घरफिचर्ससारांशरिकाम्या थिएटरच्या हाऊसफुल समस्या

रिकाम्या थिएटरच्या हाऊसफुल समस्या

Subscribe

थिएटरमध्ये सिनेमा पाहण्याचा अनुभव सिनेमाचा प्रचंड रसिक असलेली व्यक्ती असो किंवा वर्षातून एखादा सिनेमा पाहणारी व्यक्ती, दोघांनाही आपण पहिल्यांदा थिएटरमध्ये पाहिलेला सिनेमा नक्की लक्षात राहतो. कारण काय तर, आपण थिएटरमध्ये फक्त सिनेमा बघत नसतो तर तो अनुभवत असतो म्हणून तो कायम स्मरणात राहतो. हा सगळा अनुभव पुन्हा आपल्याला देण्यासाठी थिएटर सुरू झाली आहेत खरी, पण कुठल्याही मोठ्या सिनेमांशिवाय ही चालणार कशी? सरकारी नियमानुसार हाऊसफुल करता येणार नाहीत, तिकीट वाढवलं तर लोक येणार नाहीत. कोरोनाची भीती अजूनही संपलेली नाही म्हणून लोक येतील का? बिघडलेल्या बजेटमधून सिनेमासाठी खर्च करण्यास कोण तयार होईल? पैसे भरून जुने सिनेमे पाहणार कोण? आणि यामुळे थिएटर चाललेच नाही तर... या प्रश्नांचा घेतलेला हा आढावा.

लॉकडाऊननंतर अनेक गोष्टी हळूहळू का होईना रुळावर येऊ लागल्या आहेत, सर्वच क्षेत्राला याचा फटका बसला होता, प्रत्येक जणच यातून बाहेर निघेल असं नाही पण तरीही जो तो आपापल्या परीने पुन्हा कामाला सुरुवात करतोय. गेल्या 3-4 महिन्यांपासून मनोरंजन सृष्टीतील कामांनादेखील सुरुवात झाली आहे. टीव्ही मालिका असो किंवा सिनेमे शूटिंगला सुरुवात झाल्यानंतर अनेकांचे बंद पडलेले व्यवसाय आणि नोकर्‍या पुन्हा सुरू झाल्यात. गेल्या महिन्यातच काही अटींसोबत सिनेमा थिएटर सुरू करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. महाराष्ट्रातदेखील अनेक शहरात सिनेमागृहे सुरू झालीत. कोरोनाने गेल्या कित्येक महिन्यांपासून घरात बसून राहिलेल्या प्रेक्षकांसाठी थिएटर सुरू होणे म्हणजे खरं तर पर्वणीच होती. शेवटी सिनेमा पाहण्याची खरी मजा ही थिएटर शिवाय येईल का? तुम्ही कधी नाटक रेकॉर्ड करून पाहिलंय का? तर मग छोट्याशा स्क्रीनवर ती मजा कशी येणार? टीव्ही भलेही 100 इंचाचा असो त्याला डॉल्बी स्पीकर लावा, पण जी मजा थिएटरमध्ये हिरोच्या एन्ट्रीला शिट्ट्या वाजवण्यात आहे, ती घरी येईल का? सलमानचं शर्ट काढणं, शाहरुखने दोन हात बाहेर काढून रोमँटिक डायलॉग बोलणं, अक्षयची कॉमेडी आणि दीपिकाच सौंदर्य या सगळ्या गोष्टी आणि त्याच्याशी निगडित हजारो आठवणी या त्याच मोठ्या पडद्यावर बघायला मजा येते.

आपण सिनेमा थिएटरमध्ये का बघतो? ते ही अशा काळात जिथं कधीकधी तर सिनेमा रिलीज पूर्वीच मोबाईल वर उपलब्ध असतो, अशा काळात थिएटरला इतकं महत्त्व का ? याचं केवळ एकच कारण आहे, ते म्हणजे थिएटरमध्ये सिनेमा पाहण्याचा अनुभव सिनेमाचा प्रचंड रसिक असलेली व्यक्ती असो किंवा वर्षातून एखादा सिनेमा पाहणारी व्यक्ती, दोघांनाही आपण पहिल्यांदा थिएटरमध्ये पाहिलेला सिनेमा नक्की लक्षात राहतो. कारण काय तर, आपण थिएटरमध्ये फक्त सिनेमा बघत नसतो तर तो अनुभवत असतो म्हणून तो कायम स्मरणात राहतो. हा सगळा अनुभव पुन्हा आपल्याला देण्यासाठी थिएटर सुरू झाली आहेत, खरी पण कुठल्याही मोठ्या सिनेमांशिवाय ही चालणार कशी ? सरकारी नियमानुसार हाऊसफुल करता येणार नाही, तिकीट वाढवलं तर लोक येणार नाही.. कोरोनाची भीती अजूनही संपलेली नाही म्हणून लोक येतील का? बिघडलेल्या बजेटमधून सिनेमासाठी खर्च करण्यास कोण तयार होईल? पैसे भरून जुने सिनेमे पाहणार कोण? आणि यामुळे थिएटर चाललेच नाही, असे अनेक प्रश्न थिएटर चालकांना सतावत आहेत.

- Advertisement -

कोरोनाचा कहर अजूनही संपलेला नाहीये, लोकांच्या मनात या रोगाविषयीची भीती अजूनही आहेच, यामुळे स्वतः बाहेर फिरून तो वेळ सिनेमागृहात घालविण्यासाठी बहुतांश लोक तयार होत नाहीत. हॉटेल असो किंवा पर्यटन स्थळं तिकडे गर्दी होताना दिसते आहे, मात्र थिएटरकडे लोकांनी पाठ फिरवली. ऑक्टोबर महिन्यात देशभरातील काही राज्यात मोठ्या मल्टिप्लेक्स मालकांनी आपले थिएटर सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. आयनॉक्स, पीव्हीआर, सिनेपोलीस यांसारख्या मोठ्या मल्टिप्लेक्स चेन्स अनेक शहरात सुरू झाल्या. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्स सोबतच काही प्रयोगदेखील करण्यात आले. कुठे कोरोना वॉरियर्ससाठी फ्री स्क्रिनिंग करण्यात आलं तर कुठे स्टाफ मेंबर्सच्या फॅमिलीसाठी शो आयोजित करण्यात आला. टॉकीजमध्ये आल्यानंतर आम्ही प्रेक्षकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे शक्य तितके सर्व प्रयत्न करतो हे दाखविण्यासाठी आणि प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी हे करण्यात आले होते. मी स्वतः गेल्या एक महिन्यात थिएटरमध्ये जाऊन 12 सिनेमे पाहिले आहेत, औरंगाबादच्या वेगवेगळ्या थिएटरमध्ये जाऊन मी ते सिनेमे पाहिलेत, पण असं एकदाही झालं नाही की थिएटर प्रशासनाकडून प्रेक्षकांच्या आरोग्याबाबत हलगर्जीपणा झालाय.

काही शोज तर केवळ आम्ही 2-3 लोकांनी मिळून पाहिलेत, पण तरीही त्या शोनंतर पिपीई किट घालून संपूर्ण हॉल सॅनिटाईज करताना मी स्वतः पाहिलं आहे. थिएटरमध्ये प्रवेश घेतल्यापासून ते बाहेर जाईपर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी थिएटर प्रशासनाकडून घेतली गेली आहे. हे सांगण्याचा मुद्दा हाच की सिनेमा गृहांमध्ये संपूर्ण नियमांच पालन केलं जातंय. मग तरीही प्रेक्षकांचा प्रतिसाद का नाही? याच दुसरं कारण आहे, नवीन सिनेमांची कमतरता थिएटर सुरू झाल्यापासून एकही मोठा सिनेमा प्रदर्शित झाला नाहीये, या आठवड्यात प्रदर्शित झालेला क्रिस्तोफर नोलनचा टेनेट सोडला तर गेल्या जवळपास 2 महिन्यात कुठलाही मोठा सिनेमा आलेला नाहीये. हिंदीत तर सूरज पे मंगल भारी सोडला तर दुसरा कुठला छोटा सिनेमाही रिलीज केलेला नाही आणि प्रत्येक जण बंटी बबली आणि डीडीएलजे पैसे भरून पाहण्यासाठी तयार नसतो. नवे सिनेमेच नसतील तर लोकं पैसे भरून थिएटरला कशाला येतील, असाही सवाल उपस्थित होतोय, याला पर्याय म्हणून अनेक थियटरमध्ये प्रायव्हेट स्क्रिनिंग, फॅमिली स्क्रिनिंगचा उपाय वापरला जातोय. कमी किमतीत आपल्याला इच्छेचा सिनेमा पाहण्यासाठी काही प्रमाणात का होईना लोक तयार होतात. पण हे प्रमाणही नोंद घ्यावे इतके नाही.

- Advertisement -

दिवाळीनंतर देशभरातील बहुतांश राज्यात सिनेमागृहे सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली, त्या आधीही अनेक राज्यात 50 टक्के क्षमतेनुसार थिएटर सुरूच होती. ऑक्टोबरमध्ये थिएटर सुरू केलेल्या थिएटर मालकांना अपेक्षा होती की किमान दिवाळीत तरी एखादा मोठा सिनेमा रिलीज होईल, पण तसं घडलं नाही. अक्षय कुमारने त्याचा सूर्यवंशी सिनेमा मागे ठेऊन लक्ष्मी सिनेमा रिलीज केला आणि तो ही हॉटस्टारवर म्हणून थिएटर मालकांची दिवाळी थंडच गेली, त्यांना पुढे अपेक्षा होती की किमान क्रिसमसला तरी एखादा मोठा सिनेमा रिलीज करण्याचं धाडस एखादा निर्माता करेल पण तसेही कुठलेच संकेत मिळालेले नाहीत. डेव्हिड धवन आणि वरुण धवनचा ‘कुलि नंबर वन’ हा सिनेमादेखील अमेझॉन प्राइमवर रिलीज करण्यात येणार आहे, ‘सूरज पे मंगल भारी’च्या दिग्दर्शकाने केलेली हिंमत फार यशस्वी ठरली नाही, म्हणून थिएटर मालकांच्या वाट्याचे दुःख इथेही संपलेले नाहीये. कधी काळी फालतू सिनेमे एकाच दिवसात उतरवून टाकणार्‍या याच थिएटरवाल्यांना ‘इंदू की जवानी’सारख्या सिनेमाची देखील वाट पाहावी लागते आहे. या उलट डिसेंबर महिन्यात हॉलिवुडच्या दोन सिनेमांकडून भारतीय सिनेमा थिएटर मालकांना बर्‍याच अपेक्षा आहेत, त्यापैकी एक नुकताच प्रदर्शित झालाय तर दुसरा या महिन्याच्या अखेरीस प्रदर्शित करण्यात येणार आहे.

क्रिस्तोफर नोलनचा टेनेट आणि डीसीचा वंडर वूमन 1984 या दोन्ही सिनेमांकडून यांना बर्‍याच अपेक्षा आहेत, गेल्या काही वर्षात हॉलिवुड सिनेमांना मिळालेले यश पाहता या अपेक्षा ठेवणे देखील गैर नाही. क्रिस्तोफर नोलनच्या टेनेटला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत, काहींसाठी हा सिनेमा निव्वळ अप्रतिम होता तर काहींना नोलनच्या तुलनेने खूपच साधारण वाटला, तरीही हॉलिवुडचा मोठा सिनेमा म्हणून या सिनेमाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. पहिल्या विकेंडमध्ये या सिनेमाने भारतात 4.25 कोटींची कमाई केली आहे, एरवी 40 कोटी दिवसात कमावणार्‍या सिनेमांच्या तुलनेत, 9 महिन्यानंतर सुरू झालेल्या थिएटर मालकांना मात्र आता ही रक्कम देखील आधार देणारी आहे. या आठवड्यात डेव्हिड कॉपर फिल्ड आणि इंदू की जवानी सुद्धा रिलीज झाला आहे. आता या दोन्ही सिनेमांना कसा प्रतिसाद मिळतो, हे येणार्‍या काळात कळेलच… पण तरीही थिएटरला एका क्राऊड पुलर सुपरस्टारच्या सिनेमाची गरज आहे.

थिएटरची सध्याची अवस्था बदलायला किती वेळ लागेल? अनेकांचं मत आहे की यासाठी कदाचित काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो. लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान मोठे आहे, म्हणून कदाचित त्याची भरपाई करण्यासाठी काही महिने किंवा वर्षही लागू शकतं. पण थिएटर पूर्ववत होण्यासाठी मात्र इतका वेळ लागणार नाही असं मला वाटतं. थिएटरमध्ये गर्दी पुन्हा खेचण्यासाठी केवळ एक सिनेमा हवा आहे, असा सिनेमा जो प्रेक्षकांना पुन्हा एकदा थिएटरकडे घेऊन येईल भले तो सलमान खानचा सिनेमा असो किंवा रोहित शेट्टीचा सिनेमा, फक्त एक असा सिनेमा ज्यात लोकांचा सुपरस्टार असेल, त्याची धडाकेबाज एंट्री असेल. एक उत्तम कमर्शियल सिनेमा हे चित्र बदलण्यासाठी पुरेसा आहे.

अजून एक बाब म्हणजे सध्या सिनेमाचा मूळ प्रेक्षक हा घरी बसलाय, कुठेतरी ऑनलाईन लेक्चर करत किंवा वेब सिरीज बघत. थिएटरमध्ये त्या प्रेक्षकाला आणायचं असेल तर कॉलेजेस सुरू होण्याची वाट पाहावी लागणार आहे. लेक्चर बंक करून, घरी एक्स्ट्रा कलासचा बहाणा देऊन मित्रांसोबत सिनेमा पाहायला थिएटरला येणारी तरुणाई सध्या घरी आहे. कॉलेज सुरू झालं की त्यांनाही हे बहाणे पुन्हा देता येतील, सध्या बंद असलेल्या कॉर्नर सिटला नवे पर्याय शोधले जातील. तोपर्यंत दुधाची तहान ताकावर भागवत थिएटरला जगवण्यासाठी म्हणा किंवा आपला अनुभव जिवंत ठेवण्यासाठी म्हणा, शक्य असेल तिथे आणि शक्य असेल तेव्हा एखादा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन नक्की पहा. शेवटी सध्या समस्यांनी हाऊसफुल असलेली रिकामी थिएटर, आपल्यालाच पुन्हा प्रेक्षकांच्या तुडूंब प्रतिसादाने भरायची आहेत.

-अनिकेत म्हस्के

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -