घर फिचर्स सारांश मी एक दिवस जाणार आहे...

मी एक दिवस जाणार आहे…

Subscribe

अपेक्षाची आणि माझी ही पहिलीच भेट. तीही जेमतेम एक तासाची. वय वर्ष 30. सावळ्या रंगाची पण गोड मुलगी. कधीकधी नियतीसुद्धा हात धुवून पाठीमागे लागते आणि अंत पाहते. एक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला, पण त्यानंतर संकटांच्या छाताडावर हातात दुर्गेप्रमाणे त्रिशुल घेऊन उभी राहिली. मी एक दिवस जाणार आहे, याची तिला कल्पना असली तरी लढण्याचा तिचा निर्धार आहे. त्या रणरागिणीच्या आयुष्याच्या रणांगणावरची ही खरीखुरी कहानी...

–प्रियंका खैरनार

हातात अडीच वर्षांचा बलदेव. न कधी पाहिलेला न कधी ऐकलेला आजार पदराला गाठ बांधावी तसा अंगाशी पडला आणि इथली न कुठली अशी झालेली अवस्था… असं झालं तरी काय अपेक्षाच्या आयुष्यात? या संवादामार्फत मांडण्याचा प्रयत्न केलाय.

- Advertisement -

1) मीच का? हा प्रश्न कधी मनात आला? त्याला काय उत्तर दिलं?
माझ्या डिलिव्हरीच्या वेळी माझा बीपी वाढला. सुरुवातीला हे जरा नॉर्मलच वाटलं. पण नंतर बीपी पुन्हा पुन्हा वाढायचा. त्यात हायपरटेन्शन आणि रक्त कमी आहे की काय हे बघण्यासाठी म्हणून टेस्ट केल्या. त्यावेळी तपासण्या अंती लक्षात आलं की माझ्या दोन्ही किडन्या खराब झाल्या होत्या. एका क्षणात सगळं कसं काळं कुट्ट झालं. मीच का? याचं उत्तर जगात कुठेच नाही का…? हे समजावं इतकं वयही नाही. अवघे 25 वर्षे. हातात अडीच वर्षांचं बाळ. आधार म्हटला तर संपूर्णपणे वास्तवाच्या निखार्‍या इतका निराधार. नांदेड, परभणी, पुणे, अशा अनेक ठिकाणी फिरले. आसपासचे लोक 25 वर्षे वय बघून मला, काही नाही फक्त आठच दिवस, दोनच महिने सहाच महिने, आता संपेल…असं सांगून खंबीर करत होते. यावेळी माझी एम. ए. इंग्लिशची डिग्री काहीही कामात येत नव्हती ना कुणाकडून औपचारिकता म्हणून आलेला मदतीचा पैसा. माझी उभारणी यावेळी दोनच व्यक्तींनी केली. पहिला म्हणजे माझा मुलगा. आठवड्यातून दोन वेळा होणार्‍या माझ्या डायलिसिसला मी खंबीरपणे पुढे गेलं पाहिजे, यासाठी तो उत्तर ठरला आणि दुसर्‍या म्हणजे डायलिसिस टेक्निशियन कविता दास मॅडम, ज्यांनी माझ्यात खर्‍या अर्थाने डायलिसिसबद्दल खरीखुरी जागरूकता निर्माण केली.

2) आरोग्य ही प्राथमिक जबाबदारी मानण्याची अटकळ आपल्या देशात कधी होणार, याबाबत काय मत आहे?
आपण आजही अशा ठिकाणी राहतो, जिथे खायला नसलं तरी चालेल, पण चेहर्‍यावरची रंगरंगोटी असावी. तुम्हाला आयुष्यात पैसा कमावण्याच्या संधी पावला पावलावर मिळतील, पण आरोग्य ही संपत्ती पुन्हा पुन्हा नाही कमावता येत. या गोष्टी आता मला अंगवळणी आहेत. पाणी हेच जीवन हे ब्रीद वाक्य आपण पाच सहा वर्षांचे असल्यापासून ऐकत असतो, पण आज मला पाणी थोडंही जास्त पिण्यात आलं, तर दम लागणे, सूज येणे असे त्रास होतात. हा त्रास कायमचा संपावा, म्हणून अनेकांनी किडनी ट्रान्सप्लांटचादेखील पर्याय दिला, पण समोर पंधरा लाखांचा डोंगर, तो कसा सर करू…? लोकांना कशाने शहाणपण येतं माहीत नाही, पण मला मात्र एक वेळच्या सुसाईड प्रयत्नांनी आलं. म्हणून माझा दहा वर्षांचा मुलगा जेव्हा मला म्हणतो की, आई तू आय. ए. एस. अधिकारी नाही झाली ना काही नाही, मी तुझं स्वप्न पूर्ण करेन हे ऐकल्यानंतर मात्र वाटतं की मी नशीबवान आहे की मी त्या सुसाईडनंतर आज सुरक्षित आहे…

- Advertisement -

3) तुझ्या वाट्याला आलेल्या संघर्षाला सामोरे जाताना कोणत्या अडचणी आल्या?
मंगळवारच्या डायलिसिस नंतर पंचवीस हजार संपले की शुक्रवारची चिंता. त्यात आई वडिलांना सतत लागून राहणारी काळजी, की मुलगी घरातून डायलिसिससाठी गेली तर खरं, पण दवाखान्यात सुखरूप पोहोचेन की नाही, पण बघायला गेलं तर या सर्व अडचणी प्रात्यक्षिक होत्या, ज्यांच्यावर मी कदाचित मात करू शकत होती. आरोग्याच्या पलीकडे जे सुधारता येत नव्हतं, ते म्हणजे माझ्याच असणार्‍या काही लोकांचे ‘प्रतिष्ठित’ विचार. मला आजार काय लागला, सासरच्यांनी तर हातातल्या जीवा सकट सोडून दिलं. मला स्वतःचे सो कॉल्ड हितचिंतक म्हणवणारे लोक, मुलगा देऊन टाक, तुझ्यावर ताण नको असे सल्ले देऊ लागले. उत्तराला प्रत्युत्तर करण्याइतकी खंबीर त्यावेळी मी मानसिक, आर्थिक आणि सामाजिकदेखीलदृष्ठ्या नव्हते. या अडचणींना दुर्लक्षित करणं हा एकच पर्याय माझ्यासमोर नेहमी राहिला. मी स्वत:ला फक्त एकच सांगत होते की हे सर्व अवघड आहे, पण अशक्य नाही.

4) रोटरीच्या आरोग्याबाबतच्या सामाजिक भावनेविषयी काय मत आहे?
मी बाहेरगावी डायलिसिसला जायची त्यावेळी प्रचंड अडचणी होत्या. रोटरी डायलेसिसमुळे आज मला पैशांची चिंता सतावत नाही. माझ्यासारख्या व्यक्तीला आज हे जीवनदान मिळालं आहे. रोटरी डायलिसिस म्हटलं की, डॉक्टर प्रकाश जगताप समोर येतात. तिथे गेलं की सरांचे शब्द अगदी नव्या जोमाने फ्रेश करतात. रोटरीची ही मोफत डायलिसिसची सेवा माझ्यासारख्या अनेक लोकांना खर्‍या अर्थाने मिळालेला बोनस आहे.

5) तुझ्यावर बेतलेल्या प्रसंगातून आजच्या तरुणाईला काय सांगशील?
मुलींना खासकरून सांगावेसे वाटेल, की जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभ्या राहत नाही तोपर्यंत लग्न करू नका. मुळेपणा आधी जसा माझ्या नसानसात भिणलेला होता, पण मी अनुभवातून घडली. चांगलं आयुष्य जगण्यासाठी घर आणि पैसे हवेत. हक्काने जगता आलं पाहिजे. नाहीतर असे प्रसंग उद्भवतात, तेव्हा ना इथे अशी अवस्था होते. माझ्या आई-वडिलांमुळे मी वाचली. आज तीस मुलांची शिकवणी घेते. स्वतःच्या पगारावर काही करण्याचा घेण्याचा आनंद वेगळाच असतो. म्हणून स्वतःच्या हिमतीवर जगायला शिकलं पाहिजे.

6) अजून काही जे शेअर करावंस वाटतंय…?
ज्या गोष्टी मी बोलू शकत नाही, त्या मी डायरीत लिहून ठेवते. कारण मला माहितीये की, मी एक दिवस जाणार आहे. माझ्याच वयाची माझ्याच समोर डिलिव्हरी झालेली आणि दोन्ही किडन्या खराब झालेली मुलगी जेव्हा बघितली, तेव्हा आता करायचं ते मुलासाठी करायचं, हे समजलं. कारण मी माझ्यासारखं कोणीतरी माझ्याच समोर बघत होती. सुसाईडच्या प्रयत्नानंतर दोन वर्षे माहेरी राहूनदेखील नवरा घ्यायला आला नाही, मग स्वतःला विचारलं की यापेक्षा वाईट माझ्यासोबत काय होऊ शकतं. आपल्याबाबत जे घडतं, त्यामागे काही ना काही तरी कारण असतं. ते आपण पॉझिटिव्ह घ्यायचं आणि जगायचं. कारण माझा दहा वर्षांचा बलदेव मला जसं म्हणतो तसं, इथे एका सेकंदात रात बदलते…

–(लेखिका रोटरॅक्ट क्लब ऑफ सटाणा प्राईडच्या सदस्य आहेत)

- Advertisment -