घरफिचर्ससारांशहम होंगे कामयाब!

हम होंगे कामयाब!

Subscribe

वेटलिफ्टर मीराबाई चानूने रौप्यपदकाची कमाई करत टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिल्याच दिवशी भारताचे पदकांचे खाते उघडले. भारताचा ऑलिम्पिक स्पर्धांमधील इतिहास तसा संमिश्र निकालांचा, बहुतेक वेळा निराशा करणाराच ठरला आहे. १९०० साली ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणार्‍या भारताच्या खात्यात आतापर्यंत केवळ एका वैयक्तिक सुवर्णासह २९ पदके आहेत. यंदा मात्र टोकियोमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना इतिहास घडवण्याची, नवे विक्रम रचण्याची आणि सुवर्ण अध्याय लिहिण्याची...एकूणच काय तर ‘कामयाब’ होण्याची पुन्हा एक संधी मिळणार आहे.

‘नहीं डर किसी का, नहीं भय किसी का, हम होंगे कामयाब एक दिन…,’ भारताच्या ऑलिम्पिक गीताच्या या केवळ ओळी नाही, तर संपूर्ण देशवासियांच्या आणि भारतीय खेळाडूंच्या या भावना आहेत. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. परंतु, ऑलिम्पिक या जगातील सर्वात मोठ्या आणि मानाच्या क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकणाऱ्या देशांमध्ये हाच भारत देश अव्वल २५ मध्येही येत नाही. यंदा मात्र टोकियोमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना इतिहास घडवण्याची, नवे विक्रम रचण्याची आणि सुवर्ण अध्याय लिहिण्याची…एकूणच काय तर ‘कामयाब’ होण्याची पुन्हा एक संधी मिळणार आहे.

भारताचा ऑलिम्पिक स्पर्धांमधील इतिहास तसा संमिश्र निकालांचा, बहुतेक वेळा निराशा करणाराच ठरला आहे, असे म्हणणे वावगे ठरू नये. भारताने पहिल्यांदा १९०० सालच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपला सहभाग नोंदवला होता आणि पदार्पणात भारताला दोन रौप्यपदके आपल्या खात्यात जमा करण्यात यश आले होते. नॉर्मन प्रिचर्ड या धावपटूने भारताचे प्रतिनिधित्व करताना २०० मीटर धावणे आणि २०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत ही रौप्यपदके पटकावली होती. पुढे जाऊन भारताच्या पुरुष हॉकी संघाने आपले वर्चस्व प्रस्थापित करताना सलग सहा (१९२८, १९३२, १९३६, १९४८, १९५२, १९५६) आणि त्यानंतर आणखी दोनदा (१९६४ व १९८०) असे एकूण १२ पैकी आठ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधली. इतर खेळांमध्ये मात्र भारताची सुवर्णपदकाची पाटी कोरीच राहिली.

- Advertisement -

दरम्यानच्या काळात भारतासाठी आणि विशेषतः महाराष्ट्रासाठी १९५२ चे हेलसिंकी ऑलिम्पिक ऐतिहासिक ठरले. महाराष्ट्राचे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक पदकविजेते होण्याचा मान पटकावला. त्यांना या स्पर्धेमध्ये कांस्यपदक जिंकण्यात यश आले. त्यानंतर मात्र भारताला वैयक्तिक पदकासाठी तब्बल ४४ वर्षे वाट पाहावी लागली. अखेर १९९६ अटलांटा ऑलिम्पिकमध्ये टेनिसपटू लिअँडर पेसने कांस्यपदक पटकावत वैयक्तिक पदकांचा हा दुष्काळ संपवला. त्यानंतर १२ वर्षांनी भारताला ऑलिम्पिकमधील पहिला आणि आजवरचा एकमेव वैयक्तिक सुवर्णपदक विजेता खेळाडू लाभला. २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये नेमबाज अभिनव बिंद्राने १० मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करत भारतीय क्रीडा इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले.

२०१२ सालचे लंडन ऑलिम्पिक भारतासाठी बऱ्याच दृष्टिकोनातून अविस्मरणीय ठरले. भारताने या ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करताना सहा पदके जिंकली. याच स्पर्धांमध्ये मेरी कोमच्या (कांस्य) रूपात भारताला बॉक्सिंगमधील पहिलीे महिला पदकविजेती लाभली. तसेच सायना नेहवालने (कांस्य) भारताला ऑलिम्पिकच्या इतिहासातील बॅडमिंटनमधील पहिले पदक मिळवून देण्याची विक्रमी कामगिरी केली. सुशील कुमार ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्यपदक जिंकवून देणारा पहिलावहिला कुस्तीपटू ठरला. पुढील म्हणजे २०१६ ऑलिम्पिकमध्ये या चांगल्या कामगिरीच्या पुनरावृत्तीची सर्वांना अपेक्षा होती. परंतु, भारताला या स्पर्धांमध्ये केवळ दोन पदकांवर समाधान मानावे लागले.

- Advertisement -

यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये मात्र चित्र बदलेल अशी प्रत्येकच भारतीयाला आशा आहे. ग्रेसनोट या जगातील आघाडीच्या डेटा आणि तंत्रद्यान कंपनीने भारत यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये चार सुवर्णपदकांसह एकूण १९ पदके जिंकेल अशी भविष्यवाणी केली आहे. परंतु, अगदी आशादायी भारतीय चाहत्यालासुद्धा इतक्या पदकांची अपेक्षा नाही. ‘भारताने या संख्येच्या अर्धी पदके मिळवली तरी मी आनंद मानेन,’ असे अभिनव बिंद्रा म्हणाला. परंतु, बिंद्रासह अनेक आजी-माजी खेळाडू आणि क्रीडा समीक्षकांना यंदा भारतीय पथक काही तरी खास कामगिरी करेल असे वाटत आहे.

यंदाच्या ऑलिम्पिकसाठी भारताने आतापर्यंतचे सर्वात मोठे पथक टोकियोमध्ये पाठवले आहे. भारताच्या या पथकात १२० खेळाडूंचा समावेश असून ते विविध अशा ८५ क्रीडा प्रकारांत खेळणार आहेत. भारताला नेमबाजीमध्ये पदके मिळण्याची दाट शक्यता आहे. भारताच्या १५ सदस्यीय नेमबाजी संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचे चांगले मिश्रण आहे. भारताला पदकाची सर्वाधिक अपेक्षा आहे, ती मनू भाकर आणि सौरभ चौधरी या युवकांकडून!

१९ वर्षीय मनूने वर्ल्डकप आणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्णपदके पटकावली असून आता तिला ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरीची संधी आहे. त्याचप्रमाणे जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या सौरभ चौधरीच्या खात्यात युवा ऑलिम्पिक आणि एशियाडमध्ये सुवर्णपदके असून यंदा ऑलिम्पिक पदार्पणात तो कशी कामगिरी करतो याकडेसर्वांचे लक्ष असेल. हे दोघे एकेरीप्रमाणेच १० मीटर एअर पिस्तूल नेमबाजी प्रकाराच्या मिश्र दुहेरीत एकत्र खेळणार आहेत.

भारताची बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूकडून यंदा केवळ दमदार कामगिरीची नाही, तर पदकाची अपेक्षा केली जात आहे. २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधूने रौप्यपदकाची कमाई करत जगासमोर स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली होती. २०१९ मध्ये जागतिक स्पर्धा जिंकणाऱ्या सिंधूला यंदा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरीची संधी मिळणार आहे. सायना नेहवालला टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यात अपयश आल्याने चाहत्यांच्या सिंधूकडून असलेल्या अपेक्षा आता वाढल्या आहेत. ‘अपेक्षांमुळे माझ्यावर दडपण येत नसून अधिक जोमाने खेळण्याचे मला बळ मिळते,’ असे सिंधू म्हणते.

बॉक्सिंगमध्ये सहा वेळची विश्वविजेती मेरी कोम यंदा तिच्या अखेरच्या ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहे. ‘हे माझे अखेरचे ऑलिम्पिक असेल. त्यामुळे मला अविस्मरणीय कामगिरी करायची आहे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणे हे माझे एकमेव लक्ष्य आहे,’ असे ३८ वर्षीय मेरी एका मुलाखतीत म्हणाली. ५१ किलो वजनी गटात खेळणाऱ्या मेरीने २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. परंतु, कांस्यपदकावर समाधान मानेल, ती मेरी कशी! यंदा आपल्या अखेरच्या ऑलिम्पिकमध्ये ती सुवर्णपदक जिंकण्यास उत्सुक असून संपूर्ण भारताचा तिला पाठिंबा असेल. पुरुषांमध्ये ५२ किलो वजनी गटात खेळणारा अमित पांघलही पदकाचा दावेदार आहे. कुस्तीमध्ये विनेश फोगट आणि बजरंग पुनिया, तिरंदाजीत दीपिका कुमारी, तसेच भालाफेकपटू नीरज चोप्रा यांच्याकडूनही यंदा दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.

भारत आता जगात महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत असला तरी क्रीडा क्षेत्रात, विशेषतः ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी भारताला अजून बरीच वर्षे वाट पाहावी लागणार हे निश्चित आहे. परंतु, प्रत्येक गोष्टीची सुरुवात कुठे तरी होतेच ना, मग टोकियोत का नाही! ‘मन में हैं विश्वास, पुरा हैं विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन,’ असे म्हणत भारतीय खेळाडू यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांचा हा विश्वास सत्यात उतरतो की, केवळ गाण्यापुरता मर्यादित राहतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

भारताचे यंदाच्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले खेळाडू –

अ‍ॅथलेटिक्स : के.टी. इरफान (२० किमी चालणे), संदीप कुमार (२० किमी चालणे), राहुल रोहिल्ला (२० किमी चालणे), गुरप्रीत सिंग (५० किमी चालणे), भावना जाट (२० किमी चालणे), प्रियांका गोस्वामी (२० किमी चालणे), अविनाश साबळे (३००० मीटर स्टीपलचेस), मुरली श्रीशंकर (लांब उडी), एम.पी. जबीर (४०० मीटर अडथळ्यांची शर्यत), नीरज चोप्रा (भालाफेक), शिवपाल सिंह (भालाफेक), अन्नू राणी (भालाफेक), तेजेंदरपाल सिंग तूर (गोळाफेक), द्युती चंद (१०० आणि २०० मीटर धावणे), कमलप्रीत कौर (थाळीफेक), सीमा पुनिया (थाळीफेक), ४x४०० मिश्र रिले, ४x४०० पुरुष रिले

नेमबाजी : अंजुम मुद्गिल, अपूर्वी चंडेला, दिव्यांश सिंह पन्वर, दीपक कुमार, तेजस्विनी सावंत, संजीव राजपूत, ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, मनू भाकर, यशस्विनी सिंह देस्वाल, सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा, राही सरनोबत, एलावेनिल वालारिवान, अंगद वीर सिंह बाजवा, मैराज अहमद खान

बॅडमिंटन : पी.व्ही. सिंधू (महिला एकेरी), साई प्रणित (पुरुष एकेरी), सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टी (पुरुष दुहेरी)

बॉक्सिंग : मेरी कोम (५१ किलो), सिमरनजीत कौर (६० किलो), लोव्हलिना बोर्गोहेन (६९ किलो), पूजा राणी (७५ किलो), अमित पांघल (५२ किलो), मनीष कौशिक (६३ किलो), विकास कृष्णन (६९ किलो), आशिष कुमार (७५ किलो), सतीश कुमार (९१ किलो)

कुस्ती : सीमा बिसला (५० किलो), विनेश फोगट (५३ किलो), अंशू मलिक (५७ किलो), सोनम मलिक (६२ किलो), रवी कुमार दहिया (५७ किलो), बजरंग पुनिया (६५ किलो), दीपक पुनिया (८६ किलो)

तिरंदाजी : तरुणदीप राय, अतानू दास, प्रविण जाधव, दीपिका कुमारी

टेनिस : सानिया मिर्झा आणि अंकिता रैना (महिला दुहेरी), सुमित नागल (पुरुष एकेरी)

टेबल टेनिस : शरथ कमल, साथियन, सुतिर्था मुखर्जी, मनिका बात्रा

हॉकी : पुरुष संघ, महिला संघ

वेटलिफ्टिंग : मीराबाई चानू

गोल्फ : अनिर्बन लाहिरी, उदयन माने, आदिती अशोक

जिम्नॅस्टिक्स : प्रणती नायक

ज्युडो : सुशीला देवी लिकमबम

नौकानयन (रोईंग) : अर्जुन जाट, अरविंद सिंह

समुद्रपर्यटन (सेलिंग) : नेत्रा कुमानन, विष्णू सर्वनन, के. सी. गणपती आणि वरून ठक्कर

जलतरण : साजन प्रकाश, श्रीहरी नटराज, माना पटेल

अश्वशर्यत : फौवाद मिर्झा

तलवारबाजी : भवानी देवी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -