या विकृतांचं करायचं काय?

सध्याच्या काळात सामूहिक बलात्काराच्या घटना वारंवार घडत आहेत. हे असे का घडते आहे? याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. दारू पिऊन किंवा तत्सम नशेच्या पदार्थाचे सेवन करून कधी गंमत म्हणून तर कधी सहेतुकतेने असे काही करू पाहणार्‍यांना संभाव्य परिणामांची अजिबातच कल्पना नसते असे म्हणता येत नाही. वासनेचे भूत डोक्यात घुसल्याने त्यांचा विवेक संपतो आणि काहीतरी अघटित घडून जाते. इर्षा, सूडभावना किंवा स्वतःचे ‘पुरुषत्व’ सिद्ध करण्याच्या खोट्या अहमहमिकेतून अशा घटना घडत आहेत. आणि त्याचे दूरगामी परिणाम समाजावर होत आहेत. हाथरसची घटना असो किंवा यापूर्वी घडलेल्या अनेक घटना असोत, या विकृतांचे करायचे काय, असा प्रश्न सर्वसामान्य माणसांना सध्या भंडावून सोडत आहे.

Two railway officers rape UP woman on premises of Bhopal station

हाथरसच्या घटनेने भारतीय समाजजीवनात आणि राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अर्थात यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या असल्या तरी या घटनेने आपल्यापुढे मोठा पेच निर्माण केला आहे. अत्यंत अमानुष म्हणता येईल अशी ही घटना आहे. कारण बलात्कारी गुन्हेगारांइतकेच पोलीस प्रशासन आणि राजकारणीही यात दोषी आहेत. एका दलित मुलीवर अत्यंत क्रूर आणि रानटीपणे अत्याचार केल्यानंतर तिचा अनन्वित छळ करण्यात आला. तिची जीभ कापली गेली आणि तिला मरणासन्न अवस्थेत सोडून दिलं गेलं. एवढी क्रूरता माणसात येते कुठून? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. स्त्री म्हणजे केवळ उपभोगाची वस्तू. तिला हवं तेव्हा आणि हवं तसं वापरता येतं, ही मानसिकता दुर्दैवाने दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काही महिन्यांपूर्वीच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एका विकृत तरुणानं एका युवतीची जाळून हत्या केली होती. त्यापूर्वी हैदराबाद येथे असेच सामूहिक बलात्काराचे कांड घडले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचे केलेले एन्काऊंटर देशभरात चर्चेचा विषय झाला होता. बलात्कार्‍यांना अशीच शिक्षा द्यायला हवी, हा एक सार्वत्रिक सूर उमटला होता. एन्काऊंटरमुळे समाजात थोडीफार जरब बसायला हवी होती; पण तसे घडले नाही. थोडाफार काळ मध्ये निघून गेला की, जगभरात कुठे ना कुठे अत्याचाराची घटना घडतेच घडते.

हाथरसची घटना म्हणजे क्रौर्याची परिसीमा आहे. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात पीडित तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी तिचा मृतदेह तिच्या गावात आणला खरा, पण त्यांनीच परस्पर अंत्यसंस्कार केला. कुटुंबीयांच्या आक्रोशाला न जुमानता पोलिसांनी घेतलेला हा निर्णय खूप संदिग्ध वाटावा असा आहे. आपल्या मुलीचे अंत्यदर्शनही घेता येऊ नये किंवा तिच्या पार्थिवाला अग्नीही देता येऊ नये, यासाठी पोलिसांनी एवढे परिश्रम का घेतले? ते कळत नाही. आरोपींनी केलेल्या अत्याचारानंतर पोलिसांनी अत्यंत अमानवीय पद्धतीने आणि बेजबाबदारपणे हे प्रकरण हाताळले. देशभर या घटनेचे पडसाद उमटले. अजूनही जनक्षोभ थांबता थांबत नाहीये.

उत्तर प्रदेशात अमुक-तमुक विचाराचे सरकार आहे किंवा तिथली कायदा-सुव्यवस्था अशी तशी आहे वगैरे कोणतेही राजकीय आरोप न करता अशा घटना मुळात घडतातच कशा? याचा विचार होणे अत्यंत गरजेचे आहे. राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह प्रसिद्धीमाध्यमांनी या प्रकरणाच्या निमित्ताने जो धिंगाणा घातला तोही अत्यंत निषेधार्ह आहे. टीव्ही वाहिन्यांनी तर असंवेदनशीलतेचा कळसच केला आहे. मुलगी गमावलेल्या आईबापांना, तिच्या भावाला किंवा तिच्या नातेवाईकांना दिवसातून शेकडो वेळा बाइट द्यायला भाग पाडले जात आहे. त्यांची मन:स्थिती समजून न घेता वारंवार त्यांना आडवेतिडवे प्रश्न विचारून भंडावून सोडले जात आहे. एखाद्या दुःखद घटनेच्या वेळी अशा कोरड्या सहानुभूतीची खरच गरज असते काय? या पीडित कुटुंबाला काहीतरी ठोस मदत मिळण्याची गरज असताना राजकीय पक्षांनी स्वतःच्या स्वार्थासाठी या घटनेला पेटवत ठेवले आहे. हे सुद्धा अमानवीयच म्हणावे लागेल. अशा घटना घडल्यानंतर ‘कायदा अत्यंत कठोर केला पाहिजे’, ‘आरोपीचे गुप्तांग कापले पाहिजे’ किंवा ‘हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवला पाहिजे’ यासारख्या मागण्या अचानक उसळून येतात. यामागे जनभावना, क्षोभ असणे हे स्वाभाविक आहे.

परंतु अशा प्रवृत्तींचा समूळ नाश करण्यासाठी आपली सामाजिक मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे आपल्याला का वाटत नाही? स्त्रियांकडे बघण्याचा पुरुषी दृष्टिकोन एकविसाव्या शतकातही कायम असणे हा आपला सामाजिक पराभव नाही काय? एकीकडे प्रचंड औद्योगिकीकरण झाले. विकासाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या. गावोगावी शिक्षण पोहोचले. आधुनिक विचार रुजला. नवी माध्यमे आपल्या जगण्याचा भाग झाली. स्त्रियांचा सार्वत्रिक वावर वाढला. घटनेने समानता दिली. थोडक्यात काय तर पारंपरिक समाजरचनेचे प्रारूप मागच्या काही दशकात वेगाने बदलले. मात्र हे सर्व बदल होत असताना पुरुषांच्या मनातील ‘स्त्री’ मात्र बदलली नाही. स्त्रीच्या अस्तित्वाला, तिच्या कर्तृत्वाला नाकारणे आणि तिच्याकडे उपभोग्य वस्तू म्हणून बघणे, या दृष्टीकोनाची वर्तमान पार्श्वभूमीवर संगती कशी लावायची? हा मोठाच प्रश्न आहे.

अनेक शोषण यंत्रणांना ओलांडून स्वतःचे अवकाश आणि अस्तित्व सिद्ध करू पाहणार्‍या स्त्रिया पुरुषांसाठी केवळ ‘स्त्रियाच’ असतात, ही बाब अत्यंत खेदजनक म्हणावी लागेल. स्त्री मग ती कोणत्याही सामाजिक स्तरातील असो वा श्रेणी व्यवस्थेतील असो, तिला पुरुषी वर्चस्वाला मात्र ओलांडता आलेले नाही. कुटुंब व्यवस्थेसह सामाजिक व सांस्कृतिक व्यवस्थेशी तिचे जोडले जाणे कितीही महत्त्वाचे असले तरी आपण ते खुल्या दिलाने स्वीकारलेले नाही, हे वास्तव नाकारता येत नाही. आणि त्यामुळे अद्यापही समाजात स्त्री-पुरुष समानतेचे नाते निर्माण होऊ शकलेले नाही. एक जबाबदार नागरिक म्हणून जगताना तिची होणारी कुचंबणा थांबू शकलेली नाही. लिंगाधारित विषमता जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत स्त्रियांना आदर आणि प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता नाही. असेच अशा घटनेतून वारंवार सिद्ध होत आहे.

एकूणच आपले सामाजिक पर्यावरण अत्यंत नकारात्मक अशा वळणावर येऊन ठेपले आहे. निषेध, मोर्चा आणि आंदोलनाच्या पलीकडे जायची आपली इच्छा नाही. किंवा अशा कृतीमागेही काहीतरी स्वार्थ दडलेला असतोच. केवळ सहानुभूतीच्या मेणबत्त्या पेटवून असे प्रश्न सुटत नसतात किंवा पोलीस आणि न्यायालयावर हे प्रश्न ढकलून आपले दायीत्व संपत नाही. कारण प्रत्येकवेळी अशा घटनांचे, समस्येचे स्वरूप बदलत असते. स्त्रीच्या मुक्त वागण्याला ‘स्वैराचार’ समजणारी पुरुषी सत्ता बळावत चालली आहे. गरीब व कनिष्ठ वर्गातील स्त्रियांना आपलीच ‘भूमी’ समजून ओरबाडणे हेही सर्वत्र घडताना दिसते. आजचा काळ प्रचंड भौतिक समृद्धीचा काळ मानला जातो. या काळात स्त्री पुरुषांच्या जगण्यावागण्याची दैनंदिनी बदललेली आहे. मोबाईल आणि इंटरनेटमुळे हिंसक व्हिडिओ आणि पोर्नोग्राफीचा मोठा विळखा अल्पवयीन शाळकरी मुलांना पडला आहे. अशा सामुग्रीची सोशल मीडियाच्या माध्यमातून देवाण-घेवाण करणेही अत्यंत सोपे झाले आहे. त्यामुळे नवी पिढी हिंसक बनत चालली आहे. हे वास्तवही लक्षात घ्यायला हवे. अगदी कमी वयातच स्त्रियांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलतो आहे. काहीतरी वेगळे आणि धाडसी करण्याची त्यांची इच्छा बळावत चालली आहे. या इच्छेलाच ही पिढी ‘थ्रील’ समजत आहे. हे थ्रील अनुभवण्यासाठी या पिढीची कोणत्याही थराला जाण्याची तयारी आहे, हे यापूर्वीच्या अनेक घटनांमधून सिद्ध झाले आहे.

सध्याच्या काळात सामूहिक बलात्काराच्या घटना वारंवार घडत आहेत. हे असे का घडते आहे? याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. दारू पिऊन किंवा तत्सम नशेच्या पदार्थाचे सेवन करून कधी गंमत म्हणून तर कधी सहेतुकतेने असे काही करू पाहणार्‍यांना संभाव्य परिणामांची अजिबातच कल्पना नसते असे म्हणता येत नाही. वासनेचे भूत डोक्यात घुसल्याने त्यांचा विवेक संपतो आणि काहीतरी अघटित घडून जाते. इर्षा, सूडभावना किंवा स्वतःचे ‘पुरुषत्व’ सिद्ध करण्याच्या खोट्या अहमहमिकेतून अशा घटना घडत आहेत. आणि त्याचे दूरगामी परिणाम समाजावर होत आहेत. हाथरसची घटना असो किंवा यापूर्वी घडलेल्या अनेक घटना असोत, या सगळ्या घटनांची पार्श्वभूमी आपण पाहिली तर बहुतेक ठिकाणी बेफिकीर आणि विकृत मानसिकतेचे तरुण असल्याचे लक्षात येते. अशा विकृतांना पायबंद कसा घालायचा? हा मोठाच प्रश्न आहे. तूर्त तरी या प्रश्नाचे उत्तर देता येणे कठीण आहे. पण किमान जागरूक नागरिक म्हणून आणि जबाबदार पालक म्हणून आपण सजग राहण्याचा प्रयत्न करायला हवा. निदान त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या एखाद्या निर्भयाचा किंवा मनीषाचा प्राण तरी वाचू शकेल.

— पी. विठ्ठल