Monday, July 26, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फिचर्स सारांश वारसा संत विचारांचा

वारसा संत विचारांचा

आषाढी असो कि कार्तिकी पंढरीच्या वारीने सर्वसामान्यांशी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते जोडले. या वारीतून पुढे आलेल्या वारकरी संप्रदायातून उत्कट भक्ति, सदाचार, नीती यावर आधारलेला सरळमार्गी आचारधर्म पुढे आला. या धर्माने कर्मकांडांना थारा दिला नाही. वारकर्‍यांची विठ्ठलभक्ती ही प्रवृत्तिपर आहे. समाजधारणेला पोषक होणारी कर्मे सोडण्याचा उपदेश ह्या संप्रदायाने आपल्या अनुयायांना कधीच केला नाही. कर्मबंधनाची यातायात टाळण्यासाठी प्रत्यक्ष कर्माचा त्याग केला पाहिजे, अशी ज्ञानेश्वरांचीही भूमिका नव्हती. जनाबाईच्या दळणकांडणादी नित्यकर्मात प्रत्यक्ष विठ्ठलाने येऊन त्यांना मदत करावी किंवा एकनाथांच्या दारी पांडूरंगाने श्रीखंड्या होऊन राहावे, ह्या आख्यायिका या संदर्भात बोलक्या आहेत. वारकरी संप्रदायाने ज्ञानाचे महत्व कमी आहे, असे कधीच मानले नाही, परंतु भक्तीला अग्रस्थान दिले. केवळ नामसंकीर्तनानेही ईश्वराच्या जवळ जाता येते, हे आत्मविश्वासाने प्रतिपादिले. ’नलगे सायास जावे वनांतरा। सुखे येतो घरा नारायण।’ असे तुकोवांनी म्हटले आहे. वारकरी संप्रदायाने अग्रस्थान दिलेल्या भक्तिभावनेचा अत्यंत उत्कट आविष्कार संत नामदेवांच्या रूपाने पहावयास मिळतो. एखाद्या लडिवाळ लेकरासारखे ते ईश्वराजवळ जाऊ पाहतात. देवावर रुसणे, त्याच्याकडे हट्ट धरणे, पुन्हा त्याची करुणा भाकणे, अशा अनेक भावावस्था त्यांच्या अभंगांतून आपल्याला दिसतात. एकनाथांनी प्रपंच आणि परमार्थ ह्यांचा समन्वय साधण्यावर भर दिला... मंगळवारी आषाढी एकादशीनिमित्त या सर्व संतांच्या मेळ्यात जीव एकरूप होईल तेव्हा विचार, आचारात महाराष्ट्र का अग्रेसर आहे, याची मुळे सापडतील. त्याचाच हा अंतरंग...

Related Story

- Advertisement -

शाहू महाराजांच्या जीवनावर संत साहित्याचा सकारात्मक प्रभाव पडला होता. प्रबोधनच्या दुसर्‍याच अंकातील ‘सीमोल्लंघन करा’ अशा मथळ्याच्या अग्रलेखात प्रबोधनकार ठाकरे लिहितात, ‘प्रचलित परिस्थितीचे जबरदस्त तट फोडून सीमोल्लंघन करण्यास इतरांना धैर्य यावे म्हणून संतांनी आपल्या सौख्यावर रखरखीत निखारे ठेवण्यास मागेपुढे पाहिले नाही. त्यांनी ग्रंथप्रमाण्याची पर्वा ठेविली नाही. रुढीपुढे मान वाकविली नाही. स्मृतींना फाजील महत्व दिले नाही. मनुष्यकृत भेदभावांचा दिमाख चालू दिला नाही. आमचे हे सीमोल्लंघनी संतकवी म्हणजे एकप्रकारचे नवमतवादी बंडखोरच होते.’ आज ज्याला आपण पुरोगामी म्हणतो त्या विचारांचा वारसा आपल्याला संत साहित्यातून मिळाला आहे.

फुले, शाहू, आंबेडकर हे भारतातील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महाराष्ट्रातूनच का उदयाला आले? छत्रपती शिवरायसुद्धा महाराष्ट्रातूनच का उदयाला आले?

- Advertisement -

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे – Annihilation of Caste
(जातीप्रथेचे निर्मुलन) या आपल्या ग्रंथात एक महत्त्वाचा सिद्धांत मांडतात-राजकीय क्रांत्यांच्या आधी नेहमीच सामाजिक व धार्मिक क्रांत्या घडून आल्या आहेत, हा इतिहासाचा सिद्धांत आहे. पुढे जगभरच्या राजकीय क्रांत्यांच्या आधी झालेल्या सामाजिक व धार्मिक क्रांत्यांची उदाहरणे बाबासाहेब देतात. त्यात महाराष्ट्राचाही उल्लेख करताना बाबासाहेब स्पष्टपणे सांगतात, शिवरायांनी घडविलेल्या राजकीय क्रांती आधी महाराष्ट्राच्या संतांनी धार्मिक व सामाजिक सुधारणा घडवून आणल्या होत्या. न्यायमूर्ती रानडे यांनीही आपल्या ‘मराठी सत्तेचा उत्कर्ष’ या ग्रंथात याच आशयाचे मत व्यक्त केले आहे.
संतांचा जनमानसावर कसा व किती प्रभाव आहे हे बाबासाहेब जाणून होते. जनसामान्यांची भाषा संतवाङ्मयाने भारित आहे याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे त्यांच्या लिखाणात संतांची वचने सर्वत्र विखुरलेली दिसतात. मूकनायक हे बाबासाहेबांचे पहिले पाक्षिक. या त्यांच्या मुखपत्राचे शीर्षवाक्य म्हणून

‘काय आता करू धरूनिया भीड ।
निःशंक हे तोंड वाजविले ॥
नव्हे जगी कोणी मुकियाचा जाण ।
सार्थक लाजून हित नव्हे ॥’
या तुकोबांच्या ओळी अवतरतात. तर नंतर सुरू केलेल्या ‘बहिष्कृत भारता’वर बिरूदावली म्हणून ज्ञानेश्वरांच्या पुढील ओव्या उद्धृत केलेल्या असत.
आतां कोदंड घेऊनि हातीं ।
आरूढ पां इयें रथीं ।
देईं आलिंगन वीरवृत्ती ।
समाधानें ॥ 189 ॥
जगीं कीर्ति रूढवीं ।
स्वधर्माचा मानु वाढवीं ।
इया भारापासोनि सोडवीं ।
मेदिनी हे ॥ 190 ॥
आतां पार्था निःशंकु होईं ।
या संग्रामा चित्त देईं ।
एथ हें वांचूनि कांहीं ।
बोलों नये ॥ ज्ञा. 3/191 ॥
घे ते कोदंड हातात. चढ ह्या रथावर आणि समाधानाने वीरवृत्तीला अलिंगन दे, जगामध्ये कीर्ति वाढव. स्वधर्माचरणाचा कित्ता घालून दे आणि ह्या दुष्टांच्या भाराखाली दडपून गेलेली ही पृथ्वी सोडव. पार्था, आता मनात काहीही शंका ठेवू नको. केवळ ह्या संग्रामावरच लक्ष केंद्रित कर.
‘आता केवळ संग्राम, संग्रामाशिवाय दुसरे काहीही नाही!’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी युद्धप्रेरणा आपल्या बांधवांत चेतवीत होते. आपल्या बांधवांना संग्रामाची प्रेरणा देण्यासाठी बाबासाहेब, ज्ञानोबा माउलींच्या या ओव्यांचा प्रेरक म्हणून उपयोग करतात.
राजर्षी शाहू महाराजांचे अत्यंत विश्वासू सहकारी वासुदेव तोफखाने यांनी सांगितलेल्या ‘शाहूंच्या अंतरंगात’ या आठवणींच्या संग्रहातील ही एक आठवण पहा –
अवघा महाराष्ट्र ढवळून काढणारा वेदोक्ताचा प्रसंग ज्यावेळी घडला, त्यावेळी राजर्षी शाहूंच्या सोबत राजारामशास्त्री भागवत होते. त्यांनीच महाराजांना पूजा वेदोक्त मंत्राने नसून पुराणोक्त मंत्राने होत असल्याची माहिती दिली होती. त्यावेळी महाराज राजारामशास्त्रींना म्हणाले होते,
‘बरे देवा कुणबी केलो।
नाहीतरी दंभे असतो मेलो ॥
विद्या असती ।
तरी पडतो अपायी ॥
तुका म्हणे थोरपणे।
नरक होती अभिमाने ॥’
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना जेथे अनेक प्रकारे अपरंपार विटंबना व आपत्ती सोसाव्या लागल्या, तेथे आपल्यासारख्या अज्ञ जनांची मातब्बरी काय?

- Advertisement -

ही माहिती स्वतः महाराजांनी तोफखाने यांना सांगितली होती. त्या प्रसंगानंतर महाराजांचे चित्त तुकोबांच्या अभंगापुढे कसे ओढले जाऊ लागले ते महाराजांनी तुकोबांचे एकामागून एक, याप्रमाणे अनेक अभंग उदाहरणादाखल म्हणून दाखवले आणि शेवटी आपण ‘जे का रंजले गांजले…’ या अभंगावर स्थिर कसे झालो ते महाराजांनी तोफखानेंना अगदी भावुक होऊन सांगितले होते. शाहू महाराजांच्या जीवनावर संत साहित्याचा असा सकारात्मक प्रभाव पडला होता.

प्रबोधनच्या दुसर्‍याच अंकातील ‘सीमोल्लंघन करा’ अशा मथळ्याच्या अग्रलेखात प्रबोधनकार ठाकरे लिहितात, ‘प्रचलित परिस्थितीचे जबरदस्त तट फोडून सीमोल्लंघन करण्यास इतरांना धैर्य यावे म्हणून संतांनी आपल्या सौख्यावर रखरखीत निखारे ठेवण्यास मागेपुढे पाहिले नाही. त्यांनी ग्रंथप्रमाण्याची पर्वा ठेविली नाही. रुढीपुढे मान वाकविली नाही. स्मृतींना फाजील महत्व दिले नाही. मनुष्यकृत भेदभावांचा दिमाख चालू दिला नाही. आमचे हे सीमोल्लंघनी संतकवी म्हणजे एकप्रकारचे नवमतवादी बंडखोरच होते. या बंडखोरांचा आद्यप्रवर्तक म्हणजे ज्ञानदेव होय. आणि ‘निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम’ ही त्या गुप्तकटातली मेंबर मंडळी होत.’

संतांनी विधायक व कृतिशील धर्मचिकीत्सा केली. संत साहित्यात धार्मिक व सामाजिक सुधारणांचा आग्रहाने पुरस्कार केलेला दिसतो. सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला हवे की संतांनी सांगितलेला धर्म पारलौकीक नसून तो ऐहीक आहे. मानवी जीवनाचे अंतीम ध्येय, चौथा पुरुषार्थ पारलौकीक मोक्ष असल्याचे पारंपारीक धर्ममत संत नाकारतात. ज्ञानेश्वर माउली स्पष्टपणे म्हणतात –

मोक्ष मेल्यापाठी आम्हांसी होईल ।
ऐसें जे म्हणतील अतिमूर्ख ॥
मोक्षापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. चहूं पुरुषार्थाच्या शिरी । भक्ती जैसी ॥
संतांनी मुक्ती नाकारून भक्तीचा पुरस्कार वारंवार केला आहे. भक्ती ही याच मानवी देहाने याच इहलोकात करायची आहे. या भक्तीचे स्वरूप कसे आहे? माउली म्हणतात –
जे जे भेटे भूत । ते ते मानिजे भगवंत ।
हा भक्तीयोग निश्चित । जाण माझा ॥
सर्व चराचरात त्या परमात्म्याला अनुभवणे हीच भक्ती आहे. हाच वैष्णवांचा धर्म असल्याचे तुकोबा सांगतात –
विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेद भ्रम अमंगळ ॥
समता हे मूल्य संतांच्या धर्म संकल्पनेचा गाभा आहे. त्यांना कोणतीही विषमता मान्य नाही. त्यांच्या मार्गात सर्वांना प्रवेश आहे. ‘सकळांसी येथे आहे अधिकार ।’
सर्व जातीच्या, धर्माच्या स्त्री पुरुषांना संत आपल्या जागरात साद घालतात.
या रे या रे लहान थोर ।
याती भलते नारी नर ।
सर्व जातीत संत निर्माण झाले. सावता माळी, गोरा कुंभार, नामदेव शिंपी, चोखोबा महार, सेना न्हावी, विणकर कबीर, रोहिदास चांभार, सजन कसाई अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. जनाबाई, मुक्ताई, सोयराबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई अशा अनेक स्त्रीया संतत्वाच्या अधिकार पदावर आरुढ आहेत.
योग, यज्ञ, याग, विधी, कर्मकांडांना नकार देऊन संतांनी हरीनामाचा पुरस्कार केला. ज्ञानोबामाउली म्हणतात –
योग याग विधी येणे नोहे सिद्धी ।
वायाची उपाधी दंभ धर्म ॥
बुवाबाजीवर संतांनी आक्रमक हल्ला चढवला आहे. तुकोबा म्हणतात –
ऐसे कैसे जाले भोंदू ।
कर्म करोनि म्हणति साधु ॥
अंगा लावूनियां राख ।
डोळे झांकुनी करिती पाप ॥
दावुनि वैराग्याची कळा ।
भोगी विषयाचा सोहळा ॥
तुका म्हणे सांगों किती ।
जळो तयांची संगती ॥
संन्यास आश्रमापेक्षा गृहस्थाश्रमाचा संत पुरस्कार करतात. तुकोबा विचारतात –
भगवे तरी श्वान । सहज वेश त्याचा ।
तेथे अनुभवाचा । काय पंथ?
संन्यास ही मनाची अवस्था आहे. वेशासी त्याचा काही संबंध नाही. माउली म्हणतात –
मी आणि माझेपण ।
विसरलें जयाचे अंतःकरण ।
तोची संन्यासी जाण ।
निरंतर ॥

अंधश्रद्धांना नकार देऊन संतांनी वैज्ञानिक दृष्टीकोण स्वीकारला.
नवसे कन्यापुत्र होती ।
तरी का करणे लागे पती?
हा प्रश्न तुकोबा 400 वर्षांपूर्वी विचारतात. तर
ज्ञानेश्वर माउली 700 वर्षांपूर्वी विचारतात –
मंत्रेची वैरी मरे । तरी का बांधावी कटारे? मंत्रतंत्राने करणी भानामती करून वैरी मरत असेल तर कट्यार कमरेला का बांधावी?

हे सारे लोकभाषेतून आग्रहाने मांडत असताना, संत सामान्य जनांच्या सुखदुःखात सहभागी होत.

जे कां रंजले गांजले ।
त्यांसी म्हणे जो आपुले ॥
तोची साधु ओळखावा ।
देव तेथेची जाणावा ॥

अशी संतत्वाची व्याख्या तुकोबांनी केली आहे. उन्हात तळमळत असलेले महाराचे मुल नाथ कडेवर घेतात. दुष्काळ पडला असता आपल्या मालकीचे कर्जरोखे इंद्रायणीत बुडवून तुकोबा महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची पहिली कर्जमाफी करतात. अशी कितीतरी उदाहरणे संत चरित्रांतून देता येतील.

आज ज्याला आपण पुरोगामी म्हणतो त्या विचारांचा वारसा आपल्याला असा संत साहित्यातून मिळाला आहे. ती नाळ तुटू न देता घट्ट धरून ठेवून पुढील लोकसंग्रहाची वाटचाल चालणे योग्य ठरणार नाही काय? महात्मा गांधी, गाडगेबाबा, साने गुरुजी हेच तर आपल्याला सुचवत नाहीत?

— अ‍ॅड. देवदत्त परुळेकर

- Advertisement -