चूक त्यांचीच असते का..?

मोबाईल हे मानवाच्या हितासाठी झालेले संशोधन होते, पण मात्र आता त्याची व्याख्याच सध्याच्या युवा पिढीने बदलून ठेवल्याचे दिसून येत आहे. कमी वयातच हातात मोबाईल आल्याने युवक त्याचा उपयोग आईवडिलांकडून समाधान न झालेल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करतात. सर्वात चिंतेचा विषय म्हणजे पॉर्न पाहण्यात भारताचा जगातील पहिल्या 10 देशांमध्ये समावेश होतो. पब-जी, फ्री-फायर, ब्ल्यू-व्हेल या मोबाईल गेम्समुळे तर लाखो युवकांना आपले आयुष्य गमवावे लागले आहे. हे गेम्स युवकांमध्ये आक्रमकता निर्माण करतात आणि या वाढलेल्या आक्रमकतेमुळे युवकांच्या हातून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडतात.

युवकांकडे देशाचे भविष्य किंवा चेहरा म्हणून पहिले जाते. स्वामी विवेकानंद म्हणायचे मला असा तरुण मिळवून द्या की जो शरीराने तंदुरुस्त आहे, ज्याच्या इच्छा आणि विकार ताब्यात आहेत, त्याचे मन आरशासारखे पारदर्शक व स्वच्छ आहे तर मी जगात कुठलाही चमत्कार करून दाखवेन, परंतु सध्याची युवा पिढी चुकीच्या आणि हिंसेच्या मार्गावर उतरली आहे. काल-परवा अमेरिकेच्या टेक्सास शहरात एका 18 वर्षांच्या युवकाने शाळेत घुसून 18 विद्यार्थी 3 शिक्षक आणि 2 इतर नागरिकांची गोळ्या घालून अमानुषपणे हत्या केल्यात. या घटनेने संपूर्ण अमेरिका हादरली.

या हल्ल्याच्या घटना अलीकडच्या नसून 1999 मध्ये कोलोरोडो येथील कोलबूनी हायस्कूलमध्ये घुसून दोन किशोरांनी 12 विद्यार्थी आणि एक शिक्षकाला ठार केले होते. मार्च 2005 मध्ये रेड लेक हायस्कूल मध्ये एक 16 वर्षाच्या युवकाने शाळेत घुसून 5 विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकाला ठार मारले. 11 मार्च 2009 मध्ये 17 वर्षीय अल्बर्ट लीन रिअलक्युले याने ही शाळेत घुसून 15 लोकांना ठार केले होते. हे प्रमाण रशिया आणि अमेरिका सारख्या प्रगत देशांमध्ये जास्त दिसून येते. आपल्याला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की या युवकांमध्ये अल्पवयात ही हिंमत येते तरी कुठून..? या सर्व घटनांना युवकच कारणीभूत आहेत का..? किंवा युवकांकडून अशा घटना का होतात..? याचा अभ्यास करणे फार महत्वाचे ठरेल.

साधारणत: 12 ते 25 वयोगटातील युवकांचे गुन्हे करण्याचे प्रमाण अधिक आहे. गन व्हॉइलेन्स अर्चीवच्या अहवालानुसार एकट्या अमेरिकेत 2022 या चालू वर्षात 212 पेक्षा अधिक युवकांकडून गोळीबाराच्या घटना घडल्या. युवकांच्या गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीला वाढवा देणारे सर्वात मोठे कारण म्हणजे नैराश्य. गेल्या काही वर्षात भारतातही बाल गुन्हेगारांचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. याला कारणीभूत जितके युवक आहेत त्यापेक्षा जास्त त्या युवकांचे आई वडील आहेत. आपला मुलगा योग्य मार्गावर चालतोय का.. त्याला कुठल्या गोष्टींचा काही तान आहे का, हे समजूनही घेत नाही. फक्त आपले घर आणि कामाचे ठिकाण इतकाचा हल्लीच्या आईवडिलांचा प्रवास बनलाय. लहान असतानाच बाळ रडायला लागले की त्याच्या हातात सरळ सरळ मोबाईल देऊन त्याला शांत केले जाते. पालकांच्या अशा या वागण्यामुळे लहानपणापासूनच मुलांच्या मनावर नकारात्मक परिणाम व्हायला सुरुवात झाली आहे.

मागच्या काही वर्षांपूर्वी संध्याकाळी जेवताना परिवारात होणार संवाद आता फक्त जेष्ठांच्या तोंडून ऐकण्यापुरता मर्यादित राहिला आहे. महत्वाचे म्हणजे लहान मूल किवा युवक यांना खूप प्रमाणावर प्रश्न पडतात, मग ते प्रश्न कुठल्याही स्वरूपाचे असू शकतात. त्यात शारीरिक, मानसिक किंवा लैंगिक प्रश्न असू शकतात. काही संशोधनातून असे समोर आले आहे की 12 ते 25 वयोगटातील मुलांना सर्वात जास्त लैंगिक प्रश्न पडतात आणि बदलत्या वयामुळे ते सहाजिकच आहे. परंतु पालकांच्या ते लक्षात येत नाही. घरात साधी टीव्हीवर एखादी बोल्ड जाहिरात किंवा एखादा सीन जरी सुरू झाला तरी पालक क्षणात तो चॅनल बदलतात आणि या सर्व गोष्टींमुळे युवकांच्या मनात त्याबाबत कुतूहल निर्माण होते आणि त्यांच्या शंकेचं समाधान झाले नाही की मग ते त्याच्या प्रश्नाचे उत्तर समाजातून मिळवण्याचा प्रयत्न करतात. तेथेच ते फसतात. या नासमजपणामुळे त्यांच्या हातून बलात्कारासारखे गंभीर गुन्हे घडतात. सध्याच्या आधुनिक युगात तर वयाच्या दहाव्या बाराव्या वर्षीच मुलांच्या हातात मोबाईल दिला जातो.

मोबाईल हे मानवाच्या हितासाठी झालेले संशोधन होते, पण मात्र आता त्याची व्याख्याच सध्याच्या युवा पिढीने बदलून ठेवल्याचे दिसून येत आहे. कमी वयातच हातात मोबाईल आल्याने युवक त्याचा उपयोग आईवडिलांकडून समाधान न झालेल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करतात. सर्वात चिंतेचा विषय म्हणजे पॉर्न पाहण्यात भारताचा जगातील पहिल्या 10 देशांमध्ये समावेश होतो. पब-जी, फ्री-फायर, ब्ल्यू-व्हेल या मोबाईल गेम्समुळे तर लाखो युवकांना आपले आयुष्य गमवावे लागले आहे. हे गेम्स युवकांमध्ये आक्रमकता निर्माण करतात आणि या वाढलेल्या आक्रमकतेमुळे युवकांच्या हातून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडतात आणि या सर्व घटनांमध्ये जितके युवक कारणीभूत असतात त्यापेक्षा अधिक त्यांचे पालक कारणीभूत ठरतात. हातात पुस्तक देण्याच्या वयात त्यांच्या हातात मोबाइल ठेवला जातो, परंतु त्याचा वापर कसा आणि कोणत्या कामांसाठी करावा हे शिकवायचेच पालकांकडून नेमके राहून जाते आणि त्यामुळेच युवक मोबाईलचा वापर करून गुन्हेगारीकडे खेचले जातात. या सर्व गोष्टींवर येणार्‍या काळात लक्ष देणे फार महत्वाचे ठरणार आहे. पालकांनी मुलांना आवश्यक नसलेल्या गोष्टींसाठी नकार द्यायला शिकले पाहिजे.

पालकांनी आपल्या पाल्यांना सर्वच गोष्टी अगदी सहजपणे उपलब्ध करून दिल्या तर त्याची जाणीव राहत नाही त्यामुळे त्यांना सर्व गोष्टी जाणीव करूनच दिल्या गेल्या पाहिजे, जणेकरून त्यांना त्याची खरी किंमत कळेल. गुन्हेगार हा लहानपणापासूनच गुन्हेगार नसतो त्याला परिस्थिती गुन्हेगार बनवते. सर्वाधिक युवकांची लोकसंख्या भारतात आहे. 10 ते 14 वयोगटातील 35.5 कोटी युवक भारतात आहेत. युवा हा भारताचा चेहरा, ताकद आणि भविष्य आहे. उद्याचा भारत कसा असेल हे आजच्या युवकांच्या कामगिरीतून ठरेल. उठा जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका, या स्वामी विवेकानंदांच्या विचारसरणीचे पालन करुया आणि बालगुन्हेगारीमुक्त जग तयार करुया.

–प्रमोद उगले