घरफिचर्ससारांशआठवणींचा छोटा पडदा

आठवणींचा छोटा पडदा

Subscribe

लॉकडाऊनच्या काळात छोट्या पडद्याला कमालीचं महत्व आलं आहे. मुव्ही चॅनल्सवर जुने सिनेमे दाखवले जात असतानाच ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यातल्या छोट्या पडद्यावरच्या हिंदी मालिकाही पुन्हा नव्याने डीडी मेट्रो चॅनेलवर सुरू झाल्या आहेत. रामानंद सागर यांचं 80 ते 90 च्या दशकातलं रामायण पुन्हा दाखवलं जात आहे. तर कृष्ण धवल टीव्हीच्या जमान्यातल्या छोट्या पडद्यावरचा शहारुख खान पुन्हा त्याच्या सर्कसमधून दाखल झाला आहे. या निमित्त जयराज, बुश कंपनीचा रेडीओ, नेल्को, क्राऊनच्या टीव्हीचा काळ पुन्हा नेटफ्लिक्स, इंटरनेट, युट्यूबच्या जमान्यात पुन्हा छोट्या पडद्यावर अवतरला आहे.

वेबसिरीजच्या इंटरनेट काळात मोठ्या पडद्याच्या सिनेमागृहांना छोट्या पडद्याने पुन्हा आव्हान निर्माण केले. मात्र आता हा छोटा पडदा टीव्हीचा नाही तर लॅपटॉप, स्मार्टफोनचा आहे. माध्यमांचा आकार कमी होत गेला आणि प्रमाण वाढत गेलं. युट्यूबने जुन्या नव्यातल्या सर्व गरजा संपुष्टात आणल्या, त्यामुळे छोट्या पडद्याच्या जमान्यातलं छायागीत, चित्रहारचा नास्टल्जियाही निकालात निघाला. लॉकडाऊनमध्ये माणसं घरीच असल्यानं जुन्या सिरियल्स पुन्हा नव्याने पाहिल्या जात आहेत. छोट्या पडद्यावर रामायण, महाभारत किंवा शनिवार रविवारी सायंकाळचा हिंदी फिचर फिल्म सुरू झाल्यावर रस्त्यावर लॉकडाऊनसारखी स्थिती निर्माण होत असे. आज लॉकडाऊनमुळे या जुन्या गाजलेल्या कलाकृती पुन्हा दाखवल्या जात आहेत.

दशक 70 आणि 80 मध्ये आठवड्याच्या रविवारी एकच हिंदी चित्रपट दूरदर्शन राष्ट्रीय वाहिनीवर दाखवला जात होता. कारवाँ, दो बदन, हम हिंदोस्तानी असे इस्टमनकलर सिनेमांचा त्यात सर्वाधिक भरणा होता. चित्रपटाच्या मध्यंतरात सात वाजता मराठी बातम्यांची वेळ होती. शनिवारचा दिवस मराठी चित्रपटांसाठी हक्काचा असे. ज्यात चंदनाची चोळी अंग अंग जाळी, सुगंधी कट्टा, सुशीला, केला इशारा जाता जाता, अपराध, हर्‍या नार्‍या झिंदाबाद मोहित्यांची मंजुळा असे मराठी चित्रपट ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट टीव्हीचा छोटा पडद्यावर दाखल होत. हा खेळ सावल्यांचा आणि बन्याबापू हे दोन मराठीत गाजलेले चित्रपटही खूपच उशिराने छोट्या पडद्यावर दाखवले गेले होते. म्हणजेच या चित्रपटांचे दर्शनमूल्यही बराच मोठा काळ कायम होते. रविवारी सकाळच्या वेळेत दाखवण्यात येणार्‍या मराठी दूरदर्शनच्या साप्ताहिकीत आठवड्यातल्या सिनेमाची घोषणा आणि सीन पाहाण्यासाठी टीव्ही पुढे होणार्‍या गर्दीचा हा काळ होता. लॉकडाऊनच्या निमित्ताने हा काळ पुन्हा छोट्या पडद्यावर दाखल झाला असताना हिंदी छोट्या मोठ्या पडद्यावरील प्रेक्षकांची अभिरुची, आवड कमालीची बदलली आहे. रामायणात तत्कालीन लढाई आजच्या बाहुबलीच्या तुलेनत कमालीची लुटुपुटुची वाटेल. रावणाने सोडलेल्या अग्नीबाणावर रामाकडून बाणातून सोडलं जाणारं पाणी. त्यातला रावणाचा बाण गायब होणं. मग राम झालेल्या अरुण गोविलचं मंद स्मित आणी रावणाचा क्रोधित चेहरा पाहाण्यासाठी टीव्हीसमोर होणारी गर्दी आज इतिहासजमा झाली आहे. नॅशनल नेटवर्कवर रामायण सुरू होण्याआधी रविवारी सकाळी दहा वाजता शो थिम लागत असे, ज्याचं टायटल म्युझिक तुम इतना जो मुस्कुरा रहे हो…या गाण्यातल्या संतुरवादनाची सुरुवात होती. यात एखाद्या थिमवर आधारीत हिंदी चित्रपटातील प्रसंग होते. जसं की आई आणि मुलाचे भावनि प्रसंग अशी थिम असल्यावर त्यात दिवार, मदर इंडियातले सीन हक्काने दाखवले जात.

- Advertisement -

बंगाली साहित्यकृतीवर आधारलेल्या कथानकांवर दर्पण झूठ ना बोले नावाची दर्जेदार मालिका 1987 मध्ये छोट्या पडद्यावर होती. सर्वहारा समुदाय आणि सर्वसामान्य माणसांच्या दैनंदिन जगण्यातील कथामूल्य असलेल्या या मालिकेत सर्वसामान्य चेहर्‍याचीच माणसेच कलाकार होती. पंकज कपूर, पवन मल्होत्रा, बेंजामिन गिलानी ही मंडळी प्रामुख्याने यात झळकत होती. एनएसडीच्या विद्यार्थ्यांना त्यावेळी अशा प्रयोगिक मालिकांचा मोठा दिलासा होता. त्याच काळात मिट्टी के रंगचं शीर्षक गीत मोठं आशयपूर्ण होतं. दुनिया बदल गयी, इन्सा बदल गये, बदले नही कभी ये..मिट्टी के रंग…यात मातीतल्या मातीतल्या कथा मालिकारुपातून समोर येत होत्या. आर के लक्ष्णण यांच्या व्यंगचित्रकारांनी सजलेल्या मालगुडी डेजचा हा काळ…मालगुडी डेज मधली प्रत्येक फ्रेम कार्डबोर्डवर आधी चित्रकारांकडून रेखाटली गेली होती. त्यानुसार प्रत्येक प्रसंग शंकर नाग यांच्याकडून पडद्यावर रेखाटण्यात आला. अगदी मालगुडीचं स्टेशनही तस्सच होतं. जसं आधी कागदावर स्केच रेखाटलं होतं.

शोले बनवून मोठा पडदा गाजवणार्‍या रमेश सिप्पी यांनी 1986 मध्ये दूरदर्शनवर बुनियाद नावाची मालिका बनवली. त्याचे एकूण 105 भाग छोट्या पडद्यावर साकार झाले. आजपर्यंतच्या छोट्या पडद्यावरील इतिहासात बुनियादला जेवढा प्रेक्षकवर्ग लाभला तेवढा इतर कुठल्याही मालिकेला लाभला नाही. सिप्पी फिल्म्सने शोलेसारख्या मोठ्या पडद्यासारखंच यश बुनियादमधून छोट्या पडद्यावरही मिळवलं. साहित्यीक मनोहर श्याम जोशींच्या साहित्यातून हम लोग ही 154 एपिसोड्सची मालिकाही 80 च्या दशकात पडद्यावर आली. सामान्य कुटुंबातील नातेसंबंधांमधील सामाजिक संघर्षाचं कथानक हम लोक मध्ये होतं.

- Advertisement -

याच काळात छोट्यांच्या छोट्या पडद्यावर स्पायरडरमॅन आणि जायंट रोबो आले होते. स्पायडरमॅनचं कथानक कार्टून्समध्ये होतं. तर जायंट रोबो मुंबई दूरर्दशनच्या चॅनल क्रमांक दोनवरून प्रसारित होत असे. स्टार ट्रेक आणि फायरबॉल या दोन्ही अंतराळकथांचा कालावधी त्याआधीचा होता. तर त्याची हिंदी नक्कल म्हणून स्पेस सिटी सिग्मा नावाचा अंतराळपट नव्वदच्या दशकात छोट्या पडद्यावर दाखल झाला होता.विनोदी मालिकांमध्ये ये जो है जिंदगी आणि इधर उधर या दोन मालिका होता. तर शेखर सुमन, शहारुख खान, पवन मलहोत्रा, आशुतोष गोवारीकर, मकरंद देशपांडे, राकेश बेदी ही नावे छोट्या आणि मोठ्या पडद्यावर संधी मिळण्यासाठी संघर्ष करत होती.

शेखर सुमनला वाह जनाब मिळाली, पवन मलहोत्राला गुल गुलशन गुलफाम तर शहारुखच्या पारड्यात वागले की दुनियाचे दोन एपिसोड्स पडले होते. कुंदन शहा आणि सईद मिर्झांनी नुक्कड ही मालिका बनवली. याचं टायटल म्युझिक कमालीचं गाजलं. मोबाईल फोनच्या सुरुवातीच्या काळात अनेकांच्या फोनवर सॅक्सोफोनचं हीच ट्युन वाजत होती. या काळात पंकज कपूरचा छोट्या हिंदी पडद्यावर दबदबा होता. करमचंद आणि कब तक चुप रहूँगी, सांझा चुल्हा या सारख्या बहुतेक सिरियलमध्ये पंकज होताच. कुंदन पंकज आणि सईद हे त्रिकूट 80 च्या दशकात महत्वाचं होतं. म्हणूनच नावारुपाला आलेला स्टार असतानाही केवळ पंकज कपूरसोबत काम करायला मिळेल म्हणून शहारुखने राम जाने नावाचा पडेल चित्रपट स्वीकारला होता. ते असो…शहारुखचा सिगारेट फुंकण्याचा सुपरस्टारचा अटीट्युड तेव्हापासूनच होता. ज्यावेळी फौजी, सर्कस आणि दुसरा केवल या मालिका त्याच्याजवळ होत्या. केवळ कुंदन शहाच्या ओळखीने त्याला वागले की दुनियातला एक एपिसोड मिळाला होता. कुंदन आणि शाहरुखच्या मैत्रीने पुढे माया मेमसाब, राज बन गया जंटलमॅन असे अनेक दर्जेदार चित्रपट दिले. दुसरा केवल मधला शहारुखचा सहज अभिनय हेमामालिनीला आवडला होता. त्यांनी दिवानामध्ये सहकलाकार म्हणून शाहरुखचं नाव पक्क केलं.

त्याआधीच मित्र विवेक वासवानी निर्माता झाला होता. इधर उधर मालिकेच्या सेटवर त्याने शहारुख खानला राजू बन गया जंटलमनविषयी सांगितलं आणि शाहरुखचा होकार गृहीत धरला होता. डेली सोप ही त्यावेळी इंग्रजी टेलिव्हीजनवरील बाब होती. त्यानंतर खूपच उशिराने हिंदीत जुनून, शांती आणि स्वाभिमान या दोन प्रत्येक दिवसाच्या मालिका सुरू झाल्या. म्युझिकल काऊंटडाऊन शोच्या सुपरहिट मुकाबलाच्या सुरुवातीच्या काही भागाचं सूत्रसंचालन शहारुख खानने केले होते. त्यामुळे शहारुखला किंग खान बनवण्यात दूरदर्शनचा मोठा वाटा असल्याचे त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

दिवसाला प्रसारित होणार्‍या सिरियल्सनी छोट्या पडद्याचे आर्थिक ठोकताळे बदलून टाकले. एकता कपूरने सिरीयल इंडस्ट्रीला कमालीचे व्यावसायिक करून टाकले. त्यामुळे नितीमूल्यांवरील आधारीत हिंदी सिरीयल्समध्ये घरगुती भांडणे, छान छान तरुण अभिनेते, अभिनेत्रींचे स्टाईलीश पेहराव दिसू लागले. छोट्या पडद्यावरील सिरीयल कमालीची बदलत गेली. आज वेबसिरीजच्या जमान्यात नैतिक मूल्यांचे अधिष्ठान असलेल्या हिंदी मालिका केवळ आठवणीत राहिलेल्या आहेत. ज्यांची उजळणी लॉकडाऊनच्या निमित्ताने होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -