भैरवी

Subscribe

गाण्याच्या मैफलीत एकदा भैरवी गायली की त्यापुरती तरी ती मैफल संपून जाते, पण लेखकाचे तसे होत नाही. जिथे त्याची एखादी कथा किंवा कादंबरी संपते तिथेच त्यातून निर्माण होणार्‍या अनेक प्रश्नांना तो वाचक म्हणून सामोरा जात असतो. एकदा लेखक म्हणून त्याची भूमिका संपली की त्याच्यातील वाचकाने त्याच्या मेंदूचा ताबा घेतलेला असतो. आपल्या बर्‍या वाईट लेखनाची त्याने पहिली समीक्षा मांडलेली असते. या लेखनाने व्यवस्थेत काही फरक पडेल का? हा पहिला प्रश्न त्याच्या मनात नकळत येऊन गेलेला असतो. लेखकाच्या लेखकत्वाचा मांडलेला तो पहिला पट असतो. त्यामुळे लेखकाला अशा कुठल्या लेखनाने आपल्या लेखनाची भैरवी करता येत नाही.

गतिमान झालेल्या आयुष्यात कधीतरी कुठेतरी थांबावेसे वाटते. मग थांबायच्या आधी आपण इथे काय गमावलं आणि काय कमावलं याचा हिशेब सुरू होतो. गाण्याची मैफल कितीही रंगली तरी कधीतरी मैफलीचा शेवट करावा लागतोच आणि शेवट करण्याअगोदर भैरवी आळवत शेवट करावा हा मैफलीचा संकेत आहे. भैरवी गात असताना रंगलेली मैफल समोर दिसत असते. रंगलेल्या मैफलीचे पडसाद भैरवीत दिसतात. त्यात हुरहूर असते, पण समोरच्या श्रोत्यांना समाधान दिल्याचे संकेत या भैरवीत नक्कीच सापडतात. संगीतातलं फारसं काही कळत नसलं तरी घरी जाताना श्रोते बंदिशीपेक्षा भैरवीतली रागदारी लक्षात ठेवून जातात. हे सगळं आताच आठवायचे असे काय कारण असावे?

नाशिकला अखिल भारतीय संमेलनावरून परत येताना कवी अजय कांडर बरोबर होता. बसमध्ये बसल्या बसल्या अजयने मेंदूत भुंगा सोडला. आपण हे साहित्य लिहितो त्याचा उद्देश आपल्याला खरचं कळला का? अजयच्या या प्रश्नाने मी कमालीचा अस्वस्थ झालो. आपण खरंच कशाचे तरी उत्तरदायित्व लागतो. या उत्तरादायित्वाच्या कासावीसतेने आपण लिहित असतो का? आपल्या लिखाणाने अशी कोणती देशीवादाची पाळमुळं घट्ट होणार आहेत? असे अनेक प्रश्न एकावेळी मनात डोकावत होते. गप्पा चालू होत्याच.

- Advertisement -

तेवढ्यात माझ्या शाळेतील कोणा सहकार्‍याने सर, तुम्ही हा लिहिण्याचा छंद खूप छान जपता असं म्हटलेलं आठवलं आणि विचाराचे दुसरे टोक मी गाठले. साहित्याकडे मी छंद म्हणून बघतो का? केवळ ग्रामसंस्कृती, तेथील माणसे, तिथली संपदा साहित्यात आणण्यासाठी आपण लिहीत असतो का? अजयच्या प्रश्नाने पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळाली. आयुष्याची भैरवी जवळ यायच्या आत असं कोणतं लिखाण आपल्या हातून होईल जेणेकरून एक लेखक म्हणून मला समाधान मिळेल, या प्रश्नाचे उत्तर मला याक्षणी देता येणे शक्य नसले तरी हातून असं लिखाण व्हायला हवं ही इच्छा मनात आहेच.

आजूबाजूचा समाज, तेथील व्यवस्था यांचे सामाजिक जगणे मांडताना तेथील कोलाहालात होरपळत असताना आपण रिते होत चाललो आहोत अशी सूक्ष्म भावना मनाला होते, पण लेखक म्हणून आपण कधी रिते होतो का? गाण्याच्या मैफलीत एकदा भैरवी गायली की त्यापुरती तरी ती मैफल संपून जाते, पण लेखकाचे तसे नाही होत. जिथे त्याची एखादी कथा किंवा कादंबरी संपते तिथेच त्यातून निर्माण होणार्‍या अनेक प्रश्नांना तो वाचक म्हणून सामोरा जात असतो. एकदा लेखक म्हणून त्याची भूमिका संपली की त्याच्यातील वाचकाने त्याच्या मेंदूचा ताबा घेतलेला असतो. आपल्या बर्‍या वाईट लेखनाची त्याने पहिली समीक्षा मांडलेली असते. या लेखनाने व्यवस्थेत काही फरक पडेल का? हा पहिला प्रश्न त्याच्या मनात नकळत येऊन गेलेला असतो. लेखकाच्या लेखकत्वाचा मांडलेला तो पहिला पट असतो. त्यामुळे लेखकाला अशा कुठल्या लेखनाने आपल्या लेखनाची भैरवी करता येत नाही.

- Advertisement -

मला आरती प्रभू गेले तेव्हाचा वाचलेला प्रसंग आठवला. आरती प्रभूंना त्यांच्या शेवटच्या आजारात के. ई. एम. हॉस्पिटलमध्ये होते. यकृताच्या आजाराने त्रस्त असलेला हा प्रतिभावंत बेशुद्धावस्थेत होता. चार दिवसांनंतर थोडी शुद्धी आल्यावर आरती प्रभूंवर उपचार करणारे डॉ. देवल यांनी आरती प्रभूंचे मन रीझवण्यासाठी काव्यरचना करण्याचा आग्रह केला. स्फुरेल ते काव्य स्वतः डॉ. देवल यांनी लिहून घेण्याची तयारी दाखवली. आयुष्याचे पैलतीर दिसत असताना काव्याच्या चार ओळी आरती प्रभूंच्या तोंडून बाहेर पडल्या, त्यादेखील त्यांच्या काव्यप्रतिभेची भैरवी होती.

अखेरच्या वळणावर यावा
मंद सुगंधी असा फुलोरा
थकले पाऊल सहज उठावे
आणि सरावा प्रवास सारा

आयुष्याचा अंत जवळ आला ही कल्पना समोर दिसत असताना आयुष्याच्या भैरवीचे असे शब्द निघावेत, आपल्या आयुष्याचे ते बरे-वाईट संचित संपूर्ण काव्यात यावे हा नुसता योगायोग नव्हता. आयुष्यभर केलेली साहित्याची साधना, ती जोपासताना साहित्याचा घेतलेला ध्यास, त्या निर्मितीला लागलेले प्रतिभेचे लेणे या सगळ्यांची साथ संगत त्यावेळी आरती प्रभूंना लाभली असेल का? असा विचार कधी मनात येतोच.

आयुष्यभर ज्या गोष्टीचा आपण ध्यास घेतो त्याचे फलित आयुष्याच्या संध्याकाळी मिळते तेव्हा आयुष्याची खर्‍या अर्थाने भैरवी झाली असं म्हणता येईल. मला आठवतं कवी वसंत सावंत अत्यवस्थ होते तेव्हा मुलुंडच्या धन्वंतरी रुग्णालयात होते. नंतरच्या काळात जेव्हा डॉक्टरांनी आशा सोडली, तेव्हा पुन्हा सावंत सरांना घरी म्हणजे भांडुपला आणण्यात आलं. त्याच दरम्यान कोकण मराठी साहित्य परिषदेचे सावंतवाडी येथे संमेलन होणार होते. या साहित्य संमेलनात आयुष्यभर कवितेची उपासना करणार्‍या या कवीला कोकण साहित्य भूषण या पुरस्कराने सन्मानित करण्यात येणार होते, पण सरांना त्या परिस्थितीत सावंतवाडीला घेऊन जाणे शक्य नव्हते.

त्यावेळी सरांच्या एकूण तब्येतीचा अंदाज घेता कोमसापच्या पदाधिकार्‍यांनी संमेलनाच्या आधीच सावंत सरांना त्यांच्या घरी हा पुरस्कार संमेलनाध्यक्ष विंदा करंदीकर यांच्या हस्ते प्रदान करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सरांच्या नव्याने प्रकाशित होणार्‍या सागरेश्वर या कवितासंग्रहाची एक प्रत पॉप्युलर प्रकाशनच्या रामदास भटकळ सरांनी छापून आणली होती. हा सगळा सोहळा होताना सरांच्या आयुष्याची भैरवी होत असताना सरांच्या मनात काय दाटून आलं असेल हे केवळ तेथे जमलेले आम्हीच समजू शकत होतो. त्यावेळचा सरांच्या चेहर्‍यावरचा आनंद असा शब्दांत सांगता येणार नाही.

भैरवी ही अशी सुखद असते. मला सूर्योदयापेक्षा सूर्यास्त खूप आवडतो. सूर्यास्ताच्या वेळी मनात हुरहूर, काहूर याचबरोबर दिवसभरातल्या अनेक घटना आठवत असतात. आकाश मंडलावर अनेक रंगांची उधळण होत असताना जो तो आपल्या स्वभावाचा रंग शोधू पाहतो. त्यात कोणाला तो गवसतो, तर कोणाला नाही गवसत. आपण सुरू केलेला जीवनाचा प्रवास कुठे आणि कसा थांबणार याचा थांगपत्ता कोणालाच नसतो. तरी आपला प्रवास चालूच असतो. कलाकार म्हणून वावरताना, लेखक-कवी म्हणून लोकांत मिसळताना कुठेतरी आपण कोणीतरी आहोत ही धुंदी असतेच. या धुंदीतून असे एकदम बाहेर पडता येत नाही. सोहिरोबा म्हणतात तसे आम्ही ना पक्षातले ना अपक्षातले, ना लक्षातले, आम्ही तो अलक्षातले. असं केव्हा जगता येईल हा आपण आपणास विचारलेला प्रश्न. योग आणि भोग एकाच वेळी आयुष्यात उपभोगत असताना जीवनाची व्याख्या कशी मांडता येईल?

हल्लीच गणपतीला गावी गेलो होतो तेव्हा एका विशेष गुणगौरव सोहळ्याला उपस्थित राहता आले. कणकवलीपासून फोंडा रस्त्यावर वाघेरी म्हणून गाव आहे. तेथील रहिवासी बाळकृष्ण रावराणे यांनी आयुष्याची भैरवी काय अनुभवली असेल म्हणून सांगू! बाळकृष्ण रावराणे हे शाळेत शिकत असताना वाघेरी ते कणकवली हायस्कूल असा त्यांना प्रवास करावा लागत होता. ही गोष्ट जवळपास ५० वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा गाडीची सोय नव्हती, रस्ते नव्हते, पण त्या खडतर प्रवासात शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द होती. राणेंनी शिक्षण पूर्ण केले. मुंबईत येऊन चाकरमानी झाले, पण गावची नाळ तुटू दिली नाही.

आयुष्याची संध्याकाळ सुरू झाली तेव्हा आयुष्यात शिक्षणासाठी भोगलेल्या कष्टाची आठवण झाली. त्यातूनच त्यांनी एक अभिनव कल्पना आपल्या नातेवाईकांसमोर मांडली. आपल्या आयुष्यभराची जमापुंजी त्यांनी बँकेत ठेवून आपल्या मागे यातून मिळणार्‍या व्याजातून वाघेरी गावात राहून शिक्षण घेणार्‍या मुलांना प्रोत्साहन म्हणून इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत यश मिळवणार्‍या मुलांना घसघशीत पारितोषिक रोख रकमेच्या स्वरूपात द्यावे अशी योजना केली. जेणेकरून शिक्षण घेण्यासाठी आपल्याला जे कष्ट पडले ते या पिढीला पडू नयेत. राणे गेले पण गेली नऊ वर्षे त्यांच्या मागे हे पारितोषिक वितरण त्यांनी नेमलेल्या नातेवाईकांच्या माध्यमातून सुरू आहे. कोणाची संध्याकाळ ही मावळत्या सूर्यासारखी अशी तळपती होऊ शकते ही कल्पना न करता येण्यासारखी आहे.

कोणाच्या आयुष्यात कशी भैरवी गाता येईल याचा नेम नाही, पण तुकोबांच्या अभंगात मात्र या भैरवीचे अनेक दाखले सापडतात. तुकोबा म्हणतात तसे गुण गाईन आवडी हेची माझी सर्व गोडी, या एका कडव्यात त्याची सांगता आहे. हीच कदाचित भैरवीची गाथा असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -