्या अर्थाने शाश्वत सुखाची प्रत्यक्ष अनुभूती आहे, पण या अभ्यासाच्या सुरुवातीला मात्र एक गोष्ट ध्यानात घेणे गरजेचे आहे आणि ती म्हणजे ‘एकं सत’ – एकमेव सत्य – ते हे की हे विश्व एका ठराविक नियमाने चालले आहे, त्यात बदल करण्याचा अधिकार मात्र कोणालाही नाही, खुद्द ईश्वरालाही नाही.