घरफिचर्ससारांशनवसपूर्तीसाठी पशूबळी, तरीही गरिबीच कपाळी!

नवसपूर्तीसाठी पशूबळी, तरीही गरिबीच कपाळी!

Subscribe

नवसपूर्ती म्हणून पशूबळी देण्याच्या अघोरी, अनिष्ट प्रथेपायी महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात प्रभावित होत असते. या जत्राकाळात ग्रामीण आणि आदिवासी भागातील ह्या अनिष्ट, अघोरी प्रथेपायी किमान पाचशे कोटी रुपयांची उलाढाल होत असते. कुटुंबाचा हा सर्व पैसा शिक्षण वा आरोग्य या महत्वाच्या बाबींवर खर्च न होता, न करता अनावश्यक बाबींसाठी अनाठाई आणि व्यर्थ खर्च होत असतो. त्यामुळे ग्रामीण, आदिवासी भागातील अनेक कुटुंबांचे, वर्षिक आर्थिक वेळापत्रक पूर्ण बिघडते, एवढे मात्र नक्की ! गरीबाला अधिक गरीबीत ढकलण्याचेच हे कटकारस्थान नव्हे काय?

ठराविक मूहूर्तावर भरणार्‍या या जत्रा-यात्रांमध्ये, मुहूर्त साधण्याच्या घाईत एकाच वेळी भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. साहजिकच स्थानिक प्रशासनावर प्रचंड ताण पडतो. कायदा-सुव्यवस्था धोक्यात येते. श्रद्धेचा मामला असल्याने वातावरण नेहमीच स्फोटक आणि संवेदनशील बनलेले असते. विशेषतः अमावस्या, पौर्णिमा अशाच दिवशी या जत्रा भरतात. म्हणून एकाच दिवशी तोकड्या जागेत किमान चार ते पाच हजार पशूबळी देणे अडचणीचे ठरते. मग सर्रासपणे उघड्यावर पशूबळी देणे सुरू होते. अशावेळी भाविक भक्तांकडून न्यायालयीन आदेश धाब्यावर बसविले जातात. कायदा अंमलबजावणीसाठी तेथे असलेली यंत्रणा अनेकवेळा निष्प्रभ ठरल्याचे चित्र दिसते.

प्रचंड अस्वच्छतेच्या वातावरणात बळी देण्यापासून तर, तेथेच मांसाचे तुकडे करून, जवळपासच ते मांस शिजवणे, प्रचंड घाणीतच जेवणाच्या पंक्ती उठवणे असा कार्यक्रम मोठ्या उत्साहात चालतो. बरे यात केवळ खेडूत, ग्रामीण भाविकभक्तच असतात, असे नाही तर शहरातील उच्च शिक्षित, नोकरदार मंडळीही हौसेने हजर असतात. अनिष्ट, अघोरी रुढींप्रथांचा निषेध, प्रसंगी कृतिशील विरोध महाराष्ट्रातील अनेक संत आणि समाज सुधारकांनी वेळोवेळी केलेला आहे. त्यातील फक्त काहींचे म्हणणे आपण आता पाहू या.

- Advertisement -

संत तुकाराम यांनी सोळाव्या शतकात समाजातील अशा क्रूर, घातक अंधश्रद्धांचा निषेध करताना, आपल्या अभंग रचनेतून समाजमनाला प्रश्न विचारला आहे की,
नवसे कन्या पुत्र होती।

तरी का करने लागे पती ?

- Advertisement -

नवस बोलणार्‍या लोकांना गाडगेबाबांनी असा प्रश्न विचारला की,
असा कसा तुमचा देव ।
घेतो बकर्‍याचा जीव ?
आणि त्याही पुढे जाऊन ते अधिक परखडपणे प्रश्न उभा करतात की, ‘ज्याने पृथ्वी पैदा केली तो तुमचा देव इतका लालची, लाच खाऊ आहे काय? अरे देवाघरचं एक बिचारं कापून खाल्लं आणि त्यानंच तुमचं कल्याण करावं म्हणता? तुमचं कधी बरं होणार नाही !!
‘नवस करून, नवसपूर्ती म्हणून देवाला बकरे मारून देव खूश होतो, मुक्ती देतो, नवस फिटतो हा मूर्खपणा आहे. मात्र हा प्रकार अजूनही आमच्या धर्मात राहिला आहे,’ याबद्दल सुधारक गोपाळ गणेश आगरकर तीव्र नाराजी व्यक्त करतात.
ते पुढे असाही प्रश्न उपस्थित करतात की, जर यज्ञातील बळीला यातना होत नाहीत, त्याला मोक्ष मिळतो तर नवसकर्त्याने आपल्या एखाद्या नातलगास बळी म्हणून अर्पण करण्यास काय हरकत आहे?’
असे अनेक दाखले इथे देता येतील.

आजच्या विज्ञान युगात वावरणार्‍या, स्वतःला प्रगत म्हणवून घेणार्‍या आधुनिक काळातील माणसाला, संत तुकाराम महाराज यांनी चारशे वर्षांपूर्वी सडेतोडपणे सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन अद्यापही समजला नाही, असे म्हणायचे का ?
नवस-सायास करून, अगदी गावपातळीपासून विविध प्रकारच्या शोषणाला बळी पडणार्‍या महाराष्ट्रातील तमाम भाविक-भक्तांच्या या शोषणाविरोधात, आपण सामुदायिकपणे, कृतिशील प्रबोधन केले पाहिजे असे, उठता-बसता संत तुकारामांचे अथवा अन्य संत-समाजसुधारकांचे नाव घेणारी, त्यांच्या,ओव्या, अभंग रचनांचे, साहित्यातील संदर्भांचे दाखले देणारी, आत्ताची विविध सांप्रदायांतील मंडळी याबाबत विशेष कधी हालचाल करताना, सक्रीय होताना का दिसत नाही ? का दिसली नाही ?

या अनिष्ट, घातक, अघोरी रुढी, प्रथेला मोठा समाज समूह बळी पडताना पाहून, त्यांचे आध्यात्मिक अंतःकरण अस्वस्थ का होत नाही? का द्रवत नाही? गावागावातील अशा शोषित, सतत विषमतेचे बळी ठरत असलेल्या बांधवांमध्ये योग्य, इष्ट बदल करण्यासाठी, त्यांच्या वर्तनात इष्ट परिवर्तन, बदल घडवून आणण्यासाठी, वस्तुस्थिती त्यांना समजावून सांगावी, ते जे काही करतात त्यामागील कार्यकारणभाव स्पष्ट करावा, त्यासाठीच तर संत वाङ्मय आहे, आपण त्यांचे पाईक आहोत, ती आपलीही समाजिक, सामूहिक जबाबदारी आहे, असे या आध्यात्मिक-भाविक मंडळीला अद्यापही का वाटत नाही? त्यांचे अध्यात्म हे चंदा, बिदागीची पाकिटे स्वीकारणे /घेणे, मानपान, आदरसत्कार, नावलौकीक मिळवणे, स्वप्रतिष्ठा मिळवणे यासाठीच तर नसते ना?

त्यासाठीच तर वेगवेगळ्या धर्मांच्या, धार्मिक कार्यक्रमांच्या नावाने प्रार्थना, मेळावे, सोहळे, सभा-संमेलने, सप्ते, उत्सव घडवून आणले जात नसावेत? आपल्याच गावात, परिसरात, पंचक्रोशीत देवाधर्माच्या नावाने अनेक कालबाह्य, अनिष्ट, अघोरी रुढी, प्रथां, परंपरा पिढ्यानपिढ्या पाळण्यात येतात, जतन करण्यात येतात. त्यातून गाव, परिसराची कोणतीही अडचण दूर होत नाही, समस्या सुटत नाही. सुटली नाही. उलट गाव, परिसर अस्वच्छ होतो. गावाला बदनामीकारक प्रसिद्धी मिळते. या दुष्टचक्रात गावपरिसरातील युवापिढीलाही, त्यांच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन, अडकवले जाते. मानसिक गुलामीत अडकवले जाते. यापायी गावातील, परिसरातील अनेक कुटुंबे वर्षानुवर्षे कर्जबाजारी होत राहतात. परिणामी त्या गावाचा एकूणच आर्थिक वा तत्सम विकास ठप्प होतो. विषमता वाढत जाते. गावात, कुटुंबात व्यसन, अनारोग्य, मागासलेपण वाढत जाते. दैववादीपणा वाढत जातो. कोणत्याही आध्यात्मिक, माणूसप्रेमी व्यक्तीला ह्या समस्या कळत नाहीत, दिसत नाहीत, असे थोडेच आहे ? या समस्यांपैकी निदान काहींवर तरी अग्रकर्मी विचार करून, एखादी आध्यात्मिक व्यक्ती कार्यप्रवण होऊ शकते. मग अडचण काय आहे ?

‘मला काय त्याचे?’, माझा मी भला, हा स्वार्थी, माणूसकीशून्य विचार, हीच खरी अडचण आहे. म्हणून अशा व्यक्तीचे अध्यात्माच्या नावाने बाकीचे जे वरवरचे वर्तन दिसते, ते सर्व ढोंग ठरते. संतांनी अशा ढोंगी व्यक्तींवरही जबरदस्त आसूड ओढलेले आहेत. खरं तर, महाराष्ट्राला संत-समाजसुधारकांच्या कृतीशील विचारसरणीचा भरभक्कम वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्रातील मोठा समाजसमूह ह्या परंपरेशी, विचारांशी जवळीक साधून असतो. तिला आपलीशी मानतो. संतवचनांवर त्याची प्रगाढ श्रद्धा व विश्वास आहे. संपूर्ण आयुष्य ह्या दोन्ही प्रेरणांवर कंठणारी कोट्यवधी माणसं आज आपल्या महाराष्ट्रात आहेत. भलेही ती कोणत्याही जातीधर्माची असोत!! त्यांच्यातील अनिष्टता घालविण्यासाठी, ही फार मोठी जमेची बाजू आणि सहज जमणारी बाब आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. संत गाडगेबाबा दरवर्षी आषाढी-कार्तिकीला पंढरपूरला जायचे. मात्र पांडुरंगाच्या मंदिरात न जाता, ते अस्वच्छ आणि अतिशय घाण झालेला चंद्रभागेचा किनारा दिवसभर झाडून स्वच्छ करीत. रात्री तेथेच वाळवंटात भाविकांशी प्रश्नोत्तरांच्या, लोकसंवादाच्या माध्यमातून कीर्तन करीत. लोकांची मनंही बाबा साफ करीत.

हाच वारसा, त्या त्या गावातील विविध सांप्रदायिक मंडळींना, आपल्याच गावातील जे बांधव अनिष्ट, अघोरी रुढीप्रथांमध्ये गुरफटलेले आहेत, त्यांचे सातत्याने शोषण होत आलेले आहे, अशा शोषित बांधवांसाठी कृतीशील कार्यक्रम घेऊन, सुसंवादातून, सतत पाठपुरावा करून, हमखास प्रयत्न करता येईल. यालाच खरे अध्यात्म म्हणता येईल, असे सुचवावेसे वाटते.

महाराष्ट्रामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात नवस-सायास व इतर अनिष्ट रुढीप्रथा पाळल्याने मोठ्या प्रमाणात भाविकांचे आर्थिक, मानसिक, शारीरिक असे विविध प्रकारे शोषण होत असते. त्यांचे हे विविध प्रकारचे शोषण, आपण संत परंपरेचा प्रचार, प्रसार करून, प्रत्यक्ष कृतिशील कार्यक्रम घेऊन, थांबवू शकतो, कमी करू शकतो, त्याबाबत मोठ्या प्रमाणात जाणीव जाग्रुती करू शकतो, हे महाराष्ट्र अंनिसने मागील पंचवीस वर्षांपेक्षा आधिक काळ उभ्या महाराष्ट्रात सातत्याने, प्रबोधन, सत्याग्रह, संघर्ष यामार्गाने सिद्ध केले आहे. अनेक जत्रांयात्रांतील पशूबळी व इतर अघोरी रुढींप्रथा थांबविण्यात समितीला यश मिळाले आहे.

देव-देवतांना नवसापोटी अथवा देणगी म्हणून पशू-पक्ष्यांचा उघड्यावर बळी देणे, ही बाब कायदेशीर गुन्हा ठरवून त्या विरोधात संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असा सक्त आदेश मा.उच्च न्यायालय,औरंगाबाद खंडपीठाने दि.23/7/1998 रोजी महाराष्ट्र शासनाला दिला आहे, असा न्यायालयीन आदेश केवळ महाराष्ट्रातच आहे, असे नाही तर, त्रिपुरा उच्च न्यायालयाने देखील ऑक्टोबर, 2019 मध्ये याविषयाबाबत सक्त आदेश काढून, तेथील मंदिरांत दिल्या जाणार्‍या पशूपक्ष्यांच्या बळींची सव्वापाचशे वर्षांपासूनची परंपरा संपुष्टात आणली आहे.

खरं तर, देशाच्या सर्व राज्यांतील न्यायालयांनी, नवसापोटी उघड्यावरील पशूबळी तसेच देवाधर्माच्या नावाने इतर अनेक अनिष्ट, अघोरी रुढी, प्रथांविरोधात असे कडक कायदे करून, त्याची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारांना सक्ती केली पाहिजे. मात्र काहीतरी विपरित, भयंकर घडल्याशिवाय आपल्याकडे कायदा अंमलबजावणीची शक्यता अनेक वेळा फार कमी असते, असे आढळते.

महाराष्ट्रातील काही गावांनी अशा अनिष्ट, अघोरी रुढींप्रथांना गावपातळीवर पायबंद घालण्यासाठी ठराव मंजूर केले आहेत. त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे. पण अशा गावांची संख्या ही एका हाताच्या बोटांच्या संख्येएवढीही नाही. याचा खेद वाटतो. असे असले तरी, आजही अनेक जत्रांयात्रांमध्ये बोकडबळीबाबत वस्तुस्थितीत काय दिसते? कोर्टाचा आदेश झुगारून, नवसपूर्तीसाठी आणलेल्या पशूपक्ष्यांचे उघड्यावर बळी दिले जात असतात. काहीतरी जुजबी व्यवस्था करून, न्यायालयाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी होत आहे, असा लुटुपुटुचा तोकडा प्रयत्न केलेला असतो.

न्यायालयीन आदेशाची कडक अंमलबजावणी व्हावी, यासाठी समितीच्या वतीने, दरवर्षी संबंधित जिल्हा,स्थानिक पोलीस प्रशासनाला विनंती पत्रव्यवहार केलेला असतो. मात्र तरीही कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. वरिष्ठांकडून आदेश पारित होतात. पण प्रत्यक्षात त्या दिवशी त्या, त्या ठिकाणी अंमलबजावणीमधील कठोरता पाळली जात नाही, असा अनुभव कार्यकर्त्यांना नेहमीच येतो. मात्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने संत- समाजसुधारकांचा याबाबतचा विचार शिरोधार्य ठेवून, अशा अनिष्ट,अघोरी प्रथा, परंपरांविरोधात सतत जनजागरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. खरंतर अशा अनिष्ट, अघोरी, घातक रूढी, प्रथापरंपरा जोपासण्यामागे मोठे आर्थिक गणित दडलेले असते. हितसंबंधितांकडून, भाविक-भक्तांची आर्थिक ऐपत नसतानाही, केवळ देवाची भीती दाखवून, बोकड बळी देण्याची सक्ती केली जाते. त्यातून आर्थिक वसूली केली जाते. शिवाय इतर बाबींसाठींचा न परवडणारा खर्च असतोच. त्यामुळे वर्षानुवर्षे कुटुंबाचा कर्जबाजारीपणा वाढत जातो. गरीबाला अधिक गरीब करण्याचे हे कटकारस्थान आहे, असे समितीचे ठाम मत आहे.

अशा प्रथा परंपरा जोपासल्याने, जतन केल्याने, एकूणच समाज मानसिक गुलामगिरीत खोलवर अडकत जातो. समाजात दैववाद बोकाळतो. परिणामी प्रयत्नवादाला खीळ बसते. व्यसनाला चालना मिळते. युवक वर्गही त्यामुळे, व्यसनी बनण्याचा धोका वाढतो. असे अनेक दुष्परिणाम आणि त्यांच्यावरचे प्रभावी, वस्तुनिष्ठ उपाय प्रबोधनाच्या माध्यमातून कार्यकर्ते सातत्याने मांडत असतात. पत्रकं वाटतात. प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात, प्रबोधन फेर्‍या, घोषणा आदी केले जाते. जनजागरासाठी त्याचा नक्कीच मोठा उपयोग होतो, फायदा होतो. असे दिसून आलेले आहे.

पुढील काळात अशीही भीती वाटते की, कोरोनासारख्या महामारीतून आपण सहीसलामत वाचलो, याचे सर्व श्रेय त्या त्या धर्माचे देव-दैवते वा त्या त्या धर्मियांचे पुजारी, गुरू, प्रेषित याचेच आहे. त्याचीच कृपा होती, असे अनेक व्यक्ती मानण्याची शक्यता आहे. कारण आपल्याकडील दैववादीपणा, गुरूपरंपरा, देवाधर्माचा पगडा यामुळे असे वाटू शकते. मग पुन्हा तेच नवस-सायास, होम, हवन यज्ञात आहुती, बळी अशा अनेक प्रकारांना उत येईल. त्यांना खतपाणी घालण्याचे प्रकार, पुनर्जीवित करण्याचे प्रकार घडतील. अशी शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र अंनिससारख्या इतर अनेक विवेकी संघटना आणि व्यक्ती यांना सतत जागरूक राहावे लागणार आहे. सतत जागल्याची भूमिका बजवावी लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -