आदर्शवाद आणि वाद

वादाची अनेक भावंडे आहेत. वाद, प्रतिवाद, वादासाठी वाद, वितंडवाद, बौद्धिक वाद, सुसंवाद, आदर्शवाद. यापैकी काही व्यक्तिपरत्वे प्रिय-अप्रिय आहेत. काहींना वाद करायला आवडतो त्यात काही गैर नाही, पण केवळ वादासाठी वाद करणे जर मला अप्रिय असेल तर एखाद्याला आसुरी आनंदही मिळत असेल. प्रतिवाद हा न्यायासाठी किंवा अन्यायासाठी असू शकतो. मला शास्त्रीय संगीताची जाण आहे म्हणून जर भीमसेन जोशी माझे आदर्श असतील, पण तेच शास्त्रीय संगीताशी दुरान्वये संबंध न आल्यामुळे एखाद्या व्यक्तीला रटाळवाणेही वाटू शकतात, परंतु दुसर्‍याच्या आवडीबद्दल मी कसं व्यक्त होतो यावर वाद किंवा सुसंवाद ठरू शकतो.

–प्रशांत कळवणकर

एका सर्वसामान्य मनुष्याच्या दृष्टिकोनातून आदर्शवादाची परिपूर्ण कल्पना ही अशक्य तर आहेच पण व्यक्ती, स्थिती, कालसापेक्ष जरूर आहे. त्याबद्दल होणारी मतमतांतरे ही मनुष्याची स्वाभाविक वैशिष्ठ्ये आहेत. महात्मा गांधी असो अथवा तत्सम कोणतेही अभिजन असो ते अभिजन ठरतात त्यांच्यातल्या काही खास वैशिष्ठ्यांमुळे, अभिव्यक्तीमुळे. असली माणसे त्यांच्या आचार-विचाराने सामान्य माणसाला सहज साध्य नसणार्‍या आदर्शवादाच्या कल्पनेच्या बर्‍यापैकी जवळ पोहचलेली असतात. बहुसंख्येने समाज त्यांना ती जागा देतो, यासाठी ती व्यक्ती सर्वमान्य असलीच पाहिजे असाही आग्रह नसतोच आणि नसावा. ‘व्यक्ती तितक्या प्रवृत्ती’ या उक्तीप्रमाणे प्रत्येक व्यक्ती त्याचा अनुभव, आकलनक्षमता, काळ, परिस्थिती इत्यादींमुळे घडत असतो आणि त्यानुसार अभिव्यक्त होतो. प्रत्येक मनुष्य प्राण्याला त्याच्यातल्या मर्यादांची बर्‍यापैकी जाणीव असते आणि त्या मर्यादा व्यक्तिपरत्वे भिन्न असतात, यात आर्थिक, मानसिक, शारीरिक, परिस्थितीक इत्यादीचा प्रभाव असतो.

व्यक्तीला उपजत प्राप्त झलेली बुद्धिमता, आकलन क्षमता, त्यावर झालेले संस्कार आणि त्याचा सर्व बर्‍या वाईट गोष्टींकडे पाहण्याचा सकारात्मक अथवा नकारात्मक दृष्टिकोन, सद्सद्विवेकबुद्धी, जिज्ञासा, कार्यकारणभाव जाणून घेण्याची क्षमता आणि चिकित्सा करण्याची पद्धत इत्यादी गोष्टी सदर व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व घडवत असतात.

गांधीजी, फुले, आंबेडकर किंबहुना नरेंद्र मोदी इत्यादी अभिजन अभावानेच परंतु प्रभावाने सिद्ध होतात. प्रत्येकाच्या अंगी असलेल्या विशिष्ट गुणांमुळे तत्सम व्यक्ती ही समाजमान्य होते. महात्मा गांधी सत्य, अहिंसा, अपरिग्रह ह्या तत्त्वज्ञानामुळे जगनमान्य झालेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रखर बुद्धिमता, आपल्या लोकांबद्दल असलेली सहृदयता व संविधानाच्या लिखाणामुळे लोकमान्य झालेत. फुले सर्वशिक्षण अभियानामुळे, स्त्रीशिक्षण, विधवा विवाहासाठी आग्रही राहिल्यामुळे महात्मा झालेत, तर नरेंद्र मोदी हे त्यांच्यातल्या ओघवत्या वक्तृत्व शैलीमुळे प्रसिद्ध पावलेत. असली माणसे ही एकमताने आदर्श नसतात तर बहुमताने असतात.

एकमत असते तर वाद शक्य नव्हता, बहुमत आहे म्हणून वाद आहे. ओसामा बिन लादेन किंवा आसाराम बापूसारखे आध्यात्मिक गुरू यांसारखी माणसेसुद्धा बहुमताने खलनायक ठरतात, एकमताने नव्हे. वादाचीही अनेक भावंडे आहेत वाद, प्रतिवाद, वादासाठी वाद, वितंडवाद, बौद्धिक वाद, सुसंवाद, आदर्शवाद ह्यापैकी काही व्यक्तीपरत्वे प्रिय अप्रिय आहेत. काहींना वाद करायला आवडतो त्यात काही गैर नाही, पण केवळ वादासाठी वाद करणे जर मला अप्रिय असेल तर एखाद्याला आसुरी आनंदही मिळत असेल. प्रतिवाद हा न्यायासाठी किंवा अन्यायासाठी असू शकतो. मला शास्त्रीय संगीताची जाण आहे म्हणून जर भीमसेन जोशी माझे आदर्श असतील, पण तेच शास्त्रीय संगीताशी दुरान्वये संबंध न आल्यामुळे एखाद्या व्यक्तीला रटाळवाणेही वाटू शकतात, परंतु दुसर्‍याच्या आवडीबद्दल मी कसं व्यक्त होतो ह्यावर वाद किंवा सुसंवाद ठरू शकतो.

स्वातंत्र्य मिळवण्यासाठी गांधीजींना अहिंसा मान्य होती, तर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू इत्यादींना हिंसेचा मार्ग मान्य होता. अर्थात साध्य एकच होते पण मार्ग भिन्न होते. जर माझे आदर्श गांधी ठरत असतील तर काहींना भगतसिंग आदर्श वाटत असतील, तर काहींना केवळ साध्याशी घेणं असेल आणि साधनांशी कर्तव्यही नसेल. वाल्मिकींना वैदिक तत्त्वज्ञान मान्य होते, तर रावणाला तांत्रिक, परंतु दोघांचेही चाहते आजही आहेत. हरित ऋषींनी लिहिलंय की, ‘श्रुतिश्च वेदानी तंत्रानी’ एकाच ध्येयाकडे जाणार्‍या वैदिक आणि तांत्रिक विचारधारा आणि आचरण मार्ग आहेत. आस्तिक विचार आणि नास्तिक विचारधाराही आहेत, परंतु ज्यावेळेस केवळ माझाच मार्ग हा उत्तम आणि माझ्या विपरीत विचारधारेचा मार्ग अवलंबणारा हा चुकीचा ही दुराग्रही भूमिका घेतली जाते तेव्हा वाद निर्माण होतो.

वाद शक्यतो बौद्धिक ताकदीचा आणि अभ्यासपूर्ण असेल तर त्यात एक वेगळाच गोडवा असतो, मात्र दोन्हीकडे विवेक असावा. जिंकणे व हरणे असली स्पर्धा नसावी, तर एकमेकांच्या विचारांबद्दल आदर असावा. आर्य चाणक्य म्हणतात की, मूर्खाला त्याच्या हा त हा करून जिंकावे, अहंकारीला त्याची प्रशंसा करून जिंकावे, तर पंडिताला सत्य बोलून जिंकावे. वाद हा पंडितांमधला असेल तरच तो अर्थपूर्ण ठरतो. आदर्शवादाच्या भिन्न विचारधाराच वाद निर्माण करतात. त्यामुळे सर्वांच्या सुविचारांचा आदर हाच सरतेशेवटी आदर्शवाद.