-संतोष खामगांवकर
शालेय शिक्षण पूर्ण होताच मुंबईत राहणारा प्रथमेश कुटुंबासह रत्नागिरीच्या त्याच्या गावी स्थलांतरित झाला होता, परंतु आज कामानिमित्त त्याचा मुंबईचा प्रवास पुन्हा सुरू झाला आहे. प्रथमेश सांगतो की, रस्त्यात भेटणार्या मुंबईकरांना हास्यजत्रेतील कलाकार म्हणून त्याचं जेवढं अप्रूप असतं, त्याच्यासोबत सेल्फी काढावेसे वाटतात तेवढं त्याच्या गावकर्यांना वाटत नाही. कारण तो त्यांच्यासाठी नेहमीच त्यांच्यासोबत शेतात क्रिकेट खेळणारा प्रथमेश असतो. त्याच्यासोबत फोटो वगैरे काढून सोशल मीडियावर अपलोड करण्याचा हव्यास त्यांना मुळीच नसतो. प्रथमेशही त्यांच्यात रमतो. प्रथमेश सांगतो की, त्याचं गावचं घर म्हणजे चित्रातलं घर आहे. मागे डोंगर, डोंगराच्या पायथ्याशी घर, समोर विहीर, बाजूला वाहणारी नदी आणि खूप मोकळी जागा. अशा ठिकाणी शहरातली लोकं वीकेण्डसाठी वगैरे जातात, पण प्रथमेशसाठी हे रोजचं जगणं आहे, हे सांगताना तो अधिक खुलत जातो.
तर असा हा गावच्या घरात आणि शेतातल्या क्रिकेटमध्ये रमणारा प्रथमेश अभिनयाच्या क्षेत्रात आला ते क्रिकेटमुळेच! प्रथमेश सांगत होता मी अपघाताने या क्षेत्रात आलो. मी रत्नागिरीला चालणार्या क्रिकेट सामन्यांची रनिंग कॉमेंट्री करायचो. अशीच एकदा कॉलेजच्या मैदानावरील सामन्यांची माझी कॉमेंट्री आमच्या आंबेकर सरांना आवडली. ते मला कल्चरलला येशील का, म्हणाले आणि मला युथ फेस्टिव्हलच्या स्किटसाठी म्हणून घेऊन गेले. मी काही दिवस ती स्किटची तयारी पाहिली आणि तिथून चक्क पळून गेलो. परत मला पकडून आणलं गेलं आणि नेमकं त्याच वेळी स्किटमधला एक जण आजारी पडला. त्यावेळी श्रमेश बेटकरने त्या जागी प्रथमेशची वर्णी लावली आणि तिथून प्रथमेशचा अभिनय प्रवास आणि श्रमेशसोबतची मैत्री जुळून आली. सोबत आणखी एक गोष्ट म्हणजे प्रथमेशनं स्किटसाठी स्वतःमधील लेखकालाही वाव दिला. रत्नागिरी परिसरातल्या विविध स्किट्स त्यांनी केल्या. हे करत असतानाच दोघांची मैत्री अधिक घट्ट होत गेली.
हे सारे उपद्व्याप जरी चालू असले तरी याचं नक्की भवितव्य काय हे प्रथमेशला कळत नव्हतं. डोंबिवली नागरी सहकारी बँकेची अकाऊंटंटच्या नोकरीसाठी असलेली लेखी व तोंडी परीक्षा देऊन प्रथमेश अगदी पहिल्या पंचविसांत पासही झाला. हातात अपॉईंटमेंट लेटरही आलं, पण एक दिवस थ्री इडियट्स पाहून आलेल्या प्रथमेशने संध्याकाळी पिक्चरहून परतल्यावर घरच्यांना सांगितलं की, मला बँकेची नोकरी करायची नाही. मला मनोरंजनाच्या क्षेत्रात करियर करायचंय… हे ऐकल्यावर वडील त्याला काळजीच्या स्वरात म्हणाले की, तुला जे काही करायचंय ते कर, पण वयाच्या पंचविशीपर्यंत पायावर उभा राहा.
प्रथमेश सांगतो की, आईवडिलांचा सपोर्ट नव्हता असं नाही, परंतु प्रत्येक अभिनेत्याच्या-लेखकाच्या किंवा या फील्डमधल्या माणसाच्या घरात एक वाक्य बोललं जातं की, हे भिकेचे डोहाळे आहेत. अर्थात हे वाक्य एक-दोनदा माझ्याही घरात बोललं गेलंय. खूप टोकाचा विरोध नाही झाला मला, मात्र आज घरच्यांना खूप चांगलं वाटतं. प्रथमेश शिवलकरचे आईबाबा म्हणून ओळखलं जातं याचंच त्यांना खूप समाधान आहे. आज श्रमेश-प्रथमेशची जोडी महाराष्ट्राची हास्यजत्रा गाजवतेय.
मनोरंजन क्षेत्रात कामाच्या शोधात रत्नागिरीहून मुंबईला आलेल्या प्रथमेशचं कुठलं तरी एक स्किट लेखक आशिष पाथरे यांना आवडलं. म्हणून त्यांनी प्रथमेशला त्यांच्या एका चित्रपटाच्या लेखनासाठी असिस्ट करायला बोलावलं. प्रथमेश सांगतो की, मी सकाळीच त्यांच्याकडे गेलो आणि दुपारी जेवल्यावर झोपलो. ते पण विचारात पडले की या झोपणार्या माणसाला कसं काय काम द्यायचं?…पण नंतर तेच म्हणाले की, असो चालायचंच. कोकणी माणूस दुपारचा भात खाऊन झोपायचाच, मात्र याच आशिष पाथरेंना प्रथमेश त्याच्या लिखाणातील प्रगतीसाठी विशेष श्रेय देतो.