घरफिचर्ससारांशऐतिहासिकपट कलाकृती....

ऐतिहासिकपट कलाकृती….

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर अनेक चित्रपट व मालिका आल्या आहेत. १९ फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराजांची जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावरील चित्रपट किंवा मालिका म्हणजे रसिकांना एक आगळीवेगळी पर्वणीच असते. त्यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप...

– आशिष निनगुरकर

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावरील चित्रपट व मालिका रसिकांना एक आगळीवेगळी पर्वणीच असते. अवघ्या महाराष्ट्राचं दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी जीवनावर व
ऐतिहासिक विषयांवर चित्रपट काढण्याचा मोह अनेक निर्माते-दिग्दर्शकांना आवरता आला नाही. अगदी ओम राऊत, गजेंद्र अहिरे यांसारख्या दिग्दर्शकांपासून ते हिंदीमधले प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

- Advertisement -

भन्साळी यांच्या ‘बाजीराव-मस्तानी’ने अनेक वादंग ओढवून घेतले असले तरी प्रेक्षकांचा चित्रपटाला ‘हाउसफुल्ल’ प्रतिसाद मिळाला. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा यांच्या मुंबई फिल्म कंपनीने ‘छत्रपती शिवाजी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा देण्यात आली आहे ती बालक पालक, टाइमपास, टाइमपास २ यांसारख्या अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलेल्या रवी जाधवांवर. रितेश देशमुखने उडत्या पक्ष्याच्या माध्यमातून रवी जाधव यांच्या नावाची घोषणा केली आहे.

‘छत्रपती शिवाजी’ हा फक्त सिनेमा नाही, तर मोठी जबाबदारी आहे. शिवाजी महाराजांचे नुसते नाव घेतले तरी मराठी माणसाच्या अंगात स्फुलिंग संचारते. शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य पराक्रमावर मराठा साम्राज्य उभे राहिले आहे. त्यांच्या युद्धनीतीचे तंत्र विदेशात अभ्यासले जाते. खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांवर मराठीमध्ये पूर्वीच चित्रपट निर्मिती झाली आहे.

- Advertisement -

गेल्या काही वर्षांपासून ऐतिहासिक तसेच शिवकालीन ऐतिहासिकपटांची लाटच आपल्या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आली आहे. त्यातल्या काही चित्रपटांनी मोठं यश मिळवलं, तर बरेच चित्रपट प्रेक्षकांनी नाकारलेदेखील. तसेच पुढील एक-दोन वर्षांमध्ये जवळपास अशा प्रकारच्या जॉनरचे आणखी १५-२० चित्रपट तरी प्रेक्षकांसमोर येण्याची शक्यता आहे. मराठी चित्रपटसृष्टीत लाट येण्याची परंपराच आहे. आता सध्या लाट सुरू आहे ती ऐतिहासिकपटांची.

विख्यात निर्माता-दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी १९६०च्या दशकात बरेच उत्तम ऐतिहासिकपट बनवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याला आणि त्यांच्या पराक्रमाला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी चांगल्या कलाकृती साकारल्या. प्रेक्षकांनीही त्यांचं कौतुक केलं, पण भालजींच्या चित्रपटांव्यतिरिक्त दोन-तीन चित्रपटांचे अपवाद वगळता त्यानंतरच्या काळात चांगले ऐतिहासिकपट बनले नाहीत. त्यामागचं कारणही बहुधा विविध विषयांवरच्या तेव्हा सुरू असलेल्या लाटा हेच असावं.

तसेच ऐतिहासिकपट हा सहज साकारता येणारा विषय नाही, अशीही धारणा तेव्हा लेखक-निर्माता-दिग्दर्शकांच्या मनात असावी. ही धारणा गेल्या दोन-तीन वर्षांपासून बदलली आहे. अलीकडच्या काळात हिंदी-मराठी ऐतिहासिक चित्रपटांची रांगच लागली आहे. हिंदीमधील आशुतोष गोवारीकर, संजय लीला भन्साळी यांनी ऐतिहासिकपटांवर जास्तच प्रेम केलंय.

अभिनेता अजय देवगणनं त्यांच्या एक पाऊल पुढे टाकत ‘तान्हाजी द अनसंग हीरो’ चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटानं डोळ्यांना दिपवेल असं यश मिळवलं आणि पुन्हा एकदा अनेकांचं लक्ष या जॉनरकडे गेलं. प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्याचा वेध घेणार्‍या घटनांच्या मालिकेवरील ‘शिवअष्टक’ संकल्पनेची घोषणा केली.

तेव्हा हा प्रकल्प कितपत यशस्वी होईल याची अनेकांना शंका होती, परंतु लांजेकर यांनी या संकल्पनेतील पाच चित्रपट तयार केले. प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसादही दिला आणि आता उऱलेल्या चित्रपटांवर ते काम करीत आहेत. हे फक्त मोठ्या पडद्यावरच सुरू आहे असं नाही. टीव्ही माध्यमातदेखील गेल्या दशकभरापासून अनेक ऐतिहासिक कलाकृती प्रेक्षकांसमोर आलेल्या आहेत.

केवळ शिवकालीन काळ नव्हे तर संतपरंपरेचा तब्बल ८०० वर्षांपूर्वीचा इतिहासही आपल्याला टीव्ही माध्यमातून पाहायला मिळाला. लांजेकर यांच्याबरोबरच सध्या बरेच नामवंत मराठी दिग्दर्शक शिवकाळावर तसेच इतर ऐतिहासिक घटनांवर चित्रपट बनवत आहेत. नागराज मंजुळे, महेश मांजरेकर, डॉ. अमोल कोल्हे, रवी जाधव, प्रवीण तरडे, अभिजित देशपांडे ही त्यामधील प्रमुख नावे आहेत. महेश मांजरेकर यांनी ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज मोठ्या पडद्यावर आणले, पण त्या चित्रपटाची गोष्ट वेगळी होती. आजच्या काळातली गोष्ट रचून त्यात छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा गोवण्यात आली होती. या Conditions रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

दरम्यानच्या काळात छोट्या पडद्यावर डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘राजा शिवछत्रपती’ मालिकेद्वारे अस्सल शिवराय साकारले. केवळ छोटा पडदाच नव्हे, तर दरम्यान रंगभूमीवरही डॉ. अमोल शिवराज साकारत होते. इतरही अनेक छोट्यामोठ्या नाटकांमधून शिवराज दिसत होते. मोठ्या पडद्यावर मात्र तुलनेनं शिवराज फार दिसत नव्हते. कुणाला चित्रपट बनवावे वाटत नव्हतं असं नाही, पण प्रश्न बजेटचा होता. दुसरीकडे हिंदीत-दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये व्हिएफएक्सचा जोरदार वापर करून ७० एमएम स्क्रीन आणखी भव्य करण्याचा चंग बांधण्यात येत होताच. यात फार मोठी रेष मारून ठेवली ती ‘बाहुबली’च्या दोन्ही भागांनी. एकूणच मराठीत ऐतिहासिक विषयांना हात घातला जात नव्हता.

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयांना हात घातला. आधी ‘फर्ंजद’ त्यानंतर ‘फत्तेशिकस्त’ आणि त्यानंतर ‘पावनखिंड’ असे चित्रपट त्याने बनवले आणि ते बनवतानाच शिवरायांवर अष्टक बनवण्याचा संकल्पही त्याने बोलून दाखवला. अलीकडेच त्याचा ‘शेर शिवराज’ चित्रपटही आला आहे. रसिकांचा या चित्रपटांना चांगला प्रतिसाद होता. हाती असलेल्या बजेटचं योग्य नियोजन करून दिग्पालने हे सिनेमे आणले.

बर्‍याच काळानंतर महाराज मोठ्या पडद्यावर आले असल्याने मराठी माणसाने या चित्रपटांना चांगला प्रतिसाद दिला. यात ‘पावनखिंड’ने तिकीट खिडकीवर सर्वाधिक यश मिळवलं. दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या ‘वीर दौडले सात’मध्ये सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा सहकार्‍यांनी १६७४ मध्ये गाजवलेल्या शौर्याची आणि बलिदानाची कथा असणार आहे. या चित्रपटाच्या कथानकावरून हा मल्टिस्टारर चित्रपट असेल यात शंका नाही.

शिवकालीन ऐतिहासिकपट वेगवेगळ्या दृष्टिकोनातून प्रेक्षकांसमोर मांडणं यात गैर काहीच नाही. तसेच अशा प्रकारच्या कलाकृती कोणताही फिल्ममेकर हा शुद्ध भावनेनेच करतो, असेही आपण एकवेळ खरं मानू, परंतु केवळ या दोन गोष्टीच अशा प्रकारच्या चित्रपटनिर्मितीसाठी पुरेशा आहेत का, याचा विचार आता करण्याची गरज आहे. तसेच आघाडीच्या लेखक-निर्माते-दिग्दर्शक मंडळींनी सध्याच्या वास्तवाकडेही डोळेझाक करून उपयोग नाही.

कोरोना काळानंतर जवळपास दीड वर्ष राज्यातील चित्रपटगृहे बंद होती. त्यामुळे जवळपास २०० मराठी चित्रपट अजूनही प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत. या चित्रपटांमागे कोट्यवधींची गुंतवणूक लागली असल्यामुळे प्रत्येक जण आपापले चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित करण्याच्या मागे आहे. अशा सर्वच चित्रपटांना अधिक संख्येनं स्क्रीन्स किंवा प्राईम टाईम वेळा मिळणं अशक्य आहे. त्यामागचं कारण म्हणजे मराठीच्या तुलनेत हिंदी चित्रपटांची संख्या कितीतरी पटीनं जास्त आहे.

तसेच मल्टिप्लेक्सची यंत्रणा अजूनही अमराठी यंत्रणेच्या हातात असल्यामुळे हिंदी चित्रपटांनाच प्राईम टाईमच्या वेळा देण्याकडे वितरकांचा तसेच प्रदर्शकांचा कल आहे. हे संकट कमी की काय म्हणून दाक्षिणात्य चित्रपटांचंही आक्रमण गांभीर्यानं पाहायला हवं. त्यामुळे एकीकडे मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांची भाऊगर्दी आणि दुसरीकडे चित्रपटगृहांची संख्या मात्र तेवढीच असं व्यस्त प्रमाण आहे. अशा परिस्थितीत मोठ्या संख्येने बनणार्‍या मराठी ऐतिहासिक चित्रपटांचं भविष्य काय, हा प्रश्न कोणालाही पडणं साहजिकच आहे.

ऐतिहासिक चित्रपटांची आणखी एक समस्या म्हणजे तिथं आशय आणि बजेट अशा दोन्ही आघाड्यांवर थोडीही गफलत चालत नाही. सध्याची सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी पाहता प्रत्येक जण इतिहास संशोधक आणि समीक्षक झाला आहे. त्यामुळे बहुतेक सर्व ऐतिहासिकपटांना प्रदर्शनानंतर इतिहासाच्या मोडतोडीबद्दल प्रेक्षकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. चित्रपट हे मुळात मनोरंजनाचं माध्यम असल्यामुळे लेखक-दिग्दर्शकाला ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ घेण्याचं स्वातंत्र्य आहे, परंतु हे स्वातंत्र्य आजच्या काळात फिल्ममेकरला आपण देतो का, याचा विचार प्रेक्षकांनीही करणं गरजेचं आहे.

अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ चित्रपटाला मोठ्या आर्थिक बजेटचं पाठबळ असल्यामुळे त्याच्या तंत्रावर कोणी आक्षेप घेतला नाही, परंतु त्यातल्या आशयावर टीका झालीच. दुसरीकडे मराठी चित्रपटांची आशयावर चांगली तयारी आहे, परंतु बजेटअभावी ‘व्हीएफएक्स’मध्ये आपण अजूनही कमी पडतोय. ऐतिहासिकपटांबद्दलची समस्या म्हणजे कथानक प्रेक्षकांना ठाऊक असतं. ते तुम्ही किती ताकदीनं पडद्यावर सादर करता यावर त्या कलाकृतीचं भवितव्य ठरतं. थोडक्यात एवढ्या मोठ्या संख्येने ऐतिहासिकपट बनत असूनही प्रेक्षक अजूनही समाधानी नाहीत.

एकाच विषयावरचा ऐतिहासिकपट दोघा-तिघांना करायचा असेल तर त्यांनी तो स्वतंत्रपणे करण्याऐवजी एकत्र येऊन सादर करता येईल का याचा गांभीर्याने विचार करायला हवा. त्याचा होणारा सर्वात मोठा लाभ म्हणजे चित्रपटाला बजेट चांगलं मिळून तंत्राच्या आघाडीवर तो सर्वोत्तम ठरेल. तसेच एकाच विषयावर तीन-चार कलाकृती न बनल्यामुळे प्रेक्षकांची विभागणी होणार नाही. विख्यात दिग्दर्शक रिचर्ड एटेनबरो यांचा ‘गांधी’ चित्रपट नावाजला जातो ते त्याच्या परिपूर्ण हाताळणीसाठी.

आपली कलाकृतीही तशीच परिपूर्ण असायला हवी असं जर फिल्ममेकर मंडळींना वाटत असेल तर थोडी तरी सामंजस्याची भूमिका सर्वांनाच घ्यावी लागेल. खुद्द भालजींनीच शिवकलाकृतींबद्दलच्या वक्तव्यात जनहित या शब्दाला स्थान दिलं आहे. शिवरायांचे हे चित्रपट म्हणजे प्रेक्षकांना पर्वणी असणार यात शंका नाही. या चित्रपटांचं योग्य नियोजन करता आलं तर या चित्रपटांना लोकाश्रय नक्कीच मिळेल. साहजिकच मराठी चित्रपटसृष्टी खर्‍या अर्थाने श्रीमंत ठरेल यात शंका नाही. तसं झालं तर नक्कीच उच्च दर्जाचे ऐतिहासिकपट पाहण्याचं भाग्य प्रेक्षकांना लाभेल.

-(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -