मया पातळ करु नकोस…!

सोन्यासारखं लेकरू सावलीत राहत असेल तर आपल्याला तरी काय करायची जमीन-जुमला, त्याचीच हाय त्याच्यासाठीच तर जाईल, उद्या त्योच तर हाय आपल्या ‘काठीचा आधार’ वगैरे पटवून मायीने राजी केलेच आबारावला. दोन-चार एकर काळजाचा टुकडा विकून एका ठिकाणी भरला पैसा. ‘पोरगा नोकरीला लागला तो सावलीत राहील’ या विचारानं आबाराव काळ्या-आईचा तुकड्याला पारखा झाली तरी रडला नाही.

जळत्या घरातून उड्या मारलेल्या पिलावळींना आता उरलं नाही देणं-घेणं, आपल्या डोक्यावरचे छत अन् पायातलं बळ कोणामुळे आलं याचं…गावांशी आणि गावातल्या आपल्या माणसांशी नाळ तोडताना होत नाहीत वेदना, अन् मन खिन्न-विच्छिन्न…’ आम्ही देणं लागतो या ‘मातीचे’ आणि या मातीच्या गोळ्याला आकार देणार्‍या हातांचे, या संस्कारांचा पडतो कसा विसर ‘काळ’ बदलला की….! कुणाच्यातरी पायांतले ‘कुरुपं’ आणि हातांच्या ‘घट्यांवर’ पोसले हे ‘वर्तमान’ याचे राहत नाही ‘भान’ या मायावी झगमगाटात. महानगरांनी कोणत्या बेड्या घातल्या आमच्या पायात, ज्या रोखतात आम्हाला मुळांना ओल देण्यापासून…

घ्यावा शोध, करावं ‘आत्मचिंतन’ आणि पहावे तपासून आपणच आपल्या ‘माणूस’ असण्याला….!!

पारावर बसलेल्या आबारावचे डोळे डबडबले. चेहरा सुकला अन् नजर पायाच्या अंगठ्यावर स्थिरावली. बसल्या बसल्या अंगठ्याने माती उकरुन खड्डा केला तरी मन भानावर नव्हतं. एरव्ही मुलगा नोकरीला लागला तेव्हापासून जाणार्‍या येणार्‍याला ऐटीत ‘रामराम’ठोकून आपण पारावर बसलो याचे दिमाखात सुचन करायची भारी हौस. उंचपुरा गडी, मध्यम बांधा, लांबसडक टोकदार नाक, अर्ध्या नाकापासून कपाळावर गेलेला अष्टगंध, मध्यभागी बुका, गळ्यात ठळक दिसेल अशी मोठ्या मन्याची तुळशीची माळ, डोक्यावर मळकट फेटा. पाच-सहा एकर जमिनीचा मालक, पूर्वी चौकोनी कुटुंब म्हणून टुमटुमीत जगायची लागलेली सवय. कधी कुठल्या गोष्टीसाठी ओढातान नाही. पाऊसपाणी बरा असला की फिकीर नसायची. शेतीबाडीच्या दिवसात नीट शेती, घरच्या शेतातून उसंत मिळाली की बाजारहाटा पुरती मजुरी व हंगाम संपला की अखंड हरिनाम सप्ताहात भजन कीर्तन. हा वर्षभराचा नित्यनेम न चुकणारा.

‘‘नित्यनेम नामीं ते प्राणी दुर्लभ,
लक्ष्मीवल्लभ तयां जवळी’’
यावर त्याची अपार श्रध्दा.

अंगठ्यानेे खड्डा मोठा होत गेला तसं त्याला आठवलं, तरुणपणातले अपार कष्ट, मेहनतीने नवरा-बायकोने गावकुसालगतच्या पांढरीत विहीर पाडली. चार-दोन एकर भिजू लागलं. हंगामी पिके घेवून संसाराचा गाडा सुरळीत चालू झाला. एक मुलगा, एक मुलगी आगेमागे गावातल्या शाळेत जायची. गावातली शाळा संपली की मुलगा तालुक्याला जाऊ लागला. तालुक्याच्या ठिकाणी दोघांचे शिक्षण बापाला जड जाईल म्हणून दहावी संपली की मुलगी शिक्षणाला रामराम ठोकून शेतीबाडी, घरकामात मायीला मदत करू लागली. पुढे पोरगा बारावी पास झाला तशी आबारावची छाती दोन इंच पुढं आली. गावच्या गल्लीत त्याचं पाऊल आता माव्हत नव्हतं. पोरगा भरपूर शिकला पाहिजे असं मनोमन वाटू लागलं. आपण उन्हातान्हात राबराब राबतो, मातीत खपतो, खस्ता खातो पण हातात काय उरतं डोंबल? किमान पोराच्या वाट्याला हे दिवस येऊ नये’.

म्हणून नवरा-बायको दिवसरात्र राबायची. बापजाद्यापासून कष्ट नशिबी. मागच्या दहा पिढ्यात घरात कोणाला अक्षर ओळख नव्हती. आता ‘पोरगं शिकून नाव काढील’, ‘मोठा साहेब होईल’ या विचाराने दोघांचा हुरुप काही औरच असायचा. पोराला दहावीलाही चांगले गुण मिळाले होते. म्हणून बारावीला शहरात ठेवले. मोठ-मोठे क्लासेस लावले. पोरगं डॉक्टर, इंजिनियर झालं पाहिजे म्हणून आबारावने पदरमोड करुन मुलीच्या लग्नासाठी जमवलेले लाख दीड लाख रुपये त्याच्या क्लाससाठी मोजून क्लासवाल्याचे घर भरले. परंतु पोरग मेडिकल, इंजिनियरींगला लागलं नाही. ‘आरक्षण’नसल्याने आपले असेच होते, अशी बोंब मारुन पोरगा मोकळा झाला. माय-बापाला यातले काडीचे कळत नाही, याचा त्याला अंदाज होताच. नंतर त्याने पदवी घेतली.

काही दिवस स्पर्धापरीक्षेचे ढोंग करुन दिवस वाया घालवले. वय वाढले पण नोकरी नाही. दरम्यानच्या काळात आबारावने हातावरचे स्थळ पाहून मुलीचे लग्न लावून दिले. भावाच्या स्वप्नांसाठी उन्हातला जोडीदार बहिनीने हसत स्वीकारला. ‘भाऊ शिकला तर माय-बापाला दिवस सुखाचे येतील’, अशी तिची भाबडी आशा. मुलीच्या लग्नाने कर्जाचा डोंगर झाला. पोराने कुठे तरी नोकरी शोधावी म्हणून आबारावने हट्ट धरला. पण मायीच प्रेम आडवं आलं, इतके वरीस शिकवलं अजून दोन वरसानं कुठं बिघडत, म्हणून तिने मुलाच्या स्वरात स्वर मिसळला. पुढे पोरगा आणखी शिकला. कोणती तरी परीक्षा पास झाला. तेव्हा आबारावची छाती पुन्हा फुगून आली. नोकरीसाठी राज्यभरात फिरु लागला. पण नोकरी कुठेच लागेना. कारण भरायला पैसे नाहीत.

हे समजलं तसं आबारावचा जीव तिळतिळ तुटायचा. लग्नाच वय उलटून चाललं म्हणून मायीला काळजी वाटायची. सारख्या मुलाखती द्यायचा, परंतु नोकरी लागत नाही म्हणून घरात आदळआपट करायचा. त्याच्या जीवाची घालमेल पाहून मायीला वाटायचं. अंगावर किडूकमिडूक पण नाही. विकाव तरी काय? जमिनीचा तुकडा! त्यांना ते पटायचं कसं? पण सोन्यासारखं लेकरू सावलीत राहत असेल तर आपल्याला तरी काय करायची जमीन-जुमला, त्याचीच हाय त्याच्यासाठीच तर जाईल, उद्या त्योच तर हाय आपल्या ‘काठीचा आधार’ वगैरे पटवून तिनं राजी केलेच आबारावला. दोन-चार एकर काळजाचा टुकडा विकून एका ठिकाणी भरला पैसा. ‘पोरगा नोकरीला लागला तो सावलीत राहील’ या विचारानं आबाराव काळ्या-आईचा तुकड्याला पारखा झाली तरी रडला नाही.

आज मात्र धाय मोकलून मोकळं होऊ पाहत होता. पण सांगावं कसं अन् कुणाला. अवघड जाग्यावरच दुखणं. वर पाहता लोक येता-जाता बोलायाचे आबारावला आता काय कमी हाय, मुलगा चांगल्या हुदद्यावर गेला, महिन्याकाठी पाठवित असेल पैसे, बसून तर ख्यायचे तुम्हाला’ पण तसं तसं आबारावच मन मनाला खायचं. गेले एक वर्ष झालं पोरान एक रुपया सुद्धा घरी पाठवला नव्हता. नवरा-बायकोचे हात-पाय थकले. उरलेल्या एकर-दीड एकरात काम करता येत नाही, अन् बटाई केली तर हातात फुटकी कवडी पडत नाही, अशी अवस्था. पोराला नव्यानं नोकरी लागली तेव्हा सुट्टी असली की आठ पंधरा दिसाला गावाकडं यायचा. ख्याली खुशाली ईचारुन हातात खर्चासाठी चार पैसे टेकवून जायचा. पुढं लग्न झालं, शहरात घर घेतलं, गाडी घेतली. लेकरु झालं तेंव्हा मायबापाच्या आनंदाला पारावार नव्हता. गावात उठता बसता माझं लेकरु किती गुणी म्हणून कोडकौतुक करताना मायीचं तोंड कधी थकलं नाही. पण हळूहळू लेकरू गावाकडं महिन्याकाठी येता येता आता तीनचार महिन्यांत एकदाच येऊ लागलं.

‘हाफ ईजार घालून घरातल्या घरात चप्पल घालून फिरु लागलं तेव्हाच ठेकळात अनवाणी फिरलेले हे पाय फितुर झाले. मातीला हे समजले होते बापाला. गावाकडची माणसं, नातेवाईक सगळे कसे ‘गावंढळ’झाली होती एकाएकी. शहरात आपल्या सोकॉल्ड इभ्रतीला जावू नये तडे म्हणून तो घेत असे सदा काळजी गावातल्या माणसांचा विषय टाळता यावा याची. गावाकडच्या कोणत्याच विषयात नसतो इंटरेस्ट आजकाल साहेबांना. पाऊसपाणी, दुष्काळ, होत-नव्हतं यांच्याशी नसते कुठलेच सोयर सुतक. बापाचा काल फोन आला ‘गावाकडं वादळ, अतिवृष्टी झाली डोक्यावरची चार पतरं उडाली, चूल भिजली घरात पाणी शिरलं.’ असं बोलतच होता बाप. मुलांच्या क्लास, स्कूलची फीस, घराचा, गाडीचा हप्ता, बायकोचा वाढदिवस अन् पगार वेळेवर झालाच नाही या महिन्यात वगैरे अशी लंबीलाच यादी फोनवरुन वाचली गड्यानं बापापुढे. अन् मोबाईलमध्ये झाली गडबड. गोठलं संवेदनांचं नेटवर्क, शेवटी बापच तो समजला बरंच काही! मायीनंही वाचला चेहरा पाठमोराच अन् फिरवली मान सगळं कळायला शब्दच थोडी लागतात तिला ‘माय’च ती…!

तरीही तिला आलचं दाटून आपलं लेकरू किती अडचणीत काढतेय दिवस शहरात म्हणून. पण आता आपण तरी काय द्यावं? आपल्याच डोक्यावरच छप्परही उडाले देण्यासाठी उरलं काय?
फक्त एकर भर माती, पण तीही लागेलच ना शेवटी

आपण ‘माती’ व्हायला….!
माती मात्र म्हणत होती…
‘‘मया पातळ करु नकोस,
गावाकडं येत जा
कधी- मधी माय- बापाला
तुझ्या घरी नेत जा.
तुझे लेकरं-बाळं, बायको
तुझं जग सुखात ठेव
भावा-बहिनीला बोलताना
साखर तेवढी मुखात ठेव.
त्यानंच शाळा शिकविलीरं
सावकाराचं रीन काढून,
कांदा तुला चारला होता
कुपाटीतलं मव्हळ झाडून.
तुझ्या शहरी गरजांमधून;
दहा-पाच साठवत जा,
‘दर- महा अर्धी-कोर भाकर
गावी पाठवत जा’
(मुकुंद राजपंखे)