– प्रियंका खैरनार
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल, टीव्ही आणि इंटरनेट हे मुलांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. तंत्रज्ञानाचा योग्य वापर झाला, तर ते शिक्षण, मनोरंजन आणि ज्ञानाचा स्त्रोत ठरू शकते. परंतु, पालकांनी या माध्यमांचा वापर करताना सावधानता आणि जबाबदारी बाळगणे आवश्यक आहे. आज लहान मुले रडू नयेत, शांत बसावीत किंवा खेळण्याच्या उर्मीवर नियंत्रण ठेवावे, यासाठी अनेक पालक सहजपणे मोबाईलमध्ये कार्टून लावून देतात किंवा टीव्हीवरील कार्टून चॅनेल चालू करून देतात. हे करताना मात्र अनेक पालक नकळत काही महत्त्वाचे मुद्दे दुर्लक्षित करतात.
कोरोनानंतर प्रत्येक वयाच्या मुलांमध्ये खूप बदल झाले असंच सर्रास म्हटलं जातं. कारण इथूनच मुलांना मोबाईल बर्यापैकी ओळखीचा झाला, पण आता कोरोना संपून पाच वर्षं उलटत आली. वास्तव हे आहे की, आजच्या काळात टीव्ही, मोबाईल आणि इंटरनेटचा वापर लहान मुलांमध्ये अगदीच झपाट्याने वाढत आहे आणि यामुळे मुलांवर वाईट गोष्टींचा प्रभाव पडण्याचा धोका रोजच वाढतो आहे. अशा प्रकारच्या न समजलेल्या कृती मुलांच्या वर्तनावर दीर्घकालीन परिणाम करू शकतात, याकडे मात्र पालक म्हणून आपल्याला किंवा शिक्षकांनासुद्धा म्हणजे कोणालाही कानाडोळा करून चालणार नाही.
कार्टून ही मुलांसाठी केवळ मनोरंजनाची साधने नाहीत, ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि विचारसरणीवरदेखील मोठा प्रभाव टाकतात. परंतु, भारतात उपलब्ध असलेल्या बहुतांश कार्टून मालिकांची निर्मिती परदेशात झालेली असते. त्यामुळे त्यामध्ये प्रामुख्याने परदेशी संस्कृती, शिष्टाचार आणि जीवनशैली दाखवली जाते. उदाहरणार्थ, परदेशात हृदयातील भावना व्यक्त करण्यासाठी किंवा स्वागतासाठी चुंबन घेण्याची पद्धत आहे, जी कार्टूनच्या माध्यमातून सहजपणे मुलांच्या नजरेस येते. लहान मुलांना यातील योग्य-अयोग्यतेचा फारसा बोध होत नाही, त्यामुळे ते याचे अनुकरण करतात.
लहान मुले ही नैसर्गिकरित्या जिज्ञासू असतात. त्यांच्या विचारप्रक्रियेत आणि वर्तनात अनुकरणाची प्रवृत्ती असते. त्यांनी पाहिलेल्या प्रत्येक गोष्टीची समज नसते, ती फक्त ते पाहतात, शिकतात आणि अनुसरतात. कार्टूनमधील पात्रांच्या वर्तनाचे अनुकरण करताना त्यांच्या मनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होऊ शकतात. उदाहरणार्थ, हस्तांदोलन हा सामाजिक सौजन्याचा भाग असतो, पण चुंबन घेण्याची पद्धत भारतातील पारंपरिक शिष्टाचारांशी फारशी सुसंगत नाही. अशा गोष्टी पालकांच्या दृष्टिकोनातून चिंताजनक ठरतात.
मुलांच्या मानसिक आणि सामाजिक विकासात पालकांची भूमिका खूप महत्त्वाची असते. पालकांनी लहान मुलांसाठी योग्य आणि वयाला समर्पक माध्यमांची निवड करणे गरजेचे आहे. मुलांना मोबाईल किंवा टीव्ही देण्याआधी पालकांनी विचार करावा की ते काय पाहत आहेत, त्यातून काय शिकत आहेत, आणि त्याचा त्यांच्यावर कसा परिणाम होईल. मुलांनी कार्टून बघावेच, पण त्यामधून ज्ञान, नैतिकता आणि सृजनशीलता वाढवणारी मालिका निवडणे आवश्यक आहे.
यासाठी पालकांनी इंटरनेट किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या शैक्षणिक कार्यक्रमांचा शोध घेऊन त्यांचा उपयोग करावा. भारतात तयार होणारी काही कार्टून्स, जसे की छोटा भीम, मोटू पतलू किंवा बाल गणेश, ही मुलांना मनोरंजनासोबत भारतीय संस्कृतीशी परिचित करून देण्याचे काम करतात.
अशा घटनांमुळे मुलांच्या नैतिकतेवर परिणाम होतो. वयाच्या आत खेळायचे व शिकायचे असताना मुलांना चुकीच्या वागणुकीची ओळख होते. अशा घटनांमुळे पालक आणि शिक्षकांमध्ये नाहक एक दरी तयार होते. शिवाय मुलांमध्ये टीव्ही किंवा मोबाईलवरील पात्रांचे अनुकरण करण्याची प्रवृत्ती वाढते आहे, जी नेहमी योग्य नसते.
अशा घटना घडण्यामागील कारणांचाही विचार होणे गरजेचे आहे. खरे तर, मुलांमध्ये सध्या डिजिटल माध्यमांचा अतिरेकी वापर सुरू आहे. लहान वयातच मोबाईल किंवा टीव्हीचा अतिवापर हे याचे मूलभूत कारण आहे. पालकांचे दुर्लक्ष हेदेखील कारण महत्त्वपूर्ण ठरते. पालकांकडून मुलांच्या पाहण्याच्या सवयींवर आणि त्यांना दाखवल्या जाणार्या कार्यक्रमांवर पूर्णपणे लक्ष दिले जात नाही. अभ्यास झाला असेल तर थोडा टीव्ही बघून घे.
असे म्हटले जात असल्यामुळे मुलांचा ओढा डिजिटल माध्यमांकडे असतो. शिक्षणातून योग्य मार्गदर्शनाचा अभाव हेदेखील एक कारण होऊ शकते. शाळेतही अशा गोष्टींवर शिकवण्याची गरज आहे की, कोणत्या कृती योग्य आहेत आणि कोणत्या नाहीत. कारण आजही अनेक विद्यार्थ्यांसाठी शिक्षक सांगेल तीच पूर्व दिशा आहे. अशा वेळी पालकांची आणि शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरते.
यासाठी पालकांनी मोबाईल आणि टीव्हीचा आपल्या पाल्यांना मर्यादित वापर करू द्यावा. मुलांना तांत्रिक साधनांचा मर्यादित वापर शिकवावा आणि प्रत्यक्ष मैदानाची ओळख करून द्यावी. मुलांसाठी वयाला अनुरूप कार्यक्रम निवडावे. उदाहरणार्थ टीव्हीवर डिस्कवरी, अॅनिमल प्लॅनेट, न्यूज चॅनल्सदेखील आहेतच की. मुलांवर सततच लक्ष ठेवून असू नये पण, मुलं काय पाहत आहेत, यावर लक्ष ठेवून संवाद मात्र नक्कीच साधावा.
शिक्षकांचीही भूमिका अशा प्रकरणात महत्त्वाची ठरते. यात मुलांचे मन वळवण्याला सर्वाधिक महत्त्व आहे. शाळेत नैतिक शिक्षण व कृतीशील उपक्रमांच्या माध्यमातून मुलांचे मन वळवावे. शिक्षकांनी पालकांशी संवाद साधावा. पालकांना त्यांच्या मुलांच्या वर्तनाचे निरीक्षण करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. मुलांचे कौशल्य विकसित करावे. टीव्ही आणि मोबाईलचा सकारात्मक उपयोग कसा करावा, हे शिकवले जावे. याच मोबाईलवर अभ्यास करून जर वीटभट्टीवर काम करणारा एक साधारण मजूर जर आरबीआयची परीक्षा पास होऊ शकतो, तर आपण का नाही?
आजच्या डिजिटल युगात मुलांवर टीव्ही, मोबाईल आणि इंटरनेटचा मोठा प्रभाव आहे. अशा परिस्थितीत, पालकांनी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून मुलांच्या पाहण्याच्या व वर्तनाच्या सवयींवर सतत लक्ष ठेवले पाहिजे. अनेक वेळा आपला मुलगा काय करतो, कोणत्या वर्गात शिकतो, त्याला कोणते शिक्षक आहेत, हेसुद्धा आपल्याला आपल्या धकाधकीच्या आयुष्यात माहिती नसते. शिक्षकांकडून ज्यावेळी तक्रार जाते की तुमचा मुलगा अभ्यास करत नाही त्यावेळी अनेक वेळा पालक म्हणून आपल्याकडून उत्तर दिले जाते, की तो तर नेहमी मोबाईलवर अभ्यास करतो.
पण आपला मुलगा मोबाईल घेऊन किंवा टीव्हीसमोर बसून अभ्यासच करतो आहे का, हेही बघणं तितकच आवश्यक आहे. म्हणून मोबाईल कसा वापरावा हे शिकवण्यासोबत तू किती वेळ वापरावा हेसुद्धा सांगणे आवश्यक आहे. आपल्या मुलाच्या योग्यतेनुसार टीव्हीचे चॅनेल आणि मोबाईलमधले अॅप्स निवडण्याचीसुद्धा आपल्याला मुभा आहेच की. आणि सर्वात महत्त्वाचं या सर्वांच्या पलीकडे आपण मुलांसाठी करतो आहोत, मुलांसाठी कमावतो आहोत या विचाराच्या मागे धावता धावता आपण हेच विसरून जात आहोत की त्याच आपल्या मुलांसाठी आपला संवाद खूप कमी पडतोय.
आज संवादच कदाचित ही दरी भरू शकेल. म्हणून शाळेत मार्गदर्शन शिबीर असो किंवा पालकांसाठी डिजिटल माध्यमाबाबत जागरूकता निर्माण करणं असो, पण तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला, तरच तो समाजासाठी वरदान ठरू शकतो. त्यामुळे पालकांनी आणि शिक्षकांनी मिळून मुलांचे भवितव्य घडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मुलं ही झाडाची फुलं असतात, हे लक्षात घेऊन त्यांना योग्य आकार देण्याची जबाबदारी आपली आहे.
-(लेखिका शिक्षिका आहेत)