-संदीप वाकचौरे
राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर झाले. त्यापाठोपाठ राष्ट्रीय आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा जाहीर झाला. त्यानंतर शिक्षणाच्या प्रक्रियेत परिवर्तनासाठीच्या पाऊलवाटा निर्माण करण्यात आल्या आहेत. धोरणाची अंमलबजावणी होत असताना नव्याने काही संस्था निर्माण होतील. त्याचबरोबर अभ्यासक्रमातही बदल होईल. त्यापाठोपाठ पाठ्यपुस्तके बदलतील. धोरणाप्रमाणे विद्यार्थ्याचे ३६० डिग्री अर्थात समग्र मूल्यमापन अपेक्षित केले आहे. त्यासाठी प्रगती पुस्तकात बदल होणार आहे.
अर्थात केवळ प्रगती पुस्तक बदलेल असे नाही तर सध्याच्या मूल्यमापन प्रक्रियेत बदलही घडेल. त्यामागील विचारात बदल घडेल. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना केवळ बौद्धिक आणि तेही केवळ संख्यात्मक मूल्यमापनापुरता विचार न करता शिक्षणातून जी ध्येय, उद्दिष्टे, क्षमता, अध्ययन निष्पत्ती अपेक्षित केल्या आहेत त्या सर्वांचे मापन करण्याची अपेक्षा ठेवण्यात आली आहे, मात्र त्याचवेळी आराखड्यात वर्तमानकालीन मूल्यांकनाचा दृष्टिकोनही नमूद करण्यात आला आहे.
दृष्टिकोन आणि विचार प्रक्रियेत परिवर्तनाची अपेक्षा करण्यात आली आहे. शिक्षणाच्या प्रक्रियेकडे आपण जोपर्यंत मूलभूत दृष्टिकोनातून पाहत नाही तोपर्यंत मूल्यमापनातील बदलांचा विचार रूजण्यात आव्हाने कायम राहणार आहेत. धोरणे, आराखडे, आयोग, समित्या येतात, मात्र शिक्षण प्रक्रिया आणि परीक्षेसंदर्भात जोवर मूलभूत विचार रूजत नाही, तोवर शिक्षणाच्या प्रक्रियेतून अपेक्षित माणूस घडण्याची शक्यता नाही.
शिक्षणाचा विचार जेव्हा केला जातो तेव्हा शिक्षणात विद्यार्थ्यांच्या समग्र विकासाची अपेक्षा असते. शिक्षणाची उद्दिष्टेदेखील त्या दिशेने आखण्यात आली आहेत, मात्र वर्तमानात परीक्षांकडे मूल्यमापनाच्या व्यापक दृष्टीने न पाहता केवळ मार्कांपुरता विचार केंद्रिभूत झाला आहे. त्यामुळे शिक्षणाकडून अपेक्षित केलेली उद्धिष्टे साध्य न होता केवळ परीक्षाकेंद्रित विचाराने शिक्षणाची प्रक्रिया पुढे जात आहे. यापूर्वी केवळ दहावी, बारावीच्या परीक्षांच्या संदर्भाने केला जाणारा विचार अलीकडच्या काळात अगदी प्राथमिक स्तरापासून केला जाऊ लागला आहे.
शिक्षणापेक्षाही परीक्षेतील मार्कांनाच अधिक महत्त्व आले आहे. आराखड्यात परीक्षेसंदर्भाने वर्तमानातील दृष्टिकोन व्यक्त करताना म्हटले आहे की, माध्यमिक स्तरावरील परीक्षा मंडळाच्या परीक्षांचा विद्यार्थी आणि पालकांवर मोठा ताण असतो. या परीक्षेत अधिकाधिक गुण मिळावेत अशी मानसिकता पालकांची झाली आहे. वर्षातून एकदा परीक्षा होते. त्यामुळे काही कारणाने विद्यार्थी अनुपस्थित राहिल्यास किंवा पेपर अवघड गेल्यास पुन्हा दुसरी परीक्षा देण्याची संधी नाही.
अधिकांश परीक्षांचा कल हा माहितीचे एकत्रीकरण तपासण्याकडे असतो. त्यामुळे व्यक्तिमत्त्व विकसनाचे मूल्यमापन होऊ शकत नाही. खासगी शिकवणीमुळे परीक्षा मंडळाच्या परीक्षेला सामोरे जाणार्या विद्यार्थ्यांवर ताण वाढतो. असे असतानादेखील विद्यार्थ्यांचा कल खासगी शिकवणीकडे असतो. स्मरणावर आधारित परीक्षा होते. परीक्षा आणि चाचणी परीक्षा यांची विश्वासार्हता आणि वैधता याबाबत शंका घेतली जाते.
परीक्षेतील गैरप्रकार याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. वरील निरीक्षणाचा विचार करता परीक्षेचा विचार शिक्षणात किती केंद्रिभूत झाला आहे हे सहजपणे लक्षात येईल. मुळात आपल्याकडे शिक्षणाची प्रक्रिया महत्त्वाची मानली जात नाही. बालकांचे शिक्षण होण्यासाठीची एक विशिष्ट प्रक्रिया आहे. शिक्षण म्हणजे योग्य पद्धतीने विचार करण्याची प्रक्रिया असते.
शिक्षणात चिंतन, मननाची प्रक्रिया अपेक्षित आहे. ज्ञान निर्मितीकडे लक्ष दिले जाण्याची गरज असते, मात्र परीक्षेभोवती केंद्रित झालेल्या शिक्षण विचारामुळे ज्ञानापेक्षा माहिती पाठांतरावर अधिकाधिक भर दिला जात आहे. समाजाला परीक्षेतील मार्क म्हणजे गुणवत्ता वाटते. त्यामुळे शाळा मूलभूत शिक्षण विचारापेक्षा मार्क केंद्रित शिक्षण प्रक्रियेवर अधिक भर देत आहेत. पालकांना पाल्याच्या मूलभूत शिक्षण विचारापेक्षा मार्क हवे आहेत.
त्यामुळे मागणी तसा पुरवठा करण्याकडे शाळांचा ओढा वाढत आहे. प्रत्येक पालकाकडून आपला पाल्य शंभर टक्के मार्कांपर्यंत कसा पोहचेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी पालक पाल्यांच्या शाळेच्या शिक्षणापेक्षा शिकवणीवर भर देत आहेत. शिकवणीची वाट चालताना तेथे प्रात्यक्षिक, वर्गकार्य, तोंडी काम यापेक्षा मार्कांसाठी काम करून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. पालकांनादेखील ते हवे आहे.
पाल्याचे दहावी, बारावीचे वर्ष असले की पालकच अधिक तणावात असतात. जणू ती परीक्षा पाल्यांची नाही तर पालकांची वाटावी अशी परिस्थिती आहे. देशभरात विद्यार्थ्यांच्या ज्या काही आत्महत्या होत आहेत त्यात दहावी-बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या अधिक आत्महत्या आहेत. याचे कारण शिक्षण नाही तर केवळ परीक्षेचा असलेला तणाव आणि पालकांच्या उंचावलेल्या अपेक्षा याच यामागे कारणीभूत आहेत. पालक आणि पाल्यांच्या मनावर या परीक्षांचा अधिक ताण असतो.
या परीक्षा म्हणजे जणू काही पाल्याचे भविष्य अंतिम करणार्या आहेत. या परीक्षांना अधिक महत्त्व आल्याने देशभरात शिकवणीचे प्रस्थ वाढले आहे. त्यातून जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे. येथे अधिकाधिक मार्क मिळाले तर भविष्याच्या दृष्टीने अभियंता, वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेणे सुलभ होते. मुळात आपल्याकडे विशिष्ट अभ्यासक्रमांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.
प्रतिष्ठा मिळणारे अभ्यासक्रम पालकांच्या मनात आहेत, जे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मिळणार्या पदवीनंतर ते सर्वाधिक पैसा मिळवून देणारे आहेत म्हणून त्यांना प्रतिष्ठा मिळत आहे. ज्ञानाची उपासना म्हणून त्याचा विचार केला जात नाही. पालकांनीच ही प्रतिष्ठा आपल्या मनात निर्माण केली आहे. त्या वाटेने आपल्या पाल्याने जावे आणि आपले भविष्य आर्थिकदृष्ठ्या भक्कम करावे ही धारणा शिक्षणाचा आनंद हिरावून घेत आहे.
मागील वर्षी तर ९० टक्क्यांपेक्षा अधिकाधिक मार्क मिळवण्याच्या स्पर्धेत त्यापेक्षा अधिक मार्क मिळवणार्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ८० हजारांपेक्षा अधिक आहे. पाल्याला ९०- ९५ टक्के मार्क मिळूनही पालकांचे समाधान होत नाही. आज पैकीच्या पैकी मार्क हवे आहेत. त्यासाठी पाल्याला त्यांनी माणूस नाही तर जणू स्पर्धेचे घोडे मानून स्पर्धेत उतरवले आहे. त्याचे दुष्परिणाम भविष्यात भोगावे लागतात. शिक्षणाचा विचार अशा स्वरूपात केला गेल्याने शिक्षणाची प्रक्रिया आनंददायी मार्गापासून दुरावत आहे.
आपल्याकडील परीक्षा पद्धतीवर प्रश्नचिन्ह आहे. मुळात परीक्षांचा हेतू मुलं काय आणि कसं शिकत आहे हे जाणून घेणे आहे. त्याचबरोबर वर्गात जे काही अध्ययन अनुभव शिक्षकांनी योजले आहे ते अध्ययन अनुभव कितपत यशस्वी झाले आहेत याची पडताळणी करणे आहे. शिक्षणाची सर्व उद्धिष्टे ही काही लेखी परीक्षेतून मापली जातात असे घडत नाही. त्यामुळे त्यापलीकडे विविध साधनांचा विचार मूल्यमापन करताना केला जातो.
त्यातून तोंडी, प्रात्यक्षिक, प्रकल्प, गृहपाठ यांसारख्या विविध साधनांचा विचार केला जात असतो, मात्र ही साधने उपयोजनात आणताना त्यांची विश्वासार्हता फारशी राखण्यात शिक्षण व्यवस्थेला यश मिळू शकलेले नाही. त्यामुळे लेखी परीक्षाच अधिक विश्वासार्ह असल्याची मानसिकता निर्माण झाली आहे. हे आपल्या शिक्षण व्यवस्थेचे अपयश आहे असेच म्हणावे लागेल. मुळात शिक्षणातून आपल्याला समग्र विकासाची प्रक्रिया अपेक्षित असताना इतर विकासाच्या पैलूंकडे दुर्लक्ष होताना दिसते.
शिक्षणाचा विचार परीक्षा केंद्रित झाल्याने दुष्परिणामाला आपल्याला सामोरे जावे लागत आहे हे वास्तवही लक्षात घ्यायला हवे. मूल्यमापनासंदर्भात आणि विशेषत: अंतर्गत मूल्यमापनाच्या संदर्भाने गमावलेली विश्वासार्हता पुन्हा प्राप्त करण्याचे मोठे आव्हान शिक्षण व्यवस्थेसमोर आहे. ती मिळवली तरच समग्र मूल्यमापनाच्या दृष्टीने पावले सकारात्मक स्वरूपात पडतील अशी अपेक्षा आहे. सध्याच्या लेखी परीक्षेत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या संदर्भाने अपेक्षित पैलूंचे मूल्यमापन कसे करणार हा प्रश्न आहे.
शिक्षणात मार्क मिळाले मात्र व्यक्तिमत्त्व विकासाची वाट चालणे झाले नाही तर ते शिक्षण काय कामाचे? शिक्षणाचा विचार समग्रपणे करताना आपण ज्या वाटांचा प्रवास करतो त्या वाटा चालणे घडत नसेल तर जबाबदार नागरिक, उत्तम समाज आणि प्रगत राष्ट्राची वाट चालणे काहीसे कठीण आहे. आज भाषिक कौशल्यांचा विचार केला तर श्रवण, भाषण, वाचन, लेखन, संभाषण या कौशल्यांचा विचार अधिक महत्त्वाचा असताना शिक्षणाच्या प्रक्रियेत शंभर टक्के विद्यार्थ्यांसाठी वाचन आणि लेखनावर अधिक भर दिला जातो, मात्र श्रवण, भाषण, संभाषणाकडे फारसे गंभीरपणे पाहिले जात नाही. परीक्षेला जे येणार नाही त्याचा अभ्यास करावा असे वाटत नाही.
पालकही त्याकडे लक्ष देण्याच्या बाबतीत गंभीर असत नाहीत. शिक्षण म्हणजे माणूस घडवण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य ज्या कौशल्यांच्या पायावर उभे राहणार आहे ती कौशल्ये शाळा, महाविद्यालयात पदवी घेऊनही साध्य झालेली दिसत नाही. आपले विचार, मते प्रगट करण्यात अनेकांना अडचणी येतात. उत्तम संवाद, वादविवाद करण्याचे कौशल्य अनेकांना जमत नाही. त्याचबरोबर लेखन कौशल्यदेखील आत्मसात होण्याचे प्रमाण किती आहे, हा प्रश्न आहे.
याचे कारण शिक्षणात मार्क महत्त्वाचे आहेत. त्यामुळे व्यक्तिमत्त्व विकासाकडे होणार्या दुर्लक्षाने आपल्याला उत्तम समाजनिर्मितीच्या दिशेने पावले टाकता आलेली नाहीत. राज्य अभ्यासक्रम आराखडा परीक्षा पद्धतीबद्दल ज्या मुद्यांवर चिंता व्यक्त करीत आहे, त्याबद्दल समाजानेदेखील अधिक गंभीरतेने विचार करायला हवा. शिक्षणाची प्रक्रिया आनंददायी असायला हवी असेल तर मूल्यमापनाचा बदलता विचार समजावून घेण्याची गरज आहे.