‘चित्ता’वेधक!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १७ सप्टेंबरला दक्षिण आफ्रिकेमधील नामिबियातून ८ चित्त्यांना ग्वाल्हेरला आणण्यात आले. त्यानंतर मोदींच्या उपस्थितीत या चित्त्यांना मध्य प्रदेशातील पालपूर कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले आहे. गेल्या सात दशकांपासून भारतातून नामशेष झालेल्या या प्रजातीचे देशात ७४ वर्षांनंतर होणारे हे आगमन ऐतिहासिक ठरले आहे. भारताच्या इतिहासात या चित्त्यांची नोंद झाली आहे. पण ७० वर्षांपूर्वी देशातून टप्याटप्याने नामशेष होणार्‍या या चित्त्यांच्या अशा अचानक गायब होण्यामागची कारणंही वेगवेगळी आहेत. यासाठी भारतातील त्यांचे वास्तव्य ते नामशेष होण्यापर्यंतचा प्रवास जाणून घेणे गरजेचे आहे.

पूर्वी राजे महाराजे चित्त्याला पाळीव प्राण्याप्रमाणे ठेवत. त्यांच्या मदतीने हरीण, काळवीट यासारख्या प्राण्यांची शिकार करत. मध्ययुगीन काळात फिरोज शाह तुघलक याने चित्ता पाळणे सुरू केले. त्यांचा उपयोग तो शिकारीसाठी करायचा. हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. तर १६ व्या शतकात मुघल बादशहा जहाँगिरच्या काळात देशात पहिल्यांदाच चित्ता या मांसाहारी वन्यप्राण्याला पाळीव प्राण्याप्रमाणे पाळण्यात आल्याची नोंद जहाँगिरचे पिता अकबर यांनी त्यांच्या दस्तावेजात केली आहे. त्यांच्या काळात १०, ००० चित्ते जहाँगीर याने पाळले होते. त्यातील १००० चित्ते चक्क त्यांच्या दरबारतच असायचे असेही अकबरने म्हटले आहे.

१६०८ मध्ये ओरछाचे महाराजा राजा वीर सिंह देव यांच्याकडे एक सफेद रंगाचा चित्ता होता, पण त्याच्या शरीरावर काळे नाही तर नीळे ठिपके होते. असे जहाँगीरने आपल्या ‘तुजुक-ए-जहाँगीरी’ या पुस्तकात लिहिले आहे. त्याकाळी राजा महाराजांमध्ये चित्ता बाळगण्याचे फॅड आणि स्पर्धा होते हे यावरून दिसून होते. औरंगजेबच्या शासनात तर शाही शिकारीसाठी चित्त्यांना पकडण्यात येत होते. पण असे असले तरी हे सर्व राजे, महाराजे, बादशाह चित्त्याचे संवर्धन कसे करता येईल याचीही काळजी घ्यायचे. पण देश स्वतंत्र झाल्यानंतर वर्षभरातच देशातील उरल्या सुरल्या चित्त्यांची शिकार करण्यात आली आणि चित्त्यांचे भारतातील नावच पुसले गेले.

१९४७ साली कोरिया, सरगुजाचे (आताचे छत्तीसगड) महाराजा रामानुज प्रताप सिंह देव यांनी देशातील शेवटच्या तीन चित्त्यांची शिकार केली. गावकर्‍यांनी महाराजांकडे चित्ते आपली दुभती जनावरे ठार करत असल्याने मदतीची याचना केली होती. यामुळे जनतेच्या हितासाठी महाराजा रामानुज प्रताप सिंह देव यांनी तीन चित्त्यांना गोळ्या घालून ठार केले. पण त्यानंतर मात्र देशात एकही चित्ता आढळला नाही. त्यानंतर १९५२ साली भारत सरकारने देशातून चित्ता नामशेष झाल्याचे घोषित केले. एका सुंदर, उमद्या आणि रुबाबदार जनावराचे देशातून असे नामशेष होणे प्राणीप्रेमींसाठीच नाही तर देशासाठीही कष्टप्रद होते. चित्त्यांचे नामशेष होण्यामागे मुख्य कारण होते, त्यांची मोठ्या प्रमाणावर होणारी शिकार.

कारण या उमद्या, डौलदार प्राण्याचं सौंदर्य, त्याची चपळाई तेव्हाच्या राजा महाराजांना भुरळ घालत होती. चित्त्याचे शिर आणि त्याची चमकदार कातडी ज्या राजाच्या महालात सजवलेली दिसायची तो राजा शूर, साहसी समजला जायचा. चित्त्याची शिकार जणू आनंदासाठीच नाही तर पुरूषी अहंकाराला सुखावण्यासाठीही केली जात होती. चित्त्याचे हे आकर्षण मुघल कालापासून होते. त्याकाळी चित्त्यासारख्या हिंस्त्र जनावराला पाळणे म्हणजे मर्दुमकीची शान असल्याचे मानले जाई. याच पार्श्वभूमीवर चित्त्याची शिकार केली जायची. २० व्या शतकात फक्त शिकारीसाठी चित्ता आयात करण्यात येई. त्यावेळी देशात चित्त्यांची संख्या अवघी २३० एवढी होती. पण कालांतराने जसेजसे जंगल परिसरात मानवाची रहदारी वाढली तशी चित्त्यांची शिकार असलेली काळवीटं, ससे यांचीही संख्या रोडावली. त्यामुळे जंगल सोडून चित्त्ये भक्ष्याच्या शोधात मानवी वसाहतींमध्ये शिरकाव करू लागले. यात अनेकवेळा मानवांवरही चित्त्यांनी हल्ले केले.

यामुळे भारतातील तत्कालिन ब्रिटीश सरकारने चित्त्यांची शिकार करण्यास सुरुवात केली. त्यासाठी बक्षीसही लावली. यात भारतातून चित्ते कधी नामशेष झाले हे कळलेच नाही. त्यानंतर १९५० पासून सरकारने सुरू केले देशात चित्ता परत आणण्याचे प्रयत्न. यासाठी इराणची निवड करण्यात आली. पण राजकीय घडामोडींमुळे भारत सरकार आणि इराण यांच्यातील चित्ता आयात कराराची बोलणीच बारगळली. त्यानंतर संवर्धकांनी चित्त्यांचे क्लोनिंग करण्याचाही विचार केला, पण तेही बारगळले. त्यानंतर आशियाई चित्त्याबरोबर साम्य असलेल्या आफ्रिकन प्रजातीच्या चित्त्यांना भारतात आणण्याचा विचार करण्यात आला. दरम्यान २०१२ मध्ये न्यायालयात आफ्रिकन चित्त्यांना भारतात आणण्याच्या सरकारच्या योजनेवर चर्चा झाली. त्यातूनच मग आफ्रिकन प्रजातीचे चित्ते हे मूळचे भारतातील नाहीत त्यामुळे ते देशाची ओळख होऊ शकणार नाहीत, असा निकाल न्यायालयाने दिला होता. त्यावर भारत सरकारने केलेल्या विनंतीचा विचार करत नंतर सर्वोच्च न्यायालयाने २०१३ साली भारतात या आफ्रिकन चित्त्यांना आणण्यास परवानगी दिली. त्यामुळे आज ७४ वर्षांनंतर भारतातून नामशेष झालेले हे चित्ते भारतात मोठ्या डौलात आले आहेत.

पण येथे आल्यावरही या आठ चित्यांना येथील बिबट्यांपासून धोका आहे. कारण नामिबियातील जंगलात वाढलेल्या या प्राण्याला भारताच्या वातावरणाबरोबर येथील पाण्याबरोबर, मातीबरोबर, येथील जंगलांबरोबरच येथील प्राण्यांशी जुळवून घेताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. चित्त्यांच्या तुलनेत बिबटे अधिक आक्रमक आहेत. यामुळे येथील या सर्व बाबींशी जुळवून घेताना चित्यांना काही अवधी लागणार आहे. शेवटी आपला देशच सोडून ते दुसर्‍या देशात आले आहेत. यामुळे पाच वर्षांच्या आतील हे तीन नर आणि पाच मादी चित्यांची काळजी घेताना वनविभागाला रात्रीचा दिवस करावा लागणार आहे. भारतात आलेल्या या चित्यांच्या संवर्धनासाठी पालपूर कुनो राष्ट्रीय उद्यानात मुबलक जागाच नसल्याची बोंब आंतरराष्ट्रीय मीडियाने आधीच मारली आहे.

चित्त्याला वावरण्यासाठी जवळजवळ १ हजार किलोमीटर हून अधिक मोकळी जागा असणे गरजेचे आहे. पण भारतातील ज्या कुनो राष्ट्रीय उद्यानात त्यांना ठेवले जाणार आहे तेथे तेवढी जागाच नसल्याचा दावा आंतरराष्ट्रीय मीडियाने केला आहे. तसेच तेथील वातावरणाचाही चित्त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होण्याची शंका या बाहेरच्या मीडियाने तेथील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हे प्राणी हिंसक होऊ शकण्याचीही शंका तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. तसेच काहींनी प्राण्यांना जेव्हा दुसर्‍या वातावरणात सोडण्यात येते तेव्हा अनेक आजारांचाही सामना करावा लागू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे या चित्त्यांची योग्य बडदास्त ठेवण्याचे टास्क सरकारला पार पाडावे लागणार आहे. कारण हे चित्ते आता भारतात आले असले तरी त्यांच्या हालचालींवर मात्र जगभराची नजर आहे. यामुळे मोदींच्या जन्मदिनी भारतवासी झालेले हे चित्ते साधारण चित्ते नसून आंतरराष्ट्रीय पाहुणे असल्याच्या थाटातच त्यांची उठबस करावी लागणार आहे.