घरफिचर्ससारांशसेक्सटॉर्शन !

सेक्सटॉर्शन !

Subscribe

अलीकडच्या काळात देशभरात सायबर गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच नवीन पद्धतीने सायबर गुन्हे केले जात आहेत. सायबर गुन्ह्यांच्या या जगतात एक अशाप्रकारचा गुन्हा वाढत चालला आहे ज्यात तुम्ही अडकलात तर जीवावर बेतू शकते. हा गुन्हा म्हणजे सेक्सटॉर्शन. सायबर गुन्ह्यांच्या जगात हा नवीन प्रकार वेगाने वाढतो आहे. हा गुन्हा मुख्यत: व्हिडिओ कॉलशी निगडित आहे. यामध्ये फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट व इतर व्हिडिओ कॉलिंग अ‍ॅपचा वापर केला जातो आणि ब्लॅकमेलिंग करून भीती दाखवत अश्लील व्हिडिओ इंटनरेटवर टाकू असे धमकावत मोठ्या प्रमाणात लोकांकडून मोठ्या रकमा वसूल केल्या जातात. यात सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसण्याच्या किंवा बदनामी होण्याच्या भीतीने अनेकजण पोलिसांकडे तक्रारदेखील करत नाहीत.

उत्तराखंडमध्ये अलीकडेच सेक्सटॉर्शन संदर्भातील 10 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तसेच सेक्सटॉर्शन करण्याचा प्रकार राज्यातील मुंबई, पुणे, नागपूरपाठोपाठ नाशिक जिल्ह्यातसुध्दा घडल्याचे उघडकीस आले आहे. पिंपळगाव बसवंत परिसरात एका तरुणाची अशाप्रकारे आर्थिक फसवणूक झाली आहे. अर्थात यात शक्यता अशी आहे की 80 टक्के प्रकरणात लोक बदनामीमुळे पोलिसांकडे जात नाहीत. यात विशेषकरून तरुणवर्ग जाळ्यात सापडतो आहे. त्यांना कष्टाने कमावलेले पैसे या नादात गमवावे लागत आहेत.

- Advertisement -

सेक्सटॉर्शनचा हा ब्लॅकमेलिंगचा मोठा धंदा नेमका कसा होतो ते जाणून घेऊया. यात आधी सोशल साइट्सवर मुली बनून तरुणांशी चॅट सुरू होते. सायबर क्रिमिनल मुलींच्या नावाने बनावट खाते सुरू करतात. त्यानंतर सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असणार्‍या तरुणांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. त्यानंतर गुन्हेगार फेसबुकवर चॅटिंग करतात. मग व्हॉट्सअप नंबर शेअर करत अश्लील व्हिडिओ कॉल करण्यास सांगतात. जेव्हा एखादी व्यक्ती व्हिडिओ कॉल करते तेव्हा तिला अश्लील व्हिडिओ दाखवला जातो आणि त्या व्यक्तीलादेखील तसेच करण्यास सांगितले जाते. यानंतर हा व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग अ‍ॅप किंवा स्क्रीन रेकॉर्डरच्या सहाय्याने रेकॉर्ड केला जातो आणि मग तो सोशल मीडियावर सर्वत्र तसेच तुमचा मित्रांना किंवा कुटुंबाला शेअर केला जातो. तशी धमकी दिली जाते .त्यांच्या या धमकीमुळे लाजिरवाणे वाटते किंवा पश्चात्ताप होतो. सायबर गुन्हेगारांच्या निशाण्यावर सोशल मीडिया वापरणारे तरुण जास्तीत जास्त असतात. समाजात बदनामी होणार, या भीतीने आत्महत्या करण्यापर्यंत पीडित व्यक्ती जाते. अथवा मागणीनुसार पैशांची डिमांड पूर्ण केली जाते.

या प्रकारच्या सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकू नये यासाठी तरुणांनी जागरुक असणे गरजेचे आहे. अशा लोकांकडून फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका जे तुमच्या ओळखीचे नाहीत. त्याचप्रमाणे अनोळखी व्यक्तीशी व्हिडिओ कॉलवर बोलू नका. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. तुम्ही जर अडकलात तरी पोलिसांशी संपर्क करा. लोकांनी तक्रार केली तर या प्रकारच्या रॅकेटला समोर आणता येईल असे पोलिसांचे म्हणणे आहे. सेक्सटॉर्शनचे रॅकेट पकडणे पोलिसांसाठीदेखील सोपे नसते. सायबर सेल यासंदर्भात काम करत असते. मात्र अशी प्रकरणे वाढत चालली आहेत.

- Advertisement -

काही वर्षांत सोशल मीडियाचा वापर व्यसनाप्रमाणेच वाढला आहे. महिला व पुरुषांचा अधिक वेळ मोबाईलवर जात असल्याने फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून नवनवीन तंत्रांचा अवलंब केला आहे. ‘सेक्स्टॉर्शन’ या नवीन गुन्हे प्रणालीत धमकी देत गंडा घातला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी मोबाईलचा वापर करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. अनेकदा विरुध्दलिंगी आकर्षणापोटी तरुण किंवा तरुणी या जाळ्यात अडकून आपली आर्थिक फसवणूक करुन घेण्यास कारणीभूत ठरतात. तुमच्याशी चॅटींग किंवा व्हीडिओ कॉल करणारी व्यक्तीचा एकच उद्देश असतो तो म्हणजे ब्लॅकमेलिंग हे लक्षात घ्यायला हवे. अलीकडच्या काळात सायबर गुन्हे हे पोलिसांसमोरील एक मोठे आव्हान आहे. त्यासाठी सायबर सेल आहेत मात्र तरीही गुन्हेगार नवीन मार्ग आणि पद्धती शोधून लोकांना फसवत असतात. अशावेळी सर्वसामान्य माणसाने जागरुकता दाखवणे गरजेचे आहे. आणि वेळीच सावध होऊन या प्रकारच्या गुन्ह्यावर आळा घातला पाहिजे, हे आपण म्हणजेच आजची तरुण पिढी करू शकते.

–राकेश मुंडावरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -