घरफिचर्ससारांशदो धारी तलवार!

दो धारी तलवार!

Subscribe

’यत्र प्रतिभा अवसर प्राप्नोति’ हे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेचे ब्रीदवाक्य आहे. आयपीएल करंडकावर संस्कृतमध्ये लिहिलेल्या या वचनाचा मराठीत अनुवाद होतो, ’जिथे प्रतिभेला मिळते संधी’. आयपीएल स्पर्धेत केवळ भारतातीलच नाही, तर जगातील खेळाडूंना दमदार कामगिरी करत प्रकाशझोतात येण्याची संधी मिळते. याच स्पर्धेमुळे भारताला जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा यांसारखे अनेक उत्कृष्ट खेळाडू मिळाले आहेत. परंतु, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, तीच गोष्ट आयपीएललाही लागू पडते. या स्पर्धेमुळे खेळाडूंना लवकर संधी आणि पैसा मिळू लागला आहे. त्यामुळे यश मिळवण्यासाठी लागणारी चिकाटी, संयम या गोष्टी आता खेळाडूंमध्ये हळूहळू कमी होत आहेत.

’इन दी एअर, श्रीसंत टेक्स इट, इंडिया विन्स’! रवी शास्त्री यांचे हे उद्गार भारतीय क्रिकेट चाहता सहजासहजी विसरू शकणार नाही. २००७ साली दक्षिण आफ्रिकेत झालेला पहिलावहिला टी-२० वर्ल्डकप पटकावण्यात महेंद्रसिंग धोनीच्या भारतीय संघाला यश आले होते. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांसारख्या खेळाडूंनी माघार घेतल्याने भारताला या टी-२० वर्ल्डकपसाठी युवा खेळाडूंची निवड करावी लागली. तसेच धोनीला पहिल्यांदाच नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. धोनीच्या नेतृत्वात भारताने हा टी-२० वर्ल्डकप जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली, ती अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत!

जोहान्सबर्गच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात धोनीच्या भारताने शोएब मलिकच्या पाकिस्तानवर अवघ्या ५ धावांनी मात केली. पाकिस्तानला सामना जिंकण्यासाठी ४ चेंडूत ६ धावांची आवश्यकता असताना जोगिंदर शर्माच्या गोलंदाजीवर मिस्बाह-उल-हकने स्कूपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो फसला. त्याने मारलेला चेंडू हवेत गेला आणि श्रीसंतने त्याचा झेल पकडल्याने भारताने हा सामना जिंकला. त्यावेळी शास्त्रींनी ’ते’ उद्गार काढले होते. भारतासाठी २००७ टी-२० वर्ल्डकप अविस्मरणीय आणि भारतीय क्रिकेटच्या नव्या पर्वाची नांदी करणारा ठरला.

- Advertisement -

भारताला टी-२० मध्ये यश मिळाल्याने क्रिकेटच्या या प्रकारात काही नवा प्रयोग करण्याचा विचार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) सुचला. या बीजाचे रोपटे होऊन पुढील वर्षी म्हणजेच २००८ मध्ये इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेला प्रारंभ झाला. आयपीएल संघांना शाहरुख खान (कोलकाता नाईट रायडर्स), प्रीती झिंटा (किंग्स इलेव्हन पंजाब), शिल्पा शेट्टी (राजस्थान रॉयल्स) या बॉलिवूड स्टार्ससह अंबानी (मुंबई इंडियन्स) यांसारखे यशस्वी उद्योगपती संघमालक म्हणून लाभल्याने या स्पर्धेला ग्लॅमर असणार हे निश्चितच होते. परंतु, पुढे जाऊन केवळ ग्लॅमर आणि पैसा याच बाबतीत नाही, तर क्रिकेटच्या बाबतीतही आयपीएल स्पर्धा किती मोठी होईल याची बहुतेकच कोणी कल्पना केली असेल.

’वेल बिगन इज हाफ डन’ अशी इंग्रजीत म्हण आहे. आयपीएल स्पर्धेला दमदार सुरुवातीची गरज होती आणि ती त्यांना मिळाली. पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सच्या ब्रेंडन मॅक्युलमने नाबाद १५८ धावांची खेळी केली आणि मग काय, क्रिकेटवेड्या भारतात आयपीएल स्पर्धेची लोकप्रियता वाढत जाणार हे निश्चितच झाले. त्यातच पहिल्या मोसमात कोणालाही अपेक्षा नसताना शेन वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएलचे जेतेपद पटकावल्याने या स्पर्धेत कोणालाही कमी लेखता येऊ शकणार नाही, हे स्पष्ट झाले.

- Advertisement -

जसजशी वर्षे सरत गेली, मोसम होत गेले, तसतशी आयपीएलची लोकप्रियता आणि या स्पर्धेतून खेळाडूंना व बीसीसीआयला मिळणारा पैसा वाढत गेला. परंतु, त्याचसोबत क्रिकेटचा आणि खेळाडूंचा दर्जाही सुधारत गेला, हेसुद्धा तितकेच खरे. भारताच्या युवा खेळाडूंना जगभरातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंसोबत खांद्याला खांदा लावून खेळता आले. त्यांच्याकडून नवनव्या गोष्टी शिकण्याची, त्यांचे अनुभव जाणून घेण्याची संधी मिळाली. चाहत्यांनाही विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांसारख्या जागतिक दर्जाच्या खेळाडूंना एकत्र खेळताना पाहता आले.

’यत्र प्रतिभा अवसर प्राप्नोति’ हे आयपीएलचे ब्रीदवाक्य आहे. आयपीएल करंडकावर संस्कृतमध्ये लिहिलेल्या या वचनाचा मराठीत अनुवाद होतो, ’जिथे प्रतिभेला मिळते संधी’. आयपीएल स्पर्धेत केवळ भारतातीलच नाही, तर जगातील खेळाडूंना दमदार कामगिरी करत प्रकाशझोतात येण्याची संधी मिळते. याच स्पर्धेमुळे भारताला जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा यांसारखे अनेक उत्कृष्ट खेळाडू मिळाले आहेत.

या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर गेला होता. या दौर्‍यात झालेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताकडून तब्बल २० खेळाडू खेळले. यापैकी बहुतांश खेळाडूंची भारतीय संघात एंट्री ही त्यांच्या आयपीएल स्पर्धेतील कामगिरीमुळे झाली होती. या दौर्‍यात भारताच्या पाच खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या खेळाडूंपैकी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी, तसेच सलामीवीर शुभमन गिल यांनी भारत ’अ’ संघाकडून खेळताना आणि रणजी करंडकात चांगली कामगिरी केली होती. परंतु, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आणि डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नटराजन यांची गोष्ट जरा वेगळी होती.

तामिळनाडूच्या या दोन खेळाडूंना कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळाली, ती केवळ त्यांच्या आयपीएल स्पर्धेतील कामगिरीमुळेच! नटराजनला कसोटीत पदार्पण करण्याआधी केवळ २० प्रथम श्रेणी सामन्यांचा अनुभव होता. दुसरीकडे सुंदर तीन वर्षांत एकही प्रथम श्रेणी सामना खेळला नव्हता. परंतु, त्यांचा आयपीएलमध्ये खेळ पाहिल्याने काही मुख्य खेळाडूंना दुखापत झाल्यावर या दोघांना कसोटी संघात स्थान देण्याचा निवड समितीला विश्वास वाटला आणि या दोघांनी त्यांना ब्रिस्बन कसोटीत मिळालेल्या संधीचे सोने केले.

आयपीएल स्पर्धेत खेळाडूंना सर्वोत्तम खेळाडूंसह आणि सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध खेळायला मिळते. त्यामुळे दडपण कसे हाताळायचे आणि मोक्याच्या क्षणी कशी चांगली कामगिरी करायची हे ते शिकतात. रिषभ पंतसारखा खेळाडू ज्यावेळी दिल्ली कॅपिटल्स संघात प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगच्या मार्गदर्शनात खेळतो, तेव्हा त्याचा खेळ बहरतो आणि तो आंतरराष्ट्रीय पातळीवरही दमदार कामगिरी करण्यास सुरुवात करतो. या स्पर्धेमुळेच रोहित शर्मासारख्या प्रतिभावान, पण कामगिरीत सातत्याचा अभाव असलेल्या खेळाडूला मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळते आणि मग तो मागे वळून पाहत नाही. मागील दशकभरात भारतीय क्रिकेटला मिळालेल्या यशात आयपीएलचा सिंहाचा वाटा आहे. परंतु, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात आणि आयपीएल स्पर्धाही याला अपवाद नाही.

आयपीएलमुळे आता खेळाडूंना लवकर संधी आणि पैसा मिळू लागला आहे. आयपीएलला २००८ मध्ये सुरुवात झाली, तेव्हा धोनी सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला चेन्नईने ९.५ कोटी रुपयांत खरेदी केले होते. परंतु, मागील आयपीएल खेळाडू लिलावात याच चेन्नई संघाने एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या कृष्णप्पा गौतमला ९.२५ कोटी रुपयांत खरेदी केले. झटपट मिळणारा हा पैसा, ग्लॅमर आणि ओळख यामुळे यश मिळवण्यासाठी लागणारी चिकाटी, संयम या गोष्टी आता खेळाडूंमध्ये हळूहळू कमी होत आहेत. तसेच, आपल्या देशासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहणार्‍या खेळाडूंचीही संख्या आता कमी होत चालली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम खेळाडू मानला जातो. तसेच तो जगात सर्वाधिक पैसे कमावणारा क्रिकेटपटू आहे. मात्र, आजही तो कसोटी क्रिकेटला प्राधान्य देतो. परंतु, आयपीएल आणि टी-२० क्रिकेटमुळे खेळाडूंची मानसिकता आता हळूहळू बदलत आहे. केवळ तीन-साडे तीन तास मैदानात उतरून चाहत्यांचे मनोरंजन करण्यात त्यांना समाधान वाटू लागले आहे. त्यामुळे आयपीएलने भारतीय क्रिकेटला खूप गोष्टी दिल्या असल्या तरी काही गोष्टी हिरावून घेतल्या, हेही तितकेच खरे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -