हरनाज पंजाबी कुडी

...अ‍ॅण्ड द न्यू मिस युनिव्हर्स इज इंडिया’ .. इस्त्रायलमधील इलियटच्या सभागृहात झालेल्या या घोषणेनंतर संपूर्ण भारतीयांची मान अभिमानाने ताठ झाली. 21 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय सौंदर्यवतीने हा सन्मान मिळावला. ‘बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटी’ म्हणता येईल अशा 21 वर्षीय हरनाज संधूने ही स्पर्धा जिंकली. स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्याबरोबर हरनाजच्या कौतुकास्पद बातम्या आणि सोशल मीडिया पोस्टचा सगळीकडे अगदी धुरळा उडाला. या पंजाबी कुडीने एवढ्या कमी वयात कशी काय बरं एवढी उंच भरारी घेतली, हा प्रश्न या वेळी अनेकांच्या मनात आला असेल. हा दिमाखदार सोहळा बघितल्यावर लक्षात येते की, केवळ सौंदर्याच्या जोरावरच नव्हे तर बौध्दिक कुवतीवर हरनाजने हे देदीप्यमान यश संपादन केले.

India's Miss Universe 2021 heres the question that won harnaaz sandhu her miss universe title

या दिमाखदार सोहळ्यात आपली ओळख करुन देतानाच हरनाजने केलेला ‘नमस्ते’ चहात्यांची अपेक्षा वाढवून गेला. सूत्रसंचालक स्टिव हार्वे याने हरनाजला प्रथमत: चक्क तिच्या आवडत्या प्राण्याचा आवाज काढायला लावला. ज्या स्पर्धेचे स्वप्न उराशी बाळगून हरनाज मोठी झाली त्या स्पर्धेत तिला प्राण्याचा आवाज काढावा लागेल यावर तिचाही विश्वास नव्हता, परंतु पर्याय नव्हता. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा कमालीचा तणाव असतानाही तिने तो आपल्या दिसण्यात वा आवाजात जाणवू न देता मांजरीचा आवाज काढला.. सभागृह ‘मॅव, मॅव’च्या आवाजाने दणाणून गेले तेव्हा हसू रोखणे प्रत्येकाला मुश्किल झाले होते. यातून तिच्या आत्मविश्वासाची झलक संपूर्ण जगाला दिसली. हरनाजला स्पर्धेत विचारल्या गेलेल्या दोन प्रश्नांची तिने दिलेली उत्तरंच सांगतात की हरनाज विजयाची खरी मानकरी कशी आहे ते.

हरनाजला वातावरण बदला संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. अनेक लोकांचे म्हणणे आहे की, पर्यावरणात बदल होत आहेत. तर ही गोष्ट तुम्ही लोकांना कशी पटवून द्याल, या प्रश्नाचं उत्तर देताना हरनाजनं सांगितले की, ‘आपल्या निसर्गावर जी संकटं येत आहेत, ती पाहून मला खूप दुःख होतं. त्यामुळे माझं हृदय विदीर्ण होऊन जातं. हे सगळं होतं, त्याला आपलं बेजबाबदार वर्तनच कारणीभूत आहे. त्यामुळेच मला असं वाटतं की ही एक अशी वेळ आहे की, आता बोलणं कमी आणि कृती जास्त करण्याची गरज आहे. असं केलं तरच आपला निसर्ग वाचू शकेल अन्यथा त्याचा शेवट निश्चित आहे. वेळीच उपाय योजना करून त्याचं रक्षण केलं तर आपल्यावर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हा सर्वांना समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे.’

तर अंतिम फेरीमध्ये हरनाज संधूला प्रश्न विचारण्यात आला होता की, तरुण महिलांवर कोणत्या प्रकारचा दबाव असतो आणि हा दबाव झुगारून देण्यासाठी तू काय सल्ला देशील, या प्रश्नावर ती गडबडून न जात शांतपणे पण आत्मविश्वासपूर्वक उत्तरली, ‘आजच्या तरुणाईवर सर्वात मोठं दडपण आहे ते म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. ही गोष्ट तुम्हाला अधिक चांगले होण्यास मदत करते. स्वतःची इतरांशी तुलना करणे थांबवा आणि जगभरात घडणार्‍या महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. स्वतःसाठी बोला, कारण तुम्ही तुमच्या जीवनाचे नेते आहात. तुम्हीच तुमचा आवाज आहात. माझा स्वतःवर विश्वास होता आणि म्हणूनच मी आज इथे तुमच्या समोर उभी आहे’. हरनाजच्या या दोन्ही उत्तरांवरून लक्षात येईल की हरनाज कौर संधू ही एक बुद्धिमान सौंदर्यवती आहे आणि म्हणूनच ‘मिस युनिव्हर्स’ हा किताब तिला मिळाला. तिने दिलेली उत्तरं खरंच तरूणाईला विचार करायला लावणारी आहेत.

मिस युनिव्हर्स झालेल्या हरनाजचा स्पर्धेतला वावर तिचा आत्मविश्वास, तिथे विचारल्या गेलेल्या प्रश्नांना तिने दिलेली उत्तरे यावरून तिची बौद्धिक क्षमता आणि वैचारिक प्रगल्भता दिसून येते. त्यामुळेच आजच्या तरुण पिढीसाठी हरनाज नक्कीच एक उत्तम उदाहरण आहे.

सौंदर्य स्पर्धेत विजयी होणं म्हणजे फक्त चांगलं दिसण्याचेच निकष तिथे असणार असे आपल्यातल्या कित्येकांना वाटत असते. पण असे नाहीये. कित्येक तरूणींचा असा गैरसमज आहे की फक्त आपल्या आहार, व्यायाम आणि त्वचेवर मेहनत घेतली की आपणही सौंदर्य स्पर्धेत जाऊ शकतो. पण हे पूर्ण सत्य नाही. आपल्या सौंदर्याबरोबरच आपल्या बुद्धीचा, आपल्यातल्या प्रतिभेचादेखील इथे कस लागत असतो. आपण कसे दिसतो याबरोबरच आपण कसे आहोत यावर आपले मूल्यांकन इथे केले जाते.

मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड या स्पर्धा सुरू झाल्या तेव्हाचे त्यांचे स्वरूप आणि आताचे स्वरूप यात खूप बदल झाला आहे. पूर्वी फॅशन, मेकअप यावर जास्त भर देणार्‍या या स्पर्धांमध्ये हळूहळू बदल होत गेला आणि आता तिथे तुमचा हजरजबाबीपणा, आत्मविश्वास, सामाजिक जाणिवा, तुमचा मानवी जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन इत्यादी गोष्टी लक्षात घेतल्या जातात. यापूर्वी 2017 मध्ये झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेतदेखील मानुषी छिल्लार हिला विचारल्या गेलेल्या प्रश्नाला तिने दिलेल्या उत्तराने ती मिस वर्ल्डची दावेदार ठरली होती. म्हणजेच सौंदर्यस्पर्धेत शेवटापर्यंत पोहोचलेल्या दावेदारांना विजय मात्र त्यांच्या बुद्धीच्या आधारेच मिळालाय.

मिस वर्ल्ड ठरलेली मानुषी असेल किंवा आताची मिस युनिव्हर्स पटकावलेली हरनाज असेल या दोघींनीही त्यांच्यातील असलेल्या कर्तृत्वाने यश मिळवले आहे. आता प्रश्न हा आहे की, आपण त्यांच्या यशातून काय शिकतो? जगातील असंख्य मुलींना वाटत असणार आपणही मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड व्हावे. परंतु त्यासाठी नेमकं काय करायला हवंय, कुठल्या गोष्टी आपल्यात असायला हव्यात जेणेकरून आपणही तिथपर्यंत पोहोचू. तर नितळ त्वचा, सडपातळ अंगकाठी, उत्तम केशरचना, फॅशनचे नॉलेज. असाच अनेकींचा समज आहे. परंतु असे नाहीये यात तुमची जडणघडण कशी झाली आहे, तुम्ही एखाद्या गोष्टीवर विचार कसा करता अशा अनेक गोष्टी तपासल्या जातात.

हल्लीच्या सोशल मीडियाच्या काळात तर प्रत्येकाला सुंदर दिसायचं आहे. त्यामुळेच आपल्या चेहर्‍याला सुंदर करणार्‍या फिल्टर्सला प्रचंड पसंती आहे. एका क्षणात संपूर्ण चेहर्‍याचे रूपडे पालटून जाते. त्यात कधीकधी इतका अतिरेक होतो की मुळ चेहराच बदलून जातो. पण तरीही आपल्याला ते आवडते. का होत असेल असं? आपण छान सुंदर दिसावं ही मानवी भावना आपल्यातल्या प्रत्येकात आहे. आणि त्या फिल्टर्समधून आपण आपला आनंद मिळवत असतो. ज्यात काही चुकीचे नाहीये. परंतु यातून काही काळानंतर आपण आपसूकच स्वतःबद्दल असमाधानी व्हायला लागतो. म्हणजेच काय तर आपलं सगळं जग, आपला सगळा आनंद हा फक्त आपल्या दिसण्याजवळ येऊन अडतो. यात फक्त आपला दोष नाहीये आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाने काही अलिखित नियम आपल्याभोवती गुंडाळले आहेत. आपले कुटुंब, नातेवाईक, सहकारी या सगळ्यांच्या तोंडी तुम्ही दिसण्यावरून केलेली शेरेबाजी ऐकली असेल.

लग्नसमारंभात, सणावाराला सगळ्या ठिकाणी स्रीने चांगलंच दिसावं हा अट्टाहास असतो. त्यामुळेच अगदी पूर्वीपासून स्रीकडे फक्त प्रदर्शनीय वस्तू म्हणूनच पाहिले गेले आहे. परिणामी स्त्रीला तिच्या सौंदर्याचे सर्टिफिकेट सतत समाजात मिळवावे लागत असते. हल्ली प्रसिद्ध माणसांमुळे, सिनेमांतून सौंदर्याचे चुकीचे निकष पक्के झाले आहेत. आणि सर्वसामान्य महिलांना-तरूणींना त्या निकषांशी जुळवून घेणे अवघड जाते. आपल्याकडे अगदी लग्न ठरवतानादेखील मुलगी कशी दिसते यातच सगळ्यांना रस असतो. पण ती कशी आहे याच्याशी मात्र कुणालाच घेणं देणं नसतं. आजच्या या मॅरेज मार्केटमध्ये मुलीचे रंग, वजन, उंची यावरूनच तिची योग्यता ठरविली जाते. तुम्ही सुंदर दिसलात तरच समाजमान्य असाल नाहीतर तुमचं मूल्य शून्य आहे हे सतत स्त्रीच्या मनावर बिंबवले जाते. त्यामुळेच आपला सावळा रंग, चेहर्‍यावरचे पिंपल्स, आपली वजन-उंची इत्यादी गोष्टींमुळे आजच्या तरुणी प्रचंड तणावात असतात. यामुळे नैराश्य येणे, अभ्यासातील, कामातील लक्ष कमी होणे, परिणामी अपेक्षित ध्येय पूर्ण न करू शकल्याने सगळ्याचा दोष स्वतःला देणे असं कित्येक मुली करत असतात.

साहजिकच यामुळे मुलीची हुशारी, तिच्याकडे असलेली बुद्धिमत्ता याला दुय्यम स्थान मिळते. आणि नकळतपणे अनेक मुलीसुद्धा सुंदर दिसण्याचा, परफेक्शनचा ध्यास घेतात. त्यामुळे शरीरावर, त्वचेवर घातक असणार्‍या अनेक केमिकलयुक्त सौंदर्य प्रसाधनांचा वापर केला जातो. मैत्रिणींनो तुमची सुंदरता ही सर्वस्वी तुमच्या विचारांवर अवलंबून असते. तुमच्यातील आव्हानं पेलण्याच्या, प्रत्येक अडचणीतून मार्ग काढण्याच्या क्षमतेत ती असते. तुमची योग्यता ही तुमच्या त्वचेच्या रंगावर, शरीराच्या उंचीवर किंवा डोळ्यातील काजळावर ठरत नाही तर ती तुमच्याकडील बौद्धिक, भावनिक, वैचारिक सामर्थ्यावर अवलंबून असते. समाजातली तुमची माणूस म्हणून असलेली ओळखसुद्धा त्यातूनच निर्माण होत असते. अमुक अमुक असणं म्हणजेच सुंदर. आणि सुंदर म्हणजेच परिपूर्ण असे अजिबात नाहीये. जेव्हा कधी कुणी व्यक्ती तुमच्या दिसण्यावरून तुमचे मोजमाप करीत असेल तर ती त्या व्यक्तीची वैचारिक गरीबी आहे. व्यक्तिनिहाय सुंदरतेच्या व्याख्या वेगळ्या असतात. मात्र दुसर्‍याच्या नजरेतून स्वतःकडे कधीच बघू नका. स्वतःवर प्रेम करा. स्वतःवर विश्वास ठेवा. मग बघा कधीच कुणी तुम्हाला विचलित करू शकणार नाही.

आत्मविश्वास आणि आत्मनिर्णयाचे सामर्थ्य जी व्यक्ती नीट ओळखते तीच आपल्या जीवनातला उत्कर्ष बिंदू गाठत असते. आत्मविश्वासाचा अभाव असलेल्या जीवनाला स्थैर्य नसते. ते सतत विस्कटत असते. तेच जर आपल्यात आत्मविश्वास असेल तर आपण जीवनात काहीही साध्य करू शकतो. आपण सगळेच सजीव जन्मतःच इतरांपेक्षा वेगळे आहोत. आणि आपल्यातले वेगळेपणच आपली ओळख आहे. जगात असंख्य कर्तबगार स्त्रिया होऊन गेल्या. ज्या त्यांनी केलेल्या कामाने ओळखल्या जातात. त्यांच्या कर्तृत्वानेच जगात त्यांच्या चेहर्‍याला ओळख मिळवून दिली. त्यामुळे कुठेही जा तुमच्या बुद्धीची चमकच तुम्हाला कायम यशस्वी करते.

चेहर्‍यावरची लाली तेव्हाच शोभून दिसते जेव्हा तिला बुद्धिमत्तेची जोड असते. निव्वळ सौंदर्यावर तुम्ही यशाचे शिखर गाठू शकणार नाही. हरनाज कौर संधूच्या यशातून आपण सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घेऊ की, आपले विचार हाच आपला परिचय असतो. सौंदर्य काळानुरूप लोप पावते, पण बुद्धीचे सौंदर्य मात्र चिरकाल टिकते.

आपल्यातल्या आत्मविश्वासाने आपण सर्वात जास्त आकर्षक दिसत असतो. आणि हा आत्मविश्वास आपल्या बुद्धिमत्तेतून तयार होत असतो. तेव्हा कुठल्याही स्पर्धेत उतरा, शेवटी विजय मात्र बुद्धीचाच होतो. हेच हरनाजच्या यशातून शिकण्यासारखे आहे. चेहर्‍यावर शाईन असलीच पाहिजे, पण जेव्हा तुम्ही तुमच्या गुणवत्तेने ओळखले जाल तेव्हा तुमच्यातील शाईन कायम ऑन असेल.

–शुभांगी खेलूकर