अमेरिकेतील गन कल्चरची महामारी

अमेरिका हा जगातला असा एकमेव देश आहे जेथे गन कल्चरमुळे लोकांना आत्महत्या करणं सोपं झालं आहे. 2019 साली स्वत:वर गोळी झाडून 24,000 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत या घटना अमेरिकेतील तरुणांचे जग किती भयंकर आहे हे सांगण्याचाच प्रयत्न करत आहे. त्यातच अमेरिकेत शिक्षण अर्धवट सोडणार्‍यांच्या संख्येत वाढ होत आहे. पुस्तक वाचून मोठं होण्यापेक्षा बंदुकीच्या जोरावर नाव, पैसा आणि प्रसिद्धी कमावण्याकडे येथील तरुणांचा कल वाढतोय. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळातही याच गन कल्चरच्या जोरावर शहरभर गुंडाची टोळकी लुटमार करत होती. यात आता बेरोजगार झालेल्या व्यक्तीही सामील झाल्याने अमेरिकेची डोकेदुखीही वाढली आहे.

जगातील सर्वात मोठी महासत्ता असलेला, स्वत:ला जगातील एकमेव मानवी हक्कांचा रक्षणकर्ता म्हणवून पाठ थोपटून घेणारा बलाढ्य अमेरिका सध्या एका गोळीबाराच्या घटनेने पुरता हादरला आहे. बुधवारी येथील टेक्सास प्रांतातील उव्हाल्दे गावातल्या प्राथमिक शाळेत सल्वाडोर रामोस या 18 वर्षीय माथेफिरू तरुणाने केलेल्या बेछूट गोळीबारात 18 विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनेने अमेरिकेतच नाही तर संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. गेल्या काही वर्षात अमेरिकेत अशा प्रकारच्या बेछुट गोळीबाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अमेरिकेतील हे गन कल्चर आता त्याच्याच मूळावर उठलं असून त्याला आवर घालणं किंवा त्यावर बंदी घालणे आता राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याही हातात राहिलेले नाही. तसेच या गन कल्चरविरोधात रस्त्यावर उतरण्याची हिंमतही अमेरिकन्समध्येही राहिलेली नाही. कारण त्यांनी जे पेरलं तेच उगवलं असून स्वरक्षणाच्या लेबलमागे गन कल्चर, घोस्ट गन कल्चर असंच सुरू राहावं अशी येथील राजकीय मंडळींचीच असुरी इच्छा आहे. यामुळे अमेरिकेत भाजीपाला विकत घेण्याइतकंच बंदूक विकत घेणं सोपं आहे.

यामागची कारणमीमांसा करण्यासाठी आधी अमेरिकेत हे गन कल्चर, गन लॉबी केव्हा आणि का सुरू झाली हे समजून घेणं आवश्यक आहे. अमेरिकेवर ब्रिटिशांचे राज्य होते. त्यावेळी अमेरिकेच्या संविधानानेच स्वरक्षणासाठी नागरिकांना बंदुका बाळगण्याचा कायद्याने अधिकार दिला. पण अमेरिकेतून ब्रिटिश जाऊन 231 वर्षार्ंचा कालावधी उलटूनही हा कायदा मात्र बदलण्यात आलेला नाही. यामुळे येथे प्रत्येक घरातील एका व्यक्तीकडे तरी बंदूक सापडतेच. यात काही बंदुका या आता पिढीजातच झाल्या आहेत. त्यातच भारताप्रमाणे बंदूक खरेदी करण्यासाठी येथे काही भरमसाठ नियम नाहीत की सरकारचा अंकुशही नाही. उलट येथे मद्यपानासाठी व्यक्तीच्या वयाची 21 वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे.

पण बंदुकीसाठी मात्र अजब नियम आहेत. जर 18 वर्षाच्या आतील व्यक्तीला बंदूक हवी असेल तर त्यासाठी त्याला बंदुकीच्या किमतीत सवलत दिली जाते. अमेरिकेच्या द गन कंट्रोलर अ‍ॅक्टनुसार 196८ (GCA) 18 वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती रायफल किंवा कोणतेही लहान शस्त्र खरेदी करू शकते. पण मशीनगन, हँडगनसारख्या बंदुका हाताळण्यासाठी मात्र 21 वर्षे पूर्ण असावी लागतात. यामुळे तरुण वयातच स्वत:च्या मालकीची बंदूक विकत घेण्यासाठी येथील प्रत्येक तरुण उतावीळ असतो. यातूनच मग येथील तरुण कधी मजा म्हणून तर कधी कोणावर सूड उगवण्यासाठी तर कधी फन फेम गेम म्हणून या जवळच्या गनचा उपयोग निरपराधांचे जीव घेण्यासाठी करत असल्याचे गोळीबाराच्या घटनांमधून दिसून येते. यात प्रामुख्याने मानसिक तणावाखालील व्यक्तींकडून हिंसाचार घडवला जात असल्याचे अनेकवेळा निदर्शनास आलं आहे.

विशेष म्हणजे आजच्या उच्चशिक्षित अमेरिकन पिढीमध्येही गन बाळगण्याचे हे फॅड झपाट्याने वाढत आहे. पण त्याचा वापर हा स्वरक्षणासाठी कमी आणि टाईमपास किंवा तणाव घालवण्यासाठी लोकांना गोळ्या घालून ठार करण्यासाठीच अधिक होत आहे. त्यातच येथील राजकीय मंडळीदेखील बंदूकप्रेमी असल्याने हे गन कल्चर संपवण्यापेक्षा ते अधिक कशा पद्धतीने फोफावेल याची नीट काळजी येथील नेतेमंडळी त्यांचे चमचे घेत आहेत. यामुळे सामान्य नागरिकांवर वचक बसवण्याबरोबरच दहशत निर्माण करण्यासाठी बंदुका खरेदी केल्या जात आहेत. आपल्याकडे जशा पान टपर्‍या पावलापावलावर असतात तसे तिथे लोकांना बंदुकी सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी गन शॉप पावला पावलावर असतात. यातील बहुतेक शॉप हे राजकीय नेतेमंडळींचे त्यांच्या जवळच्या संबंधितांच्या मालकीचे असतात. यामुळे यातूनही चांगले उत्पन्न हे राजकीय नेते कमावत असतात.

तर दुसरीकडे PEWच्या अहवालानुसार आजच्या तारखेला अमेरिकेत 39 टक्के पुरुष आणि 29 टक्के महिलांकडे बंदुका आहेत. यात ग्रामीण भागातील 41 टक्के नागरिक आणि शहरातील 29 टक्के नागरिक बंदूक हाताळत आहेत. यामुळे आपल्याकडे जसे एखाद्या भांडणाचे स्वरूप शिवीगाळीपासून नंतर हाणामारीपर्यंत सहज पोहचते तसेच अमेरिकेत मात्र ते थेट गोळीबारावर जाऊन पोहचते. कारण येथे घराघरात बंदुकी आहेत. याच पार्श्वभूमीवर गेल्या 20 वर्षात अमेरिकेत बंदूक विकत घेण्याच्या आकड्यात 3 टक्यांनी वाढ झाली आहे. त्यातच 2016 ते 2021 या कालावधीत अमेरिकेत बेकायदेशीररित्या 45000 ज्यादा बंदुकीची निर्मिती करुन त्या विकल्या गेल्याचे बायडेन प्रशासनानेही मान्य केले आहे. अशा बंदुकांना घोस्ट गन म्हटले जाते. गेल्या काही वर्षात अमेरिकेत दहशतवादी कारवाया वाढताच अशा घोस्ट गन्सची विक्री करणार्‍यांची संख्याही वाढली आहे. यांच्याकडून बंदूक खरेदीसाठी कोणतेही नियम नसल्याने दहा वर्षांच्या मुलाच्या हातातही बंदूक दिसल्यास अमेरिकन नागरिकांना धक्का बसत नाही.

तर दुसरीकडे या गोळीबाराच्या घटनांमागे येथील तरुणांची सतत बिघडणारी मानसिकता असल्याचेही समोर आले आहे. आधुनिक तंत्राने सज्ज असलेल्या अमेरिकेत मुलं बराचसा वेळ हा व्हिडीओ गेम व तत्सम प्लॅटफॉर्मवर घालवतात. तसेच येथील मोकळ्या वातावरणामुळे अमली पदार्थ, ड्रग्जचे सेवन हा येथील मुलांच्या लाईफस्टाईलाचाच एक भाग झाला आहे. अतिस्वातंत्र्यामुळे येथील बरीचशी पिढी एका विचित्र मानसिक कोंडीत वाढत आहे. त्यातूनच या गन कल्चर, गन लॉबीमुळे अशा मानसिक वृत्तीला खतपणी मिळत आहे. यातूनच येथे आत्महत्येचे प्रमाणही वाढले आहे. अमेरिका हा जगातला असा एकमेव देश आहे जेथे गन कल्चरमुळे लोकांना आत्महत्या करणं सोपं झालं आहे.

2019 साली स्वत:वर गोळी झाडून 24,000 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत या घटना अमेरिकेतील तरुणांचे जग किती भयंकर आहे हे सांगण्याचाच प्रयत्न करत आहे. त्यातच अमेरिकेत शिक्षण अर्धवट सोडणार्‍यांच्या संख्येत वाढ होत आहे. पुस्तक वाचून मोठं होण्यापेक्षा बंदुकीच्या जोरावर नाव, पैसा आणि प्रसिद्धी कमावण्याकडे येथील तरुणांचा कल वाढतोय. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळातही याच गन कल्चरच्या जोरावर शहरभर गुंडाची टोळकी लुटमार करत होती. यात आता बेरोजगार झालेल्या व्यक्तीही सामील झाल्याने अमेरिकेची डोकेदुखीही वाढली आहे.

याचाच परिणाम टेक्साससारख्या घटनांमधून वारंवार दिसू लागला आहे. टेक्सासच्या शाळेत हल्ला करणार्‍या तरुणाने सर्वप्रथम सोशल मीडियावर आपण आजीला ठार मारणार असल्याची पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर त्याने आजीवर गोळ्या झाडल्या. यात ती जखमी झाली. यामुळे घाबरलेल्या हल्लेखोराने गाडीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र प्राथमिक शाळेजवळ गाडीला अपघात झाला. मोठा आवाज ऐकून शाळेतील सुरक्षा रक्षकांनी गाडीच्या दिशेने धाव घेतली. पण हल्लेखोराने त्यांच्यावरच गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याने थेट शाळेत प्रवेश करत विद्यार्थांवर गोळीबार केला. यात 21 जणांचा मृत्यू झाला. मात्र पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हल्लेखार ठार झाला. तो मानसिक रुग्ण असल्याचे त्याच्या आजीने पोलिसांना सांगितले.

निरपराध लोकांना ठार मारून असुरी समाधान मिळवणार्‍या या हल्लेखोरांना सावरणं हा आता अमेरिकेसमोरचा मोठा प्रश्न आहे. त्यातही या हल्लेखोरांकडून शाळा, बाजार, रेल्वे स्टेशन, गर्दीची ठिकाणे टार्गेट केली जात आहेत. या वर्षातील गोळीबाराची ही दुसरी घटना असून काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्क येथील बफेलो मार्केटमध्ये एका हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर लगेचच टेक्सासमध्येही हे हत्याकांड घडल्याने अमेरिकेपुढे स्वदेशातील नरसंहार रोखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

अमेरिकेत दरवर्षी अशा गोळीबाराच्या घटनांचा 30 लाख मुलांना सामना करावा लागतोय. तर या देशात दररोज गोळीबाराच्या घटनांमध्ये 100 लोकांचा जीव जातोय. 2002 ते 2011 मध्ये अमेरिकेत 11,000 लोकांना अशा गोळीबाराच्या घटनांमध्ये आपले प्राण गमवावे लागले. पण मृतांच्या कुटुंबीयांना ठराविक रक्कम नुकसानभरपाई म्हणून देण्यापलिकडे अमेरिकन सरकारने कोणासाठीही कधीही काहीही केलेले नाही. करेल अशी आशाही नाही. कारण गन कल्चर आहे तरच पॉवर आहे आणि त्याभोवती फिरणारे राजकारण आहे. हे अमेरिकेच्या सुप्रिमोने चांगलंच ओळखलं आहे.