घरफिचर्ससारांशसातपुड्यातील राजवाडी होळी

सातपुड्यातील राजवाडी होळी

Subscribe

सातपुड्यातील होळी उत्सव साधारण पंधरा दिवस चालतो. सात-आठ पाडे मिळून होळी उत्सव साजरा केला जातो. सातपुड्यातील मानाच्या होळीचा मान हा काठी संस्थानला जातो. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात असलेल्या ‘काठी’ या गावी मानाची राजवाडी होळी पेटवली जाते. आदिवासी राजे राजा पांटा आणि गांडा ठाकूर यांनी या होळीउत्सवाला सुरुवात केली. यानंतर 1246 मध्ये राजा उमेद सिंह याने काठी या राज्याची स्थापना केली. आणि तिथूनच या काठीच्या राजवाडी होळीची सुरुवात झाली. आज 775 वर्षानंतरही ही होळी तितक्याच उत्साहात सातपुड्यात साजरी केली जाते.

तापी आणि नर्मदेच्या कुशीत उभ्या ठाकलेल्या सातपुडा पर्वत रांगेतील मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमेला लागून असलेले उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून ओळखले जाणारे नंदुरबार. आदिवासी ही महाराष्ट्रातील बहुसंख्येने असलेली एक मुख्य जमात. पावरा, पाडवी, गावित, भिल्ल या येथील प्रमुख आदिवासी जमाती. महाराष्ट्रातील सातपुडा आणि सह्याद्रीच्या हिरव्यागार शालू पांघरलेल्या दर्‍या-खोर्‍यात राहून आपल्या आदिम संस्कृतीचे दर्शन घडवणारी ही लोक. बोलीभाषा, राहणीमान, दागिने, सण उत्सव, राणभाज्यांसारखी खाद्य संस्कृती, नृत्य, वाद्य यामाध्यमातून आपली स्वतंत्र अशी ओळख निर्माण करुन, या संपूर्ण गोष्टींची जपणूक ते आजतागायत करत आहेत. आपल्या गावापासून आजूबाजूच्या शहरी भागात किंवा प्रदेशात जाऊन मोल मजुरीची काम करुन आपल्या घरादाराच गुजराण करतात.

पावसाळा सुरू झाल्यावर आपल्या घरच्या छोट्याशा माळरानावर पीक पेरुन ही सर्व लोक कुटूंबासह आजूबाजूच्या परिसरात कामासाठी त्याचबरोबर उसतोडणीसाठी गुजरात राज्यात जातात. यावेळी गावात फक्त वृद्ध लोक अन मुलं राहतात. फाल्गुन मास लागताच उन्हाची तीव्रता वाढू लागते तोच या सर्व लोकांची काम आवरुन गावाकडे परतण्याची लगबग सुरु होते. ही लगबग सुरु होते ती खर्‍या अर्थाने आदिवासींमध्ये सर्वात मोठा सण असलेल्या होळी उत्सवासाठी. शेतीचा हंगाम संपून वसंतऋतुने संपूर्ण सृष्टी बहरलेली असते. धान्य काढून ते साठवले जाते. अन, पुढच्या हंगामापर्यंत म्हणजेच पावसाळा सुरू होईपर्यंत शेतीची मशागत करुन विश्रांती घेतली जाते. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला उत्साहात साजरी होणार्‍या होळी उत्सवासाठी सातपुड्यातील आदिवासी लोक संपूर्ण कुटूंबासह तयारीला लागतात.

- Advertisement -

होळीची तयारी सुरू होते ती भोंगर्‍या बाजारापासून. भोंगर्‍या बाजार म्हणजे सातपुड्यात भरणारी एकप्रकारची यात्राच असते. होळीच्या साधारण पंधरा दिवस आधी भोंगर्‍या बाजाराला सुरुवात होते. दहा-बारा पाडे मिळून एक भोंगर्‍या बाजार भरतो. त्यासाठी आधी या गावांमधली लोक एकत्र जमून कोणत्या गावी हा बाजार भरवायचा याबाबत नियोजन करतात. आणि सर्वांच्या संमतीने या गावांच्या मध्यभागी असलेल्या एका गावात हा बाजार ठरवलेल्या दिवशी भरतो. या बाजारात होळीसाठी लागणारं सर्व साहित्य मिळतं. गूळ, खोबर, दाळ्या, नारळ, हार-कंगन. याचबरोबर होळीत विविध पेहराव करण्यासाठी रंगीबेरंगी कपडे, चांदीचे आदिवासी संस्कृतीतील दागिने, नैसर्गिक रंग, रंगीत कागद, शस्र, विविध मुखवटे, वाद्य हे सर्व विक्रीसाठी उपलब्ध असत. मनोरंजनासाठी पाळणे, फोटो स्टुडिओ, विविध प्रकारचे खेळ देखील असतात. आजूबाजूच्या गावातील सर्व लोक भोंगर्‍या बाजारात गर्दी करुन होळीसाठी लागणारे साहित्य खरेदी करतात. बाजारात तरुण-तरुणींची संख्या ही मोठी असते. यावेळी होलिकामातेचे पूजन करुन पोलीस पाटील अन, गावातील प्रतिष्ठित व्यक्तीची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. यावेळी ठिकठिकाणी स्वागत अन सत्कारदेखील आयोजित केले जातात.

ही मिरवणूक भोंगर्‍या बाजारातून जात पुढे विसर्जित होते. बाजारात गावागावातील लोक ग्रुपने सहभागी होत वाद्य वाजवत नृत्य करतात. अन, होळी उत्सवाचा बिगुल वाजवला जातो. पूर्वी अशी परंपरा होती की याच भोंगर्‍या बाजारातून मुला- मुलींची लग्न जमायची. वर्षभरातून एकदाच ही लग्न जमायची आणि लावलीदेखील जायची. कारण आदिवासींमध्ये बघण्याचा कार्यक्रम नसतो. लग्नासाठी मुहूर्तदेखील बघितला जात नाही. ना हुंडा दिला जात. याच भोंगर्‍या बाजारात पूर्वी मुलगा मुलीला बघायचा आणि तिला पळवून न्यायचा. नंतर दोघांच्या कुटूंबाच्या आणि गावातील प्रतिष्ठित माणसांच्या संमतीने त्यांचा विवाह लावून दिला जायचा. कालांतराने ही प्रथा बंद पडली. आदिवासींमध्ये होळीबद्दल एक आख्यायिका प्रचलित आहे. ती म्हणजे पोरब नावाच्या एका राजाला ‘होळी’ नावाची सुंदर आणि देखणी मुलगी होती.

- Advertisement -

ती ‘भोंगडा’ नामक एका आदिवासी तरुणाच्या प्रेमात पडली. तो बांबूपासून देखण्या वस्तू साकारत असे. होळीला या तरुणाशीच विवाह करायचा होता. परंतु राजा याला राजी नव्हता. मात्र, होळी आपल्या निर्णयावर ठाम होती. तिने आपल्या खर्‍या प्रेमाची परीक्षा देण्यासाठी जळत्या अग्निमध्ये उडी मारली. मात्र, खर्‍या प्रेमामुळे ती अग्नितून चालत बाहेर आली. हे राजा आपल्या डोळ्याने बघत राहिला. त्याला देखील होळीच्या निस्सीम प्रेमाची जाणीव झाली अन, राजाने तिचा विवाह त्या आदिवासी तरुणाशी लावून दिला. आपल्या मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून तरुण तरुणी या भोंगर्‍या बाजारात नटून थटून येतात आणि आपला जीवसाथी निवडतात. एकंदरीतच होळीच्या आधी भरणार भोंगर्‍या बाजार येथील आदिवासींच जीवनमान आणि संस्कृतीच दर्शन घडवतो.

सातपुड्यातील होळी उत्सव साधारण पंधरा दिवस चालतो. सात-आठ पाडे मिळून होळी उत्सव साजरा केला जातो. सातपुड्यातील मानाच्या होळीचा मान हा काठी संस्थानला जातो. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात असलेल्या ‘काठी’ या गावी मानाची राजवाडी होळी पेटवली जाते. आदिवासी राजे राजा पांटा आणि गांडा ठाकूर यांनी या होळीउत्सवाला सुरुवात केली. यानंतर 1246 मध्ये राजा उमेद सिंह याने काठी या राज्याची स्थापना केली. आणि तिथूनच या काठीच्या राजवाडी होळीची सुरुवात झाली. आज 775 वर्षानंतरही ही होळी तितक्याच उत्साहात सातपुड्यात साजरी केली जाते. यावेळी संपूर्ण सातपुड्यातील आदिवासी बांधव संपूर्ण कुटूंबासह आपला पारंपरिक पेहराव करुन काठी येथे दाखल होतात. होळी साजर्‍या होणार्‍या चौकात होळी उभारण्यासाठी खड्डा केला जातो. हा खड्डा टिकाव किंवा फावड्याने खनला जात नाही तर तो हाताने माती काढत खनला जातो. ज्यांनी ज्यांनी या उत्सवादरम्यान नवस केलेला असतो असे लोक आपल्या गावाच्या ग्रुपसोबत नाचत नाचत होळीच्या ठिकाणी येतात आणि एक एक करत खड्ड्यातील माती उकरतात.

आणि त्याभोवती वाद्य वाजवत नाचतात. होळीच्या मध्यभागी उभारण्यात येणारा बांबू हा गुजरातमधील डांगच्या जंगलातून आणला जातो. हा बांबू जंगलातील सर्वाधिक उंचीचा असतो. त्याची उंची साधारण सत्तर ते ऐशी फुटापर्यंत असते. गावातील नेमून दिलेले ठराविक लोक जंगलात जाऊन हा बांबू आणतात. हा बांबू देखील कोणत्याही हत्याराविना काढला जातो. जंगलातीलच लाकडी काठ्यांच्या मदतीने आणि हाताने बांबूची मूळ कोरली जातात आणि अखंड बांबू मुळासकट काढून जमिनीवर पडू न देता अनवाणी पायाने खांद्यावर वाजत गाजत उचलून आणतात. होळीच्या दिवशी काठी या गावी हा बांबू आणला जातो. गावातील वडाच्या झाडाजवळ ठेऊन त्याची संस्थानच्या यजमानांकडून पूजा केली जाते. यावेळी राजे उमेद सिंह यांच्या शस्रांचे आणि राजगादीचे देखील पूजन केले जाते. तिथून हा बांबू गावातील हनुमान मंदिर, राम मंदिर, पीर बाबा दर्गा याठिकाणी विधिवत पूजा करुन होळीच्या ठिकाणी आणला जातो. पुन्हा त्याची पूजा करुन त्याला खोबर, हारकंगन, खजूर अडकवले जाते. यानंतर याला आंब्याची आणि चांभळाची पाने गुंडाळली जातात. आणि मग खरी कसरत सुरू होते ती खणलेल्या खड्ड्यात हा उंच बांबू उभा करण्याची. हा बांबू खड्ड्यात उभारताना देखील कोणत्याही हत्यारांची मदत घेतली जात नाही.

काठ्या अन लाकडांच्या मदतीने हा बांबू उभा केला जातो. त्याभोवती मग गावागावातून आणलेली लाकडं लावली जातात. होळी उभी झाल्यावर मोहाच्या फुलांपासून बनवलेली दारु सेवन करुन होळीभोवती वाद्य वाजवत नृत्य केले जाते. होळीच्या पाच, सात, नऊ दिवस आधी अनेक जण ब्रह्मचर्य धारण करुन नवस करतात. याकाळात खाटेवर न झोपता जमिनीवर झोपणे, अनवाणी राहणे, स्रियांना स्पर्श न करणे, मांसाहार टाळणे, व्यसन न करणे, होळीच्या दिवशी सोंग धारण करणे अशी परंपरा आहे. एकदा नवस केला की तो सलग पाच वर्षे पाळला जातो. यातून एकप्रकारे होळीमातेला वंदन करुन कृतज्ञता व्यक्त केली जाते. सातपुड्यातील लाखो आदिवासी बांधव कुणाच्याही निमंत्रणाशिवाय याठिकाणी हजर होतात. यावेळी नृत्य आणि ढोल वाजण्याच्या स्पर्धादेखील पार पडतात.

यावेळी आदिवासी बांधव राख आणि नैसर्गिक रंगाच्या मदतीने संपूर्ण अंगावर नक्षीकाम करतात. पायात घुंगरु, कमरेला घुंघरूंचा पट्टा किंवा भोपळ्याचा कमरपट्टा, डोक्यावर मोरपिसाचे टोप किंवा पारंपरिक फेटे स्रियांच्या गळ्यात चांदीच्या नाण्यांच्या माळा, पायात पैंजण, रंगीबेरंगी साड्या, कपडे असा पोशाख असतो. चेहर्‍यावर प्राणी, राक्षक, विदूषक यांचे विविध मुखवटे चढवलेले असतात. यावेळी हातात बिरी, टिपर्‍या, तुतड्या, तूर, मांदळ, बासरी, ढोल अशी पारंपरिक वाद्य आणि तलवार, कोयता, भाला, धनुष्यबाण ही शस्र असतात. यातील काही लोक बुध्या बाबा, घेर, मोरख्या, कहांडोखा, मोडवी, शिकारी असे वेगवेगळे रुप धारण करुन तसा पोशाख करतात. जशी जशी पहाट होते तसा तसा होळीचा ज्वर चढत जातो. सर्व आदिवासी बांधव बोलीगीते म्हणत पारंपरिक आदिवासी नृत्य करत वाद्याच्या तालावर बेफाम होऊन नाचत असतात.

ओली आवे बारा मोयना ओली या,
ओली आवे खोकलू वोलती ओली या…!

किंवा

होली व बाई लांबी सेंडी,
सेंडीले बांधिया गोवर्‍या फुले
म्हणजेच होळी बाईची ग लांब शेंडी शेंडीला बांधले गोवर्‍या फुले.

अशी बोलीगीते महिला म्हणत असतात. पहाटे पाच वाजेच्या सुमारास काठी येथील पहिली मानाची होळी लाखो आदिवासी बांधवांच्या साक्षीने पेटवली जाते. आणि पुन्हा तिच्या भोवती ताल धरत नृत्य केले जाते. होळी भोवती प्रदक्षिणा मारुन होळीतली राख आपल्या सोबत हे सर्व आदिवासी बांधव घरी नेतात. ती राख पुढच्या होळीपर्यंत आपल्या घरात जपून ठेवतात. सूर्योदयापूर्वी काठी येथील होळी पेटवून आदिवासी बांधव आपल्या घराकडे परततात. ज्यांनी नवस केलेला असतो असे लोक पुढील काही दिवस काकर्दे, मोलगी, तोरणमाळ, गौर्‍या, सुरवाणी, जामली, जमाना, धनाजे, मांडवी, सुरवाणी, बुगवाडा या ठिकाणी पायी जात तेथील होळी साजरी करतात. होळी ही दुःखातून सुखाचे क्षण आदिवासींच्या आयुष्यात आणते. अग्नीची पूजा करणारा आदिवासी हा खरा निसर्गपूजक म्हणून ओळखला जातो. होळीच्या माध्यमातून आदिवसांच्या प्राचीन संस्कृतीचं दर्शन काठी येथे येऊन ‘याची देही याची डोळा अनुभवावं’ असंच असतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -