‘मी’च्या मनातील चीड आणि चिडचिड !

‘अतीत कोण? मीच...’ हा कथासंग्रह आहे का? नक्कीच नाही. मग कादंबरी...? म्हणता येईल. ललित लेख आहेत का? म्हणता येईल. वैचारिक? आहेच. कविता... येतातच अधूनमधून, रसग्रहण आहे का? ते आहे... स्वैरलेखनही आहे. तर हा ‘मी’ नावाच्या पात्राच्या मनात येणार्‍या गोष्टींचा कोलाज आहे. याला एक ठाशीव रूप नाही, पण ‘मी’ च्या मनात पण तसं काही नसणार, त्यामुळे तुमच्यापर्यंत ते थेट-सरळसोट पोहोचवण्यात लेखक प्रसाद कुमठेकर यशस्वी झालाय.

शेवाळ काळ्या रंगाच्या मुखपृष्ठावर पांढर्‍या स्केचमध्ये एका तरुणाचा चेहरा दिसतो. त्याने चष्मा घातलाय. काही रेषा येऊन त्याच्या चेहर्‍याला भेदून आरपार जात आहेत. डोळे, ओठ, दात, मेंदू, कान, नाक, घसा… या सगळ्यातून सूर्य-किरणे घुसवून जे काही दिसेल ते ते लेखकाने टिपून ठेवलं आहे. लेखक प्रयोगशील आहे. त्यानं या आकृत्या प्रयोगवहीत काढल्याप्रमाणे खाली तर्क-अनुमान पण लिहून ठेवले आहेत. मी आकृती, एक्स रे, विज्ञान, अनुमान… हे सगळे शब्द वापरतो, कारण यातल्या दुसर्‍याच प्रकरणाचं नावच ‘मी चा स्वॅब’ हे आहे. मुखपृष्ठ असं आणि दुसरंच प्रकरण ‘स्वॅब’ बद्दल! हे म्हणजे कसं, जेम्स बॉण्डच्या सिनेमातल्या बिगिनिंगसारखं झालं.

जे काही आहे ते गोळीबंद आणि दिलखेचक! लेखकाने ‘मी’ नावाच्या पात्राभोवती सगळी प्रकरणे गोवली आहेत. प्रत्येक प्रकरणात ‘मी’ येतोच. सुरुवातीची बरीचशी प्रकरणंही मुंबईशी सबंधित आहेत. मुंबईत सगळं कसं ‘अ‍ॅज सून अ‍ॅज पॉसिबल’ (एका प्रकरणाचे नाव) लागतं ना? शिवाय मुंबई आणि मुंबईची ट्रेन, ‘घुसावं की न घुसावं?’, ‘ना खाएंगे न खाने देंगे’… वगैरे प्रकरणं मुंबईच्या लोकलट्रेनच्या प्रवासात घडतात. सही है हे पालुपद लावणारा मिसरा, सतत कशावर न कशावर फेंदारलेला जगताप, सु छे? करत जगावर धार सोडणारा जीग्नेस हे सगळी पात्रे मनात घोळत राहतात.

मुंबईच्या टिपिकल माणसाला मुंबई किंवा कोकण सोडून महाराष्ट्रातल्या इतर भागाबद्दल काही माहीत नसणं, बाकी जगाशी त्याचा संबंध नसणं याची ‘मी’ ला चीड आहे. ती सतत दिसत राहते. जगताप मराठवाड्यातलाच आहे. ‘मी’ पण, मात्र यवतमाळ या गावाबद्दल सु छे? असं विचारणार्‍या लोकांना ‘मी’ यवतमाळ हे गाव काय आहे? हे सुनावतो. त्यावेळी जगताप मराठवाड्याचा असूनही विदर्भाच्या बाजूने उभा राहतो. त्यातही ‘मी’ ला दुर्लक्षित असल्याची ठसठस आहे. ती वारंवार दिसत राहते. पुढे हळूहळू ही प्रकरणं वेस्टर्न किंवा सेन्ट्रल लाईन सोडतात आणि मेन लाईनने बाहेर पडतात. मग थेट ‘मी’च्या आत घुसू लागतात. आता फक्त एक्स रे नाही, तर सीटी स्कॅनचा मामला सुरू होतो.

‘रंडुल्या वानाचं’ या कथेत ‘मी’ ची भागीरथीबाई वाचकाला धो-धो धुवून काढते. मध्येच ‘मी’ च्या प्रेमाला सुरुंग लावणार्‍या एकीचा भाग येतो, पण त्यातही प्रेमाचा इजहार करण्यासाठी गीतकार समीर, गायक कुमार सानू कसे पाठीशी येऊन उभे राहतात ? पण प्रेमाचा इजहार करण्यात पॅन्ट (031) वर अंडरपॅन्ट घातलेला सुपरमन कच खातो. आणि मग ‘मी’ प्रेमकवितांच्या जगातून कविता या क्षेत्रात कसा प्रवेशकर्ता होतो? या सगळ्या गोष्टी येत जातात. पुढे नदीचं मूळ, गदिमा, कोविड, तो हाताळण्याची आपली अजब पद्धत, व्यवस्थेचा वाजलेला बाजा, थाळीनाद, तसेच एका युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक अशा विषयांवरची प्रकरणे पुस्तकातून येत जातात. ही सगळीच प्रकरणे एका बैठकीतून उठून, विस्थापित होऊन, दुसर्‍या बैठकीत जाऊन बसलेल्या माणसाची स्वगते, भाषणे, संवाद वाटत राहतात.

‘मुंबईत स्थायिक मात्र आयुष्यात विस्थापित’ हा शिक्का बसलेल्या माणसाचं अस्तित्व ट्रेनच्या बाहेर लटकत राहिलेल्या माणसासारखं असतं. या माणसांचं हे चित्रण वाटतं. प्रसाद हे सगळं खूप आतून, उचंबळून येतंय म्हणून लिहितोय. मधून मधून तो ‘कोहं कोहं’ करतोय ते त्यामुळेच. त्याला आपल्या पुराणकथा, कहाण्या, चालीरीती, रूढी, परंपरा यांची चौकट खूप स्वच्छ माहीत आहे. त्याच्या काही गोष्टींची त्याला ओढही वाटते आहे. पण सगळंच कुठेतरी हरवत जात राहतंय याचा त्याला त्रास होतोय. झाडे संपणे, नद्यांचे अस्तित्व धोक्यात येणे, मुंबईतला पूर, नवनवीन रोगांची आंदोलने, त्या सगळ्या टेस्ट्स करत स्वतःचे शरीर जाळत राहणे, त्याची चाळणी करणे, या गोष्टींचा त्याला त्रास होतो.

यातील ‘मी’ चा बाप त्याला सारखा काठी टोचत राहतो ना अगदी तसा ! हा मी भविष्याची अंत्ययात्रा समोरून पाहतो आहे. त्यात मी जळतोही आहे. प्रसाद हे सगळं मांडू शकतो, त्याची ताकद त्याने अनुभवातून कमावली आहे. सरावलेला बॅट्समन जसे नवनवीन कव्हर ड्राईव्ह, पूल, हुक शॉट्स मारून आपल्याला थक्क करत राहतो, तसा प्रसाद पुस्तकातल्या त्याच्या शब्दांनी चकित करत राहतो. आणि सगळं कसं शैलीदार! स्टाईलमध्ये ! पण ही स्टाईल रॉ आणि अस्सल आहे. यातील प्रकरणाची शीर्षकं भारी आहेत. काहीही झालं तरी लेखक त्याची माती सोडत नाही.

मराठवाड्याच्या मातीला एक उर्मटपणा आहे. पण तो नागरी माणसासारखा वच्चकन बाहेर येत नाही, तो तिरकसपणाचा स्माईली घेऊन येतो. त्यामुळे ‘तुम्हा आम्हा सामान्य गुणी जनांसारखंच’ सगळ्यांना तो कळेलच असं नाही. यातील दोन नोंदी सांगतो, एक-ट्रेनमधली पात्रं एकत्र येऊन जे काही करत राहतात. ते पुढं तसंच चालू राहिलं असतं तर एक वेगळी मजा नक्कीच आली असती. प्रसाद कुमठेकर या लेखकाचं माणूसपण जोखण्याचं कसब मजेशीर आहे. त्याला माणसं त्या त्या भागातल्या इतिहासातल्या घटनांच्या संदर्भाने दिसतात. त्यानं यापुढे अनुभवलेली माणसांची व्यक्तीचित्रणे करून पहावीत, असे वाटत राहते.

पुस्तकाचे नाव – अतीत कोण ? मीच…
लेखक – प्रसाद कुमठेकर
प्रकाशन – पार पब्लिकेशन्स
पाने – 204, किंमत -२५० रुपये

–शार्दुल सराफ