घरफिचर्ससारांशथोडा है.. थोडे की जरुरत है...

थोडा है.. थोडे की जरुरत है…

Subscribe

हजारो-लाखो वेळा प्रयत्न करूनदेखील नियतीच्या या खेळात स्वप्नपूर्ती झाली नसली तरी पराभव स्वीकारून नाराज व्हायचं नाही. जे आपल्यापाशी नाहीये त्याची खंत करत बसण्यापेक्षा जे आहे त्यातून स्वतःला अधिक उन्नत करून स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्यापाशी जे काही थोडंसं आहे ते थोडं न समजता जास्त समजायला हवं. आहे त्यात आपलं जगणं कसं सुंदर करता येईल यासाठी जीवापाड प्रयत्न करायला हवेत. जिंदगी फिर भी यहा खूबसुरत है... या ओळीतून थकलेल्या वाटसरूला पुढे चालत राहण्याची प्रेरणा मिळते. सुगम शब्दांत गुलजारने जगण्याचं तत्वज्ञान सांगितलंय.

गुल आनंद, रोमू सिप्पी निर्मित आणि बासू चटर्जी लिखित व दिग्दर्शित ‘खट्टा-मीठा’ हा चित्रपट जानेवारी 1978 मध्ये प्रदर्शित झाला होता. यात दादामुनी अशोककुमार यांच्यासह पर्ल पदमसी, राकेश रोशन, बिंदिया गोस्वामी, देवेन वर्मा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचे कथानक 1968 मधल्या ‘योर्स, माईन रपव अवर्स’ या अमेरिकन चित्रपटावर आधारलेलं आहे. गुलजार यांनी लिहिलेल्या यातल्या गाण्यांना राजेश रोशन (अभिनेता राकेश रोशनचा भाऊ) यांनी स्वरसाज चढवला आहे. या चित्रपटातल्या सहा गाण्यांपैकी थोडा है थोडे की जरुरत है, तुमसे मिला था कुछ अच्छे नसीब थे (लता-किशोर), ये जिना है अंगूर का दाना (किशोरदा-उषा मंगेशकर) ही तीन गाणी छान जमून आलेली आहेत. हिंदी चित्रपट संगीताच्या सुर्वणकाळातले संगीतकार रोशन यांचे राकेश आणि राजेश हे दोन पुत्र. राकेश यांनी अभिनय आणि दिग्दर्शनाच्या दुनियेत नाव कमावलं तर राजेश यांनी वडिलांच्या संगीताचा वारसा पुढे चालवला. अभिनेता हृतिक हा रोशन कुटुंबाच्या तिसर्‍या पिढीचा प्रतिनिधी. थोडक्यात हे चित्रपटसृष्टीतलं एक ‘रोशन’ कुटुंब आहे.

ज्या काळात राहुलदेव बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी, खय्याम, बप्पी लाहिरी, रामलक्ष्मण, रवींद्र जैन यांच्यासारखे संगीतकार श्रोत्यांना श्रवणीय संगीताचा आनंद देत होते, त्याच काळात राजेश रोशन यांनीही आपल्या सांगीतिक प्रतिभेचा उत्तम आविष्कार घडवला. पण आर.डी. सारख्या अत्यंत प्रयोगशील नि प्रतिभावंत संगीतकाराच्या विलक्षण कामगिरीमुळे राजेश यांची माध्यमं, समीक्षक आणि श्रोत्यांनीही म्हणावी तशी दखल घेतली नाही याची खंत वाटते. त्यांनी ज्युली, स्वामी, मनपसंद, दुसरा आदमी, देस परदेस, मिस्टर नटवरलाल, याराना, बातो बातो में, काला पत्थर, खुद्दार, कामचोर, आखिर क्यो, खुदगर्ज, करण अर्जुन, कहो ना प्यार है, कोई मिल गया यासारख्या चित्रपटांसाठी अनेक सुश्राव्य गाणी संगीतबद्ध केली आहेत. राजेश रोशन आणि गुलजार ‘खट्टा-मीठा’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा एकत्र आले आणि कानसेनांच्या स्मरणात राहतील अशी गाणी त्यांनी दिली. त्यातल्या एका गाण्यावर हा एक दृष्टिक्षेप…

- Advertisement -

थोडा है, थोडे की जरुरत है
जिंदगी फिर भी यहां खूबसुरत है
थोडा है.. थोडे की जरुरत है…

जिस दिन पैसा होगा, वो दिन कैसा होगा
उस दिन पहिये घूमेंगे और किस्मत के लब चूमेंगे
बोलो ऐसा होगा
थोडा है.. थोडे की जरुरत है…

- Advertisement -

सुन सुन सुन हवा चली, सबा चली
तेरे आंचल से उड के घटा चली
सुन सुन सुन कहां चली, कहां चली
मै छूने जरा आसमां चली
बादल पे उडना होगा
थोडा है.. थोडे की जरुरत है…

हमने सपना देखा है, कोई अपना देखा है
जब रात का घुंघट उतरेगा
और दिन की डोली गुजरेगी
तब सपना पुरा होगा
थोडा है.. थोडे की जरुरत है
जिंदगी फिर भी यहां खूबसुरत है…

छोटी सी यह दुनिया मेरी पुरी दुनिया है
अंग लिए रंग लिए संग चलेंगे
साथ है हम साथ है, सब साथ रहेंगे
थोडा है.. थोडे की जरुरत है
जिंदगी फिर भी यहां खूबसुरत है…

आयुष्यात सगळ्यांना कुठल्यातरी गोष्टींची गरज असते. मानव प्राण्याचा जन्मच मुळी काही तरी प्राप्त करण्यासाठी झालेला आहे. आपलं आयुष्य जगत असताना सर्वजण आपापल्या योग्यतेनुसार आणि क्षमतेनुसार काही ना काही मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. शिवाय व्यक्तीच्या मनात आकाशाला गवसणी घालण्याची आकांक्षादेखील घर करून राहत असते. कदाचित यालाच जीवन असं नाव म्हणता येईल. आपण पाहिलेली स्वप्ने वास्तवात न आल्याने काही लोक सतत बेचैन नि अस्वस्थ असतात. अशा लोकांना हे गाणं खूपसा आधार आणि धीर देणारं आहे. आयुष्यात आलेलं अपयश, भंगलेली स्वप्ने, झालेला पराभव, वाटेला आलेली उपेक्षा यांवर हुळूवार फुंकर घालणारं हे गाणं तमाम दु:खी-कष्टीजनांना उभारी देतं. निराशेवर मात करण्याची प्रेरणा देतं. किशोरदांच्या मनाला स्पर्शून जाणार्‍या आवाजात आणि गिटारीच्या तानेसह सुरू होणारं हे गीत खिन्न मनाला आशेचा किरण दाखवतं. गुलजारचे साधे, सरळ नि सोपे शब्द उदास मनाला आलेलं नैराश्य दूर करतात. निराशेचं रुपांतर आशेत परावर्तीत करणारं हे भावस्पर्शी गाणं संगीतकार राजेश रोशनने गुणगुणाव्याशा वाटणार्‍या चालीत बांधलं आहे.

पूर्ण न झालेल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी पुन्हा नव्याने प्रयत्न करण्याचा संदेश गुलजारने यातून देतात. हजारो-लाखो वेळा प्रयत्न करूनदेखील नियतीच्या या खेळात स्वप्नपूर्ती झाली नसली तरी पराभव स्वीकारून नाराज व्हायचं नाही. जे आपल्यापाशी नाहीये त्याची खंत करत बसण्यापेक्षा जे आहे त्यातून स्वतःला अधिक उन्नत करून स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्यापाशी जे काही थोडंसं आहे ते थोडं न समजता जास्त समजायला हवं. आहे त्यात आपलं जगणं कसं सुंदर करता येईल यासाठी जीवापाड प्रयत्न करायला हवेत. जिंदगी फिर भी यहा खूबसुरत है… या ओळीतून थकलेल्या वाटसरूला पुढे चालत राहण्याची प्रेरणा मिळते. सुगम शब्दांत गुलजारने जगण्याचं तत्वज्ञान सांगितलंय.

अभावग्रस्त, हालाखीचं जीवन जगणार्‍या व्यक्तीची मनोवस्था रेखाटताना गुलजार पैशाची गरज अधोरेखित करतात. पैसा आल्यावर गीताचा नायक काय-काय करता येईल याचे मनसुभे रचतो. एका अर्थाने एखाद्या सुशिक्षित बेरोजगार युवकाचं भावविश्व गुलजारने यातून उलगडलं आहे. जे काही आपल्याकडे थोडं आहे त्याचाच आसरा घेऊन उंच आकाशात विहरण्याचा प्रयत्न करायला हवा, असा सकारात्मक संदेश गाण्यातून दिलाय. देशातल्या लोकसंख्येपैकी मोठा समूह या गाण्यातल्या नायकासारखे जीवन जगतोय. मनात आशा आणि जिद्द यांची वात तेवत ठेवल्यास रात्रीचा अंधकार दूर होऊन दिवसाचा लख्ख प्रकाश पडेल, असा आशावाद गाण्याच्या शेवटी गुलजार व्यक्त करतात. खरंच हे एक सकारात्मक, आशादायी आणि उत्साहवर्धक भावनांचे तरंग मनात उमटवणारं गाणं आहे. गाण्यातल्या शब्दांचा भावार्थ नीट समजून घेऊन आशयानुरूप संगीत राजेश रोशन यांनी दिलंय. लतादीदी -किशोरदा यांनी अतिशय तन्मयतेनं आणि गीतातल्या भावनांशी समरस होऊन हे गाणं गायलं आहे. गुलजार-राजेश रोशनचं हे गीत म्हणजे निराशेच्या गर्तेतून अलगदपणे बाहेर काढणारं आंबट-गोड औषधच आहे, खरंय ना ?

–डॉ.प्रवीण घोडेस्वार 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -