168 वर्षांची तरूणी!

साह्यबाच्या हिकमती पोराने मुंबईच्या छाताडावरून ‘लोखंडी राक्षस’ चालवला, त्या दिवसाला परवाच 168 वर्षं पूर्ण झाली. भारतीय इतिहासाच्या आणि देशाच्या जडणघडणीच्या 168 वर्षांची साक्षीदार असलेली ही भारतीय रेल्वे आपल्यादेखील काळजाचा तुकडा झाली आहे. भारतीय रेल्वेला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

16 एप्रिल 1853 हा दिवस भारतीय इतिहासात अक्षरश: सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे. पहिलं स्वातंत्र्यसमर होण्याच्या चार वर्षं आधी मुंबईत मुंबईकरांना अचंबित, अस्वस्थ आणि थक्क करून सोडणारी एक गोष्ट घडली. बोरीबंदर ते टण्णा (आताचं ठाणे) या दरम्यान एक आगीनगाडी धुरांच्या रेषा हवेत सोडत ‘झुकूझुकू’ धावली. हे अप्रुप बघण्यासाठी तत्कालीन मुंबईतील लोकांनी त्या महाकाय लोखंडी रूळांच्या दुतर्फा गर्दी केली होती. काही जण त्या वेळी सँडहर्स्ट रोड वगैरे भागांमध्ये असलेल्या टेकड्यांवर चढून बसले होते. आताच्या तुलनेत त्या वेळी शांत असलेल्या मुंबईत त्या एका घटनेने मोठी खळबळ उडाली होती. मुंबईचा वेग बदलला आणि आतापर्यंत बैलगाडीच्या, बग्गीच्या किंवा ट्रामच्या संथ लयीत चालणारी मुंबई अचानक धावू लागली.

पण हे नवल लोकांना पचायला वेळ गेलाच. पनवेल भागातल्या बैलगाडीवाल्यांच्या पोटावर पाय येतो, म्हणून त्यावेळी त्यांनी आंदोलनं केल्याचे दाखलेही सापडतात. अनेक जणांच्या मते रेल्वेने प्रवास करणं म्हणजे आयुष्य कमी करून घेणं, असं होतं. कारण ज्या ठिकाणी पोहोचायला पूर्वी एक-दोन दिवस लागायचे, तिथे आता अर्ध्या ते एका तासात पोहोचता येत होतं. म्हणजेच आयुष्य कमी होणार होतं. काहींच्या मते हा लोखंडी राक्षस लहान मुलांना खाऊन टाकायचा. या सगळ्या मजेशीर मतमतांतराचा विचार करूनही रेल्वेने खूप लवकर बाळसं धरलं.

स्वातंत्र्यापूर्वी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विभागलेली रेल्वे स्वातंत्र्यानंतर मात्र भारतीय रेल्वे म्हणून समोर आली. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या आणि म्हणूनच विभागलेल्याही देशात एकसमान भारतीयत्त्व मिरवणारी ही रेल्वेच होती. काही घटना संपूर्ण देशाचं भवितव्य बदलून टाकतात. रेल्वेचं आगमन ही घटना काहीशी अशीच होती. म्हणूनच रेल्वेचा वाढदिवसही धुमधडाक्यात साजरा केला पाहिजे.

रेल्वे भारतात आली, याचा परिणाम फक्त, प्रवासाचं एक नवीन साधन उपलब्ध झालं, एवढाच झाला नाही. हे परिणाम सामाजिक, आर्थिक, राजकीय, मनोरजंन, सांस्कृतिक अशा अनेक अंगांनी भारतीय समाजमानसावर झाले. कसं, ते बघू या.

रेल्वे येण्याआधीच्या काळात दोन भिन्न जातींच्या लोकांनी एकत्र एका बंदिस्त बैलगाडीतून प्रवास करणं वगैरे निषिद्ध होतं. तथाकथित उच्चवर्णीयांना तो विटाळ वाटायचा. सुरुवातीला काही सनातनी लोकांनी वर्णव्यवस्थेप्रमाणेच आसनव्यवस्था हवी, असं टुमणं लावलं होतं. पण सुदैवाने ब्रिटिशांनी त्यांना दाद दिली नाही. शेवटी रेल्वेच्या एका डब्यात सगळे जण मुकाटपणे प्रवास करायला लागले. हे अर्थातच वर लिहिलं, एवढ्या सहजपणे नक्कीच घडलं नसेल. पण ते स्थित्यंतर झालं, हे मात्र नक्की! त्यामुळे आजही भारताचं प्रतीक म्हणजे गर्दीने खच्चून भरलेला लोकल ट्रेनचा किंवा रेल्वेचा डबा, असंच वाटतं. त्यात अनेक धर्मांचे, अनेक जातींचे, अनेक भाषा बोलणारे, भिन्न संस्कृतींमध्ये नांदणारे लोक अगदी गुण्यागोविंदाने नाही म्हणणार, पण एकत्र नांदतात.

दुसरा सर्वात दूरगामी परिणाम झाला तो, उद्योगधंद्यांवर आणि मोठमोठ्या कारखान्यांच्या उत्पादन क्षमतेवर! रेल्वेचं जाळं जसजसं विस्तारत गेलं, तसं देशाच्या एका कोपर्‍यातून कच्चा माल कारखान्यांपर्यंत पोहोचवण्याची क्रिया रेल्वेद्वारे अधिक वेगवान झाली. हीच गोष्ट पक्का माल बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्याची! काहींच्या मते भारतातील कच्चा माल ब्रिटनमध्ये वेगाने नेण्यातही याच रेल्वेचा वाटा होता. ते खरंही आहे. पण स्वातंत्र्यानंतर रेल्वेचं हेच जाळं वापरून भारतानेही प्रगती केली, हे नाकारता येत नाही.

रेल्वेची एक काळी बाजूदेखील आहे. रेल्वेने प्रवास करणारा एक बंगाली बाबू रेल्वे प्लॅटफॉर्मवर थांबली आहे, हे लक्षात घेऊन प्रातर्विधी उरकण्यासाठी उतरला. पण त्याची गाडी सुटली आणि ती पकडण्याच्या नादात तो खाली पडला आणि त्याचं धोतर सुटून लोकांसमोर हसं उडालं. या प्रकाराची तक्रार करणारं खरमरीत पत्र त्याने रेल्वे अधिकार्‍यांना पाठवल्यावर रेल्वेच्या डब्यात शौचकूप आले. हे शौचकूप आले खरे, पण या शौचकुपांनी देशाच्या एका कोपर्‍यापर्यंत मर्यादीत असलेले साथीचे आजार संपूर्ण देशभर पोहोचवले. चालत्या गाडीतून मैला खाली पडायचा. खाली वाहतं पाणी असेल, तर त्या मैल्यातील जीवजंतू पाण्यात मिसळून ते आसपासच्या गावांपर्यंत पोहोचायचे. आता एवढ्या वर्षांनी रेल्वेने यावर तोडगा म्हणून बायो टॉयलेट्स बसवली, हेदेखील कौतुकास्पद!

तसं रेल्वे आणि सिनेमाचं नातंही खूप गहिरं आहे. हिंदी चित्रपटसृष्टीच्याच नाही, तर दाक्षिणात्य, बंगाली चित्रपटसृष्टीच्याही उदयाच्या काळात अनेक चित्रपटांमध्ये रेल्वे दिसली. बूटपॉलिश, द बर्निंग ट्रेन यांच्यासारख्या सिनेमांमध्ये तर ती एक कॅरेक्टर म्हणूनच वावरली. अनेक चित्रपटांमध्ये तर नायक किंवा नायिका गावातून शहरात येतात हे दाखवण्यासाठी फक्त धावती रेल्वे आणि त्यानंतर व्हिक्टोरिया टर्मिनसची (आताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) इमारत असे शॉट्स दाखवले जायचे. आजही अनेक चित्रपटांमध्ये रेल्वे ओझरती तरी दिसतेच.

मुंबईकर आणि रेल्वे यांचं नातं तर अतूट आहे. खरं तर मुंबईकर रेल्वेच्या टाईमटेबलशी बांधलेला असतो. 8.37 आणि 8.39 या दोन मिनिटांमध्ये असलेल्या फरकाची किंमत नेहमीची गाडी चुकलेला मुंबईकरच उत्तमरीत्या सांगू शकतो. 15 ते 20 रुपयांमध्ये पार कल्याण-डोंबिवली-विरारपासून मुंबईच्या दुसर्‍या टोकाला घेऊन जाणारी लोकल हातावर पोट असलेल्या लाखो मुंबईकरांच्या खिशाचीही काळजी घेते. ठरलेल्या गाडीत तयार झालेले ग्रुप अनेकांसाठी कुटुंबासारखेच असतात. राजकारणापासून ते बाजूच्या डब्यातल्या सुंदर दिसणार्‍या एखाद्या मुलीपर्यंत, भाजी निवडण्यापासून ते हळदीकुंकवापर्यंत अनेक विषयांवरच्या गप्पा, अनेक गोष्टी या धावत्या कुटुंबात एकत्र केल्या जातात.

इतर वेळी दुसर्‍याच्या आयुष्याची दखल न घेणारा आणि इतरांच्या आयुष्यापासून अलिप्त राहणारा मुंबईकर लोकल ट्रेनच्या त्या डब्यातल्या आपल्या कुटुंबात खुलतो. हळवाही होतो. मग सावंतांच्या पोरीने दहावीत 94 टक्के मिळाल्याचे पेढे खाताना त्याला ते आपल्याच पोरीचं यश वाटतं किंवा पुरंदर्‍याच्या आईच्या ऑपरेशनसाठी येणार्‍या खर्चातला थोडासा वाटा उचलताना त्याला खिसा हलका झाल्यासारखाही वाटत नाही.

रेल्वेगाडी, त्यातले पंखे, दंड होण्याच्या भीतीने कधीही न खेचलेली चेन, प्लॅटफॉर्म, त्या प्लॅटफॉर्मवरचे लाल डगला घातलेले हमाल, हातगाड्या, खानपान सेवा पुरवणारे स्टॉल, सिग्नल, काही स्टेशनांमध्ये अजूनही जपून ठेवलेली मोठी पितळी घंटा, लोखंडी रूळ, त्याखालची खडी, त्या रूळांवर चकरा मारत रूळांची तब्येत चेक करणारे गँगमन, संस्थानिकाच्या रुबाबात वावरणारे स्टेशनमास्तर, प्रशासकीय सेवेतील इतर अधिकार्‍यांपेक्षा वेगळाच तोरा असणारे रेल्वेचे ते अधिकारी… रेल्वेचं हे विश्वच खूप लोभस आणि मोहक आहे. ते आवडतं कारण, ते आपल्याला एकमेकांशी जोडणारं आहे, आपल्या सुखदु:खातलं वाटेकरी आहे.

168 वर्षांच्या या तरुण भारतीय रेल्वेला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!