खरंच महाराष्ट्र पुरोगामी झालाय?

आज आपल्यासमोर अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. बेकारी, महागाई, रोजगार, शिक्षण, भ्रष्टाचार, सामजिक तेढ. रस्ता, वीज, पाणी, आरोग्य, या मूलभूत प्रश्नांना बगल देऊन माणूस कसा व्यक्त होतोय? हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय बनलाय. महाराष्ट्राचे संवेदनशील, तरल, सम्यक मन आज म्हणूनच अस्वस्थ आहे. अजूनही नारायण सुर्व्यानी मांडलेला, ‘भाकरीच्या चंद्राचा’ प्रश्न सुटलेला नाहीय. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी आमची बरबाद झाली. असे म्हणणारे अनेक हात आजही तसेच उपेक्षित आहेत. आजच्या गदारोळात ते कुठेच दिसत नाहीत. त्यांचे प्रश्न, त्यांचा देव वेगळा आहे. आनंदाचा, समाधानाचा उजेड अजूनही त्यांच्यापर्यंत पोहचलेला नाहीय.

हा महाराष्ट्र अठरा पगड जातीचा आहे. संत ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकोबा यांच्यासह महात्मा चक्रधर, सकळ संताचा हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र शिवबाचा महाराष्ट्र आहे. संत गाडगेबाबा, संत तुकडोजी, महात्मा फुले स्वा.सावरकर, लोकमान्य टिळक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, साने गुरुजी, न्यायमूर्ती रानडे यांचा हा महाराष्ट्र आहे. अशा कितीतरी महनीय व्यक्तींनी, विभूतींनी हा महाराष्ट्र घडवण्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या घडणीसाठी अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. आपल्या राष्ट्राला प्रगतीची दिशा दाखवणारा, समाजसुधारकांची मांदियाळी निर्माण करणारा महाराष्ट्र आजवर सर्वथैव आघाडीवरच राहिला आहे.परंतु आज महाराष्ट्राचा चेहरा उदास आहे. तो चिंतेत आहे. सामजिक, धार्मिक, जातीय अराजकतेच्या उंबरठ्यावर त्याला आपण आणून उभे केले आहे. हे महाराष्ट्राचे खरे रूप नाही.

संत जनाबाईने त्यांच्या एका अभंगात लेकुरवाळ्या विठ्ठलाचे रूपक योजून सर्वांना पुढे घेऊन जाणार्‍या समाजाचे चित्र रेखाटले होते. हा विठ्ठल खरेतर आपला सर्वांचा बाप आहे. ‘विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा’ हा अभंग फक्त भक्ती पुरता मार्यादित नाहीय. त्यात पुढे मागे, अंगावर खांद्यावर, हात धरून चालणारे, अवतीभवतीच्या संतांचे उल्लेख पहा. जनाबाईने महाराष्ट्राच्या सामजिक एकतेचेच चित्र यातून रेखाटले आहे. असे सर्वांना सोबत घेऊन जाणारा बापमाणूस आज हवाय; पण तो आपल्याला दिसत नाहीय. म्हणूनच आज महाराष्ट्रातील घडणार्‍या घटना पाहिल्या की महाराष्ट्राचे आणि त्यात रहाणार्‍या संवेदनशील माणसाचे मन विदीर्ण झाल्याशिवाय रहात नाही.. ‘ज्या पुरोगामित्वाचे ढोल आपण वाजवतो’ परंतु मनात प्रश्न येतो खरेच आपला महाराष्ट्र पुरोगामी झालाय?.

आज आपल्यासमोर अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. बेकारी, महागाई, रोजगार, शिक्षण, भ्रष्टाचार, सामजिक तेढ. रस्ता, वीज, पाणी, आरोग्य, या मूलभूत प्रश्नांना बगल देऊन माणूस कसा व्यक्त होतोय? हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय बनलाय. महाराष्ट्राचे संवेदनशील, तरल, सम्यक मन आज म्हणूनच अस्वस्थ आहे. अजूनही नारायण सुर्व्यानी मांडलेला, ‘भाकरीच्या चंद्राचा’ प्रश्न सुटलेला नाहीय. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी आमची बरबाद झाली. असे म्हणणारे अनेक हात आजही तसेच उपेक्षित आहेत. आजच्या गदारोळात ते कुठेच दिसत नाहीत. त्यांचे प्रश्न, त्यांचा देव वेगळा आहे. आनंदाचा, समाधानाचा उजेड अजूनही त्यांच्यापर्यंत पोहचलेला नाहीय. आजच्या सामाजिक, राजकीय आणि समाजमाध्यमातील संघर्षात कष्टकर्‍यांचा महाराष्ट्र व्यथित आहे. त्याने कुणाकडे पहायचे?

आम्ही नव्हतो आमुचे बाप? त्यामुळे आपण कोणत्या जातीत, धर्मात, जन्माला यायचे ते आपल्या हातात नसते. परंतु अजूनही महाराष्ट्रात जन्माला आला तो महाराष्ट्री, मराठी असे झालेले नाही. ते मुळात होऊ द्यायचे नाही. माणूस शहाणा झाला की तो डोक्याने विचार करतो, मनाने नाही. भावनात्मक बुद्धीपेक्षा, ज्ञाननिष्ठ विवेकबुद्धी नेहमीच श्रेष्ठ असते. त्यामुळे अजूनही माणसांच्या भावनेला हात घालून त्यांची डोके भडकावली जातात. सामान्य माणसे भावनाप्रधानच असतात. जीवनातील साध्या-शुल्लक प्रश्नावरून ते व्यथित होतात ती अपार सच्ची असतात, परंतु ही माणसेच लोकशाहीचा आधार असतात. ते बहुसंख्य असतात. त्यामुळे त्यांचा कल आणि कौल आपल्याकडे वळवणे मतपेटीच्या राजकारणात महत्वाचे असते. त्यासाठी वेगवेगळे डावपेच आखले जातात. सभामागून सभा झडतात. हे एक वाकयुद्धच असते. आपल्या मतपेटीतील आकडा सर्वांनाच वाढवायचा असतो. अशा वेळी विवेक हरवतो आणि बेरिंग सुटते.

यामुळे झालेला बेरंग आज महाराष्ट्र अनुभवत आहे. त्यात समाजमाध्यमांचा उपयोग अत्यंत सवंगतेने करणारी मंडळी, पुन्हा त्याचा भडका करताना दिसतात. उथळ क्रिया प्रतिक्रिया देऊन महाराष्ट्राचे सामजिक वातावरण गढूळ करतात. या क्रिया-प्रतिक्रियातून आज महाराष्ट्राची जी घुसळण झालीय ती भयावह आहे. हे दुधारी हत्यार आहे. समाजमाध्यमावर कोणतेही नियंत्रण नाहीय. सेन्सॉर नाहीय. त्याचा अनिर्बंध वापर आणि विनिमय सुरू आहे. माणसांची डोकी भडकावण्याचे काम या माध्यमावर सुरू आहे. याला सन्माननीय अपवाद आहेत. ते बिचारे हे वाचून, ऐकून अस्वस्थ होण्याशिवाय काही करू शकत नाहीत. यात दोन्ही बाजूंनी टोकाचे विचार करणारे लोक आहेत. परंतु परंपरेतील सत्व घेऊन नवे सामर्थ्य प्रकट करणारे विचार यात नाहीत. पुरोगामी विचार म्हणजे पुढे घेऊन जाणारा, माणसाची मने बदलून त्याला प्रगतीवर नेणारा विचार. असे काम महाराष्ट्रात यापूर्वी झाले आहे. संत गाडगेबाबा, संत तुकडोजी, साने गुरुजी, विनोबा, डॉ.आंबेडकर, महात्मा गांधी यांनी हे कार्य केले आहे. त्यांचे विचार हे बुद्धिवादी, कृतीशील होते. अशा कृतीशील माणसांची आज खरी गरज आहे, नाही तर, ‘क्रियेविणा वाचाळता व्यर्थ’ असे म्हटलेलेच आहे.

आपण स्मार्ट सिटीबद्दल बोलतो, परंतु संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत मांडलेल्या स्मार्ट गावाबद्दल बोलत नाही. साने गुरुजींचा ‘एकच धर्म’ अजूनही प्रार्थनेपुरता घोकून गळ्यातच अडकून राहिला आहे. जातीअंताची भाषा केली जातेय, त्यावर थोर ग्रंथ लिहिले जातात; पण कोणता जाती अंत करायचाय? एका जातीचा, अथवा एका धर्माचा अंत करून जाती अंत होणार नाही. मध्यकाळात जे पंथ निर्माण झाले त्यांनी भक्ती क्षेत्रातील कर्मठतेचा, कर्मकांडालाच भक्ती समजल्या जाणार्‍या विचारांचा अंत करण्यासाठी सुलभ भक्तीचा पर्याय दिला. आज असा कोणता पर्याय दृष्टिक्षेपात दिसतोय? उलट जात संपवायची भाषा करणारेच अधिक जातीनिष्ठ विचार करताना दिसतात. आज लिहिणारे हात भयभीत आहेत.

जिथे विचार करणारी, काही तरी नवे मांडणारी मंडळी भयग्रस्त असेल तर इतरांचे काय असेल? ही सर्व मंडळी आज मौनात गेलेली दिसतेय. राजकारण आपला विषय नाही. त्यावर कशाला बोलायचे? असा सुज्ञ विचार ते करत असतीलही, परंतु जे सत्य आहे ते सत्य विचारवंतानीच मांडायला हवे. मराठा क्रांती मोर्च्याच्या काळात प्रा. रंगनाथ पठारे यांनी या विषयावर एक दीर्घ लेख लिहून परखड, वस्तुनिष्ठ भूमिका घेतली होती. तशी आज कुणी घेताना दिसले नाही. फुटकळ माध्यमात व्यक्त होऊन चालणार नाही. तिथे व्यक्त होणार्‍या लोकांची पात्रता, त्यांचे विचार, भाषा, कुजकेपणा, अभिव्यक्तीची पातळी महाराष्ट्राने पाहिली आहेच. अशा सवंग लोकांना आज फार प्रसिद्धी दिली जातेय. त्यांना बेदखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून मोकळे झाले पाहिजे.

तेराव्या शतकात महाराष्ट्रालाच नाही तर देशाला पुरोगामित्वाचा पहिला विचार महात्मा बसवेश्वर यांनी दिला. आंतरजातीय प्रतिलोम विवाह त्यांनी घडवून आणला. कोणतेही अधिकचे धन संचयन ही चोरीच असते असे त्यांनी वचन साहित्यात सांगितले. संत तुकोबांनीही पुढे आपणास उत्तम व्यवहाराची भाषा शिकवली. परंतु तुकोबांच्या महाराष्ट्रात भ्रष्ट आचार कमी झाला नाही. गाडगेबाबाही आपल्या अंतरंगातील आणि माणसातील देवाला आळवत राहिले. त्यासाठी त्यांनी कोणत्या देवळात पाऊल ठेवले नाही. त्याच महाराष्ट्रात आज काय सुरू आहे? हे आपण पहातो. हे चित्र पाहून आजचा विचारी तरुण संभ्रमित आहे. त्याला हा देश आपला वाटला पाहिजे असे काही तरी घडायला हवे. या रोजच्या कलहाला कंटाळून महाराष्ट्रातील तरूण नोकरीसाठी बाहेरच्या देशात जात आहेत.

गावात राहून विकास होणार नाही. ती गावगुंडी, भाऊबंदकी यात अडकून पडलो तर आपली माती होणार म्हणून साथ नंतरच्या काळात तत्कालीन तरूण गावचा रस्ता सोडून शिक्षणासाठी शहरात आले. नोकरीला लागले. आजचे हे चित्र पाहून समकालीन मुलांना काय वाटते? अनेक तरुण आज हा देश सोडून बाहेर नोकरीसाठी, उच्च शिक्षणासाठी जात आहेत. त्यांना कोण थोपवणार? हे सार्वत्रिक नसले तरी वास्तव आहे. आज माध्यमात बोलणार्‍या, लिहिणार्‍याची मुले या देशात रहात नाहीत? ती इथे शिकत नाहीत? आणि राहिलेली मुले कार्यकर्ते म्हणून पारंपरिक कॉलेजात शिकून उद्याच्या भविष्याची स्वप्ने रंगवत आहेत. दिशाहीन. त्यांचा भ्रमनिरास आगामी काळात महाराष्ट्रीय समाजाला कोणत्या वळणावर घेऊन जाणार आहे…?

–डॉ.अशोक लिंबेकर