घरफिचर्ससारांशस्वातंत्र्य एकेकाचं

स्वातंत्र्य एकेकाचं

Subscribe

भरल्या बाजारात मास्कपासून खुले आम स्वातंत्र्य मिळवणार्‍यांना,

कुणा महान विभुतीच्या वाढदिवसाला अंतर न ठेवता कुंद कोंदट गर्दी करून राजरोस संचार स्वातंत्र्य उपभोगणार्‍यांना,

- Advertisement -

लॉकडाउनचे निर्बंध असताना अर्ध्यावर आणलेल्या दुकानाच्या शटरखालून माल खपवण्याचं चोरटं स्वातंत्र्य हिसकावणार्‍यांना,

…स्वातंत्र्याची किंमत नक्कीच कळली असणार!

- Advertisement -

कुणा करोनाने त्यांचं स्वातंत्र्य देशोधडीला लावलं, कडीकोयंड्यात बंद केलं. सोसायट्यांच्या गेटच्या आत जेरबंद केलं…

आज त्यांना बंदिवानाच्या पायातल्या बेड्यांचं नसलं तरी चार भिंतींमध्ये बंदिस्त असण्याचं अवजड ओझं नक्की कळलेलं असणार!

साधं वर्तमानपत्रंही मिळणं कठीण झालं होतं तेव्हा वर्तमानापासून नाळ तुटणं आणि अज्ञाताचा गाळ साचणं म्हणजे नक्की काय ते त्यांना उमगलेलं असणार!

डॉक्टरांचे दवाखाने बंद झाले होते तेव्हा ठणकणार्‍या देहातल्या वेदनाही तात्पुरत्या बंद करून ठेवायच्या थेरपीचा शोध त्यांना नक्की लागलेला असणार!

मांसाहारच दिसेनासा झाल्यावर जेव्हा जिभेचे चोचले तोंडाच्या डेस्कटॉपवरून हटवले गेले तेव्हा शुध्द शाकाहार त्यांच्या जिभेवर नक्की रूळलेला असणार!

थांबलेल्या जगाच्या थांब्यावर सक्तीने थांबावं लागताना जगणंच आंबून जाणं ह्याचा अर्थ त्यांना अन्वयासह समजलेला असणार!

मायनस इकॉनॉमीची औरस संतती असलेल्या अर्धपगारी वर्क फ‘ॉम होम द्वारे पोट जाळण्यासाठी अठरा-अठरा तास लॅपटॉपसमोर डोळे जाळण्यातली धग त्यांनी अनुभवलेली असणार!

अचानक गेलेल्या फ्युजसार‘या एमएनसीतल्या नोकर्‍या गेल्यावर मासळी आणि मिरची कोथिंबिर विकायची पाळी आलेल्यांना निराशेचा अंधार काळवंडून गेला असणार!

घंटा न होता शाळा सुटलेल्या चिमण्या जीवांच्या आयुष्यात आता किती काळ मधली सुटी नाही, ह्या प्रश्नाने त्यांचं मन आतबाहेर पोखरलं असणार!

स्थलांतरित मजुराच्या भाकरीचं भविष्य चुलीवर जाण्याआधीच करपण्याचा धोका आहे हे जाणून एका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच लोकांच्या जीवाची घालमेल झालेली असणार!

पीपीई किट घालून आयसीयूमध्ये जोखीम घेणार्‍यांचं धाडस पाहून त्यांच्या जीवाला काडीइतकी तरी करूणा शिवलीच असणार!

रात्रंदिवस मान खाली घालून अ‍ॅम्ब्युलन्सचं आणि पॅथॉलॉजीत विषाणू शोधणार्‍यांचं मग्न मन कुणी तरी एका कोपर्‍यात जाणलं असणार!

…आणि ताज्या भुतकाळाच्या पडद्यावर हे सगळे पापुद्रे असे भेसूर रेखाटले गेले असतानाही –

मलईदार खाती मिळवण्यासाठी फिल्डिंग लावणार्‍यांचं,

वादळग‘स्तांना मदतनिधी देतानाचा नाट्यप्रवेश वर्तमानपत्रातल्या फोटोसाठी सादर करणार्‍यांचं,

जनतेच्या पोटापाण्यासाठीचे प्रश्न सोडून स्वत:च्या दाणापाण्याच्या अस्तित्वासाठी भुस्सा भरलेलं आंदोलन करणार्‍यांचं,

निवडणुकांवर डोळे ठेवून वोटबँक जपणार्‍यांचं,

शेअर बाजाराला, भांडवली बाजाराला सूज आणणार्‍यांचं,

एका पक्षातून दुसर्‍या पक्षात जाण्याचं आणि दुसर्‍या पक्षात जाताना आपल्या विचारांना रफू मारण्याचं…..

स्वातंत्र्य मिळो ही शुभेच्छा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -