– रणजितसिंह राजपूत
गारठ्याची पहाट, थंडाई हवेला आणि चांदण्यांची झीळ ओल्या जोंधळ्याला, पहाटेच्या संधीप्रकाशात दूर लखलखत्या दिव्यांनी गाव जागे होताना मी गोधडीला कवळून धुक्यात हरवलेली वाट नदीच्या काठाने तुडवत निघालो. तापीचा काठ, लांब उतरणीचा, झाडांच्या गर्दीचा, फांद्यातून दाटलेल्या हिरव्या राव्यांचा, जोंधळ्या रानात धुडगूस घालणार्या पाखरांच्या थव्याचा, पाण्याच्या सावल्यात हरवून बसलेल्या नाभाळ्यांचा. अंजनी, गिरणा, वाघूर गोमाई, नद्यांच्या ‘सारंगी’ प्रवाहांनी सारंगखेड्याच्या (ता. शहादा, जि. नंदुरबार) एकमुखी दत्ताच्या चरणी तीर्थक्षेत्र झालेले तापीचे प्रवाह. अथांग पण संथ वाहणारी तापी, तिच्या प्रतिबिंबात अखंड बुडालेले सातपुडा डोंगर, सुंदर पपई-केळीचे, हुरड्याच्या कणसांचे मळे, त्यात घोड्यांच्या जत्रेने बहरून गेलेला सारंगखेड्याचा परिसर. मारवाडच्या राजघराण्याशी रुबाबदार नातं सांगणारं चौखूर उधळलेलं ऐटबाज घोडदळ, धुक्याच्या गर्दीतून ठळक जाणारी पायवाट तुडवत दूर मुख्य रस्त्यापर्यंतच्या सेतूला पोहचलेलं. तिथं निर्मळ तापीच्या उदरात सारंगखेडा बॅरेजने अडवलेल्या पाण्यात त्याचं चैतन्यमय रूप प्रतिबिंबीत झालेलं.
लोकसंस्कृतीच्या परंपरांना अनुभवण्यासाठी बोलावं लागत नाही. आपल्या डोळ्याचं पारणं फेडत त्या आपल्याला साद घालू लागतात. जणू आपल्या मनाला ते स्पर्श करीत आहेत. आपल्या नाजूक, मुलायम आणि तितक्याच रांगड्या आभासी रूपाने त्या आपल्याला जोडून घेत असतात. या यात्रेतील प्रवास आणि सहवास असतो कधी संपू नये असा. मनाला आणि देहाला संमोहित करून टाकणारा, स्मरणात सदैव साठवून ठेवावा असा. आपण जणू आपल्या मुळांच्या दिशेने पोहचलेलो असतो. पहाटेच्या बोचर्या पण हव्याहव्याशा वाटणार्या थंडीत शेकोटीच्या सहवासात जीवनातल्या स्मरणग्रंथाची पानं मनातल्या मनात उलटत राहतो. सुखाचा अर्थ शोधू पाहतो. पाखरं जागी होतात. सोनेरी ऊन आणि हिरवं रान परस्परांत विरघळून जातं. एकमुखी दत्ताच्या मंदिराच्या घंटानादाने श्रद्धाळूंचा दिवस सुरू होतो. परस्परांना संदेश जातात, कामाचं नियोजन होतं. सुमारे 300 वर्षांची महान परंपरा लाभलेलं एकमुखी दत्तप्रभूचं आणि महानुभाव पंथाच्या सत्य सनातन धर्माचं प्रतीक मानलं जाणारं हे मंदिर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या श्रीदत्त जयंतीला आपल्या लाखो भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज असते. पुढचे 15 दिवस आपल्या चहूअंगांनी भक्तांना लपेटून घेतं. आपल्या निर्मळ भक्तीपाशात बंदिस्त करून टाकतं. आपलं बोट हळूवारपणे पकडून आपल्याला त्याच्या अंतरंगात घेऊन जातं. इतिहासातले प्रसंग जिवंत अनुभवायचे असतील, चित्रपटात उत्कंठा वाढविणारे घोडे आणि घोडदळ खरोखरच पाहायचे असतील आणि अलीकडच्या काळात विकाऊ पुढार्यांनी बदनाम केलेल्या ‘घोडेबाजार’ या शब्दाला अहिराणीच्या मुलखाने दिलेली विधायक ओळख करून घ्यायची असेल तर या दिवसांत सारंगखेड्याला (ता. शहादा, जि. नंदुरबार) यायलाच हवे.
सारंगखेडा हे तापी नदीच्या तीरावर वसलंय. या ठिकाणी साधारणत: 300 वर्षांचे एकमुखी दत्तमंदिर आहे. या जागृत देवस्थानामुळं दर दत्त जयंतीला गेल्या 300 वर्षांपासून सारंगखेड्यात यात्रा भरते. यावेळीच हा प्रसिद्ध घोडेबाजार भरतो आणि पुढं महिनाभर सुरू राहतो. हौसे, नवसे, गवसे…असे सर्वच जण इथं आवर्जून हजेरी लावतात. सध्या बाजारात असणार्या चकचकीत महागड्या गाड्यांचं काय घेऊन बसलात, त्यापेक्षा कितीतरी महागडे घोडे या बाजारात विक्रीसाठी आहेत. सिनेसृष्टीतील कलाकारांपासून ते देशाच्या कोनाकोपर्यातून घोडेशौकिन खरेदीसाठी येत आहेत. रेससाठी वापरल्या जाणार्या घोड्यांची नस्ल वेगळी असते. असे घोडे या यात्रेत क्वचितच पाहायला मिळतात, मात्र लग्नकार्यात भाड्यानं देण्यासाठी आणि पर्यटनस्थळी सवारीचा व्यवसाय करण्यासाठी लागणारे घोडे या यात्रेत मोठ्या प्रमाणात आहेत. भव्य प्रासादापुढं बांधण्यासाठी, मनात येईल तेव्हा रपेट मारण्यासाठी घोडे खरेदी करणारे नवश्रीमंत, चित्रपट निर्माते, अभिनेतेही इथं खरेदीसाठी येताहेत. पंजाब, मारवाड आणि काठीयावाडही.
डोक्याच्या केसांपासून तर पायाच्या नखांपर्यंतची दैनंदिन ग्रामीण जीवनात लागणार्या वस्तूंपासून तर थेट बैलगाडी आणि शेतीची विविध औजारे आणि बैल, घोडे यांसारखे पशुधन देशभरातून या यात्रेतील प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवलेले असते. गरमागरम गुळाची जिलेबी, गोडीशेव, शेवखमणी आणि आळूपात्रा यांच्या खमंगाने गंधाळलेली खाऊची दुकाने जिभेचे लाड पुरविणार्या खवय्यांनी खच्चून भरलेली असतात. या खान्देशी चवीच्या अवीट गोडीचा आस्वाद घेण्याचा मोह ज्याला झाला नाही असा एखादाच असतो. सोबतीला अनुभवता येते सातपुड्यातील आदिवासी महिला बचत गटांची कारागिरी आणि पहाडातील चुलींवर भाजलेल्या ज्वारी, बाजरी, नागली व मक्याच्या भाकरीचा मनाला सुगंधित करणारा दरवळ. बापाच्या खांद्यावर चढून जत्रा लुटणारी मुले, जत्रेत सजलेले तमाशाचे तंबू आणि नमकीन चाटचे ठेले, पेढ्यांची गोडी, चुर्णाची जडीबुटी या सर्वांना आपल्या अंतर्यामात घेतलेल्या सारंगखेडा यात्रेचे पंचप्राण एकवटलेले असतात ते अश्वप्रदर्शनात. हे अश्वप्रदर्शन म्हणजे अहिराणीच्या लोकसंस्कृतीचे हृदय. असं ठिकाण जिथून या बहुसांस्कृतिक संस्कृतीच्या चैतन्याची स्पंदने उगम पावतात आणि या यात्रेच्या आर्थिक उलाढालींना गती देतात. मानव आणि पशू यांचं एक अतूट नातं असतं. पशू असेल तर माणूस टिकेल आणि माणूस टिकला तर पशूच्या जगण्याची निर्मळ उपुक्तता सिद्ध होते. मानव आणि अश्व या अनोख्या नातेसंबंधाने इथल्या संपूर्ण चराचर सृष्टीवर मायेची पाखर घातलेली असते. भारतभरातून आलेल्या हजारो घोड्यांचं रूबाबदार, ऐटबाज आणि आरसपानी रुपडं आपल्यासमोर येतं. त्यात डोकावता डोकावता आपण हरवून जातो.
आधी राजस्थानातील पुष्करला, मग पंढरपूरला, तिथून मग सारंगखेड्याला हा बाजार येतो. इथून पुढे हा बाजार हलतो नांदेडच्या माळेगावला आणि तिथून पुन्हा उत्तर महाराष्ट्रातल्या मधल्याच शिरपुरात हा बाजार येतो. असे देश आणि राज्यात भरणारे घोडेबाजार कमी नाहीत. तरीही सारंगखेड्याच्या बाजाराची एक आगळी ओळख निर्माण झाली आहे. भारतात पुष्करनंतर घोड्यांच्या प्रदर्शनासाठी सारंगखेड्याचे नाव घेतले जाते. येथील
घोडेबाजाराने पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथील घोड्याच्या व्यापार्यांना चांगलेच आकर्षित केले आहे. याचे कारण या बाजारात पंजाब, मारवाड, काठीयावाड, सिंध, गावठी अशा नस्लीचे घोडे विक्रीसाठी येतात. त्यांना चांगले दाम मिळतात याची त्यांना खात्री झाली आहे. त्यामुळे दरवर्षी उत्तमोत्तम घोडे घेऊन येथील बाजारात ते हजेरी लावतात. एकेक अस्सल जातिवंत घोडा निरखून, पारखून 50 हजारांपासून ते 1 कोटीपर्यंत घोड्यांच्या किमती असतात. महिनाभरात तब्बल 30 कोटींपर्यंत उलाढाल होते. या एवढ्या मोठ्या उलाढालीचे कारण एकच आहे, ते म्हणजे येथे मिळणारे उत्तम घोडे आणि खरेदी-विक्रीची उत्तम होणारी नोंद. या बाजारात प्रामुख्याने घोड्यांच्या तीन जातींची हुकूमत चालते. त्यात पंजाबी, मारवाडी आणि काठेवाडीचा समावेश आहे. तशा स्थानिक जाती बर्याच आहेत, पण अस्सल घोड्यांसाठी दर्दी मंडळींची गर्दी या तीन जातींनाच असते. तब्बल 2500 घोडे पंजाबी, मारवाडी आणि काठेवाडी जातीचे येथे विक्रीसाठी आले आहेत. एकेक घोडा एवढा अस्सल की पाहताक्षणी नजरेत भरतो.
अर्थात सामान्य जनांना पाहताक्षणी या घोड्यांची जात किंवा त्यांचे वैशिष्ठ्य लक्षात येत नाही, पण घोडाशौकिन मात्र रंग, उंची आणि शरीराच्या ठेवणीवरून पाहताक्षणी त्यांची अचूक पारख करतात. कारण या प्रत्येक जातीची स्वतंत्र खासियत आहे. मारवाडी जातीचे घोडे उंच असतात. त्यांची उंची पाच ते साडेपाच फूट असते. ते दिसायलाही आकर्षक असतात. त्यांचे कान उंच असून त्यांची टोके एकमेकांशी जुळतात. काठेवाडी घोडे दिसायला तजेलदार असतात. त्यांचे कान कमी असतात, पण चेहरा पसरट असतो. त्यामुळे ते भारदस्त दिसतात, तर पंजाबी अधिकतर शुभ्र आणि तेजस्वी असतात. त्यांच्या पांढर्या वर्णावर किंचित डाग आढळतो. ते शुभ्रवर्णी पंजाबी घोडे ‘नुकरा’ नावाने प्रसिद्ध आहेत. अश्वशौकिनांची या घोड्यांना विशेष मागणी असते.
घोडेबाजारात घोड्यांची अचूक पारख करणारे अनेक जण असले तरी प्रत्येकाची निवड सारखी असेल असेही नाही. कारण घोडे खरेदीसाठी येणार्या प्रत्येकाची गरज वेगवेगळी असते. काही जण फक्त छंद म्हणून घोडे बाळगतात, तर काहींना घोडागाडीसारख्या व्यवसायासाठी तो हवा असतो. त्यामुळे प्रत्येक खरेदीदार घोड्यांची पारख करताना आपली गरज पाहतो. काठेवाडी घोडे शिकण्यासाठी उत्तम असल्याने लग्नात नाचण्यासाठी याच घोड्यांना मागणी असते. पंजाबी शुभ्र घोडे लग्नात मिरवणुकीसाठी वापरले जातात. मिरवणुकीतील रथांना ते जुंपतात. शौकिन मंडळीही शुभ्र घोडे पसंत करतात. गरजेनुसार देवमान, कंठळ, जयमंगल, पद्म, शामकर्ण, पंचकल्याणी या सगळ्याच घोड्यांना बाजारात मागणी असली तरी त्यातही थोडा फरक आहे. म्हणजे व्यवसायासाठी घोडा खरेदी करणारा त्याला आवडलेल्या घोड्यात फार खोड्या काढत नाही, परंतु तोच जर एखद्या शौकिनास खरेदी करावयाचा असेल तर तो त्या घोड्यांची सविस्तर अंगपरीक्षा घेतो. घोड्याच्या अंगावरील सर्व खुणा तपासतो. गेल्या तीन पिढ्यांपासून या अश्वप्रदर्शनाचे आयोजन करणार्या रावळ कुटुंबाचे वारस जयपालसिंह रावळ यांच्या म्हणण्यानुसार घोड्यात 72 खोड्या म्हणजे दोष काढता येतात. अंगावरील खोड्या कुठे आणि कशा आहेत ते महत्त्वाचे असते. या खुणा मुख्यत्वे भोवर्याच्या स्वरूपात असतात. गळ्यावर भोवरा असलेला घोडा उत्तम समजला जातो. त्या घोड्यास ‘देवमान’ म्हटले जाते. छातीवर दोघींकडे आणि डोक्यावर दोन भोवरे असलेला घोडा शुभलक्षणी मानला जातो. पोटावर भोवरा असेल तर तेही शुभ मानून त्यास गंगापाट म्हटले जाते, मात्र त्याचवेळी डोक्यावर, गळ्यावर तीन आणि चार भोवरे असतील तर ते अशुभ मानले जाते. मागच्या पायात ढोपराच्या सांध्याजवळ खालच्या दिशेने खोल खड्डा असेल तर तो घोडा चांगला समजला जातो. असा घोडा मालकाच्या ताब्यात राहतो. वरच्या दिशेने खड्डा असलेला घोडा खुटी उपटून पळणारा मानला जातो. निव्वळ छंद म्हणून दारातील शुभलक्षण म्हणून घोडा पाळणारे घोड्यातील अशी सारी लक्षणे तपासून खरेदी करतात. अशा शुभलक्षणी घोड्याचा दाम लाखावर असतो. पंचकल्याणी घोडा खासकरून देवाचे वाहन म्हणून वापरला जातो. त्याचे चारही पाय ढोपराखाली शुभ्र असतात आणि त्याचे डोळे घारे असतात. या दोन डोळ्यांना ‘जयमंगल’ असे म्हटले जाते.
‘पंचकल्याणी घोडा अबलख गं, जीनावरी कलाबूत लखलख गं…’ लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांची ही प्रसिद्ध लावणी. ती गाताना अबलख घोडा आणि घोड्यावर बसणार्या पाकळ्या शिलेदाराचे वर्णन त्या खुबीने करतात. ऐकणार्यांच्या डोळ्यांसमोर खरोखरीच बाजिंदा शिपाई गडी आणि मस्तीने फुरफुरणारा घोडा उभा राहतो. सारंगखेड्याचा घोडेबाजार बघताना यमुनाबाईंची लावणी सोबतीला नसली तरीही या लावणीतला माहोल ठासून भरलेला असतो. बाजारात आलेले घोडे अस्सल जातिवंत आहेत. त्यांना पाहणार्या प्रत्येकाच्या मनात येते की ठोकावी घोड्यांवर मांड अन् द्यावा उधळून चौखूर…आणि हीच खासियत आहे या घोडेबाजाराची. म्हणून एकदा जायलाच हवे ‘घोड्यांच्या जत्रेला…सारंगखेड्याच्या यात्रेला!’
(लेखक शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागात जिल्हा माहिती अधिकारी आहेत)