-डॉ. प्रशांत भरवीरकर
स्वर या संकल्पनेचा विस्तारच करायचा झाला तर किती अंगांनी तो करता येईल ना! वातावरणातले स्वर मनाला मोहवणारे असले तरी आतून येणार्या स्वराची सर कशाला येईल? हा स्वर किंवा आवाज सर्वांनाच ओळखता येईल असं नाही…म्हणूनच तर कबीरानं म्हटलंय…‘सुनता है गुरूग्यानी’. जो गुरूग्यानी आहे तोच ऐकू शकतो. त्यांच्या म्हणण्याचा मथितार्थ हा आहे की, ज्याला गुरूंबद्दल ज्ञान झाले आहे तोच फक्त आतला आवाज, अंतरातला आवाज ओळखू शकतो.
हा अंतरातला आवाजच आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जातो. आपल्याकडील अंतरंगात जी दैवी सुरावट आहे ती अशा काही शब्दांना, स्वरांना जन्माला घालत असते. ही सुरावट एकदा किणकिणली की अंगोपांगी बहरायला होतं…‘मोरा पिया घर आया’ची अनुभूती होते. काय सांगते ही सुरावट… एका पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत ‘जीए’ म्हणतात, ‘काही माणसं जवळ चालणारे मोठे आवाज ऐकू शकत नाही कारण त्यांना दूरवरून येणारे डिंडीबध्वनी ऐकू येत असतात.’ अतिशय सुंदर अर्पणपत्रिका.
डिंडीबध्वनी म्हणजे आपला सर्व दैनंदिन व्यवहार सुरू असताना दूरवर कोठेतरी काही वाद्ये वाजत असतात, त्यांचा आवाज. जो ‘कांतारा’ चित्रपटात त्या शिवाला ऐकू येत असे. निबीड जंगलातला तो आवाज, त्याच्या अंतरातही एक आवाज असतो. त्याच्यासोबत तादात्म्य पावतो तो आतला आवाज आणि मग जागा होतो तो पंजुर्ली दैव. कांतारा कधी जुना होत नाही तो या अंतरातल्या आवाजामुळेच. ती केवळ एका क्षेत्रपाल देवाची कहाणी राहत नाही. दैवत्व हे प्रत्येकाच्या अंगी असते, फक्त एवढेच की ते काही काळासाठी जागृत होते आणि नंतर विझून जाते. परमेश्वर समजून घेण्याची ऊर्मी खरंच सापडेल का आज कुणात. फुलणार्या फुलात अन् हसणार्या मुलात कुणी पाहतं का त्याला.
एखाद्याच कुसुमाग्रजांना त्याची पुसटत चाललेली पावलं दिसतात. मग ते लिहून जातात त्यांच्या ‘गाभारा’ कवितेत… ‘पण तूर्त गाभार्याचे दर्शन घ्या. तसं म्हटलं तर, गाभार्याचं महत्व अंतिम असतं, कारण गाभारा सलामत तर देव पचास.’ माणुसकीचा गहिवर दाटून आल्याने ते असं म्हणत असतीलही, परंतु अंतिम भावना तर माणूस जपण्याची आहे. दूर आभाळात कोठेतरी आवाज होत राहतात, पण त्यांना ध्यानात घेतं कोण…‘गगन में आवाज हो रही है ‘झिऽऽनि झिनी झिनी झिऽऽऽनी झिनी झिऽऽनी झिऽऽनी’ कबीर ते ऐकतो. कबीरच तो. तो तर देवालाही सोडत नाही म्हणतो, ‘मुल्ला पुकारें मस्जीदमें…क्या साहीब तेरा बहरा है…चिटी बजाये पैरमें घुंगरू वो भी अल्ला सुनता है’ असेलही त्या ओरडण्यामागे जर देव जवळ आणण्याची भावना तर असो ना! पण नाही… कबीरजी म्हणजे आरस्पानी माणूस.
किती असावं पारदर्शी, तर ‘मोको कहा ढुंढे रे बंदे में तो तेरे पास रे’ असं क्षणभरात जगण्याचं रहस्य सांगतात. मला कुठेतरी देवळांमध्ये, मस्जिद, गुरूद्वारामध्ये शोधत बसू नको. मी तुझ्याजवळ आहे. ‘ना में देवल, ना में मस्जिद, ना काबा कैलासमें.’ तू फक्त आत डोकाव, मी दिसेन. हे आत डोकावणे काय असते माहीत आहे का, आतला आवाज कसा ऐकता येतो माहीत आहे का? त्यासाठी एकांत हवा. लोकांतात ते शक्य नाही आणि आज तर सर्व बाबाबुवांच्या दुकानदार्या लोकेशनावरच चालतात. जिकडे गर्दी जास्त तो बाबा जास्त मोठा. असो, तो प्रस्तुत लेखाचा विषय नाही, तर आतला आवाज कसा ओळखायचा? हे ज्याच्या त्याच्या वकुबावर अवलंबून असते.
कुणाला भिकार्याला मदत केल्याने आनंद होतो, तर कुणाला माणसे जेवू घातल्याने सुख वाटते. कुणाला मंदिरात पारायणे केल्याने दिलासा मिळतो, तर कुणाला तासन्तास तपश्चर्या केल्याने मनाला आल्हाददायक वाटते. आतला आवाज ऐकून त्याबरहुकूम वागणे हे ज्याचा त्याचा स्वत:चा विचार असतो. काहीजण त्यासाठी गुरूंची मदत घेतात. ‘बलिहारी गुरू आपकी गोविंद दियो बताय’ म्हणतात ते त्यामुळेच तर. देव ही संकल्पना कशी आहे? सत्य कोण बोलतो? सत्य म्हणजे काळ्याकुट्ट अंधारात, काळी मांजर शोधण्यासारखं आहे, असं म्हणणारा नास्तिकवादाचा प्रणेता चार्वाकसुद्धा कधीकधी खरा वाटू लागतो, पण यात एखादे रामकृष्ण परमहंस असतात, जे विवेकानंदाला म्हणतात, ‘नोरेन आमी तोका देब दिखाबो’ जो साधू भेटेल त्याला विवेकानंद प्रश्न विचारत असत, ‘तुम्ही देव पाहिला आहे का?’ त्यांना नकारार्थी उत्तर येई मग विवेकानंदांचे मन खट्टू होत असे.
शेवटी त्यांनी रामकृष्ण परमहंस यांना हा प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले, ‘हो मी देव पाहिला आहे. तू जेथे उभा आहेस इतक्या जवळून मी त्याला पाहिलं आहे, मी तुलाही त्याचे दर्शन करून देऊ शकतो.’ आणि मग विवेकानंदांचे समाधान झाले. तरीही आयुष्यभर रामकृष्ण परमहंस यांच्या सोबतीने राहिल्यावर, शेकडो चमत्कार अनुभवल्यावर रामकृष्ण परमहंस बिछान्याला खिळलेले असताना त्यांची सेवा करत असताना विवेकानंदांच्या मनात विचार आला की, आपले गुरू खरोखरंच देवरूप झाले असतील का? तेव्हा हसत रामकृष्ण परमहंस म्हणाले, नरेंद्र अरे जो राम होता, जो कृष्ण होता तोच हा रामकृष्ण आहे.
रामकृष्णांसारखा एखादाच सद्गुरू असा असतो जो शिष्याला ‘मन चल निज निकेतन’ची शिक्षा देतो, अंतरात पाहायला शिकवतो. इतकंच काय तो ही तर सांगतोच ना, ‘ना में देवल, ना में मस्जिद… ना काबा कैलासमें’ शेवटी प्रश्न आत्मानंदाचा आहे. तो कोठे मिळतो, ते शोधायला कोण किती प्राधान्य देतं याचा आहे. नाशिकला कपालेश्वराच्या समोर अजगर महाराजांचं समाधीस्थान ही एक अशी जागा आहे की जेथे आल्यानंतर मनाला शांत वाटतं. फार वर्षांपूर्वी एक योगी नाशकात आले. त्यांना गंगेवर जायचं होतं. तेथे गेल्यावर त्यांनी दोन पवित्र ठिकाणांना भेट देण्याविषयी सांगितलं. त्यातील एक म्हणजे तपोवनातील नारायणदास पिठले स्वामींची समाधी, दुसरी म्हणजे कपालेश्वरासमोरील अजगर महाराजांची समाधी. नाशकातील किती लोकांना ही ठिकाणं माहीत आहेत याबाबत अद्यापही शंका आहे.
आपण सिग्नलवरून जाताना एखादं लहान बाळ आपल्याकडे पाहून हसलं तर आपल्याला छान आनंद होतो. वाटतं ‘बस! आता काही नको’ ‘ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया’ म्हटलं तर कानात तेच पैंजण किणकिणतात. हास्य ही किती सुंदर देणगी आहे ना! ‘वस्तु अमोलीक दी मेरे सतगुरू, किरपा कर अपनायो, पायोजी मैने रामरतन धन पायों’ हेच तर खरं धन. हसणं कोण देतं…कोण मनापासून हसायला लावतं. कोण मनस्वी आनंद देतं. इंटिमेटचा सुवास जसा मनाला आनंद देतो तसंच सुफी गीते मनाला आनंद देतात. ‘अब जो भी आपका हो चुका उसका खुदा होगा’मधून जे प्रतित होतं ते इतर कशातूनच होणार नाही.‘तुम समंदर के धनी’ असा प्रतिध्वनी येताना किती दिलासादायक वाटतं. त्याच्याकडे मागताना ‘मरम्मत मुकद्दर की कर दो ख्वाजा’ म्हणावंसं वाटतं. त्याचं कारणच मुळात जो त्याच्या पायाजवळ गेला तो तरला हे वैश्विक सत्य ज्याला समजेल तोच खरा गुरूग्यानी.
या गुरूग्यान्याच्या मनात ‘जो भी तेरे दर आया झूकने जो सर आया’चा गजर होतो तेव्हा आपण त्याची शरणागती पत्करून मागणं मागितल्याचं तुणतुणं त्याला लावावं लागत नाही. ‘इस दर की सदावत क्या किजे, खाली न गया मंगता कोई’ या वचनावर विश्वास ठेवूनच त्याने डोके टेकवण्याचा निश्चय केलेला असतो. ज्या क्षणाला त्या निरंतर परमात्म्याला पाहण्याचा क्षण येतो, तेव्हाच ‘मोरा पिया घर आया मोरा पिया घर आया’ची हूल उठते अन् ‘है मेरे पीर का सदका, तेरा दामन है थामां’ असं त्यालाही सुनावत आता दर्शन दे, मी तहानलो आहे रे देवा अशी आळवणी करत त्याच्या गर्म ‘मजहर’वर हा गुरूग्यानी पडून राहतो.
त्यामुळे काय होते? एखाद्या सिद्ध ठिकाणी गेल्यावर नक्की काय होते? शिर्डीला गेल्यावर आपल्याला उगाचच प्रसन्न का वाटत राहते? कोणत्याही मंदिरात गेल्यावर नतमस्तक होण्याची भावना कोठून येते? ‘मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरू तुझे पाय दोन्ही’ ही संत रामदासांची आळवणी आपल्याला काय शिकवते? या सगळ्याचा मथितार्थ एकच आहे, माणूस बना. आपण माणूस आहोत, माणसासारखे राहायला शिका. ‘जे जे भेटेल भूत, तो तो मानावा भगवंत’ हे संत तुकाराम महाराजांनी जे लिहून ठेवलंय त्याचा अर्थच मुळात हा आहे की जो माणूस आपल्या वाट्याला आला आहे, तितक्या वेळापुरते त्याला समाधान देण्याचा प्रयत्न करा. देव त्याच्यातच शोधा.