Homeफिचर्ससारांशGopaldas Neeraj : हृदयाच्या लेखणीचा गीतकार : नीरज

Gopaldas Neeraj : हृदयाच्या लेखणीचा गीतकार : नीरज

Subscribe

‘आसू जब सम्मानित होंगे मुझको याद किया जाएगा, जहां प्रेम किं चर्चा होगी मेरा नाम लिया जायेगा, गीत जब मर जायेंगे फिर क्या यहाँ रह जाएगा, एक सिसकता आंसूओ का कारवां रह जाएगा,’ असं म्हणणार्‍या ‘नीरज’ यांच्या गाण्यांशिवाय हिंदी प्रेमगीतांचा इतिहास पूर्ण होणार नाही. २०१८ च्या १९ जुलैला नीरज यांनी अखेरचा श्वास घेतला. ४ जानेवारी २०२४ पासून त्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालं असून २०२५ मध्ये त्याची सांगता होईल. यानिमित्ताने त्यांना अभिवादन करताना त्यांच्याच ओळी आठवतात, ‘कहानी बन कर जिए है इस जमाने मे, सदिया लग जायेंगी हमे भुलाने मे, आज भी होती है दुनिया पागल, जाने क्या बात है, नीरज के गुनगुनाने में!’ फुलांच्या रंगानी नि हृदयाच्या लेखणीने भावमधुर गाणी लिहिणार्‍या नीरज यांना विसरणं कसं शक्य आहे?

-प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार

‘नीरज’ नावाची ओळख माध्यमिक शाळेत असताना झाली. हिंदीच्या पुस्तकात त्यांची कुठली तरी कविता होती. कवितेचं नाव आता आठवत नाही. त्यांचं खरं नाव गोपालदास सक्सेना. नीरज हे टोपण नाव, ज्यांची गाणी आपण रेडिओवर ऐकतो तेच हे नीरज असावेत का, अशी शंका डोक्यात आली, पण हिंदीच्या शिक्षकांना विचारायची तेव्हा हिंमत झाली नाही, पण मनोमनी खात्री वाटत होती की पुस्तकातले कवी नि हिंदी चित्रपट गाणी लिहिणारे गीतकार एकच असावेत.

पुढे वस्तुस्थिती समजली नि लहानपणी आपण कसे बरोबर होतो याचा आनंद झाला. नीरज रूढार्थाने लोकप्रिय गीतकार होऊ शकले नाहीत. त्या काळात मजरुह, शैलेंद्र, हसरत जयपुरी, राजेंद्र कृष्ण, साहीर यांच्यासारखे दिग्गज गीतकार होते, म्हणून नीरज यांना जास्त संधी मिळाली नसावी, पण जी मिळाली त्यावर त्यांनी चार चाँद लावले, असंच म्हणायला हवं.

नीरज यांचा जन्म ४ जानेवारी १९२५ रोजी उत्तर प्रदेशातल्या इटावा इथं झाला. ते सहा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. घरची परिस्थिती गरिबीची. त्यांच्या गावापासून जवळच यमुना नदी वाहायची. ते नदीत पोहून नाणी जमा करायचे. शिवाय पान आणि विड्यांचीही विक्री त्यांनी केली, तर कधी रिक्षादेखील चालवली. १० वर्षे ते दुसर्‍याच्या घरी राहिले. एकटेपणा त्यांना त्रास द्यायचा. मग एका वकिलाकडे टायपिस्टचं काम केलं.

पुढे कारकून झाले. नंतर प्राध्यापक. इतकंच नाही तर १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनात सहभागी होऊन काही दिवस त्यांनी तुरुंगवासही भोगला. १९५४ मध्ये एक घटना घडली. नववधूच्या वेषातल्या त्यांच्या भाचीचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेने त्यांचं काळीज विदीर्ण झालं. इथूनच त्यांच्यातल्या सृजनतेचा जन्म झाला. आपलं दु:ख त्यांनी कागदावर उतरवलं. त्यांचे ते शब्द होते…

‘पालकी लिए हुए कहार देखते रहे…
कारवा गुजर गया, गुबार देखते रहे…!

त्यांची ही रचना पहिल्यांदा लखनऊ आकाशवाणीवर सादर झाली. नंतर मोहम्मद रफींच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाली. प्रख्यात लेखक, शायर व गीतकार जावेद अख्तर यांना ही रचना प्रचंड आवडली. ते नीरज यांना उर्दूचे कवी आणि हिंदीचे शायर संबोधू लागले. नीरज यांचं बालपण अत्यंत हलाखीत गेलं. ते एकांतवासात राहायचे. एकीकडे ते जीवनातल्या कटू अनुभवांना सामोरे जात होते, तर दुसरीकडे कबीर, ओशो, महर्षी अरविंद यांच्या साहित्याचं वाचन सुरू होतं. याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. म्हणूनच त्यांच्या लेखणीतून

‘अब तो मजहब कोई ऐसा भी चलाया जाए
जिसमे इन्सान को इन्सान बनाया जाए…
जिसकी खुशबू से महक जाए पडोसी का घर भी
फूल इस किस्म का हर सिम्त खिलाया जाए…
आग बहती है यहाँ गंगा मे, झेलम मे भी
कोई बतलाए कहां जा के नहाया जाए…
प्यार का खून हुआ क्यो ये समझने के लिए…
हर अंधेरे को उजाले मे बुलाया जाए…!

असे भारताची गंगा-जमनी तहजीब व्यक्त करणारे शब्द सहजतेने पाझरले.

कवी हरिवंशराय बच्चन यांच्या कवितांनी नीरज यांना वेड लावले. त्यांच्या ‘मधुशाला’ने ते वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी स्वत:ला पारखून घेत होते. कविसंमेलनात कविता पेश करण्याच्या शैलीवर हरिवंशराय यांचाच प्रभाव असल्याचे त्यांनीच सांगितलं. हरिवंशराय त्यांचे अतिशय आवडते कवी होते तसेच टागोर, खलील जिब्रान यांच्याही लेखनाचे ते चाहते होते.

१९६५ मध्ये उत्तम आयुष्य जगण्याचा ध्यास घेऊन नीरज मुंबईत आले. त्यांना सर्वात आधी ‘नई उमर की नई फसल’ चित्रपटाची गाणी लिहिण्याची संधी मिळाली. यातली गाणी फारसी लोकप्रिय झाली नाहीत. मुंबईच्या सिनेसृष्टीतला तामझाम न मानवल्याने ते मुंबई सोडून अलीगढला परतले. इथल्या महाविद्यालयाची अर्थव्यवस्था पाहून ते दु:खी झाले. मग पुन्हा एकदा नवी उमेद, नवा आत्मविश्वास नि नव्या जिद्दीने गीतकार म्हणून आपली ओळख प्रस्थापित करण्यासाठी सिनेसृष्टीत दाखल झाले. इथं आल्यावर त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. या काळात हिंदी सिनेसृष्टीत पंजाब्यांचा दबदबा होता, तर चित्रपटांच्या कथा आणि गाण्यांवर उर्दूचा गहिरा पगडा होता.

एका कविसंमेलनात देव आनंद यांनी नीरज यांना ऐकलं. देव यांना त्यांच्या कवितेची भाषा फार आवडली. त्यांनी सिनेमासाठी सोबत काम करण्याचं आश्वासन दिलं. देव नीरज यांना संगीतकार सचिनदेव बर्मन यांच्याकडे घेऊन गेले. सचिनदा तेव्हा ‘प्रेमपुजारी’ चित्रपटाचं संगीत करीत होते. त्यांनी ‘रंगीला’ शब्दापासून सुरू होणारं गाणं लिहायला सांगितलं. नीरज यांनी लगेचच ‘रंगीला रे, तेरे रंग मे, यू रंगा है मेरा मन.. छलीया रे ना बुझे है किसी जल से ये जलन…’ हे गाणं लिहून दिलं. वास्तविक सचिनदांनी त्यांना अडचणीत आणण्यासाठी मुद्दाम कठीण चाल दिली होती, पण नीरज यांनी हे सुंदर गाणं लिहून त्यांचा मनसुबा परतवून लावला.

शिवाय सचिनदांनीच त्यांना शमा, परवाना, शराब, तमन्ना, जानेमन, जान, इश्क यांसारखे शब्द टाळून गाणी लिहायला सांगितलं. मग हाडाचे कवी असलेल्या नीरज यांनी बगिया, मधुर, गीतांजली, धागा, माला, दरपन, रेशमी, मखमली, मेघा अशा शब्दांचा उपयोग आपल्या गाण्यांमध्ये चपखलपणे केला. राज कपूरला त्यांची ‘राजमार्ग के पदयात्री’ ही कविता फार आवडायची. राजने याच कवितेच्या चालीवर त्यांना ‘मेरा नाम जोकर’साठी एक गाणं लिहायला सांगितलं. नीरज यांनी ये भाय जरा देख के चलो, आगे भी नही पिछे भी… हे गाणं लिहून राजची इच्छा पूर्ण केली.

नीरज पहिल्यांदा प्रकाशझोतात आले १९६८ मधल्या ‘कन्यादान’ सिनेमातल्या ‘लिखे जो खत तुझे, वो तेरी याद मे, हजारो रंग के नजारे बन गए… या रफीने गायलेल्या आणि शंकर-जयकिशन यांनी स्वरबद्ध केलेल्या गाण्याने! १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात नीरज-सचिनदेव बर्मन जोडीने अनेक कर्णमधुर गाणी श्रोत्यांना दिलीत. यात शर्मिली, गॅम्बलर, तेरे मेरे सपने, प्रेम पुजारी, छुपा रुस्तम या चित्रपटांचा अंतर्भाव आहे. सचिनदांचे निधन झाल्यावर नीरज यांनी गीत लेखनाचा संन्यास घेतला नि मुंबईला अलविदा केलं. साधारणत: ५ वर्षांचीच त्यांची फिल्मी कारकीर्द होती.

इतक्या कमी कालावधीत त्यांनी सव्वाशेपेक्षा जास्त गाणी लिहिलीत. या ५ वर्षांतच त्यांनी सलग तीनदा सर्वोत्तम गीतकाराचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवण्याची किमया केली. काल का पहिया घुमे रे भैया…(चंदा और बिजली/१९६९), बस यही अपराध मै हर बार करता हूँ, आदमी हू आदमी से प्यार करता हूँ… (पहचान/१९७०) आणि ए भाय जरा देख के चलो…(मेरा नाम जोकर/१९७१) ही ती फिल्मफेअर विजेती गाणी! विशेष म्हणजे नीरज यांची जोडी जमली होती संगीतकार सचिनदेव बर्मन यांच्यासमवेत, पण त्यांना फिल्मफेअर मिळालेल्या तिन्ही गाण्यांचे (व चित्रपटांचे) संगीतकार होते शंकर-जयकिशन! भारत सरकारने १९९१ मध्ये पद्मश्री, तर २००७ मध्ये पद्मभूषण देऊन नीरज यांचा सन्मान केला.

अत्यंत अल्पकाळ सिनेसृष्टीत राहून आपला वेगळा ठसा उमटवणारे नीरज हिंदी साहित्यातले महान कवी होते. त्यांना हिंदीतली ‘वीणा’ म्हणायचे, तर अन्य भाषिक ‘संत कवी’ म्हणून गौरव करायचे. वीसपेक्षा जास्त काव्यसंग्रह त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या अनेक कवितांचा वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. ‘आसू जब सम्मानित होंगे मुझको याद किया जाएगा, जहां प्रेम किं चर्चा होगी मेरा नाम लिया जायेगा, गीत जब मर जायेंगे फिर क्या यहाँ रह जाएगा, एक सिसकता आंसूओ का कारवां रह जाएगा,’ असं म्हणणार्‍या नीरज यांच्या गाण्यांशिवाय हिंदी प्रेमगीतांचा इतिहास पूर्ण होणार नाही.

२०१८ च्या १९ जुलैला नीरज यांनी अखेरचा श्वास घेतला. ४ जानेवारी २०२४ पासून त्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालं असून २०२५ मध्ये त्याची सांगता होईल. यानिमित्ताने त्यांना अभिवादन करताना त्यांच्याच ओळी आठवतात, ‘कहानी बन कर जिए है इस जमाने मे, सदिया लग जायेंगी हमे भुलाने मे, आज भी होती है दुनिया पागल, जाने क्या बात है, नीरज के गुनगुनाने में!’ फुलांच्या रंगानी नि हृदयाच्या लेखणीने भावमधुर गाणी लिहिणार्‍या नीरज यांना विसरणं कसं शक्य आहे?