-मंजूषा देशपांडे
तुम्ही कधी ऐन हिवाळ्यात दिल्लीला गेला आहात का? खरंतर उत्तरेकडचा हिवाळा आपल्यासारख्या उबदार हवामानाच्या महाराष्ट्रात राहणार्या लोकांना सोसवतच नाही. मी एकदा कोणत्या तरी ट्रेनिंगसाठी डिसेंबरमध्ये दिल्लीत गेले होते. त्यावेळी मला सर्दी पडशापासून सांधेदुखीपर्यंत सर्व विकारांनी ग्रासले होते.
मी अगदी वैतागून गेले होते. त्या ट्रेनिंग काळातल्या एका रविवारी तिथली माझी एक मैत्रीण रितू सक्सेना आणि तिचा नवरा अगदी सकाळी साडेआठ वाजता आमच्या गेस्ट हाऊसमध्ये आले. कडाक्याच्या थंडीत मला उठायचे जीवावर आले होते. त्यामुळे मी अगदी नाईलाजानेच त्यांच्याबरोबर पुरान्या दिल्लीत ‘हिवाळी खाद्यजत्रा’ साजरी करण्यासाठी बाहेर पडले.
आम्ही चांदणी चौकात पोहचलो. आमच्यासारखे भरपूर लोक तिथे गरमागरम हिवाळी पदार्थांचा आनंद घेण्यासाठी जमतील तेवढे उबदार कपडे घालून आले होते. खरोखरंच रस्त्यावर मोठे उत्साही वातावरण होते. आम्ही गाडी एका बाजूला पार्क केली आणि समोर असलेल्या चहाच्या दुकानात शिरलो. मी एरवी चहा पीत नाही, पण थंडी एवढी प्रचंड होती की काहीतरी गरम पाहिजेच होते.
त्या दुकानात अद्रक आणि इलायचीवाली कडक फेसाळ चाय घेतली. अहाहा! तो चहा प्यायल्यावरच शरीरात एकदम प्राण संचारल्यासारखे वाटले. त्या दुकानात किंचित खारा काश्मिरी कहावाही मिळत होता. तिथल्या लोकांच्या मते थंडीच्या दिवसांत भराभर चालले पाहिजे, त्यामुळे अर्थातच भूकही लागते आणि नानाविध पदार्थ रिचवता येतात.
आम्ही चहा घेतल्यानंतर तिथेच समोर असलेल्या शिव मिष्टान्न भांडारात ‘मटार सामोसे आणि मटार कचोरी’ घेतली. त्यांचे आकार तसे छोटे होते. त्याबरोबर त्यांनी आमचूरची चटणी, कोथिंबीर पुदिना चटणी आणि कचालूचे लोणचे दिले होते. सामोसे आणि कचोर्या तुपात तळलेल्या होत्या. एकेक पदर सुटलेले, थोडेसे पातळ पण खुसखुशीत आवरण आणि आत किंचित गरम मसाला पखरलेले हिरव्यागार ताज्या मटाराचे सारण… वा! वा! प्रत्येक घासागणिक जीव तृप्त होत गेला. आज इतक्या वर्षांनंतरही त्यांची चव माझ्या जिभेवरून हललेली नाही.
मग तिथेच अस्सल देशी तुपात तळलेली गरमागरम हरयानवी जिलेबी घेतली. हरयानवी जिलेबीचे वैशिष्ठ्य म्हणजे ती किंचित जाडसर, आतल्या पोकळीत भरपूर पाक भरलेली, अगदी कुरकुरीत आणि अजिबातच आंबट नसते. काही जण त्या जिलेबीवर रबडी आणि मलई घालूनही खात होते. मला खरंतर भरपूर जिलेब्या खाव्याशा वाटत होत्या, पण पुढे भरपूर खायचे असल्याने दोनच जिलेब्या खाऊन पुढे गेलो. मग खाल्ली गाजराची बर्फी.
मला तोवर गाजर हलवाच फक्त माहिती होता. अतिशय चवदार, तुपात निथळणारी, बदाम, पिस्ते आणि बेदाणे घातलेली आणि त्यामानाने कमी गोड अशी गाजर बर्फी मी पहिल्यांदा तिथेच खाल्ली. यानंतर बरेच पुढे चालत गेल्यावर एका दुकानात नाना तर्हेचे गाजर, दुधी, मूग, चना असे वेगवेगळे हलवे ठेवलेले दिसत होते. त्यापैकी उडदाच्या डाळीचा हलवा आम्ही घेतला.
तिथे आपल्याला उडदाचा हलवा देताना अगोदर बाऊलमधे तुपात तळलेले अक्रोड, बदाम, पिस्ते आणि तळलेला बाभळीचा डिंक घालतात. त्यावर उडदाच्या डाळीचा हलवा टाकतात आणि बाऊल उलटा करून आपल्याला देतात. हा हलवा गोडसर आणि दरदरीत असा असतो. त्यात प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे तिकडे हिवाळ्यात घरोघरीही हा हलवा बनतो असे समजले. हिवाळ्यातील सांधेदुखीवर तर हा हलवा म्हणजे म्हणे रामबाण उपाय आहे.
तिथेच गरमागरम छोट्या पुर्या आणि हलवाही होता. त्याला नागोरी हलवा असे म्हणतात. त्यानंतर एका ठिकाणी फ्लॉवरचे सारण असलेला पट्टी सामोसा खाल्ला. तो सामोसा चांगलाच मसालेदार आणि तिखट होता. एवढा तिखट सामोसा खाल्ल्यामुळे काहीतरी गोड खाणे भागच होते. मग आम्ही तिघांनी मिळून तिळात घोळवलेला खवा आणि सुक्यामेव्याचा लाडू, कणिक आणि डिंक यांचा लाडू आणि बदाम, पिस्ता लगडवलेला सोहन हलवा एवढे पदार्थ खाल्ले.
सगळेच पदार्थ भरपूर तूपकट होते. त्यामुळे खाताना हातांची बोटेही तुपात न्हात होती. पुढे एका ठिकाणी सिंधी मुगाचा हलवा दिसला. खरंतर पोट नको म्हणत होते, पण केशर इलायची आणि बेदाणे, बदाम आणि पिस्ते घातलेल्या त्या मुगाच्या हलव्याचा वासही इतका सुंदर होता की बस्स! त्याची चव तर अफलातून होती.
तिथेच एक ‘हबशी हलवाही’ खाल्ला. हा हलवा दिसायला काळा सावळा असतो. हा म्हणजे तुपात अक्षरशः तळलेल्या दलिया किंवा तुकडा गव्हामध्ये लवंग, जाफरान, दालचिनी आणि जायफळ घालून केलेला गुळाचा दळदार हलवा असतो. यातही भरपूर तूप आणि सुकामेवा असल्याने हिवाळ्यात सेहत बनवायची असेल तर हा हबशी हलवा खायलाच हवा, असे आमच्या यजमानांचे मत पडले.
त्यानंतर खरोखरंच एवढे पोट भरले होते की काहीच खायची इच्छा नव्हती, पण तरी साधारण १५-२० मिनिटे चालल्यावर एका ठिकाणी कढईत भाजत असलेले गरमागरम खारे शेंगदाणे, पॉपकॉर्न दिसले. चालता चालता शेंगदाणे खाणे काही जड नव्हते. त्यामुळे एकेक शेंगदाण्याची पुडी खिशात ठेवली. थोड्या वेळानंतर एका ठिकाणी रताळ्याची चाट खाल्ली. त्यासाठी रताळे वाळूत भाजतात आणि त्याच्या जाड गरम चकत्यांवर चाट मसाला, पुदिना चटणी घालून खातात.
खरंच खूप छान लागते. तिथेच उकडलेल्या बिटाचा आणि रताळ्याचा कीस एकत्र करून त्यात आले, कोथिंबीर आणि मिरची यांची पेस्ट घालून त्याच्या टिक्क्या दिसल्या, त्या पण छान लागतात. त्यानंतर उत्तरेतला हिवाळ्यातला खास पदार्थ म्हणजे ‘मल्लाय्यो’ खाल्ला. हा पदार्थ मी पूर्वी काशीत खाल्लेला होता. त्याला ‘मख्खन मलई’ असेही म्हणतात. दूध आणि क्रीम अगदी फेस होईपर्यंत एकत्र घोटतात. आपण ऑर्डर दिली की त्यावर खवा, केशर आणि पिठीसाखर घालून देतात. त्यावर केशर, पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या असतात. हा पदार्थ तिकडे फक्त हिवाळ्यातच मिळतो.
अजून थोडे पुढे गेल्यावर एका ठिकाणी तिथे कोरफड-खवा, डिंक, पांढर्या, जांभळ्या आणि सोनेरी गाजराचे हलवे दिसले. प्रत्येकाची चव घेऊन ते हलवे पार्सल करून घेतले. कारण त्या दिवसाचा गोड खाण्याचा माझा कोटा खरोखरंच पूर्ण झाला होता. आमच्या त्या खाद्यजत्रेचा शेवट हिमाचल प्रदेशातले मोमोसदृश दिसणारे सिड्डू खाऊन झाला. ही एक गुबगुबीत उकडलेली मुरड करंजी असते. सिड्डू करण्यासाठी आंबवलेल्या गव्हाच्या कणकेच्या जाडसर छोट्याशा पोळ्या लाटतात.
त्यावर वाटलेल्या उडदाच्या डाळीत आले, मिरची, हळद, हिंग, धणे पावडर, मटार, कोथिंबीर आणि बदामाची, अक्रोडाची पूड घातलेले सारण घालतात. मग त्याची करंजी करून तिला मुरड घालतात. मग त्या करंज्या वाफवतात. सिड्डू अक्रोडाच्या चटणीबरोबर खातात. छान लागतात. त्यानंतर हिवाळ्यात गरम मसालेदार केशरी दाट दूध घ्यायलाच हवे असे कळल्यामुळे तेही रिचवल्यावर आमची त्या दिवशीची खाद्ययात्रा खरोखरंच संपली. आश्चर्य म्हणजे एवढे सगळे खाऊनही पोट अजिबातच बिघडले नाही. घरी येताना खास हिवाळी नजाकत म्हणून गज्जक, रेवड्या आणि खजुराच्या वड्याही विकत घेतल्या.
दुसर्या दिवशी आमच्या ट्रेनिंगसाठी आलेल्या एका मूळ पहाडी, गढवाल प्रदेशातल्या मैत्रिणीच्या अंगणात संध्याकाळी मांडुआची भाकरी आणि बथुआची भाजी खाल्ली. त्याबरोबर तिथली जाडसर गव्हाची लापशी आणि उकडलेल्या बटाट्याचे लोणचे होते. हेही खास हिवाळ्यातच बनवले जाते. ट्रेनिंगच्या शेवटच्या दिवशी एका पंजाबी मैत्रिणीकडे भरपूर लोणी घातलेला सरसों का साग, मक्याची रोटी आणि घर का गाजर का हलवा खाल्ला.
सरसों का साग म्हणजे मोहरीचा पाला आणि बथुआ घातलेली भाजी अतिशय चवदार आणि गरम प्रवृत्तीची असते. उत्तरेत हिवाळ्यात अनेक प्रकारच्या भाज्या मिळतात. खेडोपाड्यात त्या मिश्र भाज्यांच्या तिखट आणि मसाला भरलेल्या तर्रीदार भाज्या आणि गरमागरम तूप लावलेल्या रोट्यांच्या पार्ट्या घरोघरी आयोजित करतात. आमच्या ट्रेनिंग कालावधीत मथुरेजवळच्या एका खेड्यात त्याही कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या भागात हिवाळी नाश्त्यांमध्ये भरपूर तूप लावलेले भाज्यांचे परोठे आणि लोणची यांचाही समावेश असतो.
दिल्लीत छोले आणि भटुरे सगळ्याच हंगामात मिळतात, पण हिवाळ्यात गरमागरम भटुरे आणि किंचित अधिक मसालेदार छोले आणि राजमा चावल यांचीही अधिक मजा येते. आपल्याकडे उत्तरेकडे खावे आणि दक्षिणेकडे पाहावे, अशी म्हण आहे. जर आपण तिथल्या हिवाळ्यातल्या थंडीची पर्वा न करता त्या मोसमात उत्तरेकडे गेलो, तर आपली खाण्याची अक्षरशः चंगळ होते. तिथल्या अतिथंड हवेत आपली रसनाही तृप्त होते आणि सेहतही बनते. अजून एक म्हणजे जर आपल्याला दिल्लीतल्या स्थानिक लोकांबरोबर तिथली हिवाळी खाद्यजत्रा करता आली, तर आपण तिथेच उत्तरेतल्या बहुतेक हिवाळी पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतो.