Maharashtra Assembly Election 2024
घरफिचर्ससारांशUsha Uthup : मर्दानी आवाजाची पॉप सम्राज्ञी : उषा उत्थुप

Usha Uthup : मर्दानी आवाजाची पॉप सम्राज्ञी : उषा उत्थुप

Subscribe

गायिका बनण्याचा ध्यास उषा उत्थुप यांनी घेतला, पण त्या काळात हिंदी सिनेविश्वात मंगेशकर भगिनींचं साम्राज्य होतं. त्यांनी मग नाईट क्लबमध्ये गायला सुरुवात केली. चेन्नई, कोलकाता यांसारख्या शहरांमधल्या नाईट क्लबमध्ये त्या गाऊ लागल्या. दिल्लीतल्या ओबेरॉय हॉटेलमधल्या अशाच एका कार्यक्रमामुळे त्यांचं नशीब बदललं. आवाजाप्रमाणेच त्यांची वेशभूषाही वैशिष्ठ्यपूर्ण आणि हटके होती आणि आजही त्यात बदल झालेला नाही. गडद रंगाची भरजरी साडी, कपाळावर भलेमोठे कुंकू आणि केसांत माळलेला गजरा यामुळे त्यांची वेगळी छाप प्रेक्षकांवर पडते.

-प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार

आपला देश स्वतंत्र झाला त्याच वर्षी मुंबईत एका दाक्षिणात्य कुटुंबात (8 नोव्हेंबर 1947) गायिका उषा उत्थुप यांचा जन्म झाला. त्यांचे वडील पोलीस खात्यात नोकरीला होते. त्यांच्या आईला संगीताची खूप आवड असल्याने घरात काहीसं संगीताचं वातावरण होतं. आई छंद म्हणून गायचीही. विशेष म्हणजे पन्नासच्या दशकातही त्यांच्या घरात विशिष्ट प्रकारचंच नव्हे तर वैविध्यपूर्ण संगीत ऐकलं जायचं.

- Advertisement -

अभिजात पाश्चिमात्य कलावंत बिथोवीन, मोझार्ट, भारतीय शास्त्रीय संगीतातले दिग्गज बडे गुलाम अली खान, बेगम अख्तर, किशोरी अमोणकर, भीमसेन जोशी यांचं गाणं ऐकत ऐकतच त्या मोठ्या झाल्या. परिणामी बालपणापासूनच त्यांच्यात गायनाची आवड निर्माण झाली. शाळेत एकदा त्या संगीत शिक्षकाकडे गेल्या आणि संगीत शिकण्याची इच्छा व्यक्त केली. शिक्षकाने त्यांचं गाणं ऐकलं आणि नकार दिला. उषा यांचा आवाज गायनासाठी योग्य नसल्याचं शिक्षकाने सांगितलं.

गाण्यासाठी आवाजात माधुर्य असायला हवं, मात्र उषा यांचा काहीसा पुरुषी असलेला आवाज शिक्षकाला आवडला नाही. शिक्षकाच्या अशा अभिप्रायाने दुसर्‍या एखाद्या मुलीने नाराज होऊन संगीत शिकायचा विचार मनातून काढून टाकला असता. अश्रू ढाळत दु:खी झाली असती, मात्र उषा यांनी असं काहीही केलं नाही. त्यांनी शिक्षकाचं म्हणणं अजिबात मनावर घेतलं नाही. त्यांना जसं गाता येतं तसंच त्या गात राहिल्या. शाळेत रिकामा तास मिळाला की उषा आपली कला सादर करायच्या. बसण्याची बाकं तबला व्हायची आणि इतर विद्यार्थी कोरस म्हणून साथ द्यायचे.

- Advertisement -

त्यांच्या बहिणींनाही गायनाचा छंद होता. त्यांच्या शेजारी राहणार्‍या पोलीस उपायुक्त पठाण यांची कन्या जमिलाने उषा यांना हिंदी भाषा आणि शास्त्रीय संगीत शिकायला प्रोत्साहित केलं. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांना चेन्नई इथं एका कार्यक्रमात गायची संधी मिळाली. त्यांनी गायलेल्या इंग्रजी गाण्याला उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांनी दाद दिली. या दिवशी त्यांच्या लक्षात आलं की गायनात नाव कमवायचं असेल तर स्वत:ची वेगळी आणि सर्वस्वी आपली ओळख निर्माण करायला हवी. त्यांनी गायनाच्या क्षेत्रात आपलं करिअर करण्याचा निर्णय घेतला.

गायिका बनण्याचा ध्यास उषा यांनी घेतला, पण त्या काळात हिंदी सिनेविश्वात मंगेशकर भगिनींचं साम्राज्य होतं. त्यांनी मग नाईट क्लबमध्ये गायला सुरुवात केली. चेन्नई, कोलकाता यांसारख्या शहरांमधल्या नाईट क्लबमध्ये त्या गाऊ लागल्या. दिल्लीतल्या ओबेरॉय हॉटेलमधल्या अशाच एका कार्यक्रमामुळे त्यांचं नशीब बदललं. आवाजाप्रमाणेच त्यांची वेशभूषाही वैशिष्ठ्यपूर्ण आणि हटके होती आणि आजही त्यात बदल झालेला नाही. गडद रंगाची भरजरी साडी, कपाळावर भलेमोठे कुंकू आणि केसांत माळलेला गजरा यामुळे त्यांची वेगळी छाप प्रेक्षकांवर पडते.

नाईट क्लबमध्ये हिंदी सिनेगीतं गाताना त्या प्रसिद्ध पंजाबी लोकगीत ‘काली तेरी चोटी…’ देखील आवडीने सादर करायच्या. दिल्लीतल्या त्या नाईट क्लबमध्ये अभिनेता-दिग्दर्शक देव आनंद यांच्या नवकेतन फिल्म्स युनिटची मोठी माणसं उपस्थित होती. त्यावेळी त्यांच्या ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटाचं काम सुरू होतं. याचं संगीत राहुलदेव बर्मन करीत होते. नवकेतनच्या लोकांनी उषा यांचं क्लबमधलं गाणं ऐकून त्यांच्याविषयीची माहिती मिळवली. सारी माहिती मिळाल्यावर त्यांनी त्यांच्याशी संपर्क केला. त्यांची ऑफर स्पष्ट होती, त्यांच्या आगामी सिनेमासाठी पार्श्वगायन करण्याची! उषा यांनी या सुवर्ण संधीला नाकारण्याचा प्रश्नच नव्हता.

त्यांनी होकार दिला. त्यांनी आशा भोसलेंसमवेत ‘हरे रामा हरे कृष्णा…’ हे शीर्षक गीत गाऊन हिंदी चित्रपटसृष्टीत धमाकेदार पदार्पण केलं. (खरं म्हणजे या सिनेमातलं ‘दम मारो दम…’ हे आशा भोसलेंनी गायलेलं गाणं त्याच गाणार होत्या, पण अंतर्गत राजकारणामुळे त्यांची ही संधी हुकली.) याआधी १९७० मधल्या ‘बॉम्बे टोकीज’ या इंग्रजी चित्रपटात ‘Good Times and Bad Times… आणि Hari Om Tatsat…’ ही दोन इंग्रजी गाणी त्यांनी (संगीतकार : शंकर-जयकिशन) गायली.

अलीकडे डिजिटल साऊंड डिझाईन, ऑटो-ट्यूनिंग अशा अत्याधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे एखाद्या गायकाला आपल्या आवाजाची वेगळी ओळख निर्माण करणं आव्हानात्मक झालंय. पूर्वी गाण्याच्या एक-दोन ओळी ऐकताच गायक कोण आहे हे लक्षात यायचं. अशा या काळात उषा उत्थुप आपल्या अनोख्या आवाजाने आणि दिलखेचक सादरीकरणामुळे हिंदी पॉप गायकीच्या शिखरावर जाऊन बसल्या आहेत, असं म्हणणं चुकीचं होणार नाही. त्यांना भारतीय पॉप संगीताची सम्राज्ञी संबोधलं जातं.

त्यांच्या बहिणीने महान निवेदक अमीन सायानी यांच्याशी भेट घालून दिली. सायानी यांनी रेडिओ सिलोनवर प्रसारित होणार्‍या ‘ओव्हलटाइन म्युझिक अवर’ या कार्यक्रमात त्यांना गायची संधी दिली. यानंतर त्यांनी अशा अनेक कार्यक्रमांमध्ये गायन केलं. त्यांनी तुरळक हिंदी, मल्याळम, तमिळ, कन्नड चित्रपटांमध्ये आणि काही म्युझिक अल्बम्समध्येही काम केलंय. शिवाय स्टार सिंगर, भारत की शान, गौरव महाराष्ट्राचा, कुल्फी कुमार बाजेवाला अशा दूरचित्रवाणीवरच्या गाण्यांच्या कार्यक्रमात परीक्षक म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे.

उषा यांना भारत सरकारने पद्मश्री (२०११) आणि पद्मभूषण (२०२४) हे दोन नागरी सन्मान देऊन गौरवलं आहे. तसेच गायनासाठी त्यांना आयफा, स्क्रीन, मिर्ची म्युझिक, एशियानेट फिल्म, कलाकार, राजीव गांधी राष्ट्रीय एकात्मता उत्कृष्ट संगीत, आंतरराष्ट्रीय शांतता महिला शिरोमणी असे विविध पुरस्कार मिळाले आहेत. जगविख्यात ‘बीबीसी रेडिओ लंडन’वर त्यांची मुलाखतही प्रसारित झाली आहे. त्यांनी विदेशातही आपल्या गायनाचे अनेक कार्यक्रम केले आहेत. उषा यांचे भारतीय बालकांसाठी दोन ‘कराडी चिल्ड्रेन र्‍हाइम्स अल्बम्स’ देखील प्रकाशित झाले आहेत.

यातली भारतीय सण-उत्सव, पारंपरिक झाडे, भारतीय अन्नपदार्थ (भेळपुरी, सांबार), भारतीय क्रिकेट, भारतीय पारंपरिक पोशाख-वेशभूषा, भारतीय नद्या, भारतीय संगीत यांची वैशिष्ठ्ये सांगणारी गाणी मोठ्यांनाही थिरकायला लावणारी आहेत. मायकेल जॅक्सनच्या गाण्यांचा हिंदी रूपांतरित अल्बमही त्यांनी काढला. भारतीय म्युझिक बँड ‘परिक्रमा’सोबतही त्यांनी गायन केलंय. त्यांच्या स्टेज शोला उदंड प्रतिसाद मिळत असतो. त्यांच्या अनवट गायकीचे आणि सादरीकरणाचे चाहते प्रचंड दिवाने आहेत.

आपल्या गायनशैलीविषयी त्या म्हणतात की, मी कोणत्याही विशिष्ट शैलीचं अनुकरण करीत नाही. मला लोकांचं संगीत गायला आवडतं. जेव्हा मी गायला सुरुवात केली तेव्हा कोणी नाईट क्लबमध्ये गात नव्हतं किंवा मी ज्या पद्धतीने गाते तसं कोणी गात नव्हतं. माझ्यासमोर आदर्श असा नव्हता कोणाचा. आता जेव्हा मला लोक विचारतात की माझी गायची शैली कोणती आहे? त्यावर ‘लोकांचं संगीत मी गातेय’ असं उत्तर देते. जे लोकांना आवडतं ते मी गाते. यामुळे मला पुढे जायला प्रेरणा मिळते.

गाणं कधीही गायकापेक्षा मोठं असतं अशी माझी ठाम धारणा आहे. माझ्या कारकिर्दीची सुरुवात पार्श्वगायिका म्हणून झाली नाही. मी प्रत्यक्ष कार्यक्रमातून गाऊ लागले. लोकांनी मला ऐकलं. माझी चर्चा होऊ लागली आणि अशा तर्‍हेने लोक माझ्या कार्यक्रमांना गर्दी करू लागले. सर्व पिढीतल्या श्रोत्यांना माझं गाणं आवडतं. अगदी माझ्या नातवंडांच्या पिढीलाही. त्यामुळे मला गतिशील राहता येतं. मी काळाबरोबर चालत स्वत:चा शोध घेत राहते. वर्षानुवर्षे गात असलेल्या गाण्याचा मी पुनर्विचार करून गात त्यास समकालीनत्व प्रदान करते.

एकेकाळी भारतीय चित्रसंगीताच्या परंपरागत साच्यात न बसणार्‍या आणि म्हणून अनुपयुक्त समजल्या जाणार्‍या उषा यांची वाटचाल संघर्षपूर्ण आहे. त्यांचं गायन एक ‘ट्रेडमार्क’ बनलं आहे. त्यांनी गायलेली जोगन प्रीतम की…(देवी/लक्ष्मीकांत-प्यारेलाल), मै भी जलू तू भी जले…(कही धूप कही छाव/चित्रगुप्त), वन टू च च च… (शालीमार/आरडी बर्मन), हरि ओम हरि-हरि ओम हरि… (प्यारा दुश्मन/भप्पी लाहिरी), दोस्तों से प्यार किया, दुश्मनों से बदला लिया (शान/आरडी), रंबा हो हो, संबा हो… (अरमान/भप्पीदा), कोई यहाँ आहा नाचे नाचे… (डिस्को डान्सर/भप्पीदा), नाकाबंदी…(नाकाबंदी/भप्पीदा), उरी उरी बाबा…(दुश्मन देवता/भप्पीदा), इधर दौड है… (दौड/एआर रहमान), राजा की कहानी… (गॉडमदर /विशाल भारद्वाज), कभी पा लिया तो कभी खो दिया… (जॉगर्स पार्क/ताबून), दिन है ना ये रात…(भूत/सलीम-सुलेमान), विकेट बचा…(हॅट्ट्रिक/ प्रीतम), है ये माया…(डॉन २/शंकर-एहसान-लॉय), डार्लिंग आंखों से आंखे चार करने दो…(सात खून माफ/ विशाल भारद्वाज), रम्बा मै सम्बा…(शिरीन फरहाद की तो निकल पडी/जीत गांगुली), आमी शोट्टी बोलची… (कहानी/विशाल-शेखर) ही गाणी म्हणजे उषा यांची ओळख. भारदस्त आणि जराशा मर्दानी आवाजाच्या उषा उत्थुप यांनी शुक्रवारी ८ नोव्हेंबरला वयाच्या ७८ व्या वर्षात पदार्पण केलं. त्यांचं मन:पूर्वक अभीष्टचिंतन!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -