घर फिचर्स सारांश कुटुंबातील वृद्धांचा सन्मान!

कुटुंबातील वृद्धांचा सन्मान!

Subscribe

आपल्याच घरातली व्यक्ती म्हणून आपण कुटुंबातील वृद्धांना गृहीत धरतो. त्यांच्या मनाचा, मताचा विचार करत नाही. यातूनच जाणतेपणाने असो किंवा अजाणतेपणाने त्यांचा अपमान केला जातो. त्यांच्याबद्दल तुमच्या मनात तितकी किंमत उरलेली नाहीये, हेच मग अशा वागणुकीतून दिसून येतं. भूतकाळात त्यांनी आपल्याला जपलं आणि आता आपल्यावर त्यांना जपण्याची वेळ आली आहे. ही जाण ज्या व्यक्तींमध्ये असते ते आपल्या वृद्ध पालकांचा अपमान चुकूनही करत नाहीत. त्यांचा सन्मान राखून त्यांचे जीवन सुखकर करतात.

— संकेत शिंदे

बदलत्या काळानुसार समाजात अनेक सामाजिक, कौटुंबिक प्रश्नही निर्माण झाले आहेत. हे प्रश्न आधी नव्हते असे नव्हे, पण आता काही प्रश्नांची तीव्रता अधिकच वाढत चालली आहे. यातील एक महत्वाचा प्रश्न म्हणजे घरातील वृद्धांना मिळणारी अपमानास्पद वागणूक. सगळ्याच घरांमध्ये वृद्धांचा अपमानच केला जातो असे नाही, पण कळत-नकळत म्हातार्‍या जीवांचा अपमान केला जात असल्याचे प्रकर्षाने सध्या दिसून येते. खरं तर उतारवयात शारीरिक आधाराबरोबरच मानसिक आधाराची वृद्धांना खूप गरज असते. कोणी आपल्याला टोमणे मारतंय, टिंगल उडवतंय, याचं त्यांना वाईट वाटत असतं. मानसिकरित्या ही वृद्ध माणसं हळवी झालेली असतात. त्यामुळे बारीकबारीक गोष्टीही त्यांच्या मनावर परिणाम करतात. या वयात तरुण मुलामुलींवर त्यांना समजून घेण्याची जबाबदारी असते.

- Advertisement -

बदललेली कुटुंबपद्धती हा भारतातला गेल्या काही वर्षांपासूनचा चर्चेत असलेला मुद्दा. आपल्या देशाची ओळख जगभरात एकत्र कुटुंबपद्धतीमुळे होत होती. परदेशी लोकांना या पद्धतीचं आकर्षण होतं. आता मात्र आई-वडील आणि मुलगा किंवा मुलगी असं त्रिकोणी किंवा जास्तीत जास्त चौकोनी कुटुंबरचना असलेलं कुटुंब दिसून येतं. विभक्त कुटुंबपद्धती मोठ्या प्रमाणात दिसून येते. ज्या घरांमध्ये आजी-आजोबा असतात, अशी घरं आपल्याला बघायला आदर्श वाटतात. नातवंडांना केवढा त्यांचा आधार, असं आपल्याला वाटत असतं. पण त्या घरांमध्ये असतं का इतकं आदर्श वातावरण? आपणच आपल्या आसपासची उदाहरणं आठवून बघू. कितीतरी घरं, उदाहरणं अशीच सापडतील की मुलं सतत वृद्ध आई-वडिलांच्या तक्रारी करतात. कधी अजाणतेपणातून त्यांची टिंगल करतात. त्यांना आता कसं आठवत नाही, दिसत नाही, या गोष्टींची उगाचच चर्चा केली जाते. आपल्या बोलण्यातून वागण्यातून त्यांना काय वाटत आहे, याचा फारसा विचार केला जात नाही.

आपल्याच घरातली व्यक्ती म्हणून आपण त्यांना गृहीत धरतो. त्यांच्या मनाचा, मताचा विचार करत नाही. यातूनच जाणतेपणाने असो किंवा अजाणतेपणाने त्यांचा अपमान केला जातो. त्यांच्याबद्दल तुमच्या मनात तितकी किंमत उरलेली नाहीये, हेच मग अशा वागणुकीतून दिसून येतं. हल्लीची नातवंड इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येच शिक्षण घेतात. त्यांच्या आई-वडिलांनाही बर्‍यापैकी इंग्रजी भाषा येतच असते, पण आजी-आजोबांचा मात्र इंग्रजीशी फारसा संबंध आलेला नसतो. दोन पिढ्यांमध्ये मोठा काळ लोटलेला असतो. अशावेळी नातवंडांकडून आजी-आजोबांना इंग्रजी येत नाही, यावरून पटकन बोललं जातं. आपलीच नातवंड म्हणून वृद्ध माणसंही पहिलं दुर्लक्षच करतात, पण सातत्याने आपल्यात काही कमी असल्याचं ऐकावं लागत असेल, तर आपण हिरमुसतोच. तेच यांच्या बाबतीतही होते. अशी प्रकरणे घरोघरी दिसून येतात. नातवंडांनी असा अपमान करू नये, याची शिकवण मुलांच्या आई-वडिलांनीच मुलांना द्यायला हवी, पण तेच दुर्लक्ष करतात आणि मग वृद्ध व्यक्तीही खचत जातात.

- Advertisement -

आयुष्य हे सायकलच्या चाकाप्रमाणे असतं. ते वर्तुळ पूर्ण करत असतं. आपण लहान असताना आपले आई-वडील आपलं बोट धरून आपल्याला चालताना आधार द्यायचे, आपल्याला खाता-पिता यायचं नाही तर ते खाऊ घालायचे, बोलताना आपण चुकलो तर आपल्यावर हसायचे नाही, उलट आपल्याला शिकवायचे. म्हातारपण हे दुसरे बालपणच असतं, असं म्हणतात, मग आपले आई-वडील म्हातारे होतात तेव्हा मुलांकडून हे का लक्षात ठेवले जात नाही. भूतकाळात त्यांनी आपल्याला जपलं आणि आता आपल्यावर त्यांना जपण्याची वेळ आली आहे.

ही जाण ज्या व्यक्तींमध्ये असते ते आपल्या वृद्ध पालकांचा अपमान चुकूनही करणार नाहीत. जी कृतघ्न मुलं आहेत, ज्यांना भूतकाळात आपल्या माता-पित्यांनी आपल्यासाठी काय काय तडजोड केली याचा विचारसुद्धा नको आहे, अशीच मुलं पुढे अपमान करतात. अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांचा बागबान हा सिनेमा याच मुद्यावर प्रकाश टाकतो. त्यांची मुलं त्यांच्या कर्तव्यापासून पळ काढतात. त्यांना अपमानास्पद वागणूक देतात. तो सिनेमा बघताना आपल्याला वाईट वाटतं, पण आपणही प्रत्यक्षात आपल्या आई-वडिलांची अशी चेष्टा तर करत नाही ना, हे एकदा आपण तपासलं पाहिजे.

पालकांना त्यांच्या म्हातारपणात खरी गरज मुलामुलींची असते. ते आर्थिक दृष्टीने कितीही सक्षम असले तरी या वयात त्यांना मानसिक आधार हवा असतो. हा आधार त्यांना आपण दिलाच पाहिजे. त्यांच्यामुळे आपण आहोत, ही कृतज्ञतेची भावना जपली पाहिजे. आज ते ज्या जागी आहेत, उद्या तिथे आपण असणार आहोत, हे वास्तव ओळखलं तर कदाचित आपला त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक स्वच्छ होईल. एकदा आपणच आपली त्यांच्यासोबत वागण्याची पद्धत कशी आहे, हे तपासून पाहू. मग कोणी सांगण्यापेक्षा आपल्यालाच कळेल की आपण कसं वागत आहोत आणि मग त्यात सुधारणा करणेही आपल्याला सोपे जाईल.

- Advertisment -