घरफिचर्ससारांशइंडियाज ‘आयडीअल’ डॉटर

इंडियाज ‘आयडीअल’ डॉटर

Subscribe

आपण तयार केलेल्या आदर्शांच्या साच्यात न बसणार्‍या मुलीला लगेचच खलनायिका करून तिला समाजात घडणार्‍या सगळ्या वाईट गोष्टींसाठी आरोपी ठरवण्याच्या या मानसिकतेतच मूळ लोचा आहे. आणि मग याचाच पगडा आपण मुलींवर आणि येत्या पिढीवर इतक्या मोठ्या प्रमाणात तयार करतो की, ही ‘गुड गर्ल’ संकल्पना बर्‍याचदा निवड नाही तर सक्ती होते. वर्षानुवर्षांपासून धर्म, संस्कृती, सामाजिक नैतिकतेच्या नियमांखाली आपण जोपासत असलेल्या आदर्श मुलीच्या प्रतिमेला मग जराही धक्का लागला किंवा ज्या स्त्रियांनी हा धक्का लावण्याचा प्रयत्न केला त्यांना तातडीने वाईट, चारित्र्यहीन आणि असंस्कारी असण्याचं लेबल आपण लावतो.

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण आणि रिया चक्रवर्तीचे आरोपीच्या पिंजर्‍यात उभे राहणे हे गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या सगळ्यांसाठी अनेक अर्थांनी अनेक शक्यता आणि मान्यता उलगडून दाखवणारे होते. रियावरचा आरोप सिद्ध व्हायच्या आधीच आपण सारे आपल्याच माध्यमांच्या साथीने तिच्याभोवती जे नकारात्मक आरोपाचे किंवा आरोपांसाठी प्रबळ वातावरणाचे कवच तयार करत आहोत ते रियाने केलेल्या किंवा न केलेल्या गुन्ह्यापेक्षाही जास्त भयानक आहे. NCB च्या पहिल्या चौकशीला येताना रियाने ठरवून किंवा योगायोगाने घातलेला टी-शर्ट आणि त्यावर लिहिलेलं वाक्य ‘‘Roses are red, violets are blue,

let’s smash the patriarchy me and you’ हे आपण समाज म्हणून आणि माध्यमांमधून रियाकडे पाहत असलेल्या नजरेच्या आणि वृत्तीच्या प्रतिक्रियेत तिचं एक मोठं विधान होतं असं मला वाटतं. रियासारख्या स्वतंत्र, कमावत्या, प्रगल्भ, आपल्या हक्कांची आणि अधिकारांची जाण असलेल्या, साथीदार निवडण्याचे आपले स्वातंत्र्य प्रत्यक्ष वापरणार्‍या आणि समाजाच्या-संस्कृतीच्या अनेक ढाच्यांना प्रश्न विचारून त्यांना बदलत्या काळानुसार बदलायला भाग पडणार्‍या बायका आणि मुली या बहुसंख्याच्या आणि समाजमनाच्या नजरेत खलनायिका असतात. आणि मग त्याच नजरेतून त्यांनी केलेल्या किंवा न केलेल्या प्रत्येक कृतीसाठी त्यांची मुक्त जीवनशैली, पुरोगामी विचार हेच कारणीभूत असते हे आपण पक्क ठरवलंय. याच स्त्रिया मग पुरुषांना नादाला लावून त्यांना फसवतात, त्यांचे पैसे उकळतात, स्वतःचा स्वार्थ बघतात, घर-कुटुंब फोडतात आणि आणखी टोकाचं म्हणजे काळी जादू करून पुरुषांना संमोहित करतात आणि मग त्या पुरुषाच्या प्रत्येक चुकीच्या-वाईट कृतीला जबाबदार त्या चारित्र्यहीन स्त्रियाच असतात, असा आपला पक्का समज आहे. मग आतापर्यंत मिडिया ट्रायलमध्ये असू देत किंवा समूहाची मानसिकता तयार करण्यात असू देत अशा अनेक स्त्रियांना या मानसिकतेला बळी पडावं लागलंय. रिया ही त्यापैकीच एक!

- Advertisement -

आपण तयार केलेल्या आदर्शांच्या साच्यात न बसणारीला लगेचच खलनायिका करून तिला समाजात घडणार्‍या सगळ्या वाईट गोष्टींसाठी आरोपी ठरवण्याच्या या मानसिकतेतच मूळ लोचा आहे. आणि मग याचाच पगडा आपण मुलींवर आणि येत्या पिढीवर इतक्या मोठ्या प्रमाणात तयार करतो की, ही ‘गुड गर्ल’ संकल्पना बर्‍याचदा निवड नाही तर सक्ती होते. वर्षानुवर्षांपासून धर्म, संस्कृती, सामाजिक नैतिकतेच्या नियमांखाली आपण जोपासत असलेल्या आदर्श मुलीच्या प्रतिमेला मग जराही धक्का लागला किंवा ज्या स्त्रियांनी हा धक्का लावण्याचा प्रयत्न केला त्यांना तातडीने वाईट, चारित्र्यहीन आणि असंस्कारी असण्याचं लेबल आपण लावतो.

समाजाने तयार केलेल्या ‘आदर्श मुलगी’ या व्याख्येत बसण्यासाठी असलेले निकष हे मुलींच्या विकासात बाधा आणणारे ठरतात. पण आपण संस्कृतीच्या आवरणाखाली समोर आलेले काहीही चिकित्सक विचार न करता डोळे बंद करून स्वीकारायला तयार होतो ही आपली संस्कृती! आणि विशेषत: असे विषय जर मुली आणि स्त्रियांच्या बाबतीत येत असतील तर ही उदासीनता आणखी कट्टरतेकडे झुकते. तसं पाहिलं तर मुलग्यांनासुद्धा या आदर्श मुलाच्या परीक्षेचा सामना करावा लागतोच. मुलांनी मुळूमुळू रडू नये, भावनेपेक्षा शक्ती महत्वाची, कष्टाची कामं करावीत, घरातील कर्ता पुरुष व्हावं वगैरे अपेक्षा मुलांकडूनही असतातच. त्यामुळे हा विषय मुलींनी समानतेसाठी रडं मिरवण्याचा नाही असे काहींचे म्हणणे असेलही पण मुलगा आणि मुलगी यांच्यासाठी असलेल्या या आदर्शांच्या साच्यांमध्ये एक मूलभूत फरक आहे. आदर्शाच्या या अपेक्षांवर खरे उतरले नाही तर मुलींना मोजावी लागणारी किंमत ही मुलग्यांपेक्षा खूप जास्त असते किंवा अधिक तीव्र असते. बर्‍याचदा तर मुलांनीही त्यांना आखून दिलेली चौकट मोडणे कौतुकास्पद ठरते, पण मुलींच्या बाबतीत मात्र ते अपमानास्पदच. मुलींनी चौकट ओलांडणे म्हणजे बापाचे नाक कापणे, कुटुंबाची इज्जत घालवणे, शेण खाणे, शिंगं फुटणे, तोंड काळं करणे आणि या सगळ्याची एकमेव शिक्षा म्हणजे मुलीचे लग्न.

- Advertisement -

दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या विषयावर बीबीसीने केलेल्या ‘इंडियाज डॉटर’ या माहितीपटात आरोपी मुकेश सिंग आपल्या मुलाखतीत म्हणतो की, ‘या बलात्कारात खरी चूक तर त्या मुलीचीच होती. आदर्श, संस्कारी मुली असं रात्री 9 वाजता रस्त्यावर फिरत नाहीत. पब, डिस्को, बारमध्ये, सिनेमागृहात दिसत नाहीत तर स्वयंपाकघरात दिसतात.’ मुकेश सिंगने किती नेमक्या शब्दात भारतीय समाजातील चांगल्या, संस्कारी अशा आदर्श मुलीचं शब्दचित्र रंगवलं. या घटनेला आता 6 वर्षे उलटली. पण वर्षानुवर्षांपासून आपण असंच आपल्या साच्यांमध्ये न बसणार्‍या मुलींना अनेक लेबलं लावून आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करत आलोय. तसं तर प्रत्येकच संस्कृती आपापल्या भवतालाचे धागेदोरे सांभाळत ही आदर्श मुलीची संकल्पना भिजवत ठेवते आणि पालक, शिक्षक, धार्मिक गुरु, मित्रमैत्रिणी, माध्यमं, सोशल मीडिया, फॅमिली ड्रामात रंगलेल्या मालिकांच्या माध्यमातून ही प्रतिमा येणार्‍या अनेक पिढ्यांपर्यंत प्रसवत राहते.

मुलींनी या आदर्श मुलीच्या व्याख्येत बसण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घालावे, अशी अपेक्षा तर समाज करतोच पण भरीस भर म्हणजे ही चौकट मुलींनी जराशी ओलांडली तरी त्यांना शिक्षा करून समाज आपली एकाधिकारशाही दाखवून देतो. मग ते मुलीने प्रेमविवाह केला म्हणून समाजातून कुटुंबाला बहिष्कृत करणं असेल किंवा वयात आलेल्या मुलीचा ‘पाय घसरू नये’ म्हणून तिला घरातच डांबून ठेवणं असेल. हळूहळू आपल्यासाठी असलेल्या या सामाजिक नियमांची आणि अपेक्षांची मुलींना सवय होते आणि त्या अपेक्षा पूर्ण करणे, आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येकाला खूश करणे हे आपले परम कर्तव्यच समजून नंतरच्या आयुष्यातही त्या पूर्ण वेळ ‘संस्कारी बहु’ होण्यासाठी झटत असतात. आदर्श मुलीची ही प्रतिमा डोक्यात बिंबवण्याच्या या प्रक्रियेची तीव्रता इतकी जास्त असते की, आदर्श मुलगी असल्याचा किताब मिळवण्यासाठी कितीतरी मुली आपल्या इच्छा, मतं, स्वप्नांची बाजी लावतात. मानसशास्त्रात ह्याला ‘गुड गर्ल सिंड्रोम’ म्हणतात.

माझ्या कामामुळे मुलींच्या विशेषत: ग्रामीण भागातील मुलींच्या आयुष्यात खूप जवळून डोकावायला मिळतं आणि मुलींच्या भावविश्वात रेंगाळणार्‍या कितीतरी होड्यांवर या गुड गर्ल सिंड्रोमचं वादळ घोंघावतंय हे दिसत असतं. मला आठवतं एकदा एका कार्यशाळेत मुलींना तुमचं स्वप्न काय आहे ते एका कागदावर रेखाटायला सांगितलं होतं. मग मुलींनी डॉक्टर, इंजिनिअर व्हायचं, शिक्षक व्हायचं अशी उत्तरं तर दिलीच पण मोनिका नावाच्या एका चुणचुणीत मुलीने मला ‘आदर्श मुलगी’ व्हायचंय असं उत्तर दिलं आणि आपल्या डोक्यातील आदर्श मुलीचे चित्र तिने कागदावर रेखाटले. पंजाबी ड्रेस, लांबसडक केसांची घट्ट वेणी, अंगावर भरगच्च ओढणी, नजर पायाशी, चेहर्‍यावर हसू. किती बोलकं होतं ते चित्र आणि तितकंच अस्वस्थ करणारंसुद्धा! मोनिकासारख्या अशा कितीतरी मुली आदर्श मुलगी, आदर्श सून, आदर्श बायको, आदर्श बहीण, आदर्श आई अशा कितीतरी आघाड्यांवर खरे उतरण्यासाठी आणि लोकांच्या नजरेत सन्मान मिळवण्यासाठी आयुष्यभर स्वतःची शारीरिक मानसिक झीज करून घेतात. स्वतःच्या क्षमतांकडे दुर्लक्ष करतात. स्वतःला जे हवंय ते बोलून न दाखवण्याची, त्याकडे दुर्लक्ष करण्याची आणि इतरांना खूश ठेवण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे ही वृत्ती मुलींची पाठ सोडत नाही. नोकरीच्या किंवा कामाच्या ठिकाणीसुद्धा त्या बर्‍याचदा स्वतःचे मत ठामपणे मांडू शकत नाहीत. स्वतः एखादा निर्णय घेऊन परिणामांचे धोके पत्करण्याची तयारी त्या दाखवत नाहीत. कुटुंब आणि त्यांच्या सामाजिक भवतालाने त्यांना दिलेल्या अनुभवांवरून आपण इतरांची सेवा करण्यासाठी आहोत ही भावना पुढे करिअरमध्येसुद्धा तशीच उमटत राहते.

आदर्श मुलीच्या या संकल्पनांचे स्वरूप शहरी-ग्रामीण, गरीब-श्रीमंत, सुशिक्षित-अशिक्षित अशा संदर्भांमध्ये थोड्याफार प्रमाणात बदलत असले तरी या सगळ्यात आपण आखून दिलेली रेष मुलीने ओलांडू नये हीच एक सामायिक अपेक्षा असते. ग्रामीण भागात मुलींनी शाळेत-कॉलेजात जाऊ नये, घराची, घरातल्या कामांची सगळी जबाबदारी घ्यावी, मोबाईल वापरू नये, जीन्स घालू नये, नट्टापट्टा करू नये, मुलांशी अजिबात बोलू नये, कुटुंबातील व्यक्तींच्या दिमतीला सतत हजर असावे, सर्वांना आनंदी ठेवावे, भाऊ-वडील-नवरा यांनी दारू पिऊन मारहाण केली तरी ते मुकाट सहन करावे ही आदर्श मुलगी ठरण्यासाठीची नियमावली असते तर जराशा शहरी भागात मुलींनी लग्न ठरेपर्यंत शिकावे, मुलांशी कामापुरते बोलावे, आईवडील म्हणतील तेव्हा आणि म्हणतील त्या मुलाशी लग्न करावे, स्वयंपाक शिकावा, आईला घरकामात मदत करावी, पूजापाठ करावा, जीन्स चालेल पण तरी अंगभर कपडे घालावेत, मोबाईल कामापुरता वापरावा, सोशल मिडीयावर स्वतःचे फोटो न टाकता नट्यांचे फोटो टाकावेत, नोकरी करावी पण पूर्ण पगार आईवडिलांच्या हातात द्यावा, रात्री नऊच्या आत घरात यावे, दारू-सिगारेट पिऊ नये, दिवसभर घडणारी प्रत्येक गोष्ट घरी येऊन आईवडिलांना सांगावी, त्यांचा सल्ला घ्यावा आणि आईवडिलांचा सल्ला हाच अंतिम निर्णय समजावा या निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला ‘आदर्श मुलगी’ हा किताब मिळतो.

हे सगळं जरी वरवर खूप साधं आणि सोपं वाटत असलं तरी हा खूप गंभीर विषय आहे. या आदर्श मुलीच्या समाजात असलेल्या प्रतिमेपर्यंत पोहचण्यासाठी कितीतरी मुलींची दमछाक होते. हे संमोहन इतके पावरफुल असते की, आपण ज्या गोष्टीसाठी धावतोय ती गोष्ट किती फुटकळ आहे, आपल्या प्रगतीला मर्यादा घालणारी आहे, प्रसंगी आपलं माणूस असणंच नाकारणारी आहे हे मुलींच्या लक्षातच येत नाही किंवा लक्षात आले तरी या प्रतिमेचा पगडा इतका भयंकर आहे की, तो नाकारण्यामुळे होणार्‍या परिणामांची भीती मुलींना ते धाडस करू देत नाही. सगळ्याच बाबतीत स्वतःला सर्वात शेवटी ठेवण्याची सवय आयुष्यभर पुरते आणि एक वेगळ्याच प्रकारचा नि:स्वार्थी स्वभाव मुलींमध्ये तयार होतो. मग पुढे त्याचंच कसं चार केकचे तुकडे आणि घरात पाच माणसं असताना आई मला भूक नसल्याचं सांगते वगैरे गौरवीकरण केलं जातं. स्त्री महान असते. त्यागाची मूर्ती असते. स्वतःचा विचार न करता कुटुंबाच्या भल्यासाठी नेहमी झटत असते ही स्तुतीसुमनं या आदर्श मुलगी प्रतिमेच्या नावाखाली केल्या जाणार्‍या सगळ्याच अमानवी प्रकाराला फिकट करतात.

आदर्श मुलगी म्हणून मान्यता मिळवण्याच्या या अदृश्य स्पर्धेत कितीतरी शिक्षित, चांगल्या पदावर नोकरी करणार्‍या जाणत्या मुली अजाणतेपणी भरडल्या जातात. आत्मविश्वास गमावतात. चिकित्सक विचार करण्याची, निर्णय घेण्याची क्षमता स्वतःच क्षीण करतात. स्वाभिमानाची बोली लावतात. ही स्पर्धा मुलींना आणखी दुर्बल आणि अबला करते. याचे सर्वात टोकाचे उदाहरण म्हणजे सतीप्रथा. फक्त समाजाच्या व्याख्येत बसणारी आदर्श स्त्री म्हणून स्टॅम्प मिळवण्यासाठी नवर्‍याच्या जळत्या चितेवर उडी घेण्याचं बळ कुठून येत असावं? सामाजिक दबावाची परिणती कृतीत आणि अमानवी कृतीत होण्याचे हे टोकाचे उदाहरण. सतीप्रथा आता जरी अस्तित्वात नसली तरीसुद्धा अजूनही बायकांचं सती जाणं सुरूच आहे. फक्त त्याचं स्वरूप बदललं आहे. कुटुंबासाठी-कुटुंबाच्या वर्तुळात बाईला नेमून दिलेल्या बायको, आई, सून या भूमिकांवर खरे उतरण्यासाठी स्वतःच्या इच्छा, चालून आलेल्या करिअरच्या मोठमोठ्या संधी कटुंब नावाच्या चितेवर दररोज जळत असतात. आणि दुर्दैव म्हणजे हे सगळं पडद्यामागे घडत असतं. पडद्यावर दिसत नसलं तरी स्वतःच्या शोधात स्वतंत्रपणे निघालेल्या बाईच्या बुडाखाली नेहमीच आग लागलेली असते.

नाशिकसारख्या अर्धवट स्मार्ट शहरात एक स्वतंत्र मुलगी (स्वातंत्र्य कितपत हा एका स्वतंत्र लेखाचा विषय!) म्हणून राहत असताना शहरी आणि स्वतःला स्वतंत्र म्हणवणार्‍या मुलींच्या डोक्यावरसुद्धा या आदर्श प्रतिमेचा किती पगडा आहे हे जाणवते. मीसुद्धा याच सामाजिक वातावरणात घडलेली असल्याने तसा पगडा माझ्याही डोक्यावर असेलच यात शंका नाही. माझ्या आजूबाजूला असणार्‍या समवयीन, मध्यवर्गीय, भरपूर शिकलेल्या, चांगल्या पगाराची नोकरी असलेल्या, वरकरणी स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेणार्‍या (कोणते निर्णय हा आणखी एका लेखाचा विषय!) मुलींसाठी ही आदर्श मुलीची चौकट जरा सैल झाली असली तरी तिची मुळं मात्र मुलींच्या डोक्यात खोलवर रुजवण्यात समाज यशस्वी झालेला दिसतो. बॉयफ्रेंड असणार्‍या पण लग्नाआधी सेक्स करणार नाही हे मनोमन ठरवलेल्या, मैत्रिणींमध्ये असताना नॉनव्हेज जोक्समध्ये रमणार्‍या पण मित्रांमध्ये असताना मात्र सेक्स या विषयाबद्दल आपल्याला कसं काहीच माहीत नाही असा निरागस भाव उगवणार्‍या, कधीतरी दारू-सिगारेट चालेल पण त्याबद्दल मनात सतत अपराधीपणा बाळगणार्‍या, सोशल मीडियावर फक्त स्वत:चे गोड गोड फोटो पोस्ट करून आपली ऑनलाईन प्रतिमा ‘मॉडर्न आणि हॉट गर्ल’ करवून घेण्यासाठी उत्सुक पण बोल्ड असणं म्हणजे असंस्कारी अशी श्रद्धा असलेल्या इत्यादी इत्यादी. आपण नक्की कोण आहोत? आपल्याला काय हवंय? आपण जे करतोय ते का करतोय या प्रश्नांची उत्तरं शोधण्यापेक्षा या मुली या प्रश्नांच्या गुंत्यात खूप अडकतात.

हा विषय खूप क्लिष्ट आहे. एका बाजूने हा गुंता सुटणारा नाही. समाजाचा लोकांवर एक पगडा असतो, पकड असते. ही पकड चांगल्या वाईटाच्या या प्रतिमांमधून परावर्तित होत असते. व्यक्ति आणि समुहामधल्या संघर्षात अशा प्रतिमा हत्यार म्हणून वापरल्या जातात. या प्रतिमांनाच तडे जायला लागले तर समाजाची माणसांवरील विशेषत: स्त्रियांवरील पकड सैल होऊ शकते. समूहवादापेक्षा व्यक्तीवाद उफाळू शकतो. असा संपूर्ण व्यक्तिवाद जसा संयत समाजासाठी अहितकारक आहे, तसाच व्यक्तीवादाला पायदळी तुडवून समूहाचेच खरे करणार्‍या लैंगिक भेदांवर उभ्या राहिलेल्या आदर्शांच्या प्रतिमा. आता या जुनाट आणि प्रतिगामी प्रतिमा नाकारून नव्या, विवेकी, व्यक्तींच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणार्‍या सामाजिक प्रथांना नाकारून विवेकी व्यक्तिवादाचा पुरस्कार करणार्‍या प्रतिमा आता समाजाने आणि मुलींनीही स्वीकारायला हव्या. अशाने फक्त काळ्या किंवा पांढर्‍या साच्यात बसणार्‍याच नाही तर स्वतःच्या आयुष्याबद्दल स्वतः निर्णय घेऊ शकणार्‍या, स्वातंत्र्य आणि स्वैराचारातला फरक जाणणार्‍या आणि बाई म्हणून नाही तर माणूस म्हणून आत्मविश्वासाने क्षितिजाकडे पाहणार्‍या मुलींच्या अनेक रंगीबेरंगी प्रतिमा पुढे येतील आणि त्याचे स्वागत करायला आपण समाज म्हणून हातात हात घेऊन तयार असू!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -