घरफिचर्ससारांशप्राचीन मातृदेवतांची ओळख

प्राचीन मातृदेवतांची ओळख

Subscribe

‘आदिमाया’ हे लेखक अशोक राणा यांचं पुस्तक पुण्याच्या प्राजक्त प्रकाशनाने जानेवारी २०१९मध्ये प्रसिद्ध केलं आहे. डॉ. अशोक राणा हे मराठी भाषा व साहित्याचे निवृत्त प्राध्यापक आहेत. मातृदेवतांच्या उपासनेचं रहस्य समजून घ्यायला सहाय्य व्हावं या हेतूने काही मातृदेवतांची ओळख या पुस्तकातून त्यांनी करून दिली आहे. यामुळे स्त्री सन्मानाचा संस्कार भावी पिढीत रुजेल अशी अपेक्षा लेखकाने व्यक्त केली आहे. भारतातल्या प्राचीनतम मातृदेवतांचा परिचय असल्यामुळे पुस्तकाला ‘आदिमाया’ असं शीर्षक दिल्याचं लेखकाने नमूद केलंय.

-प्रवीण घोडेस्वार

अशोक राणा यांची आतापर्यंत सुमारे ७० पेक्षा जास्त पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. वानगीदाखल आरोपीच्या पिंजर्‍यात संभाजी, इतिहासाचे विकृतीकरण, गणेश जन्माच्या कथेचा अर्थ, खोटच खोटं पण किती?, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, विठोबा कोणाचा?, शाक्तवीर शंभू राजे, शोध सरस्वतीचा, शिवराज्याभिषेक : पहिला व दुसरा इत्यादी काही उल्लेखनीय ग्रंथ सांगता येतील. त्यांची साप्ताहिक चित्रलेखामध्ये प्रसिद्ध झालेली ‘असत्याची सत्यकथा’ ही लेखमाला प्रचंड गाजली होती. यातल्या लेखांचं पुस्तकही नंतर प्रसिद्ध झालंय. डॉ. राणा अनेक परिवर्तनवादी उपक्रमांमध्ये वेळोवेळी आपला सक्रिय सहभाग नोंदवत असतात.

- Advertisement -

सध्या जगातल्या अनेक राष्ट्रांमध्ये पुरुषसत्ताक व्यवस्था व संस्कृती कार्यरत आहे. मातृसत्ताक व स्त्रीप्रधान व्यवस्था व संस्कृती असलेले देश अभावानेच आढळतात. प्राचीन कालखंडात स्त्रिया समाजाचं नेतृत्व करत होत्या. केवळ नेतृत्वच नाही तर कुटुंबातल्या संपत्तीची मालकीही महिलांकडेच होती. परिणामी समाजातलं त्यांचं स्थान अतिशय मानाचं होतं. सक्षमता व सन्मान यामुळे स्त्रियांचं शोषण करायला कोणी धजावत नव्हतं. स्त्रीसन्मानाचं प्रतीक म्हणून समाजातल्या कर्तृत्ववान स्त्रियांना त्यांच्या निधनानंतर मातृदेवता मानलं जाऊन त्यांची उपासना करण्याची पद्धत सुरू झाली. जगभरात त्यामुळेच मातृदेवतांच्या उपासनांचे अवशेष आढळून येतात. काळाच्या ओघात स्त्रीसत्ताक/स्त्रीप्रधान समाजाची पीछेहाट होऊन पुरुषसत्ताक/पुरुषप्रधान समाज स्थापित झाला.

आज सगळीकडे पुरुषी वर्चस्वाचा नगारा वाजत आहे. त्यामुळे जगभरात महिला दुय्यम नागरिक असल्याचं वातावरण दिसून येतं. स्त्री ही एक उपभोगाची वस्तू आहे, अशा मनोवृत्तीतून पुरुष त्यांच्यावर मालकी हक्क गाजवतात. तद्वतच संधी मिळाल्यावर त्यांच्यावर अन्याय-अत्याचार करायला कचरत नाहीत. मातृदेवतांच्या पूजनाची परंपरा असलेल्या भारतात असं घडतंय हे विशेष! मातृदेवतांच्या उपासनेचं रहस्य समजून घ्यायला सहाय्य व्हावं या हेतूने काही मातृदेवतांची ओळख या पुस्तकातून करून दिली आहे. यामुळे स्त्री सन्मानाचा संस्कार भावी पिढीत रुजेल अशी अपेक्षा लेखकाने व्यक्त केलीय. भारतातल्या प्राचीनतम मातृदेवतांचा परिचय असल्यामुळे पुस्तकाला ‘आदिमाया’ असं शीर्षक दिल्याचं लेखकाने नमूद केलंय.

- Advertisement -

या पुस्तकात निऋती, लक्ष्मी, सीरिमा, मायादेवी, गजलक्ष्मी, असुरलक्ष्मी, ज्येष्ठा, सटवी, सिंधू मातृका, साती आसरा, अमावस्या, जीवती, हारिती, कद्रू, दिती, दनू, अदिती, सीता, माया, मनसा, पूतना, होलिका, हिडिंबा, महाविद्या, सरस्वती, कामाख्या इत्यादी मातृदेवतांची ओळख करून दिलेली आहे. प्रत्येक मातृदेवता एकमेकीशी जवळकीचं नातं सांगत असते. त्यांचं स्वरूप या अर्थाने वैश्विक असतं, तर काहींनी इतकी लोकप्रियता मिळवली आहे की त्या अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या नावांनी परिचित आहेत. काहींनी तर देशांतर करून त्या-त्या देशाचं नागरिकत्वच जणू काय स्वीकारलं आहे. इतक्या प्रमाणात वंदनीय ठरलेल्या या मातृदेवतांनी त्या देशांच्या आदिमातांचं स्थान प्राप्त केलंय.

या अर्थाने विश्वमातांनी विश्वसंचार केला आहे. त्यांची ओळख करून घेणं म्हणजे खर्‍या अर्थाने वैश्विक होणं आहे, अशी मांडणी लेखकाने आदिमायेचा विश्वसंचार विशद करताना केलीय. भारतामध्ये स्त्रियांना अबला म्हणण्याची संस्कृती (की विकृती?) आहे. स्त्री हे नरकाचं द्वार आहे. सर्व मादक पदार्थांचं परमोच्च टोक आहे म्हणून ‘चित्रीची स्त्री न पहावी’ असे आदेश आपल्या अनुयायांना देणारे धर्म-पंथ इथं अस्तित्वात आहेत. दिवसाआड बायकोला व तासाआड पशूला मारण्याची अजब नीती सांगणार्‍या स्मृतींमध्ये जिथे स्त्रियांची पूजा होते, तेथे देवता राहतात असा उच्च विचारही सांगितला आहे. आचार व उच्चारातील विसंगतींनाही येथे प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. तेथे खूप प्रामाणिकपणा व पारदर्शकतेची अपेक्षा करणं भाबडेपणाचं ठरेल, असं महत्त्वपूर्ण प्रतिपादन लेखक करतात.

भारतातल्या स्त्रीसत्ताक गण समाजाचं नेतृत्व करणारी एक कर्तबगार स्त्री म्हणून निऋतीचं स्थान ऐतिहासिकदृष्ठ्या अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून तिला आद्यगणमाता संबोधलं जातं, असं लेखक म्हणतात. तसेच निऋतीचं सीरिमा, श्रीलक्ष्मी, गजलक्ष्मी असं रूपांतर कशा पद्धतीने झालं याचाही आढावा पुस्तकात घेतलाय. विशेषत: दिवाळी सणाची देवता म्हणून तिचं महत्त्वाचं स्थान अधोरेखित केलंय. या अनुषंगाने यक्षसंस्कृती, त्यातलं कुबेराचं स्थान, कुबेर व लक्ष्मी यांचं साहचर्य तसेच पुढे गजलक्ष्मीला मिळालेली लोकप्रतिष्ठा, बौद्ध धम्मामध्ये बुद्धमाता मायावती म्हणून शालभंजिका व गजलक्ष्मीकडे पाहण्याची दृष्टी यांचीही चर्चा लेखकाने केलीय.

भारतात मातृपूजेची संस्कृती मेसोपोटेमियामधून आल्याचं अभ्यासकांचं मत सिंधू संस्कृतीच्या शोधाने चुकीचं ठरलं. सिंधू संस्कृतीच्या उत्खननात मातृसत्ताकतेचे अवशेष मिळाले आहेत. त्याचप्रमाणे अप्सरा याही मातृदेवता होत्या, पण वैदिक व पौराणिक ग्रंथांमध्ये अप्सरांची क्षुद्र देवता म्हणून हेटाळणी केलीय. आपल्याकडे अमावस्या अशुभ समजली जाते, मात्र हिंदू धर्माचा सगळ्यात मोठा सण दिवाळी अमावस्येला का असतो याची मीमांसा उद्बोधक आहे. भारतातली आद्यगणमाता निऋतीचं विकसित रूप ‘हारिती’ असून ती बौद्ध परंपरेनुसार आधी एक यक्षी होती. आर्यपूर्व समाजात स्त्रियांचं स्थान सन्मानाचं होतं. या काळातली कर्तृत्ववान स्त्री म्हणजे दिती. संस्कृतमध्ये दिती म्हणजे तेज किंवा बुद्धिमत्ता.

यावरून ती बुद्धिमान असल्याचं आणि तिचा तत्कालीन समाजावर प्रभावही असल्याचं दिसतं, मात्र तिची उज्ज्वल प्रतिमा मलिन करण्यासाठी पुराणकारांनी तिला उच्छृंखल व कामुकवृत्तीची चित्रित केली असल्याचं लेखकाने साधार स्पष्ट केलंय. भारतीय परंपरेतली जलदेवता दनू किंवा दानू, मातंगी रेणुका, आदिवासी जमातींची मातृदेवता मनसा यांच्याविषयीदेखील महत्त्वाची मांडणी केलीय. मातृदेवतांना हीन समजण्याच्या उद्देशाने बालरक्षक पूतनाला बालभक्षक कोणी व कसं केलं? कंसमामा व पूतना मावशी ही प्रतीकं खलनायकी कशी करण्यात आली, होलिका दहनामागचं वास्तव, मातृदेवता हिडिंबाचं विकृतीकरण, पुरुषी शोषणाचं प्रतीक सरस्वती यासंदर्भातलं लेखकाने केलेलं विवेचन नवी दृष्टी प्रदान करणारं आहे. यामुळे प्रचलित समजांना धक्का बसून वास्तव किती वेगळं आहे याचा प्रत्यय येतो.

दामोदर कोसंबी, कॉ. शरद पाटील, आ. ह. साळुंखे, डॉ. रा. चि. ढेरे, डॉ. आनंदकुमार स्वामी, पंडित महादेवशास्त्री जोशी, डॉ. बाळकृष्ण दाभाडे, देवीप्रसाद चटोपाध्याय, डॉ. सांकलिया अशा विद्वानांच्या संदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन डॉ. राणा यांनी हा अत्यंत मौलिक ग्रंथ सिद्ध केलाय. आपल्या मातृदेवतांची महती सांगणारं हे पुस्तक केवळ अभ्यासकांनीच नव्हे तर सर्वसामान्य वाचकांनीही आवर्जून वाचायला हवं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -