Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
Homeफिचर्ससारांशHermann Hesse : हर्मन हेस

Hermann Hesse : हर्मन हेस

Subscribe

हर्मन हेस त्याच्या काळातला जर्मन भाषिक जगातला एक मोठा, प्रतिभावान लेखक होता. त्याच्या अनेक कादंबर्‍या प्रचंड लोकप्रिय झाल्या, पण जगभर त्याचं नाव झालं ते सिद्धार्थ या कांदबरीमुळेच, म्हणजे जरा उशिराच. विसाव्या शतकात ज्या युरोपियन लेखकाच्या साहित्याची जास्तीत जास्त भाषांतरं झाली तो म्हणजे हर्मन हेस. त्याच्या कविता, कथा, कादंबर्‍या आजही आवडीनं वाचल्या जातात.

-राजीव श्रीखंडे

हर्मन हेस हा एक जगप्रसिद्ध जर्मन लेखक. कवी, कादंबरीकार आणि चित्रकार म्हणून त्याने दिगंत कीर्ती मिळवली. १९४६ मध्ये त्याला साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले.

हेसचा जन्म १८७७ मध्ये एका जर्मन गावात झाला. हेसचे आजी-आजोबा (म्हणजे त्याच्या आईचे आईवडील) यांनी हिंदुस्तानमधील एका प्रोटेस्टंट मिशनसाठी काम केलं होतं. त्याच्या आजोबांनी बायबल मल्याळी भाषेत भाषांतरीतही केलं होतं. (त्यांना ३० भाषा अवगत होत्या.) हेसच्या आईचा जन्म भारतातलाच. हेसच्या वडिलांचा जन्म त्यावेळी रशियात असणार्‍या इस्टोनियातील एका गावात झालेला असल्यामुळे हेसचं नागरिकत्व पहिल्यापासूनच जर्मनी आणि रशिया या दोन्ही देशांचं होतं.

हेसचे आजोबा (म्हणजे वडिलांचे वडील) मोठे विद्वान गृहस्थ होते. त्यांच्यामुळे त्याला लहानपणापासूनच वाचायचा छंद लागला. लहानपणी हेस अतिशय हट्टी होता. त्यामुळे त्याच्या आईला त्याच्याबद्दल नेहमीच काळजी वाटत असे. त्याची आई एक कवयित्री होती आणि तिला संगीताची आवडही होती. त्याच्या एकंदर कुटुंबातच कविता आणि संगीत यांना खूप महत्व होतं. हेसच्या बालपणावर या सगळ्या गोष्टींचा परिणाम झाला. अगदी लहानपणीच, म्हणजे तो १३-१४ वर्षांचा असताना हेसनं लेखक व्हायचं म्हणून ठरवून टाकलं.

हेसचं प्राथमिक शिक्षण एका ऍबेत झालं. शिकत असतानाच पुढे त्याचे आईवडिलांशी खटके उडू लागले. त्याला बर्‍याच वैयक्तिक समस्यांना तोंड द्यावं लागलं. त्यात त्यानं एकदा आत्महत्येचा प्रयत्नही केला, पण नशिबानं तो वाचला. त्याला मानसोपचार तज्ज्ञांची मदतही घ्यावी लागली. या सगळ्यांमुळे त्याला बर्‍याच शाळा बदलाव्या लागल्या. त्याचं शालेय शिक्षण असंच गोंधळात झालं. मग काही कोर्सेस करून त्यानं प्रथम घड्याळाच्या दुकानात आणि नंतर पुस्तकांच्या दुकानांत नोकर्‍या केल्या. त्याचं वाचन या सगळ्यांत सतत चालूच होतं.

१८९९ साली हेसची पहिली दोन पुस्तकं प्रकाशित झाली. एक कविता संग्रह आणि दुसरा ललितलेखसंग्रह. पण त्यांना यश मिळालं नाही. १९०४ मध्ये हेसची कादंबरी ‘पीटर कमेनझिंड’ चांगलीच गाजली. हे त्यांचं पहिलं यश. सिगमंड फ्रॉईड या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाची ती आवडती कादंबरी ठरली. या नंतर हेसनं पूर्णवेळ लेखन करण्याचा निर्णय घेतला. याचवेळी हेसनं लग्न करून गृहस्थाश्रमाला सुरुवात केली आणि ते उभयता लेक कॉन्स्टंसच्या तीरावरील एका गावात राहू लागले.

याच वेळी हेसला हिंदु धर्म व बौद्ध धर्म यांबद्दल कुतूहल वाटू लागलं आणि त्यानं त्यासंबंधी अभ्यास करण्यास सुरुवात केली. तेव्हाच हेसला थिओसॉफीनंही आकर्षित केलं. त्याला भारताबद्दलही कुतूहल वाटू लागलं पण तो भारतात येऊ शकला नाही. त्याने सिलोन म्हणजे सध्याच्या श्रीलंकेला भेट दिली. त्याने सुमात्रा, बोर्निओ आणि ब्रह्मदेश या देशांची सफरही केली.

पहिले महायुद्ध सुरु झाल्यावर हेसनं लष्करात भरती व्हायचा निर्णय घेतला, पण बहुदा दृष्टी दोषामुळे त्याला आघाडीवर जाता आलं नाही. त्यावेळेच्या युद्धज्वरापासूनदेखील हेस अलिप्तच राहिला. त्यावेळेला चहू बाजूंनी त्याच्यावर टीकेचा भडीमारदेखील झाला. एका क्षणी हेसनं असे उद्गार काढले की, राजकीय मुद्यांकडे प्रेमभावनेने बघण्याचा माझा प्रयत्न पूर्णपणे फसला आहे.

युद्धानंतर हेसच्या कौटुंबिक स्वास्थ्यात मोठं परिवर्तन घडून आलं. त्याची बायको मनोरुग्ण बनली होती. हेस मग एकटाच तिसीनो येथे स्थायिक झाला. तिथं त्यानं पेंटिंग सुरू केलं. त्यांचं लिखाण सतत चालूच होतं. १९२३ साली त्याला स्विस नागरिकत्व मिळालं. त्याच्या डेमियन, स्टेपनवोल्फ, नारसिसिस अँड गोल्डमंड अशा कादंबर्‍या प्रकाशित होत होत्या आणि त्याच्या नावाचा दबदबा वाढतच होता. त्याच्या वयाच्या ५० व्या वर्षी दुसर्‍या एका लेखकानं लिहिलेलं त्याचं चरित्रही प्रकाशित झालं. याच सुमारास त्यानं दुसरं लग्न केलं.

जर्मनीत उदयास येऊ लागलेल्या नाझीवादामुळं हेस खूप अस्वस्थ होता. १९३३ मध्ये ब्रेख्त आणि थॉमस मान यांना जर्मनी सोडण्यात हेसनं सक्रीय मदत केली. पण त्याच्या मुळातच असलेल्या अलिप्त स्वभावामुळं पुढं त्यानं नाझीवादाच्या विरुद्धच्या चळवळीत कुठलाही सक्रीय भाग घेतला नाही. नाझीवादाविषयी त्याला विलक्षण घृणा होती, हे वेगळं सांगायची खरी गरज नाहीच.

१९४३ साली प्रसिद्ध झालेली ‘द ग्लास बीड गेम’ ही हेसची शेवटची उल्लेखनीय कादंबरी. मागं सांगितल्याप्रमाणे त्याला १९४६ चं साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळालं. यानंतर त्यानं ललित लेखन केलं, विविध लोकांशी भरपूर पत्रव्यवहारही केला, पण यापलीकडे तो गेला नाही. वयाच्या ८५ व्या वर्षी म्हणजेच १९६२ मध्ये हेसचा मृत्यू झाला.

हर्मन हेस त्याच्या काळातला जर्मन भाषिक जगातला एक मोठा, प्रतिभावान लेखक होता. त्याच्या अनेक कादंबर्‍या प्रचंड लोकप्रिय झाल्या. पण जगभर त्याचं नाव झालं ते सिद्धार्थ या कांदबरीमुळेच, म्हणजे जरा उशिराच. विसाव्या शतकात ज्या युरोपियन लेखकाच्या साहित्याची जास्तीत जास्त भाषांतरं झाली तो म्हणजे हर्मन हेस.

त्याच्या कविता, कथा, कादंबर्‍या आजही आवडीनं वाचल्या जातात. तरुण वाचकवर्गात हेस नेहमीच खूप लोकप्रिय होता आणि हा शिरस्ता आजही कायम आहे. प्रसिद्ध जर्मन संगीतकार रिचर्ड स्ट्रॉसनं हेसच्या तीन कवितांना संगीत देऊन आपल्या प्रत्येक प्रोग्रॅममध्ये त्यांचा आवर्जून समावेश केला. हेसला त्याच्या आयुष्यात खूप पारितोषिकेही मिळाली.