घरफिचर्ससारांशदिल तो बच्चा है जी...

दिल तो बच्चा है जी…

Subscribe

जगण्याच्या धबडग्यात आयुष्य एकट्याने गेलं असेल किंवा आपलं जीवन कसं व्यतीत होतंय याचाही थोडं थांबून विचार करण्याची उसंत मिळालेली नसेल, अशा अनियंत्रित घडामोडींमध्ये गुरफटलेलं असताना आपल्या आयुष्यात प्रेमाची शक्यता व प्रेमाची हाक यापूर्वी ऐकू आली नसेल, अशावेळी प्रौढावस्थेत प्रेम करण्याची नि मिळवण्याची संधी मिळाल्यावर व्यक्ती विचलित होणारच ना! मात्र आपलं तारुण्य तर ओसरलं आहे आणि आपला कल आध्यात्मिकतेकडे झुकलेला असल्याने वृद्धावस्था ईशस्मरणात घालवता येईल असा विचार करणारी व्यक्ती आयुष्यात प्रेमाचं आगमन झाल्याने थोडं सैरभैर होणं साहजिकच आहे. गुलजारचं ‘दिल तो बच्चा हैं जी,’ हे गाणं म्हणजे एक आशयगर्भ काव्य!

रामन मारू, विशाल भारद्वाज निर्मित, अभिषेक चौबे दिग्दर्शित ‘इश्कीया’ हा चित्रपट २०१० मध्ये प्रदर्शित झाला होता. नासीरुद्दीन शाह, विद्या बालन, अर्शद वारसी हे यातले प्रमुख कलाकार. कथा गुलजार तर पटकथा विशाल भारद्वाज, सब्रिना धवन, अभिषेक चौबे, गुलजार यांनी लिहिली. गाणी अर्थातच गुलजारची तर संगीत विशाल भारद्वाज यांचं. यातली गाणी दिल तो बच्चा है जी… (राहत फतेह अलीखान), इब्न-इ-बतुना…(सुखविंदरसिंग, मिकासिंग), बडी धीरे जली…, अब मुझे कोई…( रेखा भारद्वाज)श्रवणीय आहेत. यातल्या ‘दिल तो बच्चा है जी…’ या अनवट गाण्याचा आस्वाद घेऊ या…

सिनेसंगीत समीक्षकांच्या मते चित्रपटातल्या सिच्युएशनच्या दृष्टीने हे २००१ ते २०१० या दशकातल्या उत्कृष्ट गाण्यांपैकी एक आहे. हे गाणं एकप्रकारे चित्रपटाचं कथानक, स्वरूप, प्रकृती नि परिस्थितीशी एकरूप असणार्‍या पन्नास व साठच्या दशकातल्या गाण्याची आठवण करून देतं. प्रेमाला वय-रंग-रूप-जात-पंथ-धर्माचं बंधन नसतं. एखाद्यावर जीव जडणं ही एक अकस्मात घटना होय. प्रेमाचं आपल्या आयुष्यात येणं पाहुण्यासारखं असतं. एखादी व्यक्ती (स्त्री असो वा पुरुष) शेकडो प्रकारची बंधनं आपल्यावर लादून घेऊन जगणं नाकारत असेल आणि मोकळ्या मनाने नि बुद्धीने जगत असेल तर प्रेमाची हाक कधीही ऐकायला येऊ शकते. वय कितीही असो प्रेमामुळे व्यक्ती हमखास बदलतेच. शिवाय व्यक्ती उच्चशिक्षित असो वा अल्पशिक्षित प्रेमाच्या स्वप्नांमध्ये हरवून जाते.

- Advertisement -

तिच्या प्रेमाची कल्पना पतंगासारखी आकाशात उंच भरारी घेत असते. असं म्हणतात की, प्रौढावस्थेत प्रेमात पडलेल्या लोकांनाही किशोरवयीनांसारखं वाटायला लागतं नि ते तसे वागायला लागतात. आपण प्रेमात पडलो असल्याची जाणीव झाल्यावर अनेक भाव-भावना निर्माण होतात, ज्या या वयात जाणवणार नाहीत असं आधी वाटलेलं असतं. एकाचवेळी अनेक विरोधाभासी भावना त्यांना स्पर्शून जातात. परिपक्व नि अनुभवी असूनही नवथर प्रेमिकांना जी भीती नि अस्वस्थता वाटते तसलाच अनुभव यांनाही येतो. काही कालावधीनंतर त्यांना आपल्या वयाचं भान येतं. मग योग्य व अयोग्याचं वास्तव समजून जगाची काळजी त्यांना वाटू लागते. राहावलंही जात नाही आणि सहनही होत नाही, अशी त्यांची अवस्था होते. जर त्यांनी आपली प्रेमभावना व्यक्त केलेली नसेल तर मग ती करण्यासाठीही अधीर होतात. आपल्या जीवलगाला हे समजल्यावर कसा प्रतिसाद मिळेल याची त्यांना चिंता वाटते. गुलजारने प्रेमात पडलेल्या प्रौढावस्थेतल्या पुरुषाच्या मनोविश्वाचा अत्यंत तरलतेने वेध या गाण्यातून घेतलाय.

मल्लिका पुखराज यांनी गायलेली ‘अभी तो मैं जवान हूँ…’ ही प्रौढ पुरुषाच्या भावनांची अभिव्यक्ती करणारी गझल प्रसिद्ध आहे. याच आशयाची पुनरावृत्ती गुलजारने या नितांत सुंदर गाण्यातून केली आहे, ज्यातून वर्षानुवर्षे लोकांच्या भावना व्यक्त होत राहतील ! त्यांनी या गाण्यातून केवळ भावनांचे प्रकटीकरण न करता आपल्या सवयीनुसार प्रेम भावनेच्या पलीकडे जात यांस सुफी शैलीचा मुलामा दिलाय.

- Advertisement -

ऐसी उलझी नजर उनसे हटती नहीं
दात से रेशमी डोर कटती नहीं
उम्र कब की बरस के सफेद हो गई
कारी बदरी जवानी की छटती नहीं
वल्लाह ये धडकन बढने लगी हैं
चेहरे की रंगत उडने लगी हैं
डर लगता हैं तन्हा सोने में जी
दिल तो बच्चा हैं जी, थोडा कच्चा हैं जी…

किसको पता था पहलू में रखा
दिल ऐसा पाजी भी होगा
हम तो हमेशा समझते थे कोई
हम जैसा हाजीही होगा
हाय जोर करें, कितना शोर करें
दिल सा कोई कमीना नहीं
कोई तो रोके, कोई तो टोके
इस उम्र में अब खाओगे धोखे
डर लगता हैं इश्क करने में जी…

ऐसी उदासी बैठी हैं दिल पे
हंसने से घबरा रहे हैं
सारी जवानी कतरा के काटी
पीडी में टकरा गए हैं
दिल धडकता हैं तो ऐसे लगता हैं वो
आ रहा हैं यही देखता ही न हो
प्रेम की मारे कटार रे
तौबा ये लम्हे कटते नहीं क्यू
आंखो से मेरी हटते नहीं क्यू
डर लगता हैं खुद से कहने में जी
दिल तो बच्चा हैं जी… थोडा कच्चा हैं जी…

मनाला कोणावर तरी अनुरक्त व्हायचं होतं नि ते झालंही. वय कितीही असो मनाच्या कुठल्याशा कोपर्‍यात एक लहान मूल सतत बागडत असतं. संधी मिळेल तेव्हा हे आत दडलेलं मूल दंगा करतं. जेव्हा आपल्या केसांचा रंग रुपेरी होऊन बराच काळ लोटलेला असतो तेव्हा आपण कोणाच्या तरी प्रेमात पडू अथवा कोणीतरी आपल्या प्रेमात पडेल याची शक्यता धूसर असते. जगण्याच्या धबडग्यात आयुष्य एकट्याने गेलं असेल किंवा आपलं जीवन कसं व्यतीत होतंय याचाही थोडं थांबून विचार करण्याची उसंत मिळालेली नसेल, अशा अनियंत्रित घडामोडींमध्ये गुरफटलेलं असताना आपल्या आयुष्यात प्रेमाची शक्यता व प्रेमाची हाक यापूर्वी ऐकू आली नसेल, अशावेळी प्रौढावस्थेत प्रेम करण्याची नि मिळवण्याची संधी मिळाल्यावर व्यक्ती विचलित होणारच ना! मात्र आपलं तारुण्य तर ओसरलं आहे आणि आपला कल आध्यात्मिकतेकडे झुकलेला असल्याने वृद्धावस्था ईशस्मरणात घालवता येईल असा विचार करणारी व्यक्ती आयुष्यात प्रेमाचं आगमन झाल्याने थोडं सैरभैर होणं साहजिकच आहे.

गुलजारचं हे गाणं म्हणजे एक आशयगर्भ काव्य! तेवढीच सुरेल चाल विशाल भारद्वाजने गाण्याला लावली आहे. गाण्याच्या सुरुवातीची हळूवार, रेशमी आणि कोमल सुरावट खास आपला असा माहोल निर्माण करते. हे संगीत केवळ कानांनाच सुखावणारे नाही तर थेट काळजात खोलवर झिरपत जाऊन श्रोत्यांना एका वेगळ्याच भावविश्वात अलगद घेऊन जातं. गाण्याचा सारा अर्क नासीरने आपल्या अभिजात नि खानदानी अभिनयातून प्रेक्षकांपर्यंत विलक्षण नजाकतीने पोहचवला आहे. विद्या बालनच्या अभिनयातून दिग्दर्शकाने शृंगार रसाचा मोहक नि मादक परिपोष घडवलाय. नासिरच्या तोडीस तोड असा तिचा पूरक अभिनयाविष्कार आहे. सिनेमेटोग्राफर मोहना कृष्णा यांनी या गाण्याचं अतिशय लाजवाब चित्रीकरण केलंय. राहतने गायकीतून गुलजारचा एकेक शब्द त्यातल्या गहिर्‍या नि उत्कट भावार्थासह अक्षरशः जिवंत केला आहे. संपूर्ण सिनेमाचा सारांश म्हणजे हे गाणं! सलाम गुलजार-विशाल भारद्वाज आणि राहतभाई!

– प्रवीण घोडेस्वार 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -