घरफिचर्ससारांशवासुदेवाचं दान पावलं...

वासुदेवाचं दान पावलं…

Subscribe

मोठ्या भावानं डोक्यावरची टोपी फेकली. महादूला बघवलं नाही. त्यानं मुकाट ती टोपी उचलली. दुपारी पुरणपोळीचं जेवण झाल्यावर त्यानं बापाला सांगितलं... आजपासून ही टोपी माझी.. आजन्म वासुदेव घराण्याला राखीन, पण घरी वाटा मागायला कधी येणार नाही. बापही गहिवरला. म्हणाला..महादू पोरा..घराचं नाव राखशील. वासुदेव तुला आयुष्यात काय बी कमी पडून देणार न्हाई. माझा आशीर्वाद हाय आणि त्या दिवसापासून त्यानं ती मोरपिसी टोपी जवळ केली. तिलाच आयुष्याचं जोडीदार बनवलं. हे सगळं सांगता सांगता महादूची भाजी- भाकरी तयार झाली. गावाकडच्या आठवणींनी तो गलबलला.

एकदा सहजच मनात आलं.. काळारामाचं दर्शन घ्यावं. गावात आलो. एका सुरक्षित ठिकाणी गाडी लावली आणि चालत निघालो. सकाळचे सात वाजत आलेले. कुठुन मंदिरातील घंटेचा आवाज येतोय.. कुठे काकड आरती चाललीय. रामसेतू पार करून पुढे आलो तर कानावर स्वर पडले…

दान पावलं दान पावलं
वासुदेवाचं दान पावलं.

- Advertisement -

कितीतरी वर्षांनी हा आवाज ऐकला. लहानपणी गल्लीत येणारा वासुदेव आठवला. त्याची झांज चिपळ्यांची लय आठवली. त्या लयीवर घेणारी गिरकी आठवली. मी त्याच्या मागोमाग निघालो. पंचवटीच्या या भागात अजूनही काही वाडे ठामपणे उभे आहेत. त्या वाड्यांच्या दिंडीसमोर उभं राहून तो नाचू लागला. एक पाय पुढे..एक पाय मागे करत संतांची पदे गाऊ लागला. आजूबाजूला असणारे पर्यटक क्षणभर थांबत होते..त्याचं गाणं ऐकत होते. पदे गाताना तो हळुवारपणे गात होता, पण पद संपलं की त्याच्या टाळांचा आवाज मोठा होई.

तेवढ्यात एका वाड्यातून एक लहान बाळ दुडूदुडू धावत आलं. त्याच्याजवळ गेलं. त्याचा अंगरखा ओढू लागलं. वासुदेवानं त्याला उचलून घेतलं. बाळाच्या गालाचा पापा घेतला. वासुदेवाच्या मिशीनं त्याला गुदगुल्या झाल्या. बाळ त्याच्या टोपीला हात लावू लागलं. मग वासुदेवानं हलकेच त्या बाळाचा हात आपल्या टोपीवरून फिरवला. टोपीवरल्या मोरपिसांना धक्का न लागता. वासुदेवानं बाळाला हलकेच खाली उतरवलं. तो पुढे निघाला. एखाद्या वाड्यातून कोणी बाई येई. वासुदेवाला वाटीभर पीठ, तांदूळ देई. त्याच्या खांद्यावर दोन-तीन झोळ्या होत्या. काही बर्‍या होत्या, तर काही जीर्णशिर्ण झालेल्या. झोळीत पीठ, तांदूळ पडल्यावर तो मनभरून आशीर्वाद देई.

- Advertisement -

एका गल्लीतून दुसर्‍या गल्लीत जात वासुदेव नाचू लागला.

दान पावलं दान पावलं
वासुदेवाला दान पावलं
पंढरीच्या विठोबाला
जेजुरीच्या खंडोबाला
नाशकाच्या रामाला
त्रिंबकच्या निवृत्तीला
दान पावलं दान पावलं

उन्हं वर चढत गेली. गाणं म्हणून, नाचून वासुदेवही थकला. काळाराम मंदिरात आला. एका ओवरीत टेकला. तिथं त्यानं तात्पुरता संसार मांडला होता. डोक्यावरची मोरपिसांची टोपी व्यवस्थित बाजूला ठेवली. गळ्यातल्या कवड्यांच्या, रंगीबेरंगी मण्यांच्या माळा काढल्या. झोळीतलं धान्य बाहेर काढलं. त्या झोळीत माळा, टाळ, चिपळ्या ठेवल्या. अंगरखा काढला. आता तो त्या साध्याशा बंडीत वेगळाच दिसू लागला. मी त्याच्या शेजारी टेकलो. त्याचं लक्षच नव्हतं. हातावरील तंबाखू मळण्यात तो गर्क होता.

नमस्कार पावणं..कुठले तुम्ही? म्हणत बोलायला सुरुवात केली. त्याचं नाव महादू. तो पार तिकडे विदर्भातला होता. ‘वासुदेवकी’ घरात वंशपरंपरेने चालत आलेली. अगदी दहा पिढ्यांपासूनची. भावंडात जो मोठा तो वासुदेव हे ठरलेलं. त्यानं गावोगावी फिरायचं. बाकीच्यांनी शेतीवाडी सांभाळायची. महादू धाकटा. एकदा मोठा भाऊ म्हणजे वासुदेव गावोगावी फिरून घरी आला. दिवाळीसाठी, पण मधल्या भावानं त्याला शेतीचा वाटा नाकारला. तू काय वासुदेव.. तुला लई मिळतं. तरी बी तुला हवंय आहे अजून. एवढं तीर्थक्षेत्री हिंडतो..रहातो..कमावतो तरी तुझी बुद्धी नाय पालटली. शब्दानं शब्द वाढत गेला. रागारागाने मोठ्यानं डोक्यावरची टोपी फेकली. महादूला बघवलं नाही. त्यानं मुकाट ती टोपी उचलली. दुपारी पुरणपोळीचं जेवण झाल्यावर त्यानं बापाला सांगितलं…

आजपासून ही टोपी माझी. आजन्म वासुदेव घराण्याला राखीन, पण घरी वाटा मागायला कधी येणार नाही. बापही गहिवरला. म्हणाला..महादू पोरा..घराचं नाव राखशील. वासुदेव तुला आयुष्यात काय बी कमी पडून देणार न्हाई. माझा आशीर्वाद हाय आणि त्या दिवसापासून त्यानं ती मोरपिसी टोपी जवळ केली. तिलाच आयुष्याचं जोडीदार बनवलं. हे सगळं सांगता सांगता महादूची भाजी-भाकरी तयार झाली. गावाकडच्या आठवणींनी तो गलबलला. त्याला भावंडांना गमावल्याचं दुःख नव्हतं. शेतीवाडी गेल्याची खंत नव्हती, पण गाव, तेथील माणसं आणि मुख्य म्हणजे बाप यांना तो विसरू शकत नव्हता. त्याचे डोळे डबडबले. खरंतर त्याला ढसाढसा रडायचं होतं, पण त्याने जवळचा तांब्या उचलला, थेट तोंडाला लावला, ढसाढसा पाणी प्यायला आणि पाण्याबरोबरच डोळ्यातले अश्रूही गिळून टाकले.

–सुनील शिरवाडकर.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -