-सुजाता बाबर
हवामान बदल हा शब्द आपल्याला फारसा नवा राहिलेला नाही. आपण ज्याClimate Change, हवामान बदल अर्थाने सध्या वापरतो तो अधिकतर मानवी हस्तक्षेपामुळे झालेल्या हवामान बदलासंदर्भात आहे. हवामान बदल म्हणजे तापमान आणि हवामान पद्धतींमध्ये दीर्घकालीन बदल होय. हवामान म्हणजे आपण बातम्यांमध्ये हवामान वृत्त ऐकतो ते नव्हे. ते वेदर रिपोर्टींग असते. म्हणजे साधारण दिवसभरात झालेले किंवा होणारे बदल असतात.
परंतु हवामान बदल हा काही कालावधीत होणार्या बदलांसाठी वापरत येणारा शब्द आहे. असे बदल नैसर्गिक कारणांमुळे होऊ शकतात, जसे सूर्याच्या क्रियाकलापांमध्ये होणारे बदल किंवा मोठ्या ज्वालामुखीचा उद्रेक. निसर्गामध्ये असे बदल करोडो वर्षांपासून होतच आहेत. हे हवामान बदल जर निसर्गामध्ये झाले नसते तर आज पृथ्वीवर जी सुंदर सजीव सृष्टी आपण पाहतो ती दिसली नसती.
हवामान बदल आणि सजीव सृष्टीचा विचार केला तर सुरुवातीच्या काळात प्राणी जगतातील उत्क्रांती आणि विविधतेच्या गतीमध्ये प्रचंड प्रमाणात बदल झाले. आजवरच्या इतिहासात दोन सर्वात मोठ्या सामूहिक विलोपन घटना २६ आणि २५ कोटी वर्षांपूर्वी घडल्या. त्यांनी उत्क्रांतीच्या शर्यतीमधील भरभराट अक्षरशः धुवून काढली. या कालखंडाला आपण पर्मियन-ट्रायसिक विलोपन घटना म्हणून ओळखतो.
यात पृथ्वीवरचे ९६ टक्के समुद्र जीवन आणि ७० टक्के जमिनीवरील जीवन नष्ट झाले. हे बदल ज्वालामुखींमुळे झाले. यामुळे कार्बन डायऑक्साइड मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडला गेला. यामुळे हरितगृह परिणाम झाला. पृथ्वी गरम झाली. परिणामी, हवामानाचे स्वरूप बदलले, समुद्राची पातळी वाढली आणि जमिनीवर आम्लाचा पाऊस पडला. यामधून पुन्हा जीवित स्थितीत येण्यासाठी सुमारे १ कोटी वर्षे जावी लागली. जागतिक तापमानात वाढ जी सुमारे २.७ कोटी वर्षांपूर्वी सुरू झाली आणि किमान २.४ कोटी वर्षांपूर्वीपर्यंत टिकली त्यानंतर बहुतेक सरपटणार्या प्राण्यांच्या शरीरात जलद बदल झाले.
परंतु १८००च्या दशकापासून मानवाच्या हस्तक्षेपांमुळे हवामान बदलाचा वेग वाढला आहे. औद्योगिक क्रांतीपूर्व काळाच्या तुलनेत पृथ्वीचे सरासरी तापमान आता सुमारे १.२ अंश सेल्शियसने वाढले आहे, जे मागील एक लाख वर्षांतील सर्वाधिक तापमान आहे. आज वातावरणात सोडल्या जाणार्या कार्बन डाय ऑक्साईडचा वेग पर्मियन-ट्रायसिक विलोपन कालखंडापेक्षा सुमारे नऊ पट आहे!
नैसर्गिक संपत्तीचा अतोनात आणि अविवेकी वापर यामुळे आज आपण तीव्र आणि वेगाने हवामान बदल अनुभवत आहोत. जीवाश्म इंधन जाळणे आणि जंगलतोड ही हवामान बदलाची महत्त्वाची कारणे आहेत. ऊर्जा, उद्योग, वाहतूक, कचराकुंड्या आणि शेती ही क्षेत्रे हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाला हातभार लावतात.
हे वायू वातावरणात सूर्याच्या उष्णतेला अडकवून ठेवतात आणि जागतिक उष्मा सारख्या घटनेला कारणीभूत ठरतात. यामुळे मानवी, आर्थिक आणि पर्यावरणीय कल्याण धोक्यात येते. हवामान बदलाचे काही परिणाम, जसे तीव्र दुष्काळ, जंगलांना आग लागणे, समुद्राच्या पातळीत वाढ, पूर, ध्रुवीय बर्फाचे वितळणे, प्रलयंकारी हवामान घटना आणि जैवविविधतेतील घट आपण पाहत आहोत.
हवामान बदल काय आहे, त्याचे परिणाम कोणते आहेत आणि आपण ते कसे नियंत्रित करू शकतो हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. नासाच्या मते जागतिक सरासरी तापमान दोन अंशांनी वाढल्यास भीषण परिणाम होऊ शकतात. ६१ दशलक्ष लोक तीव्र दुष्काळाला सामोरे जातील. २७० दशलक्ष लोकांना पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागेल. जीवघेण्या उष्णतेच्या लाटा आणि अत्यंत हवामान घटनांचे प्रमाण वाढेल. जवळजवळ १०० टक्के प्रवाळभित्ती नष्ट होतील.
वाढते तापमान, बदलते हवामान आणि मानवी विकास वन्यजीवांवर गंभीर परिणाम करू शकतात. तापमानवाढ प्राण्यांच्या अन्नस्रोतांवर, वनस्पतींवर आणि पाण्याच्या उपलब्धतेवर परिणाम करते. यामुळे आफ्रिकन हत्ती, जायंट पांडा, मोनार्क फुलपाखरे, सागर कासव, वाघ, ध्रुवीय अस्वल आणि डॉल्फिन यांसारख्या प्राण्यांच्या अधिवासांचा नाश होतो आहे. २०१९-२० च्या ऑस्ट्रेलियातील वणव्यांमुळे तीन अब्ज कांगारू, कोआला आणि इतर वन्यजीव मरण पावले किंवा विस्थापित झाले.
हवामान बदलामुळे पावसाळी जंगलं, प्रवाळभित्ती आणि ध्रुवीय प्रदेश यांसारख्या परिसंस्था मोठ्या प्रमाणावर प्रभावित होतात. अॅमेझॉनच्या १.४ अब्ज एकर दाट जंगलात पृथ्वीवरील १० टक्के ज्ञात प्रजाती आढळतात. परंतु हवामान बदल आणि जंगलतोड यामुळे हे जंगल नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
दक्षिणपूर्व आशिया आणि पॅसिफिकच्या उष्णकटिबंधीय पाण्यातील कोरल ट्रायँगल येथे ६०० हून अधिक कोरल प्रजाती, २,००० हून अधिक माशांच्या प्रजाती आणि ७ पैकी ६ समुद्री कासवांच्या प्रजाती आढळतात. मात्र समुद्राच्या तापमानात वाढ आणि अॅसिडिफिकेशनमुळे ही परिसंस्था धोक्यात आली आहे. अंटार्क्टिका दरवर्षी १५० अब्ज टन बर्फ गमावते, तर ग्रीनलँड २८० अब्ज टन बर्फ गमावते. यामुळे समुद्र पातळीत वाढ होते आणि ध्रुवीय अस्वलांसारख्या प्राण्यांचा अधिवास नष्ट होतो.
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार जागतिक तापमानवाढ १.५ अंश सेल्शियसच्या आत रोखणे अत्यंत महत्त्वाचे आहे, परंतु सध्याच्या धोरणांनुसार शतकाच्या अखेरीस ३.१ अंश सेल्शियस तापमानवाढ होण्याचा धोका आहे. चीन, अमेरिका, भारत, युरोपियन युनियन, रशिया, ब्राझील हे प्रमुख हरितगृह वायू उत्सर्जक देश आहेत. हे देश मिळून २०२३ मध्ये निम्म्याहून अधिक उत्सर्जनासाठी जबाबदार होते, तर ४७ अल्प-विकसित देश फक्त ३ टक्के उत्सर्जनासाठी जबाबदार होते!
हवामान बदलामुळे आरोग्य, अन्न उत्पादन, निवास, सुरक्षा आणि उपजीविका यावर विपरीत परिणाम होतो. तसेच पायाभूत सुविधांचेदेखील नुकसान होते. काही देश, विशेषत: छोटी बेटं आणि विकसनशील देश, हवामान बदलाच्या परिणामांसाठी अधिक संवेदनशील आहेत. हवामान बदलाचे विशेषत: किनारपट्टीवरील लोक, अनेक दूरस्थ आदिवासी जमाती हे मोठे प्रभावित घटक आहेत. हवामान बदलाचे परिणाम कोणालाही चुकवता येणार नाहीत. ग्लोबल वॉर्मिंग, प्रदूषण, समुद्राचे अॅसिडिफिकेशन, प्रलयंकारी हवामान घटना आणि मानवी हस्तक्षेप यामुळे भविष्यातील पिढ्यांना मोठा फटका बसेल.
गेली अनेक दशके हवामान बदलाची तीव्रता कमी व्हावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन केले जात आहे. अनेक क्षेत्रांमध्ये वेगवेगळे पर्याय शोधले, अवलंबले जात आहेत. वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक धोरणे आखली जात आहेत. यात अनेक देशांनी अनोखे प्रयोग करून आपल्यासमोर उदाहरणे ठेवली आहेत. या वर्षभरातील मालिकेमध्ये आपण यावर माहिती घेणार आहोत.
आपण योग्य कृतींनी या समस्येवर मात करू शकतो किंवा किमान तीव्रता कमी करू शकतो. यासाठी पर्यावरणीय धोरणांना पाठिंबा देणे, शाश्वत जीवनशैली अवलंबणे, पर्यावरण जागृती निर्माण करणे असे काही पर्याय आहेत. शाश्वत आणि सुरक्षित भविष्यासाठी आता कृती करणे अत्यंत आवश्यकच नाही तर अपरिहार्य आहे.