Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश कफन में जेब नही होती...

कफन में जेब नही होती…

समाजाची निर्मिती, राज्यसंस्थेच्या स्थापनेइतकाच जुना विषय काळ्या बाजाराचा आहे. अगदी सिनेमाच्या तिकिटापासून ते मानवी अवयवापर्यंतच्या वस्तू काळ्या बाजारात विकल्या आणि विकत घेतल्या गेल्याच्या बातम्या येतात. काळ्या बाजारातील गणितं व्यावसायिक यशाच्या गणितांच्या अगदी विरुद्ध टोकाची असतात, मागणी वाढली की पुरवठा वाढतो, असं व्यावसायिक उत्पादनाच्या यशाचं समीकरण असतं. पण काळ्या बाजारात मात्र स्थिती अगदी याउलट असते, इथं मागणी वाढवायची असते, त्या तुलनेत उत्पादन वाढवायचं नसतं. अशा प्रकारे लोकांची पिळवणूक केली जाते. हिंदी पडद्यावरच्या अनेक चित्रपटात एक संवाद अनेकदा ऐकला असेल..मौत कभी रिश्वत नही लेती... कफन में जेब नही होती...

Related Story

- Advertisement -

दिलीप कुमारच्या कृष्ण धवल जमान्यातली एक क्लिप व्हायरल होतेय, ज्यात दिलीप कुमार केलेल्या पापगुन्ह्याची कबुली देतोय. महामारीत आम्ही औषधांचा साठा दाबून ठेवला. त्यानंतर साथीच्या आजारात माणसं मरू लागल्यावर आम्ही ती औषधं काळ्या बाजारात जादा किमतीने विकली. आम्ही जगण्यासाठी गरजेच्या असलेल्या अन्न धान्य आणि सगळ्याच वस्तूंच्या बाबतीत हेच केलंय, आम्ही माणूस म्हणून जगण्यास नालायक आहोत. आम्हाला कठोरात कठोर शिक्षा मिळायला हवी. असा पश्चातापदग्ध सूर दिलीप कुमारने ‘फूटपाथ’ या चित्रपटात लावल्याचा हा काळ 1953 चा आहे. कोरोनाच्या महामारीत सत्तर वर्षानंतरही ही स्थिती कायम आहे. त्या वेळी प्लेग, टीबीच्या साथीत माणसं किड्यामुंग्यांसारखा जीव सोडत होती. त्या काळात दिलीप कुमारने औषधांच्या काळ्याबाजाराच्या परिणामाचं हे वास्तव पडद्यावर उभं केलं होतं. त्यापुढे 1960 मध्ये देव आनंदचा ‘काला बाजार’ याच विषयावर स्वतंत्र चित्रपट होऊन रिलिज झाला.

समाजाची निर्मिती, राज्यसंस्थेच्या स्थापनेइतकाच जुना विषय काळ्या बाजाराचा आहे. अगदी सिनेमाच्या तिकिटापासून ते मानवी अवयवापर्यंतच्या वस्तू काळ्या बाजारात विकल्या आणि विकत घेतल्या गेल्याच्या बातम्या येतात. काळ्या बाजारातील गणितं व्यावसायिक यशाच्या गणितांच्या अगदी विरुद्ध टोकाची असतात, मागणी वाढली की पुरवठा वाढतो, असं व्यावसायिक उत्पादनाच्या यशाचं समीकरण असतं. पण काळ्या बाजारात मात्र स्थिती अगदी याउलट असते, इथं मागणी वाढवायची असते, त्या तुलनेत उत्पादन वाढवायचं नसतं. मात्र मोजक्याच नगातल्या उत्पादनाची किंमत मात्र मागणीनुसार वाढवायची असते. लिलावातही हाच प्रकार होतो. वस्तूच्या किंमतीची जास्तीत जास्त बोली लावून ती खरेदी करणार्‍याची ऐपत असलेल्यांना त्या वस्तूवर हक्क सांगता येतो. इथंही लिलाव लागतो, पण तो चोरून आतल्या गोटातून प्रचलित कायद्यापासून लपवून लावला जातो. जीवनावश्यक वस्तू कोणत्या, त्याचे निकष हे कोणाचे जीवन त्यावर अवलंबून आहे, त्यावर ठरवले जाते. आपल्या देशात दारु, धान्य, पाणी, अन्न, रेती, औषधे, नोकरी, नोकरीची संधी, सेवा, वस्तू, वाहने, कपडे, मानवी अवयव, सत्तेच्या आरक्षीत जागा, अगदी कोट्यवधींची घरेही काळ्याबाजारात विकली, विकत घेतली जातात.

- Advertisement -

शक्ती सामंतांच्या अमानुष (1975) मध्ये धनियाखाली गावचा सरपंच महिन घोषाल (उत्पल दत्त) गावात पूर आल्यावर धान्याची साठेबाजी करतो. ही साठेबाजी हिरो मधु (उत्तम कुमार) उघडकीस आणतो आणि पूरस्थितीत भुकेने मरणार्‍या गावकर्‍यांना वाचवतो. काळ्याबाजाराची भिस्त वस्तूच्या टंचाईवर असते. सरकारी किंवा सुरक्षित नोकरीच्या संधी मोजक्याच असतात, तिथं काळ्याबाजारात जास्त दाम देणार्‍यांना अशा नोकर्‍या विकल्या जातात. 1989 मध्ये कादरखानचा ‘काला बाजार’ रिलिज झाला होता. त्यात नोकरीपासून ते मंत्रीपदापर्यंतच्या सर्वच थरातल्या काळाबाजाराचं कथानक होतं. काळ्या बाजारातून खरेदी केलेली पोलीस उपनिरीक्षपदाची नोकरी मी तुला कशी मिळवून दिली आणि अनिल कपूरवर कसा अन्याय केला हे कादरखान त्याचा मुलगा जॅकी श्रॉफला सांगतो, तेव्हा प्रेक्षकांना आपल्यातल्या सूज्ञ नागरिकत्वाची आणि देशाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव होते आणि हा काळाबाजार बंद व्हायलाच हवा असं वाटत राहतं.

अजिझ मिर्झाच्या ‘राजू बन गया जंटलमॅन’मध्ये जय नावाच्या समान्य माणसाचं प्रतिनिधीत्व नाना पाटेकर करत असतो, यात सिव्हील इंजिनियरींगचा डिप्लोमा केलेल्या शाहरुखने बनवलेला पूल सिमेंटमध्ये झालेल्या भेसळीमुळे कोसळतो आणि त्यात अनेकांचा जीव जातो. बांधकाम व्यावसायातील सिमेंटच्या साठेबाजी आणि भेसळीविरोधातील कथानकात राजूमधला जंटलमॅन पडद्यावरून हळूच प्रेक्षकांमध्ये शिरतो. यश चोप्रांच्या ‘त्रिशूल’मध्येही बांधकाम व्यावसायात सिमेंटची साठेबाजी करून गडगंज झालेल्या संधीसाधू प्रेम चोप्राचा आपल्याला राग येतो. प्रसारमाध्यमातील काळ्या बाजारावर आधारीत खोर्‍याने ओढता येतील इतके सिनेमे बनवलेले असतात. बांधकाम व्यवसायातील काळ्या बाजारावर अंगार, औरंगजेब तर मानवी आणि अवयव तस्करीवर आधारीत तथास्तू किंवा सुहागसारखे तद्दन व्यावसायिक सिनेमे बनलेले असतात. विक्रम गोखलेंनी स्वतः दिग्दर्शित केलेल्या मराठीतील आघात (2010) चा उल्लेख महत्वाचा असतो. वैद्यकीय क्षेत्रातल्या सेवेच्या काळाबाजाराचे चित्र पडद्यावर परिणामकारकपणे साकारणार्‍या गोखलेंचा हा चित्रपट मराठीतील एक उल्लेखनीय चित्रपट आहे. मुक्ता बर्वे, अमोल कोल्हेंचा अभिनय आणि कथानकामुळे ‘आघात’ लक्षात राहतो.

- Advertisement -

शुद्ध स्वरुपातल्या बातमीत भेसळ करून ती माध्यमांच्या काळाबाजारात विकली जाते. बातमी दाबणं, योग्य वेळ आल्यावर ती ब्रेक करणं हा सुद्धा बातम्यांचा काळाबाजार मधुर भांडारकरच्या पेज श्री आणि रामगोपाल वर्माच्या रण (2010) मधून समोर येतो. ब्लॅक मार्केटींगचा विषय भवलात घेरून असतो. मेहूल कुमारच्या क्रांतीवीरमध्ये अतुल अग्निहोत्रीसाठी पाच हजारांची जमवाजमव करण्यासाठी नाना पाटेकर सरकारी औषधं बाहेर काळ्याबाजारात विकणार्‍या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरकडून खंडणी वसूल करतो तर अनिल कपूरच्या नायकमध्ये एक दिवसाचा मुख्यमंत्री शिवाजीराव माचिसपासून मर्सिडीज कारपर्यंत कुठल्याही खरेदीवर पक्क्या पावतीचा आग्रह सांगून सर्वसामान्य ग्राहकांचा हक्क मिळवून देतो आणि राज्याच्या महसुलात कोट्यवधींची भर घालतो. शैक्षणिक क्षेत्रातल्या काळाबाजाराला आरक्षणाचं नाव देऊन बुद्धीभेद करणांमध्ये आहे रे…गटाचा एक मोठा प्रभाव समाजात काम करत असतो. प्रकाश झाच्या ‘आरक्षण’मध्ये शिक्षण क्षेत्रातल्या राखीव जागा काळ्या बाजारात कशा विकल्या गेल्या त्याचे कथानक असते.

शेअर मार्केटमधल्या काळाबाजारावर हिंदी पडद्यावर ‘बाजार’ नावाचा चित्रपट दोन वर्षांपूर्वी येऊन गेलेला असतो. हिंदी पडद्यावर अ‍ॅक्शन, रोमँटिक थ्रीलर अनेकदा आले आणि गेले, मात्र फायनान्शियल थ्रीलर असा उल्लेख परिक्षकांनी बाजारचा केलेला असतो. माणसांना गरजेची असलेली प्रत्येक विकण्यायोग्य वस्तू काळ्याबाजारातही विकली जाते. गरज ही शोधाची जननी असतानाच ती काळ्या बाजाराचीही जननी असते.

कोरोना काळात जीवनावश्यक वस्तूंसोबतच वैद्यकीय व्यावसायाचा काळाबाजारही तेजीत आलेला आहे. मास्कपासून ते औषधं, लस, वैद्यकीय सेवा, ऑक्सिजन सिलिंडर आणि रुग्णालयातला बेडही जादा किमतीने विकला जात आहे. याशिवाय मृतदेहांची विल्हेवाट, अंत्यसंस्कार, स्मशानातला लाकूडफाटाही काळ्या बाजारात विकला गेल्याच्या बातम्या आहेत. कोरोनाने माणसाच्या महनीय संस्कृतीचा नकाब निर्दयपणे फाडून काढला आहे. अशाही परिस्थितीत माणूसपण जपून असलेले कोरोनातील सेवेकरी, डॉक्टर्स, वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी मंडळी, लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तू पुरवणार्‍या संस्था, संघटनाही काम करत आहेत. एकीकडे औषधांची साठेबाजी करणारी मंडळी जशी आहेत. तशीच स्वतःचा प्लाझ्मा आणि पुढे येऊन रक्तदान करणारीही माणसं आहेत. वैद्यकीय संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून आणि लावलेल्या औषधांच्या शोधांमुळे येत्या काळात कधीतरी कोरोनाही टीबी किंवा मलेरियासारखा सर्वसामान्य आजाराच्या रांगेत जाऊन बसेल, मात्र पैशांसाठी मरणार्‍यांचे खिसे चाचपणारी माणसं ही त्याआधीच कधीचीच ठार मेलेली असतील, हिंदी पडद्यावरच्या अनेक चित्रपटात एक संवाद अनेकदा ऐकला असेल..मौत कभी रिश्वत नही लेती… कफन में जेब नही होती…

- Advertisement -