घरफिचर्ससारांशब्रा विरुद्ध उच्चारलेले ‘ब्र’!

ब्रा विरुद्ध उच्चारलेले ‘ब्र’!

Subscribe

‘बायकांचा ब्रालेसनेस पुरुषांना धक्का देतो आणि जरा घाबरवतो सुद्धा. कारण बाईचे स्तन ही पुरुषांची मालमत्ता आणि ब्रा काढणं हा पुरुषांचा जन्मसिद्ध हक्क आहे, अशी त्यांची पितृसत्तेने समजूत केलेली असते. ब्रा पाहून, रंगीत ब्रा पाहून, कपड्यांच्या आतून बाहेर आलेल्या ब्राच्या पट्ट्या पाहून पुरुषांच्या लैंगिक भावना चाळवतात आणि म्हणून बायकांनी ही झाकण्याची गोष्ट झाकूनच ठेवावी असं म्हणणं खूपच असंबद्ध आहे. पण ते कळण्याचे शहाणपण किंवा कदाचित हिंमत समाज म्हणून आपल्यात नाही. अभिनेत्री हेमांगी कवी हिच्या ‘बाई, ब्रा आणि बुब्ज’, या पोस्टनंतर अशा बर्‍याच गोष्टी बाहेर येत आहेत.

हेमांगी कवी या अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट केलेला ब्रालेस व्हिडीओ, त्यावरची मतमतांतरं, त्याला उत्तर देत आणि नवे प्रश्न निर्माण करत ‘बाई, ब्रा आणि बुब्ज’ नावाची पोस्ट लिहून तिने सोशल मीडियावर सुरू केलेली चर्चा ह्याने गेला आठवडा चांगलाच गाजला. बायकांनी ब्रा घालावी की, घालू नये? तो त्यांच्या निवडस्वातंत्र्याचा भाग आहे. आहे का? कितपत आहे? पुरुष चाळवतील म्हणून स्तन-स्तनाग्र लपवून ठेवत त्याला कितीकाळ आपण झाकत राहणार? स्तनांकडे फक्त लैंगिक अवयव म्हणून पाहत असताना ब्रा घालण्याच्या किंवा न घालण्याच्या बाईच्या निर्णयाचा विचार कशाच्या धर्तीवर आणि कुणी करायचा? असे अनेक प्रश्न आणि त्यावरच्या उत्तरांची अनेक दिशांनी लागलेली रांग गेला आठवडाभर सोशल मीडियावर वाढतच होती. सोशल मीडियाच्या गुहेतून बाहेर येणार्‍या या असल्या चर्चा किती काळ तग धरतात आणि त्यातून काय निष्पन्न होते हा आणखी एका मोठ्या चर्चेचा भाग. पण किती काळ टिकतात ह्याच्या उत्तरापेक्षा ह्या चर्चांनी निर्माण होणार्‍या मतमतांतराच्या लाटा आणि घडून येणारी घुसळण ही खूप महत्वाचीही ठरते. अशीच घुसळण ‘बाई-ब्रा-बुब्ज’ च्या निमित्ताने झाली, अजूनही सुरुय.

अर्थात हा प्रश्न काही फक्त ब्रापुरताच नाही तर बाईच्या स्तनांचा, त्याचा पुरुषसत्तेने आणि बाजाराने बाईच्या सौंदर्याशी, ओळखीशी, पुरुषाच्या लैंगिक भावनांशी जोडलेल्या संबंधाचा आहे. त्यावर बसवलेल्या सांस्कृतिक, जातीय आणि बाजारू पहार्‍याचा आहे. ते दोन मांसल गोळे आणि योनीची गुहा म्हणजेच बाईची ओळख असं बिंबवू पाहणार्‍या माध्यमांचा आणि त्यामुळे घडणार्‍या डोक्यांचा आहे. काय खावं, काय प्यावं, काय घालावं, काय करावं, काय करू नये हे ठरवणार्‍या व्यवस्थेचा आहे. 1968 मध्ये फक्त ब्राच नाही तर हाय हिल्स, मेकअपचे साहित्य अशा काही बाईच्या बाईपणाला बाजाराने चिकटवलेल्या गोष्टी कचर्‍याच्या पेटीत टाकून ‘फ्रीडम ट्रॅश कॅन’ घडवून आणणार्‍या अमेरिकेतल्या बायकांनी हे फाट्यावर मारायला सुरुवात केली. बाईच्या शरीराकडे ‘मेल गेज’मधून बघणं बंद करायला हवं हे सांगायला सुरुवात केली. पण तरी तिथून मिळालेली ‘ब्रा बर्निंग फेमिनिस्ट’ ही बिरुदावली आजही पुरोगाम्यांच्या वर्तुळातही जणू शिवी असल्यासारखीच उच्चारली जाते ह्यातूनच आपल्याला केवढं अंतर गाठायचंय हे कळेल.

- Advertisement -

बाईचे स्तन आणि शरीराचा आकार हे विषय ह्याच भोगवादावर उभ्या असलेल्या व्यवस्थेला नेहमी अनकम्फर्टेबल करत आले आहेत. आणि मग तांबडं फुटू नये म्हणून वेळोवेळी कोंबडं झाकण्याचे असफल प्रयत्न ही व्यवस्था करत आलीय. 2013 मध्ये तर मुंबईत बलात्कार थांबवण्यासाठी दुकानांच्या बाहेर असलेल्या पुतळ्यांना अंतर्वस्त्रे घालून उभं करण्यावर बंदी आणण्याचा फतवा काढला होता. दोन वर्षांपूर्वी राजधानी दिल्लीतल्या एका शाळेने मुलींना त्वचेच्या रंगाची ब्रा आणि तीसुद्धा झाकण्यासाठी त्यावर स्लीप घालून शाळेत यायचं असा आदेश काढला. सुसन ब्राऊनमिलर नावाची फेमिनिस्ट लेखिका म्हणते की, ‘बायकांचा ब्रालेसनेस पुरुषांना धक्का देतो आणि जरा घाबरवतो सुद्धा. कारण बाईचे स्तन ही पुरुषांची मालमत्ता आणि ब्रा काढणं हा पुरुषांचा जन्मसिद्ध हक्क आहे अशी त्यांची पितृसत्तेने समजूत केलेली असते.

ब्रा पाहून, रंगीत ब्रा पाहून, कपड्यांच्या आतून बाहेर आलेल्या ब्राच्या पट्ट्या पाहून पुरुषांच्या लैंगिक भावना चाळवतात आणि म्हणून बायकांनी ही झाकण्याची गोष्ट झाकूनच ठेवावी असं म्हणणं खूपच असंबद्ध आहे. पण ते कळण्याचे शहाणपण किंवा कदाचित हिंमत समाज म्हणून आपल्यात नाही. बाईच्या शरीराकडे वस्तू म्हणून पाहण्याचा आणि ही वस्तू आपण आपली मालमत्ता म्हणून मिळवू शकतो, काबीज करू शकतो असं वाटण्याची मानसिकता आपण समाज म्हणून पुरुषांमध्ये तयार करत आहोत. समभावाची-सहभावाची कुठलीच जागा शिल्लक ठेवत नाही आणि आभाळभर फाटलेल्या या आपल्या सामाजिक अपयशाच्या भगदाडाला असले क्षुल्लक ठिगळ लावू पाहतोय, ह्यातला विनोद आणखी कुठल्या शब्दात सांगायचा? ह्याला ठिगळ तरी म्हणायचं का की, आणखी एखादा तडा हा प्रश्न तर अलाहिदाच!

- Advertisement -

स्तन आणि त्यांचे प्रदर्शन ह्यात जात आणि जातीचे बाईच्या शरीरावरील नियंत्रण ह्यांचाही मोठा संबंध आहे. 18 व्या शतकात त्रावणकोर साम्राज्यात दलित आणि क्षुद्र बायकांना स्तनांवर कर आकारला जायचा. उच्च जातीतल्या बायकांप्रमाणे जर त्यांना आपले स्तन झाकायचे असतील तर त्यासाठी स्तनांच्या आकारानुसार आणि बाईच्या वयानुसार राज्याकडून कर आकारला जायचा. उच्च जातीयांना सन्मान देण्याची एक रीत म्हणून ह्याकडे पाहिलं जायचं. म्हणूनच भारतात स्तन ह्या अवयवाचं प्रदर्शन हा फक्त वैयक्तिक म्हणून सोडून देण्याइतका मुद्दा नाही तर त्याला अनेक सामाजिक-आर्थिक-जातीय आयाम आहेत आणि म्हणूनच ब्रा घालावी की, घालू नये हा तसा फार वैयक्तिक मुद्दा असला तरी तो बर्‍याच अंगांनी राजकीयसुद्धा आहे. ब्रा घालावी की, घालू नये ही वैयक्तिक निवड असली तरी ती निवड कशी आपल्याही नकळत भांडवलशाही मार्केटने, पितृसत्ताक व्यवस्थेने बिंबवून पक्की केलीय हे समजायला हवं. मी स्वतःसुद्धा अजूनही ब्रा वापरते.

ब्रा घालण्यामागची भांडवली बाजाराची भूमिका समजलेली असूनही आणि त्याला नाकारण्याची पूर्ण इच्छा असतानाही मला माझ्या सामाजिक-आर्थिक भवतालाने दिलेले ग्राउंड असे एका मुक्तीच्या अनवट क्षणी झुगारून देता येत नाही हेही मान्य करायला हवं. एका प्रचंड टिपिकल मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली मुलगी म्हणून ‘ब्रा’ हा एक नवा अवयव ज्या वेगाने माझ्या आयुष्यात आला आणि शरीराचा भाग झाला, मग हळूहळू कम्फर्ट झोनच्या नावाखाली त्याचे मुके घेणं सुरू झालं. त्याला स्वत:पासून लांब करून स्वतःच्या शरीराला स्वीकारायला काही वेळ, प्रोसेस व्हावी लागेल. बरं जाळून मुक्तीचा श्वास घेण्याची स्वप्नं मलाही पडतात, ते स्वीकारण्याची ताकद येण्यासाठी आणि इतक्या वर्षांचं कंडीशनिंग पुसण्यासाठी विरुद्धमार्गी फोर्स लागेल आणि तो जमवण्यासाठी लागणारा वेळ घेणंही तितकंच वैध आहे.

यानिमित्ताने आणखी एक मुद्दा पुढे आला तो म्हणजे ब्रा घालणं किंवा न घालण्याचा चॉइस असणंसुद्धा कसं प्रीविलेज आहे आणि त्यावर कुणी बोलायला हवं आणि कुणी नको. अर्थात, हे आपल्या जातीने, वर्गाने, सामाजिक स्थानाने दिलेलं खूप मोठं प्रिव्हिलेज आहे हे पूर्णपणे मान्य आणि त्यामुळे ब्रा घालायची की, नाही हा निर्णय आणि या चर्चाही पूर्णपणे भरल्या पोटाने करायच्या गोष्टी आहेत हेही मान्य. पण इथे ज्या पद्धतीने आदिवासी-दलित बायका, त्यांचे प्रश्न, अंगावर नेसायला कपडा नसणं किंवा पाळीच्या काळात पालापाचोळा-कापूस वापरावा लागणं हे विषय आणले जाताय आणि मग कसं त्या मुद्यांवर बोलायचं सोडून हे असले ब्राचे विषय चघळत बसण्यात काय अर्थ म्हणून आवई उठतेय हे खूपच गोंधळात टाकणारं आणि गोंधळातून आलेलंही आहे. आणि विशेषत: ही मतं पुरुषवर्गाकडून खूपच उत्साहाने पुढे येताय हे आणखी गोंधळजन्य. पण दरवेळी एका गटातल्या स्त्रियांच्या प्रश्नाबद्दल बोलतांना, विशेषत: अशा प्रश्नांबद्दल ज्याची उत्तरं शोधल्याने व्यवस्थेला हादरा बसणार आहे अशाचवेळी दुसर्‍या आणि पर्यायाने आणखी पिछाडीवर असलेल्या स्त्रियांच्या गटांचे मुद्दे पुरुषांनी म्हणजे पुन्हा शोषक गटातील कुणीतरी समोर आणण्यात काय लॉजिक आहे हे मला कळत नाही.

बायकांच्या संपूर्ण गटाला मागे ठेवण्यात हीच पुरुषसत्ता आणि पुरुषकेंद्री मार्केट मोठं कारण ठरलेलं असताना काही वेळा कर्तृत्वाने, बर्‍याचदा प्रिव्हीलेजेसने एखाद्या विषयावर बोलण्याची क्षमता-जागा आणि ताकद मिळालेल्या बाईला बोलू देत ना तिच्या प्रश्नावर. तिच्या प्रीव्हिलेजचा वापर करून ती तिच्यासकट तिच्यासारख्या अनेक बायकांच्या वतीने बोलेल. मग हळूहळू तेच प्रीव्हीलेजेस वापरून ती ज्यांना ते बोलण्याची ताकद नाही, आजच्या सोशल मीडियाच्या भाषेत ‘प्रीव्हीलेजेस’ नाही त्यांच्या बाजूने बोलून ते मुद्देही लावून धरेल. हळूहळू प्रत्येकीला हे बोलण्याची, आपले प्रश्न मांडण्याची ताकद कशी येईल, क्षमता कशी तयार होईल हे बघेल. सत्ताधार्‍याने किंवा तुलनेने जास्त विशेषाधिकार असणार्‍या माणसाने सत्ताहिनांच्या वतीने किंवा कमी विशेषाधिकार असणार्‍या किंवा नसणार्‍याच्या वतीने, त्यांच्या सोबत उभं राहून बोलल्याशिवाय सत्तेचं पुनर्वाटप कसं होईल? ज्या वंचित आणि ह्या सगळ्या प्रवाहापासून दूर असणार्‍या बायकांच्या गटांबद्दल सगळे बोलताय त्यांचं आणि मुख्य प्रवाहाच्या मधलं अंतर कसं कमी होईल? ब्रा हा विषय आणि त्याचा आशय उच्चजात-वर्गातील बायकांचा आणि अभिजनवादी आहे असं म्हणून त्याकडे डोळेझाक करून किंवा लक्ष परतवून चालणार नाही तर प्रत्यक्ष भूमिका घेऊन हस्तक्षेप करावा लागेल.

अर्थात जात, वर्ग आणि स्त्रीवाद ह्यांचे इंटरसेक्शन्स महत्वाचे आहेत आणि जात-वर्गाच्या संदर्भांचा आधार घेतल्याशिवाय स्त्रीवादावर अधांतरी बोलता येणार नाही. पण म्हणून मुख्य प्रवाहातल्या स्त्रीवादावर बोलायचंच नाही असं करून कसं चालेल? जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे भूमिका घेऊन हस्तक्षेप करावा लागेल. ह्या पितृसत्ताक व्यवस्थेला समतेची बाजू दाखवावी लागेल. पुन्हा पुन्हा दाखवत रहावी लागेल. त्यामुळे सगळ्यांनी बोलायला हवं. आपापल्या सामाजिक-आर्थिक-जातीय जागा आणि सत्तास्थानं समजून घेत, त्यांची जाणीव ठेवून बोलायला हवं. ज्यांना बोलता येत नाही, ज्यांचे आवाज ऐकले जात नाही त्यांच्या वतीने ही बोलायला हवं. हे बोलणं आणि बोलत राहणंच मुक्तीच्या दिशेने एखादं पाऊल पुढे टाकण्यासाठी मदत करेल!

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -