घरफिचर्ससारांशगुगल कॅमिओ आले, आता तुम्ही काय करणार?

गुगल कॅमिओ आले, आता तुम्ही काय करणार?

Subscribe

गुगलच्या माध्यमातून आपल्या वेबसाईटवर युजर्सना आणण्यासाठी लाखो वेबसाईट प्रयत्न करत आहेत. यामध्ये हजारो न्यूज वेबसाईट्सही आहेत. याचसाठी सर्च इंजिन ऑप्टिमायजेशनही केले जाते, हे सगळ्यांनाच माहिती झाले आहे. सगळ्याच न्यूज वेबसाईट्सच्या संपादकीय विभागामध्ये आता सर्च इंजिन ऑप्टिमायजेशन करणारी व्यक्ती स्थिरावली आहे. कोणतीही नवी वेबसाईट सुरू केली की त्याचा एसईओ केला आहे ना, असा प्रश्न हमखास विचारला जातो. हे सगळे करण्याचे कारण इतकेच की गुगलवर जाऊन जर कोणी काही शोधत असेल, तर सर्च इंजिन रिझल्ट पेजेसमध्ये आपली साईट पहिल्या पानावर दिसली पाहिजे. त्या वाचकाने आपल्या साईटच्या लिंकवर क्लिक केले पाहिजे आणि तो किंवा ती तिथे आले पाहिजेत.

सर्च इंजिन ऑप्टिमायजेशनच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये खूप वेगाने बदल झाले. याच बदलांमध्ये आता गुगलने कॅमिओ आणले आहे. हे कॅमिओ काय आहे. त्याचा डिजिटल माध्यमात काम करणार्‍यांना कसा फटका बसू शकतो, हे समजून घेणे गरजेचे आहे.

- Advertisement -

गुगलवर जाऊन वाचक सतत काही ना काही शोधत असतो. अगदी सेकंदा सेकंदाला लाखो प्रश्नांची उत्तर गुगलवर शोधली जातात. गुगल त्याच्या पद्धतीने या प्रश्नांची संभाव्य उत्तरे असणार्‍या वेबसाईटची यादी वाचकांपुढे ठेवतो. एक प्रकारे वेबसाईट आणि वाचक यांच्यातील दुवा म्हणून गुगल काम करतो. ज्यामुळे वेबसाईटला नवे वाचक किंवा युजर्स मिळतात आणि युजर्सला आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. नवी माहिती समजते. गुगल कॅमिओच्या माध्यमातून कंपनीने गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रक्रियेला वेगळे स्वरुप दिले आहे.

गुगलवर वाचक जे प्रश्न सातत्याने विचारतात, त्यांना लोकप्रिय प्रश्न (पॉप्युलर क्वश्चन) असे म्हटले जाते. या प्रश्नांची उत्तरे शोधून ती वाचकांना देण्याचे काम आतापर्यंत न्यूज वेबसाईट करत होत्या. ज्यामुळे या प्रश्नांची उत्तरे वाचण्यासाठी किंवा बघण्यासाठी वाचक आपल्या साईटवर येईल आणि आपल्याला नवे वाचक मिळतील. पण याच प्रश्नांची उत्तरे स्वतः संबंधित सेलिब्रिटीच देऊ लागला आणि गुगल व्हिडिओ स्वरुपातील याच उत्तरांना निकाल पानांमध्ये दाखवू लागला तर? साहजिकच वाचक तो सेलिब्रिटी काय सांगतो हेच बघेल. तो कोणत्याही वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करण्यापेक्षा सर्च इंजिन रिझल्ट पेजेसमध्ये जे व्हिडिओ दिसताहेत ते तिथेच बघेल.

- Advertisement -

गुगल कॅमिओने हेच सुरू केले आहे. सध्या जे प्रसिद्ध सेलिब्रिटी आहेत, त्यांच्याबद्दलची माहिती गुगल कॅमिओच्या माध्यमातून मिळायला सुरुवात झाली आहे. काही भारतीय सेलिब्रिटीही यामध्ये आहेत. लग्न झाल्यामुळे गेल्याच आठवड्यात विकी कौशल ट्रेंडमध्ये होता. सहज जाऊन गुगलवर विकी कौशल असे इंग्रजीत टाईप केले तर त्यावेळी विकी कौशलने लोकप्रिय प्रश्नांसाठी दिलेल्या उत्तरांचे व्हिडिओ गुगल दाखवत होता. एकीकडे अनेक लोकांनी हे व्हिडिओ बघितले आणि दुसरीकडे हजारो न्यूज वेबसाईट्सनी यामुळे आपले संभाव्य ट्रॅफिक गमावले.

सध्यातरी गुगल कॅमिओ ही पूर्णपणे निमंत्रितांसाठी उपलब्ध सुविधा आहे. म्हणजे गुगल कॅमिओमध्ये कोणत्या सेलिब्रिटीला बोलवायचे आणि कोणाला नाही हे फक्त गुगल ठरवते. कॅमिओसाठी कोणत्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आणि कोणत्या प्रश्नांची नाही याचे स्वातंत्र्य सेलिब्रिटींना असते. गुगल केवळ त्यांच्याबद्दलचे कोणते प्रश्न लोकप्रिय आहेत याची माहिती त्यांना देते. या प्रश्नांपैकी काहीच प्रश्नांची उत्तरे संबंधित सेलिब्रिटी देतो. आता या सेलिब्रिटीबद्दल वाचक म्हणून आपण काही शोधायला सुरुवात केले की गुगलच्या निकाल पानांमध्ये उजव्या बाजूला नॉलेज पॅनेलखाली गुगल कॅमिओचे व्हिडिओ दिसतात. या व्हिडिओंवर क्लिक केल्यावर ते लगेचच सुरू होतात आणि संबंधित सेलिब्रिटीने रेकॉर्ड करून ठेवलेली लोकप्रिय प्रश्नांची उत्तरे तुम्हाला दाखविली जातात. ज्या प्रश्नाचे हे उत्तर आहे तो प्रश्न व्हिडिओमध्ये खाली दिसतो. व्हिडिओ प्ले केल्यावर लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर तो सेलिब्रिटी तुमच्याशी बोलतो आहे, असे ही उत्तरे ऐकल्यावर जाणवते.

गुगल कॅमिओमध्ये भारतातील जास्तीत जास्त सेलिब्रिटींनी सहभागी व्हावे आणि त्यांच्याबद्दल विचारल्या जाणार्‍या लोकप्रिय प्रश्नांची उत्तरे त्यांनी द्यावीत, यासाठी गुगल प्रयत्नशील आहे. आपल्या फॅन्सशी थेटपणे संवाद साधण्याची संधी कॅमिओमुळे सेलिब्रिटींना मिळते. पण यापलीकडे जाऊन एका महत्वाच्या अडचणीवर आपापल्या पद्धतीने उत्तर शोधण्याचे कामही गुगलने केले आहे.

खोटी किंवा चुकीची माहिती हे डिजिटल माध्यमांपुढील सर्वात मोठे आव्हान आहे. अनेकवेळा फेक न्यूज प्रसारित होते. तसेच अनेकवेळा मूळ माहितीला रंगवून सांगण्याच्या नादात त्यातील मुख्य मुद्दाच हरवून जातो. या सगळ्यावर गुगल कॅमिओ हे उत्तर आहे. तुमच्याबद्दल कुठल्यातरी वेबसाईटने काहीबाही माहिती देण्यापेक्षा तुम्ही स्वतःच तुमच्याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे द्या. जेणेकरून नेमकी माहिती वाचकांना मिळेल. त्यातून वाचकांचा गुगलवरचा विश्वास आणखी वाढेल. सेलिब्रिटीने किमान दोन लोकप्रिय प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतरच त्याचे कॅमिओ व्हिडिओ सर्च इंजिन रिझल्ट पेजेसमध्ये दिसायला लागतात. सेलिब्रिटीला स्वतःच्या मोबाईलवर फ्रंट कॅमेर्‍याच्या साह्याने या प्रश्नांची उत्तरे रेकॉर्ड करायची असतात. कॅमिओ अ‍ॅपच्या माध्यमातून ही सर्व प्रक्रिया पार पडत असते. रेकॉर्ड झालेली उत्तरे थेटपणे वाचकांना दाखविली जातात. त्यामध्ये कसलेही एडिटिंग केले जात नाही हे आणखी विशेष.

आतापर्यंत वाचकांना पडणारे प्रश्न पत्रकार म्हणून आपण सेलिब्रिटींना विचारत होतो. त्या प्रश्नांची उत्तरे गुगलच्या निकाल पानांमध्ये यावीत यासाठी सर्च इंजिन ऑप्टिमायजेशन करत होतो. हे सगळे सुरू असताना आता गुगलनेच कॅमिओ आणून थेट सेलिब्रिटी आणि वाचक यांच्यात संवाद घडवून आणला आहे. म्हणूनच तर मी प्रश्न विचारतोय गुगल कॅमिओ आले, आता तुम्ही काय करणार?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -