घरफिचर्ससारांशऔर ठीक तराजू के कांटे पर....अर्धसत्य !

और ठीक तराजू के कांटे पर….अर्धसत्य !

Subscribe

दिलीप चित्रेंची ‘अर्धसत्य’ ही कविता दिग्दर्शक गोविंद निहलानींच्या अर्धसत्य चित्रपटाच्या कथानकाची मध्यवर्ती होती. साठच्या दशकातील लिटील मॅगझिन चळवळीतून साहित्य, चित्रपटक्षेत्राला जे मौल्यवान हिरे, माणीक मोती गवसले त्यात दिलीप चित्रे हे नावही महत्वाचे आहे. साडेचार दशकांनंतरही या चित्रपटाचा आशय विषय आजही तेवढाच नवा आहे. अर्धसत्य हे सत्याच्या फसव्या मुखवट्याचे काम करत असल्याने माणसाला समजलेलं अर्धसत्य हे संपूर्ण खोटेपणा किंवा ठाम असत्यापेक्षाही जास्त धोकादायक असते.

अर्धसत्यमध्ये सब इन्पेक्टर अनंत वेलणकर या मध्यवर्ती प्रमुख भूमिकेसाठी पहिल्यांदा नसिरुद्दीन शहांचे नाव गोविंद निहलानी यांनी विचारात घेतलं. मात्र ओम पुरींच्या अती सामान्य तेलकट चेहर्‍यावरील सामान्य माणसाच्या परिस्थितीचे हतबल सोसलेपण अस्सल असल्याने गोविंद निहलानींनी अनंतर वेलणकरसाठी ओमची निवड केली. मात्र नसिरुद्धीन शहांसारख्या अस्सल अभिनेत्यालाही वाया घालावायचे नसल्यानं बडतर्फ इन्स्पेक्टर माईक लोबो साकारण्यासाठी नासिरला तयार केलं. अर्धसत्यच्या पडद्यावर वेलणकर आणि लोबो या दोन पोलीस अधिकार्‍यांच्या व्यवस्थेकडून केल्या जाणार्‍या शोकांतिका समांतर कथानकातून उलगडत जातात. यातील कधीतरी पोलीस अधिकारी असलेल्या आणि आता कफल्लक, पाईपाईला मोहताज असलेल्या विपन्नावस्थेतील माईक लोबोची शोकांतिका सर्व काही संपल्यात जमा असते. वेलणकर सरकार आणि सामाजिक व्यवस्थेने लादलेल्या भयंकराच्या दरवाजात उभा आहे. वेलणकरचं भविष्य हे माईक लोबोचं वर्तमान आहे. हे उघड वर्तमान आणि भविष्य वेलणकरला टाळता येत नाही.

अनंत वेलणकरचा बाप पोलीस खात्यातला अमरीश पुरी कमालीचा विक्षिप्त आणि रागीट आहे. बाहेरचं फ्रस्ट्रेशन काढण्याचं बायको हे हक्काचं साधन आहे. त्याच्या दहशतीखाली नवर्‍याच्या माराने कायमच भेदरलेल्या थरथर कापणार्‍या आणि कौटुंबिक जबाबदारीमुळे हाडांचा सापळा झालेल्या अनंतच्या आईचं बाई आणि माणूस म्हणून जगणं केव्हाच संपलेलं आहे.
समाज, कुटुंबासोबत फटकून वागणं, आजूबाजूच्या माणसांना ताब्यात घेणं आणि अधिकारशाही गाजवून बायकोला मारणं हा अनंतच्या बापाचा अधिकार आहे. पोलीस खात्यातल्या माणसांमध्ये असलेला तणाव त्याचा घर कुटुंबावर होणारा परिणाम बाप आणि मुलाच्या नात्यामधील कमालीची कटूता अर्धसत्यमध्ये ठळपणे समोर येते. हतबल आईला एका रात्री अनंत दारु पिताना थेट बापाविरोधात बंड करतो. समाज, कौटुंबिक नात्यांमधला हा तणाव अर्धसत्यच्या पडद्यावर कथानकासोबत समांतर प्रवास करतो. असाच तणाव वेलणकर आणि ज्योत्स्ना गोखले (स्मिता पाटील) यांच्या नात्यामध्येही आहे.

- Advertisement -

पोलीस विभागातील अंतर्गत राजकारण, वशीलेबाजी, व्यसनाधिनता, कनिष्ठ अधिकार्‍याच्या कामगिरीवर डल्ला मारणारे वरिष्ठांचे राजकारण यातून बळी जाणारा सामान्य अधिकारी असा अर्धसत्यचा पट आहे. घर आणि नोकरीतील तणावामुळे अनंत कमालीचा रागीट झालेला आहे. अमिताभच्या जंजिरनंतर दहा वर्षांनी अर्धसत्य रिलिज झाला. त्यानंतर चिरंजीवीचा प्रतिबंध, मनोज वाजपेयीचा शूल आणि इतरही पोलिसपटांवर अर्धसत्यचा जेवढा परिणाम होता तेव्हढा जंजिरनेही केला नाही. श्याम बेनेगलांच्या तालमीत गोविंद निहलानींनी दिग्दर्शनाचे धडे गिरवले होते. अंकुर (1973), निशांत (1975), मंथन (1976), भूमिका (1977) च्या दिग्दर्शनात श्यामबाबूंनी गोविंद निहलानींसाठी सहाय्यकाची भूमिका पार पाडली. तर पुढे गोविंद निहलानींच्या अर्धसत्यमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून राजकुमार संतोषी रूज झाले.

खलनायक रामा शेट्टीचा शोध सुरू असताना चित्रपटासाठी नवख्या सदाशिव अमरापूरकर या तरुणाचे नाव लेखक तेंडुकरांनी निहलानी यांना सुचवले, त्यासाठी सदाशिव अमरापूरकर यांचे हँडसअप हे नाटक निहलानींना पाहायला लावले, ही निवड पुढे रास्त ठरली. व्यावसायीक सिनेमातील राज कपूरांनी अर्धसत्य पाहून विजय तेंडुलकरांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.

- Advertisement -

स्मिता पाटील, ओम पुरी आणि नसिरुद्दीन शहांना घेऊन गोविंद निहलानींनी लेखक विजय तेंडुलकरांच्या पटकथेसोबत 1980 मध्ये आक्रोश बनवला होता. त्यावेळीच अर्धसत्यविषयी तेंडुलकर आणि निहलानी यांच्यात चर्चा झाली होती. हे दोन्ही चित्रपट कमालीचे वास्तववादी असतानाच आक्रोशमधील बहुतेक कलावंतांना अर्धसत्यमध्येही संधी मिळाली. आक्रोशचे कथानक ग्रामीण भागातील अल्पभूधारक शोषित जातीच्या शेतकर्‍याचे होते. तर अर्धसत्यमध्ये शहरातील सामान्य माणसाच्या व्यवस्थेकडून होणार्‍या शोषणाचे चित्रण होते. या दोन्ही चित्रपटात कलाकारांशिवाय आणखी तीन गोष्टींमध्ये समानता होती. सामान्य माणसाची हतबलता, हिंसा, उद्वीग्नता आणि राग या नकारात्मक भावना दोन्ही चित्रपटात कायम होत्या. माणसातील राग आणि हिंसा याबाबत तेंडुलकर आणि निहलानी यांच्यात कमालीचे विचारसाम्य होते. त्यामुळेच निहलानींच्या अनेक चित्रपटात या भावना पडद्यावर येण्यासाठी शब्दांची पेरणी तेंडुलकरांनीच केली होती. आजच्या ओटीटीच्या काळातील छोट्या पडद्यावरील शब्दिक हिंसा अर्धसत्यने खूप आधीच हिंदी पडद्यावर आणली होती.

पोलीस कस्टडीतल्या अंधूक शेड बल्बच्या प्रकाशात चौकशीदरम्यान आरोपींना होणारी मारहाण, मोर्चातील ओम पुरीने केलेला लाठीचार्ज, सहकारी पोलीस कर्मचार्‍याला जिवंत जाळल्यानंतरही काहीही कारवाई न करू शकणार्‍या अनंतची हतबलता व्यवस्थेच्या झालेल्या बजबजपुरीची दाहकता स्पष्ट करते. स्मिता पाटीलने साकारलेली जोत्स्ना गोखले शिक्षिका आहे. पोलीस खात्यातली नोकरी माणसांचे माणूसपण खाऊन टाकत असल्याची तिची खात्री असल्याने तिने अनंतला पोलीस खात्यातील नोकरी सोडण्याचे सुचवलेय. मात्र अनंत त्याला नकार देतोय. अनंतच्या कस्टडीत चौकशीदरम्यान आरोपीचा मृत्यू झाल्याने अनंतची नोकरी धोक्यात येते. गुंड रामा शेट्टी (सदाशिव अमरापूरकर) च्या मदतीशिवाय त्याची सुटका अशक्य आहे. तर रामा शेट्टी या कामाच्या आडून अनंत या माणसासह त्याची खाकी वर्दीही विकत घेऊ पाहतोय. या चक्रव्युहात फसलेल्या अनंतची स्थिती दिलीप चित्रेंच्या कवितेतून स्पष्ट होते. चित्रपटाच्या अखेरीस रामा शेट्टीची हत्या करून या चक्रव्युहातून अनंत वेलणकर आपली सुटका करून घेतो. यात दिलीप चित्रेंच्या कवितेचा शेवट आहे…

एक पलड़े में नपुंसकता,
एक पलड़े में पौरुष,
और ठीक तराजू के कांटे पर,
अर्धसत्य

हा तराजू समाजव्यवस्थेचा आहे. इथं कोणतीही गोष्ट निखळ नाही, त्यात भेसळ आहेच. ही व्यवस्थाच संपूर्ण बरबटलेली आहे. नपुसंक करणार्‍या व्यवस्थेने माणूसपण संपवल्यानंतरही खाकीआड आपलं पुरुषत्व मिरवणारे पोलीस अधिकारी नावाचे देह अर्धसत्यच्या पडद्यावर कायम दिसत राहतात. सदाशिव अमरापूरकरचा रामा शेट्टी या नकारात्मक व्यवस्थेचं प्रतिनिधीत्व करतो….कितना मंगताय…कैश मिलेगा…असं बोलून अनंतला थेट बाजारात उभं करणारा रामा शेट्टी कमालीचा शांत असूनही भेसूर वाटतो. माणूस जात्याच हिंसक असतो, मात्र समाज आणि कायद्याच्या साखळदंडामुळे त्यातल्या पशूत्वाला नियंत्रणात ठेवलं जातं, असं अर्धसत्यचे पटकथाकार विजय तेंडुलकर यांना वाटत होतं.

अर्धसत्यचा शेवट अनंतकडून रामा शेट्टीची हत्या, असा असावा का की, रामा शेट्टीला कायद्याने शिक्षा द्यावी, या चित्रपटाचे हे दोन अखेरचे प्रसंग होते. याबाबत कथा लेखक डी. ए. पानवलकर आणि पटकथाकार विजय तेंडुलकर आणि गोविंद निहलानी यांच्यात मतभेद होते. त्यामुळेच गोविंदने अर्धसत्यचे दोन क्लायमॅक्स शूट करून घेतले. गोविंद निहलानी यांनी त्यांना पटलेला क्लायमॅक्स विजय तेंडुलकरांनाही पटवून दिल्यानंतर तो रिलिजसाठी फायनल करण्यात आला. चित्रपटाच्या गती आणि आशयाला धक्का लागू नये म्हणून चित्रपटात एकही गाणं ठेवण्यात आलं नाही. तरीही अवघ्या 67 लाखात बनलेल्या आणि सव्वा कोटीपेक्षा जास्त कलेक्शन करणार्‍या अर्धसत्यने फिल्मफेअरसह राष्ट्रीय पुरस्कारांवरही नाव कोरले.

या चित्रपटाने प्रकाश झा, राजकुमार संतोषी, रामगोपाल वर्मा, अनुराग कश्यप अलिकडचा रोहित शेट्टी अशा पोलिसपट बनवणार्‍या अनेक दिग्दर्शकांवर प्रभाव टाकला जो अजूनही कायम आहे. अर्धसत्यमधील संवादात थोडेफार बदल करून त्याचा घायल, घातकमध्ये वापर करण्यात आला. तर एन. चंद्राचा तेजाबमध्येही अर्धसत्यच्या बॅकग्राऊंड म्युझिकचा पुन्हा वापर करण्यात आला. रशियामध्ये अर्धसत्य हाफ ट्रथ या नावाने इंग्रजी सबटायटल्ससह रिलिज करण्यात आला, या ठिकाणी आणि इतर आंतरराष्ट्रीय फिल्मफेस्टमध्येही अर्धसत्यचं कमालीचं कौतुक झालं. विजय चित्रेंच्या अर्धसत्य कवितेच्या आशयाला चित्ररुप देणारा अर्धसत्य आज 45 वर्षांनीही समकालीन आहे. लोकशाही व्यवस्थेतील लोकांना समजलेल्या व्यवस्थेच्या अर्धसत्याचे अजूनही पूर्ण आकलन झालेले नाही. हा चक्रव्यूह अजूनही कायम आहे. दिलीप चित्रेंच्या कवितेतील अर्धसत्य ही सामान्यांच्या जगण्यामध्ये असलेली पूर्ण हतबलता आजही कायम आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -