घरफिचर्ससारांशलाखेंच्या नाट्यचिंतनाचा रंगधर्म

लाखेंच्या नाट्यचिंतनाचा रंगधर्म

Subscribe

दरवर्षी 25 डिसेंबर हा दिवस मुंबईतल्या ‘ग्रंथाली’ या प्रकाशन संस्थेतर्फे ‘वाचक दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्त काही साहित्यिक उपक्रम ते आयोजित करत असतात. या उपक्रमांचा एक भाग म्हणून दरवर्षी निवडक पुस्तकांचे प्रकाशन सुद्धा ‘ग्रंथाली’कडून केले जाते. यंदाच्या वर्षी जी सहा पुस्तके प्रकाशित झाली, त्यापैकी एक म्हणजे प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक रवींद्र दामोदर लाखे यांचे ‘नाटक: एक मुक्त चिंतन’ हे पुस्तक होय. या पुस्तकाचे विमोचन ही रंगभूमीवर काम करणार्‍या समस्त रंगकर्मींनी आवर्जून दखल घ्यावी अशी महत्वाची घटना आहे. या लेखाच्या माध्यमातून रंगधर्मी लाखेंच्या या समग्र नाट्यचिंतनाचा संक्षिप्त परिचय वाचकांना करून द्यावासा वाटतो.

रंगभूमीवर भरीव काम करणार्‍या अनेक थोरामोठ्यांची रंगचिंतने आपल्या वाचनात येऊन गेली असतील. त्या प्रत्येक चिंतनाचं आपलं असं एक महत्व आहे, याबद्दल वाद असण्याचं काही कारण नाही. तरी साधारणपणे या सगळ्या चिंतनांचा सूर हा ‘नाटक करता करता मी कसा घडत गेलो’ पासून ते ‘नाटकातलं माझं संचित’ या दोन पट्ट्यांमध्ये लागलेला असल्याचे आपल्याला आढळून येईल. रवींद्र लाखेंचं ‘नाटक: एक मुक्त चिंतन’ मात्र या अनुषंगाने एक महत्त्वाचा आणि ठसठशीत अपवाद आहे. महाराष्ट्र आणि सबंध भारतवर्षात जिथे जिथे नाटकाचं रीतसर प्रशिक्षण दिलं जातं, जिथे जिथे नाटक एक प्रयोगशील कला म्हणून सादर केलं जातं, त्या संस्थांमधून हे रंगचिंतन नाटक शिकवणार्‍या आणि शिकू पाहणार्‍या मंडळींनी आयुष्यभर आपल्या झोळीत बाळगायला हवंय, इतकी मौलिकता या मुक्त चिंतनाला लाभली आहे. या मौलिकतेला असलेला मोठा आधार म्हणजे रवींद्र लाखेंनी हे केवळ रंगकर्मी म्हणून आपल्या जडणघडणीवर केलेलं चिंतन नसून, त्या पलीकडे तो समग्र माणूसपणाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक समृद्धीचा अमूल्य गोषवारा आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. या पुस्तकाबद्दल सविस्तर लिहिणं इथे घालून दिलेल्या शब्दमर्यादेत अजिबातच शक्य नाहीय, याची पूर्ण जाणीव मला आहे. तरी यातील गाभ्याचा इथे थोडक्यात परिचय करून देण्याचा हा एक नम्र प्रयत्न आहे.
साधारणपणे कुठल्याही रंगचिंतनांचं स्वरूप पाहिलंत तर आपण आजवर जे काही भलंबुरं नाटक केलं त्याची जंत्री मांडण्याने चिंतनाची झालेली सुरूवात झालेली आपल्याला दिसून येते. लाखेंनी मात्र या परंपरेला छेद देत थेट मनाच्या मशागतीलाच हात घातलेला आहे. या मनाच्या मशागतीबद्दल बोलताना ते म्हणतात की, कुठल्याही कलेचा मनाशी जास्त संबंध आहे. किंबहुना, आपण करत असलेल्या कुठल्याही कामावर चांगला वा वाईट परिणाम आपल्या ते काम करण्यामागच्या मानसिकतेवर अवलंबून असतो. मशागतीचा वाढीशी संबंध आहे. हा संबंध कसा आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी तुकारामाच्या अभंगाचा, पिकासोच्या चित्रकलेविषयीच्या दृष्टिकोनाचा, जे. कृष्णमूर्तींच्या तत्वचिंतनात्मक विधानांचा, किशोरी आमोणकरांच्या गायनकलेमागील तत्वज्ञानाचा दाखला संदर्भ म्हणून दिला आहे. आता तुकाराम काय, पिकासो काय, जे. कृष्णमूर्ती काय की किशोरीताई आमोणकर काय….या मंडळींचा नाट्यकलेशी तसा थेट संबंध नाही. तरी सुद्धा नाट्यकलेची मर्मस्थळे उलगडून सांगताना रवींद्र लाखे या कलावंतांच्या कलाविचारांची मौक्तिके उधृत करतात. असं करण्यामागे काय कारणं असावीत ? एक कारण हे असावं की, नाटक ही जरी लेखक, दिग्दर्शक, अभिनेते आणि तंत्रज्ञांनी एकत्र येत एकता साधत रंगमंचावर सादर करायची कला असली, तरी ती सादर करण्यासाठी आवश्यक असणार्‍या मनाच्या ज्या मशागतीची चर्चा रवींद्र लाखे आपल्या मुक्तचिंतनात करतात, तिची बीजे या नाटकाला पूरक असणार्‍या कलांच्या सादरीकरणामागील भूमिकेत अधिक ठळकपणे आढळून येतात. या अर्थाने, नाटक हा एक ‘आयसोलेटेड’ कलाप्रकार नसून या पूरक कलांच्या संयोगानेच ते आपला उत्कर्ष साधतं, याकडे त्यांनी नव्याने लक्ष वेधलं आहे. विशेष म्हणजे ‘चिंतन’ म्हटल्यावर कितीही टाळायचं म्हटलं तरी टाळता न येणारा रूक्षपणा ही मांडणी वाचताना कुठेही जाणवत नाही. या मनाच्या मशागतीतून जे हाती लागलं, त्याचं संक्षिप्त रूप सांगायचं म्हटलं तर लाखेंच्याच शब्दांचा आधार घेतो. ते म्हणतात, वय वाढतं तसं आपल्या मनावर सभ्यतेचे, कृत्रिम यमनियमांचे संस्कार होत जातात नी आपण आपल्यातली निरागसता हरवून बसतो. उपजत क्षमता हरवून बसतो. शुद्ध भावनेपासून लांब येतो. मला एक कलेचं तत्व दिसतं आहे. ते म्हणजे वजा होणं. इतकं की स्वत:तून स्वत: वजा होणं. वजा होत होत शून्यापर्यंत जाणं. पण वजा काय व्हायला पाहिजे ? आपल्या मनाची ज्या चुकीच्या संस्कारांनी मशागत झाली आहे, ते सर्व वजा होणं. ते झाल्यावर आपल्याला आपलं मनही वजा करता येईल. मग आपल्याला उरेल ते वैश्विक मन. वैश्विक मनाशी संधान साधल्याशिवाय कुठल्याही कलेतलं मर्म कळणं अवघड. एखादा क्षण जरी त्या वैश्विक मनाचा साक्षात्कार झाला, तरी कलेतला निर्मम आनंद आपल्या लक्षात येतो. पुढे त्या आनंदासाठीच आपण काम करतो. असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. यात कुठेही तथाकथित अध्यात्म नाहीय. हे अध्यात्म जे आहे त्याला मनाचे शास्त्र म्हणूया. आता हे मनाचे शास्त्र केवळ नाटक करतानाच अभ्यासणं उपयोगी पडेल असं कोण म्हणू शकेल? नाटक किंवा कुठलीही कला बाजूला राहू द्या, निव्वळ माणूस म्हणून जगतानासुद्धा मनाचं हे शास्त्र तितकंच उपयोगी पडेल असा विश्वास वाटतो.
नाट्यकलेतील जे प्रमुख घटक आहेत, ते अभिनेते आणि त्यांचा अभिनय, दिग्दर्शक आणि त्यांचं दिग्दर्शन, नेपथ्यकार आणि त्यांचं नेपथ्य, संगीतकार आणि त्यांचं संगीत तसंच इतर तंत्रज्ञ, या सगळ्यांच्याच ‘नाटक’ या कलाप्रकाराला मध्यवर्ती ठेवून आपापल्या भूमिका (Role) काय, कश्या आणि कितपत असतात किंवा असाव्यात, याचं मनोज्ञ विवेचन रवींद्र लाखेंनी या मुक्तचिंतनातून केलं आहे. नाटकाच्या माध्यमात गांभीर्याने काम करू पाहणार्‍या प्रत्येक रंगकर्मीने ते मुळातूनच वाचून काढत त्याचा शक्य तितका अंमल करावा, यातच या मुक्तचिंतनाचं सार्थक आहे, असं मला वाटतं.
या मुक्तचिंतनाचं प्रकाशन प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम यांच्या हस्ते झालं. किशोरसारख्या बुद्धिमान आणि संवेदनशील नटाने या चिंतनाचं अनावरण करावं हा काही निव्वळ योगायोग नव्हता. प्रकाशनानंतर बोलताना ते म्हणाले की, रवींद्र लाखेंचे हे मुक्तचिंतन नाटकाच्या क्षेत्रात काम करू पाहणार्‍या नुकत्याच आलेल्या मुलांसाठी नाहीय. तर उणीपुरी पंधरा ते वीस वर्षे काम केल्यानंतर म्हणजेच नाटकाचं ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर, नाटकाविषयी आपली स्वत:ची एक धारणा पक्की झाल्यानंतर पुन्हा स्वत:ला तपासून पाहण्याची इच्छा असलेल्या रंगकर्मींना ते आव्हान देणारं आहे. जे आजवर शिकलो ते ‘अनलर्न’ करण्याच्या आणि पुन्हा नव्याने शिकण्याच्या प्रक्रियेचं महत्व रवींद्र लाखेंनी या मुक्तचिंतनातून अधोरेखित केलं आहे. किशोरचं हे मत अत्यंत योग्य असलं, तरी त्यात किंचितसा भेद करत सांगावंसं वाटतं की, नाटक करत असतानाच्या सुरूवातीच्या संस्कारक्षम वयात मुलांनी या मुक्तचिंतनाचं पारायण केलं तर ‘नाटक’ या माध्यमाची त्यांची समज उत्तम तर होईलच. शिवाय, पुढील कारकीर्दीत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेसा वेळही त्यांना मिळेल.
आपल्या आयुष्याचा बहुतांश काळ ज्या ज्या रंगकर्मींनी ‘रंगधर्मी’ म्हणून व्यतीत केला, त्या सगळ्यांच्या वाटा जरी वेगळ्या असल्या तरी गंतव्य एकच होतं आणि आहे. नाटक हे केवळ रंगमंचावर सादर करण्यापुरतं मर्यादित नसून त्याचा संबंध हा तुमच्या एकूण समग्र जगण्याशीच असतो, या निष्कर्षापर्यंत येऊन त्यांच्या वाटा एकमेकांत विलीन होतात. असं विलीन होत असताना मधल्या प्रवासातलं जे चिंतन रवींद्र लाखेंनी केलं आहे, ते रंगभूमीच्या दस्तावेजीकरणातलं निर्विवादपणे एक अत्यंत महत्वाचं पान आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -